Saturday, October 1, 2011

जिथे सागरा सरिता मिळते..!

पणजी हे गोवा सरकारच्या मालकीचे बंदर. मांडवी नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर उभ्या राहणाऱ्या बोटीत खनिज माल चढविण्याची दृश्‍ये कित्येकदा पणजीतूनही दिसतात. या बंदराला मुरगाव पोर्ट ट्रस्टने हरकत घेतली आहे. पणजी बंदराला धक्का नाही, येथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही. सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना नाही असे म्हणूनएमपीटीने पणजी बंदरालाच आक्षेप घेतला आहे. हे बंदर फक्त कागदावरच अस्तित्वात आहे असेही एमपीटीचे म्हणणे आहे. या नदीच्या मुखाशी जाण्याची संधी भारतीय नौदलाच्या सौजन्याने मला मिळाली होती.
छोट्या नौकेला मीटर अर्धा मीटर वरखाली फेकणाऱ्या लाटा, जवळून जाणाऱ्या मोठाल्या बार्ज, दूरवर दिसणारे राजभवन आणि ठिपक्‍यागत दिसणारे पणजी शहर हे वर्णन आहे मांडवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगम स्थळाचे. दोनापावलच्या राजभवनाला पाण्यात समांतर असे हे ठिकाण आहे. नदीचे मुखही असेही नाव या भागाला आहे. मुंबई ते कोची जलमार्गावरील नौदलाच्या नौकानयन मोहीम पाहण्याच्या निमित्ताने या भागाला मी भेट दिली होती. दुपारी कडक उन्हात नौदलाच्या आयएनएस मांडवी या अकादमीच्या छोट्या नौकेतून वेरे बेती येथील बोट क्‍लबकडून निघताना नदीचे वरवर शांत वाटणारे पात्र एवढे खोड्या काढणारे असेल याची सुतराम कल्पना आली नाही. नौका निघाली तर नदीच्या पलीकडील काठावर पूर्वी नदी परिवहन खात्याचे कार्यालय होते तो परिसर ठळकपणे दिसत होता. हळूहळू नौकेच्या चालकाने वेग वाढविला आणि लाटा व नौका यांचा पाठशिवणीचा खेळच जणू सुरू झाला. लाटांच्या हेलकाव्याने खालीवर होणारी नौका क्षणातच लाटांवर स्वार होत पुढे जात होती. हळूहळू पणजी शहर मागे पडत गेले नि पर्यटकांनी सदा गजबजलेल्या मिरामारचा किनारा नजरेच्या टप्प्यात आला. आपणाला कोणी पाहत नाही अशा स्थितीत मिरामार परिसरात गप्पागोष्टींसाठी बसलेले पाण्यातून कसे दिसतात याचेही दर्शन घडले. दुसऱ्या बाजूला वेरे बेती आणि त्यापुढील नेरुलच्या परिसरात किनारी भागात लोकांच्या चाललेल्या हालचाली दिसत होत्या.नौका पुढे पुढे सरकत गेली आणि दोनापावलच्या राजभवनाच्या इमारतीचे दर्शन घडले. त्याचे लाल छप्पर ठळकपणे नजरेत भरत होते. दुसऱ्या बाजूला आयएनएस मांडवी या नौदल अकादमीतील इमारतीही दिसू लागल्या होत्या. दीक्षांत संचलनासाठी उपस्थित राहण्यासाठी गेल्या दशकभरात अनेकदा अकादमीत जाण्याचा योग आला होता. तेथून परतताना मांडवीतून जा ये करणाऱ्या नौकांचे दर्शनही घडत होते. आता मात्र नदीतून अकादमी कशी दिसते हे पाहण्याची संधी मिळाली. त्याचेही लाल छप्पर राजभवनाच्या छप्पराची आठवण करून देणारे. मांडवी नदी अरबी समुद्रास मिळते ते ठिकाण म्हणजे नदी की सागर याचा थांग लागणे कठीण. त्याच स्थितीत हेलकावे खात नौकेतून चारही दिशेला नजर टाकल्यावर दोन्ही बाजूला दूरवर ठिपक्‍यागत मानवी वस्ती दिसत होती. किनाऱ्यालगत काय हालचाली सुरू आहेत हे स्पष्टपणे दिसत नव्हते. पणजीतील उंच इमारती मात्र दिसत होत्या. मिरामार आणि दोनापावल भागात गेल्या पाच वर्षात उभ्या राहिलेल्या इमारतीही दिसत होत्या. दूरवर अंधूकपणे मुरगाव बंदर दिसत होते. बंदरात नांगरलेल्या नौकांचे आकार तेवढे दिसत होते. बित्रा या युद्धनौकेभोवती आमच्या नौकेचे प्रदक्षिणा घालणे सुरू ठेवले होते. नौका एका जागी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ती लाटांमुळे वरखाली होत होती, वाऱ्यामुळे उडणारे तुषार खाऱ्या पाण्याचे अस्तित्व नको तितके दाखवून देत होते. त्यातच सूर्याच्या तिरप्या किरणांमध्ये इंद्रधनुष्य दिसत असल्याचा शोध कुणीतरी लावला आणि काही वेळ इंद्रधनुष्य शोधण्यात गेला. नौका वर्तुळाकार फिरती ठेवल्याने चारही दिशांचा परिसर डोळ्यासमोर येऊन जात होता. अखेर नौदलाच्या मोहिमेस सुरवात झाली नि परतीचा प्रवास सुरू झाला. काहीवेळातच ठिपक्‍यागत दिसणारी पणजी डोळ्यासमोर मोठी होत गेली आणि वेरे बेतीच्या बोट क्‍लबवर केव्हा नौका नांगरली गेली हेच कळले नाही.

Sunday, September 11, 2011

पोलिस समाज एक नाते

गोवा पोलिसांनी 11 सप्टेंबरला सिंघम चित्रपट पाहिला. सिंघम चित्रपटातील तडफदार पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका गोव्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी वठवावी अशी अपेक्षा पोलिस दलाचे प्रमुखांची आहे. त्यांची अपेक्षापूर्ती होईल की नाही हे आताच सांगणे अवघड आहे.
गुन्हा घडला की पोलिसांनी काय केले याची मोठी उत्सुकता असते. काही दिवसांनी वर्तमानपत्रातही तपासकाम थंडावल्याची बातमी येते. त्यानिमित्ताने खासगीत का होईना पोलिस अधिकाऱ्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. पोलिसांना आपल्या खबऱ्यांचे जाळे विणण्यात आलेले अपयश याचेच हे निदर्शक आहे.  महानगरात पोलिस बऱ्यापैकी खबऱ्यांवर अवलंबून असतात. बऱ्याचवेळी कुप्रसिद्ध गुंड आणि शार्प शूटर यांच्याशी पोलिसांच्या झालेल्या चकमकी या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित होत्या यावरून खबऱ्यांचे महत्त्व निश्‍चितपणे अधोरेखित होते. गोव्यात पोलिसांना माहिती मिळवताना बराच त्रास होतो वा माहितीच मिळत नाही यावरून खबरे नाहीत वा त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद नाही असा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात ते तसे नाही. एसएस (सिक्रेट सर्विस) नावाने ओळखली जाणारा निधी या दलाकडे असतो. त्याचा प्रभावी वापर कसा करायचा हे त्या त्या स्थानकप्रमुखाचे काम असते. त्यावरच माहिती मिळविण्यासाठीचा स्रोत किती भक्कम की दुबळा हे ठरत असते. आपण पाहतो की अमका एक अधिकारी तपास करतो म्हणजे गुन्हेगारापर्यंत पोलिसांचे हात पोचतील असा सर्वसामान्यांना विश्वास वाटू लागतो. ही सारी खबऱ्यांची किमया. ज्याचे खबरे समर्थ तो यशस्वी पोलिस अधिकारी असे समीकरण आहे. समाजाचा चेहरा बदलत असताना विशेषतः येथे जगभरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीत हवी ती नेमकी व्यक्ती शोधण्यासाठी वा एखाद्या पर्यटनस्थळी घडलेल्या गुन्ह्याची तातडीची माहिती मिळविण्यासाठी खबऱ्यांवर अवलंबून राहणे केव्हाही सोयीचे. समाजानेही माहिती देण्यासाठी पुढे यावे यासाठी पोलिस स्थानकातील अधिकारी आणि त्या परिसरातील जनता याचे नाते सौदार्हाचे असावे लागते. (प्रत्यक्षात ते सापा मुंगुसाचेही असू शकते नव्हे थोडेफार तसेच असते) मगच घटनेमागची कारणमीमांसा करणे पोलिसांना सोपे जाते. पोलिसांनी आरोपपत्र ठेवलेल्या बऱ्याचशा संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते. जनता आणि पोलिस यांचे चांगले संबंध असतील तर जबानी देण्यासाठी अनेकजण पुढे येतात. पूरक माहिती आणि पुरावे गोळा करण्यात मदतही करतात. समाजाने हात दुमडून पोलिस काय ते करतील अशी भूमिका घेतली तर पोलिस तपासकामात फारशी प्रगती करू शकणार नाहीत. मागे गोव्यात पोलिसांनी "नेबरहूड पोलिस' ही सिंगापूरी संकल्पना स्वीकारली होती. त्याचे पुढे काय झाले हे पोलिसांनाच माहीत. सर्वसामान्य नको ती पोलिस ठाण्याची पायरी असे का म्हणतो याचा कधीतरी वरिष्ठ पोलिसांनी विचार जरूर करावा. पोलिसांनी पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाकडे संशयाने बघणे सोडले तर बऱ्याचशा समस्या सुटू शकतील. अपघात झाल्यावर पहिली माहिती देणाऱ्याला विविध प्रश्‍न विचारून भंडावून सोडण्याची प्रवृत्ती त्यागली पाहिजे. तरच समाज पोलिसांचे नाक, कान, डोळे बनतील.तपासकामाची पारंपरिक पद्धतही मागे पडल्याची जाणीव पोलिसांना व्हायला हवी. पोलिस कोठडीतील चौकशी दरम्यान काही कारणाने संशयितांने दिलेला जबाब न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही हे लक्षात घेतले पाहिजे. तेथे पुराव्यांची सूत्रबद्ध मांडणी आणि साक्षी विचारात घेतल्या जातात. त्यामुळे गुन्हा दाखल झाला की संशयिताला कर अटक ही संकल्पना मागे पडल्याचे भान आता ठेवायला हवे. तसे न करताही पुरावे गोळा करण्याकडे जास्त लक्ष पुरविल्यास खटला भक्कमपणे न्यायालयात टिकू शकतो. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार न्यायालयात जबानीसाठी तयार करण्यावरही लक्ष केंद्रित करून संशयिताला शिक्षा होण्यास पोलिस भाग पाडू शकतात. न्यायालयात एकाला शिक्षा झाली की त्याचा आपोआप संदेश समाजात जातो, त्याजोगे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते. पण पोलिस हे लक्षात कधी घेणार?

Wednesday, August 3, 2011

मरण दिसले समोर

बातमीदारीच्या व्यवसायात जगात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अलीकडे कमालीची वाढली आहे. त्या तोडीचा अनुभव येथील आम्हा पत्रकारांना येत नसला तरी मरण समोर दिसण्याचे अनेक प्रसंग येतात. कधी तरी त्याची बातमी होते तर कधी ते मनाच्या कप्प्यात राहून जातात. 19 डिसेंबर गोवा मिुक्तदिन. सर्वांसाठी तसा तो सुटीचा दिवस. आम्हा पत्रकारांना त्या दिवशी कुठे सहलीला जाण्याऐवजी काही तरी विधायक करायचे वेध लागतात. मी आणि गोमन्तक टाइम्सचे सहायक संपादक पॉल फर्नांडिस यांनी 19 डिसेंबर 2005 ला खानापूरच्या जंगलात जायचे ठरविले. म्हादईचा उगम याच जंगलात होतो. तेथे बेकायदा खाणकाम सुरू झाल्याची माहिती मिळाल्याने त्या सुटीचा उपयोग याचा पर्दाफाशसाठी करण्याची कल्पना आली. गोमन्तकची गाडी घेऊन आम्ही निघालो. चालक प्रकाश पेडणेकर हेही सोबत होते.बेळगाव येथील पयार्वरणीय संस्थेचे श्रीहरी कुकजी आम्हाला नेमकी ठिकाणे दाखवणार होते. देगावजवळील तळेवाडी येथे खाणकाम आणि वनौषधींसाठी जंगलतोड होत होती. यामुळे जलस्त्रोतांना धोका पोचून म्हादईवर परिणाम होणार असे बातमीचे संभाव्य चित्र आमच्या डोळ्यासमोर होते. कुकजी आम्हाला खानापुरात भेटले. जेमतेम एकच चारचाकी गाडी जाऊ शकेल अशा खडकाळ रस्त्याने आम्ही घनदाट जंगलात विसेक किलोमीटरवरील तळेवाडी येथे पोचलो. तेथील गैरव्यवहारांकडे कुकजी यांनी वनखात्याने लक्ष वेधल्याने स्थानिक त्यांच्याविरोधात होते. त्यामुळे ते गाडीतच दडून बसले होते.आम्ही हळूहळू माहिती गोळा करत होतो. छुपेपणाने खनिजमाल साठवणुकीची छायाचित्रेही मी टिपली. एवढ्यात गाडीत बसलेल्या कुकजी यांच्याकडे लोकांचे लक्ष गेले व त्यांना आम्ही नेमके कशासाठी आलो याचा पत्ता लागला. एव्हाना दुपारचा एक वाजला होता.त्यांनी गाडीला घेराव घातला. गाडीसमोर दगड रचून रस्ता बंद केला. कुकजी याला ताब्यात द्या अशी त्यांची एकमुखी मागणी होती. तसे केल्यास कुकजी याला ते ठार मारतील याविषयी जराही शंका नव्हती. त्यातील काहीजण कंत्राटदाराला बोलावून मारेकरी आणण्यासाठी शेजारील गावात एका दुचाकीवरून गेले. ते परतण्याचा दुपारी चार वाजेपर्यंत पत्ता नव्हता. गाडीसमोर दगड रचल्याने आम्ही पळून जाण्याचा संभव नसल्याने ती गर्दी हळूहळू गाडीपासून दूर गेली. आमच्याशी त्यांच्या गप्पाही सुरू झाल्या. तेवढ्यात संधी साधून कुकजी यांनी जंगलात धूम ठोकली. त्यांच्यामागे अनेकजण लागले. सायंकाळचे साडेपाच वाजू लागले होते आणि जंगलात अंधारूनही येऊ लागले होते. हवा तो कुकजी पळाला आम्ही थांबून तरी काय करू असा युक्तिवाद मी व पॉल यांनी करणे सुरू केले. त्या शिष्टाईला यश आले नि सव्वा सहा वाजता आम्ही निघालो. त्या स्थानबद्धतेत घालविलेल्या क्षणाक्षणाला मरण समोर दिसणाऱ्या पाच तासांनी जीवनात मिळविलेले स्थान कधीही ढळणार नाही.

Thursday, July 28, 2011

आठवणीतले तारकर्ली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचे वारे वाहू लागले आहे. त्या संधीचा फायदा खऱ्या अर्थाने तारकर्ली गावाने घेतला आहे. तारकर्लीत घराघरात लॉजिंग व्यवसाय सुरू झाल्याने जिल्ह्यात तारकर्ली पर्यटनाच्या बाबतीत "मॉडेल व्हिलेज' म्हणून उभे राहिले आहे. मालवणपासून 15 किलोमीटरवर असलेल्या या गावाने जिभेवर घर केले आहे.तेथे रमेश मिठबावकर यांच्या घरगुती खानावळीत एकदा जेवलेला माणूस पुन्हा तेथे जाण्यासाठी केवळ निमित्त शोधत असतो. मी गेल्या चार वर्षांत अनेकदा मालवणला गेलो पण मिठबावकरांकडचे जेवण जेवल्याशिवाय दौरा पूर्ण झाला नाही. तारकर्ली पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर झळकत आहे. तेथे आज घराघरात पर्यटनाचे वारे पोहोचले आहे. तारकर्लीत प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे वायरीपासूनच रस्त्यानजीक प्रत्येक घरात फलक दिसतो, "तो इथे राहण्याची व जेवणाची सोय आहे' असाच. पूर्वी या भागातील लोकांचा व्यवसाय मच्छीमारी हा होता; परंतु लोकांनी आता पर्यटन हा पूरक व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे. पर्यटनामुळे या भागात बऱ्यापैकी रोजगारनिर्मिती झाली आहे. तारकर्लीसारख्या छोट्या गावात असलेली लॉजिंगची सोय पर्यटकांनाही सुखावते. तारकर्लीच्या टोकास एमटीडीसीने तंबू निवास उभारले आहेत. त्याच पद्धतीचे तंबू निवास आता खासगी तत्त्वावरही उभे राहिले आहेत. त्यामुळेच तारकर्लीत अगदी दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतच्या राहण्याच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. एका बाजूने कर्लीची खाडी आणि दुसऱ्या बाजूने अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या देवबाग-तारकर्ली गावावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. नारळी पोफळीच्या बागा, सुरूचे बन आणि त्यात भर टाकणारा स्वच्छ समुद्रकिनारा! येथे येणाऱ्या पर्यटकाला या सगळ्याची भुरळ पडते. मालवण ते देवबाग या पंधरा किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक तंबू निवास आहेत. अगदी कमी पैशांत ते पर्यटकांची राहण्या- जेवण्याची सोय करतात. समुद्रातील स्कूबा डायव्हिंगच्या पर्यटनासाठीच्या वापरापाठोपाठ आता केरळच्या धर्तीवर हाउसबोट पर्यटनालाही सुरुवात झाली आहे. दत्तप्रसन्न कुलकर्णीसोबत या भागात फिरताना मी माहिती संग्रहीत करणे सुरूच ठेवले होते. आजही मला तारकर्ली म्हटली की सारे तपशील त्याचमुळे आठवू शकतात. डॉल्फिन दर्शन, कोकणचा विहंगम किनारा, देवबागचा संगम हे सर्व पाहण्यासाठी खाडीतूनच लज्जतदार मालवणी जेवणाचा आस्वाद घेत पर्यटक जाऊ शकतात. हे असे चित्र असले तरी तारकर्ली नदीचा बहुतांश भाग गाळाने बुजत चालला आहे. पावसाळ्यात तारकर्ली नदीला येणाऱ्या डोंगराकडील पाण्यामुळे नदीचे पात्र रुंदावून किनाऱ्याचा दुतर्फा भाग नदी गिळंकृत करीत आहे. तारकर्ली नदीमध्ये यापूर्वी बारमाही खोल पाणी असायचे, परंतु गेली कित्येक वर्षे या नदीच्या आणि खाडीच्या पात्रामध्ये साचलेल्या गाळामुळे छोट्या होड्यांना ये-जा करणे मुश्‍कील झाले आहे. शिवाय या खाडीपात्रामध्ये मिळणाऱ्या मासळीचे प्रमाणही घटले आहे. नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ भरल्याने तारकर्ली-कोरजाई तारीसाठी प्रवाशांना अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. येथे असलेल्या नैसर्गिक बेटामुळे होडीवाल्यांना या बेटाला वळसा घालून कोरजाईपलीकडे बंदरात जावे लागते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस "किंग्ज गार्डन' येथे रंगीबेरंगी मासे, शेवाळ, शुद्ध पाणी, खडके पाहण्यासारखी आहेत. चिवला बीच या ठिकाणच्या "कोरल गार्डन'चे सौंदर्यही पर्यटकांना निश्‍चितच आनंद देणारे आहे. तारकर्ली येथील "सरग्यासम पॉइंट' येथे प्रवाळे, कोरल, आकर्षक असे मासे या ठिकाणी आहेत. देवबाग येथील "लगून पॉइंट' हे खाडीच्या बाजूने असून, एका बाजूस खडके तर दुसऱ्या बाजूस मासे या ठिकाणी तिन्ही बाजूंनी शुभ्र वाळू आहे. यासाठी तारकर्लीत स्कूबा डायविंगची सोय आहे हे विशेष महत्त्वाचे.

Wednesday, June 8, 2011

आकाशविहार अन्‌ समुद्रावर नजर...!

किनारी भागातील जीवन कमालीचे बदलले आहे. मुळात क्रॉंक्रिटच्या जंगलाच्या दिशेने गोव्याच्या किनाऱ्यांची वाटचाल पूर्णत्वाला गेली आहे, त्याच्या जोडीला काही कारणांनी का होईना किनारे काळंवडत चालले आहेत. नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून परतताना हे दृश्‍य दिसले.सुमारे दीडशे सागरी मैलावर आतवर मासेमारी नौका काडेपेटीगत दिसत होत्या. एकीकडे ट्रॉलरची संख्या वाढल्याचे चर्चा सुरू असतानाच खोल समुद्रात आतवर अभावानेच एखादी नौका दिसे. किनाऱ्यापासून तिसेक मैलावर नौकांची गर्दी दिसली. पुढे आल्यावर माणसांची गर्दी उसळलेला पण काळवंडत जाणारा किनारा दिसला. दूरवर ठिपक्‍यागत वस्तीही दिसू लागली होती. मुंबई या युद्धनौकेच्या डेकवरून दुपारी हेलिकॉप्टरने उड्डाण केले त्यावेळी माझ्यासोबत मुंबईच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न जनसंपर्क अधिकारी आलोक मिश्रा होते. पहाटे जाताना हेलिकॉप्टर प्रवासाचा थरार ढगाळ हवामान आणि अंधाराने हिरावून घेतला होता. त्यामुळे साहजिकच दुपारच्या प्रवासाची मला प्रतीक्षा होती. दुपारी सव्वा दोन वाजता हेलिकॉप्टर उडाले नि आता उडी ठोकून पळ काढावा का असा माझ्या मनात विचार आला. चेतक या हेलिकॉप्टरला एकच इंजिन असते ही माहिती याच नको त्या वेळी मला आठवली. त्यातच हेलिकॉप्टरला दोन्ही बाजूला दरवाजे नाहीत. त्यामुळे कंबरेला बांधलेल्या दोन इंच रुंद पट्ट्याचा काय तो आधार. वर पकडायला काय आहे का याची अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनीच मी पाहणी केली. एका बाजूला पकडण्यासाठी असलेल्या पट्टा पकडण्यासाठी बाजूला सरकणे भाग होते. तसे करणे शक्‍यच नव्हते. एक तर वर जाताना हेलिकॉप्टर धडधडत होते. वाऱ्याचा दाब शरीराला जाणवत होता.त्यातच चारशे फुटावर हेलिकॉप्टर आल्यावर पायलटने ते पुढे दामटले.नजर सरावली असली तरी खोल समुद्रात पडल्यास काय होईल हा विचार मनातून जात नव्हता. गळ्यात लाइफ जॅकेट अडकवलेले होते. त्यातच या प्रवासाआधी निघताना नौदलाने अपघात झाल्यास नौदलाला जबाबदार धरणार नाही असा बॉण्ड लिहून घेतला होता. त्याचे विचारही मनात येत होते. दूरवर निळाशार समुद्र दिसत असताना सरावात सहभागी नौकांची मला पाहणी करता यावी म्हणून नौकांच्या ताफ्याभोवती पायलटने प्रदक्षिणा घातली. प्रत्यक्षात अवाढव्य दिसणाऱ्या नौका चारशे फुटावर कशा किरकोळ दिसतात हे पाहता आले. त्याचबरोबर वरून खालची नेमकी गोष्ट पाहणे कसे कठीण असते याचा प्रत्ययही आला. चालकाने आता निघू अशी हातानेच खूण केली आणि हेलिकॉप्टर दूरवर क्षितिजावर न दिसणाऱ्या किनाऱ्याच्या दिशेने घेतले.वाटेत मासेमारी करणारी मोठी नौका पाहण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर एका जागी स्थिर केल्यागत केले. तो नेमके काय सांगत होता हे वाऱ्यामुळे नेमकेपणाने माझ्यापर्यंत पोचत नव्हते. त्याच्या तोंडाच्या दिशेने कान करण्यासाठी बसल्याजागी काही अंशात हलण्याचीही माझ्या मनाची तयारी नव्हती. पुढे आल्यावर नौकांची गर्दी दिसली. किनाराही दिसू लागला. किनाऱ्यावरचा माणसांचा समुद्र पाहून हे गोवा आहे हे सांगावे लागले नाही. किनाऱ्याच्या एका कोपऱ्यात ट्रॉलर पाण्यातून बाहेर काढणे सुरू असल्याचे दृश्‍य सेकंदभर दिसले. किनाऱ्यालगत उभ्या राहिलेल्या इमारतींनी मोकळी जागाच सोडली नसल्याचे कटू सत्यही पाहता आले, पुढे वास्कोत शहर असे अस्ताव्यस्त पसरले आहे हेही पाहता आले मुख्य म्हणजे हंस या नौदलतळावर उतरण्याआधी विमाने ठेवण्यास जराही जागा नसलेला दाबोळी विमानतळ पाहता आला.

Wednesday, May 11, 2011

कोझिकोड, अल्वाये, कोची, कोवालम

कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील खुदाईवर लक्ष ठेवणाऱ्या कंपनीतील अभियंता अब्राहम वार्के याच्या लग्नाच्या निमित्ताने केरळमध्ये राहण्याचा व भटकण्याचा योग आला होता. खऱ्या अर्थाने कालीकतला भटकलो ते सॉटर डिसोझासह. जानेवारीत कन्याकुमारीला जाताना सॉटर माझ्यासोबत होता. वाटेत कालिकतला थांबावे असे ठरले. आम्हाला वास्को द गामाने पहिला पाय ठेवला ती जागा बघायची होती. शहरापासून पंचवीस किलोमीटरवरील त्या जागेकडे गेलो तर तेथे पुरुषभर उंचीचा एक स्तंभ दिसला. स्थानिकांनी सांगितले की पूर्वी स्तंभ असलेल्या जागेवर समुद्राने अतिक्रमण केल्याने आजवर तीनदा स्तंभाची उभारणी केल्याचे सांगितले.कालिकतला मिळणारे मासे व उकडा भात आणि जेवणानंतर चघळायला देण्यात येणारा काळा हलवा कधीच विसरला न जाणारा असा होता. पण भावली ती रेल्वे स्थानकावरील स्वच्छता. कट्टर कम्युनिस्ट असलेल्या प्रा. एन. शोबिंद्रन यांच्याशी म्हणूनच मी रेल्वेच्या प्रतीक्षालयात अनेक विषयांवर दोन तास वाद घालू शकलो. तेथे स्वच्छतेची वेळ झाली की स्वच्छतागृहे सर्वांसाठी बंद केली जातात. दर चार तासांनी तसे केले जाते. यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.वार्केचे घर कोट्टायमजवळ एका बेटावर आहे. तेथे जाण्यासाठी फेरीबोट पकडून ये असा त्याचा निरोप. मी गोव्यात जशी फेरीबोट असते तशा फेरीबोटीची प्रतीक्षा कुमन्नम येथे अर्धा दिवस केली. अखेरीस एकाला विचारले त्या वेळी ट्रॉलरवजा बोटीलाच फेरीबोट म्हणतात असा साक्षात्कार झाला. पुढे घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत काळ्या चहाने करतात हाही धक्का बसला. त्याच्या घराभोवती असलेल्या पाण्यातून एकमेकांकडे जाण्यासाठीही छोट्या होड्यांचा वापर कसा केला जातो इथपासून जीप आणण्यासाठी दोन होड्यांच्या मध्ये फळ्या रचून तराफा कसा केला जातो हेही पाहता आले.कोची येथे इंडियन एक्‍सप्रेसमधला माझा मित्र मनु पबी याच्यासह फोर्ट कोची भागात ताजे मासे पकडून ते लगेच तळून कसे दिले जातात याचे प्रात्यक्षिक अनुभवले. पुढे गोमन्तक टाइम्समधील ऍण्ड्य्रू परेरा याच्यासह भटकंती करताना अल्वाये येथे हाउसबोटीच्या व्यवसायाचे अंतरंगही न्याहाळता आले. तीन वर्षांच्या मुलांना नदीत पोहायला शिकविणारे धाडसी लोकही तेथेच पाहता आले. मोठ्या बोटीवरील खोल्या ते वातानुकूलित रेस्टॉरंट व खोल्या असा हाउस बोटीचा प्रवास झाला आहे.गेल्या दशकातील केरळ आणि आजचे केरळ यात बराच बदल झाला आहे. 1994 ते 98 पर्यंत गावागावात कौलारू घरे दिसत. क्वचित एखादा उघडाबंब माणूस फक्त लुंगीवर दिसे. आज लुंगी टिकून असली तरी घरे मात्र बदलू लागली आहे. कॉंक्रिटीकरणाचे वारे पोचले आहे. पूर्वी लुंगीवर कुठेही जाण्यास मुभा होती. ते प्रतिष्ठेचे लक्षणही मानले जात होते. पण गेल्यावर्षी युवा वर्गाने पॅन्टला आणि त्यातील फॅशनलाही पाठिंबा दिल्याचे दिसले. स्वस्तात काजूगर पुरविण्याची किमया केरळने साधली आहे, कष्टाळू अशा केरळी समाजाला त्याला बुद्धीची जोड देत राज्य विकासपथावर नेले आहे. साक्षरतेचे प्रमाण केरळमध्ये जास्त असले तरी स्थानिक मल्याळम वगळता इतर भाषा न येण्याने होणारे तोटे कुठल्या पारड्यात टाकले जाणार?कनार्टकाला लागून असलेल्या अझीमला येथे नौदलाची अकादमी उभी राहत आहे. वेरे बेती येथील नौदल अकादमी तेथे हलविली जाणार असे जाहीर झाल्याने तेथे भेट न देणे शक्‍यच नव्हते. अकादमी दोन डोंगराच्या मधल्या भागात विस्तारली आहे. या दोन डोंगरांचा उल्लेख वास्को द गामाच्या प्रवास वर्णनात आहे. संरक्षणदृष्ट्याही टेहळणीसाठी ती मोक्‍याची जागा असल्याने तेथे अकादमी होणे हा निव्वळ योगायोग नव्हे. सध्या संचलन मैदान, मुख्य प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले असून प्रशिक्षणार्थींच्या वसतीगृहाची इमारत उभी राहत आहे. केरळच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या तिरुअनंतपुरम येथे सुती टॉवेल फार स्वस्त मिळतात. त्याही पुढे असलेल्या कोवालमला तर जगात उपलब्ध असणारे सर्वकाही मिळते. फक्त तिथे सध्या कॉंक्रिटचे जंगल उभे राहिले आहे इतकेच.

Monday, May 2, 2011

गोपुरी आश्रम

1999 मध्ये कणकवलीत असताना एक दिवस अमरसिंह घोरपडे नावाचे माझे सहकारी मला वागदे या तीन किलोमीटरवरील गावी असलेला गोपुरी आश्रम दाखविण्यास घेऊन गेले. तेथे प्रा. राजेंद्र मुंबरकर या तिशीतील तरुणाचा परिचय झाला. मुंबरकर कणकवली महाविद्यालयात ग्रामीण विकास विषय शिकवतात. आता ते पीएचडी मिळवून प्रा. चे डॉ. मुंबरकरही झाले, तरी आमची मैत्री त्याच पातळीवर कायम आहे. मुंबरकर यांनी तेथील गोशाळा, शेती फिरून दाखविली. त्या वेळी या आश्रमाच्या व्यवस्थापनाचा ताबा एक दिवस माझ्याकडे येईल अशी पुसटशी कल्पना देखील माझ्या मनाला शिवली नाही. समाजवादी चळवळीशी असलेली जवळीक त्यासाठी उपयोगी ठरली. जयवंत मठकर, गणपत सावंत, रमाकांत आर्ते, गोविंदराव शिंदे दादा यांना मी कणकवलीत आल्याचे कळले. एकदा मठकरकाका आले नि माझ्या जानवलीतील खोलीतील सर्व साहित्य गोपुरीतील विश्रामगृहात हलविण्याचा जणू आदेशच दिला. त्यानंतर मला व्यवस्थापन समितीवर कायम निमंत्रित असे स्थान देण्यात आले. दैनंदिन व्यवस्थापनात माझा शब्द अखेरचा ठरू लागला. तेथे असताना संस्था फायद्यात आणण्याची किमया सर्वांच्या मदतीने साधली. नर्सरी सुरू केली. नर्सरी प्रशिक्षण वर्ग सुरू केला. खतविरहीत ताजी भाजी मोठ्या प्रमाणावर मिळण्यासाठी प्रयत्न केले. गणपत पाटील यांच्या मदतीने उसाची शेती केली. केळीच्या नव्या जातींची लागवड केली. जुनाट पंप बदलून नवा जादा अश्‍वशक्तीचा पंप बसविला. अप्पासाहेबांच्या या कार्याची साक्ष देत गोपुरी आश्रम आजही कणकवलीनजीक वागदे येथे कार्यरत आहे. कोकण गांधी म्हणून ओळखले जाणारे अप्पासाहेब 1922 मधील द्विपदवीधर. इंग्रजांच्या त्या आमदनीत त्यांना प्रशासनात उच्च अधिकाराची नोकरी करणे सहज शक्‍य होते; पण त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. 1930 ला महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला, तर अप्पासाहेबांनी सिंधुदुर्गातील शिरोडा येथे हा सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या चिरस्थायी विकासाचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पटवर्धन यांनी आपल्या मायभूूमीची वाट धरली. कणकवलीनजीक वागदे गावात त्यांचे सहकारी मित्र प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या सहकार्याने 18 एकर टाकावू जमिनीवर 5 मे 1948 रोजी गोपुरी आश्रम या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. केवळ संकल्पना न मांडता आपले विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. युरोपियन देशातील उच्च राहणीमान अप्पांनी अनुभवले होते. भारतीय लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे हे धोरण त्यांनी अवलंबिले. गोरगरीब लोकांना परवडतील, असे शौचालय बांधण्याचे प्रयोग त्यांनी केले. सोन खतापासून उत्तम खत निर्माण होते हेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी उभारलेली मॉडेल्स आजही गोपुरी येथे पाहायला मिळतात. गोबरगॅस आणि त्यावर जेवण शिजविण्याचा त्यांचा प्रयोग म्हणजे सुरवातीला आक्रीतच वाटले. उत्तम बायोगॅस निर्माण करता येऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी कणकवलीतील छात्रालय येथे "मैला गॅसप्लॅन्ट' उभारला. अप्पांनी ग्रामीण ऊर्जा व स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेक प्रयोग केले. धवल क्रांतीची कोकणात सुरवात व्हावी यासाठी संकरित गायी आणल्या. पुण्याहून चारा आणला. फलोत्पादन, शेतीचे नवे प्रयोग, पेरू, केळी, आंबा, यावर वेगवेगळे प्रयोग, मसाले पिकांची लागवड त्यांनी स्वतः केली व शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. आजही गोपुरीत अनेक प्रयोग सुरू आहेत. काजू सरबताचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. आजही कृषी सहली गोपुरीला आवर्जून भेट देतात. नंदकिशोर परब, सरिता धामापूरकर, जया सदडेकर, उमेश जाधव, प्रसाद आचरेकर यांनी गोपुरी आश्रमात नव्या कल्पना राबविण्यासाठी चांगले सहकार्य केले. त्या आश्रमात असताना कोकण दौऱ्यावर आलेले अण्णा हजारे माझ्या खोलीत एक दिवस मुक्कामाला राहिले ही आठवण मी हृदयात जपून ठेवली आहे.

Saturday, April 30, 2011

सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी

परमेश्‍वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी असा उल्लेख मला 1998 मध्ये ऐकता आला. 1998 मधील जुलैपासून सलग वर्षभर मी सावंतवाडीत होतो.तलावाच्या काठावर वसलेले हे शहर अलीकडच्या काळात उदयाला आले आहे. गाव मौजे चराठे या गावाची सावंतवाडी ही वाडी अशी माहिती मला सावंतवाडीतील दै. "कोकणसाद'चे संपादक गजानन नाईक यांच्याकडून मिळाली. आजही चराठेभोवती असलेला खंदक पाहता येतो. विजय देसाई यांच्यासोबत त्या खंदकाची पाहणी मी केली होती. तेव्हाही तो सुस्थितीत होता. सावंतवाडीत असताना श्रीराम वाचन मंदिरात जाऊन बसणे हा माझा नित्याचा उद्योग होता. 100 वर्षे होऊन गेलेले हे वाचनालय आजही सुस्थितीत आहे. आता तर नवी इमारत उभी राहिली आहे. ग्रंथपाल दीनानाथ नाईक यांचा हसरा चेहरा आजही नजरेसमोर आहे. या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयानंद मठकर हे नेहमी कुठली पुस्तके वाचनालयात हवीत याविषयीची माझी मते आवर्जून ऐकत. त्यामुळेच की काय अनेक विषयांवरील पुस्तकांचा मोठा संग्रह या वाचनालयात आहे. सावंतवाडीत असताना तत्कालीन नगराध्यक्ष दीपक केसरकर यांच्याशी माझा विशेष स्नेह जुळला. विकासाच्या बाबतीत त्यांची मते ऐकून मला कधी कधी थक्क व्हावे असे वाटत असे. त्यांच्याच कारकिर्दीत तळ्याच्या बाजूला संगीताच्या तालावर नृत्य करणारा कारंजा, अद्ययावत उद्यान उभे राहिले. एवढेच कशाला रेस्टॉरंटही सुरू झाले. तळ्याच्या भोवती जॉगिंग करण्यासाठी पदपथ आकाराला आला. मोती तलावात झालेले शेवाळ खाण्यासाठी मासे आणून तलावात सोडण्याचा उपक्रम नगरपालिकेने राबविला होता. मे महिन्याच्या पूर्वी तलावातील पाणी आटू लागते त्याच दरम्यान ते मासे कुणी तरी खाण्यासाठी पळविण्याचा प्रकारही उघडकीस आला होता. अजीज शेख हे मुख्याधिकारी असताना अचानकपणे तळे आटविण्याच्या प्रकाराची मोठी चर्चाही आजही आठवते.सावंतवाडीच्या मोती तलाव ही पूर्वीच्या काळची सिंचन व्यवस्था होती. त्या संदर्भातील जुने कागदपत्र प्रा. जी. ए. बुवा यांच्याकडे मला पाहता आले. त्या काळी सावंतवाडीत पिण्याचे पाणी केसरी या गावातून आणण्यात येत होते. आजही ती व्यवस्था कायम असून गोविंद चित्रमंदिर येथे असलेला सार्वजनिक नळ हा केसरीच्या पाण्यावर चालतो. सावंतवाडीहून बेळगावकडे जाणारा मार्ग फुटतो त्या तिठ्याला गवळी तिठा असे नाव आहे. गेल्या दोन वर्षांत त्या भागात मोठ्या इमारती उभ्या राहून त्या भागाचा चेहरा-मोहराच बदलला आहे. पूर्वी सिनेमाघर होते त्या जागी आता मोठाले कॉम्प्लेक्‍स उभे राहिले आहे. पालिकेजवळ उघड्यावर चालणारा बाजार आता बंदिस्त इमारतीत हलविण्यात आला आहे. सावंतवाडीच्या बाजारातून वरच्या बाजारात जाताना वाटेत विठ्ठल मंदिर लागते. या मंदिरातून पूर्वी शहराच्या सर्व सीमा दृष्टीस पडत. आता इमारती उभ्या राहिल्याने ती मजा हरवली गेली आहे. या वरच्या बाजारातून खाली उतरताना चितार आळी लागते.सावंतवाडी हे शहर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे असा उल्लेख पाठ्यपुस्तकात होता. ही ओळख पटवून घेण्यासाठी चितार आळीशिवाय पर्याय नाही. तेथे अशी खेळणी मिळणारी ओळीने सात दुकाने आहेत.सावंतवाडीत असताना पत्रकार अरविंद शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. गेली 25 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या शिरसाट यांची स्मरणशक्‍ती दांडगी. सावंतवाडीविषयी सर्व संदर्भ त्यांना तोंडपाठ. एकदा मला त्यांनी हंसा वाडकर यांच्या सावंतवाडीत असलेल्या घराविषयी थोडीफार माहिती दिली होती. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारे नंदू ऊर्फ नंदकिशोर पेडणेकर यांनीही सावंतवाडीत पूर्वीच्या काळी पथदीप कसे होते, सावंतवाडीत कर व्यवस्था, न्यायदान व्यवस्था कशी होती याची माहिती दिली. सालईवाड्यात शंभर वर्षांपूर्वीपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचे दृश्‍य आजही डोळ्यासमोर येते.सावंतवाडीच्या राजघराण्यातील समाध्या माठेवाडा भागात आजही पाहायला मिळतात. राजेश नाईक त्या भागात राहतात. त्यांनी मला या माठ्यांविषयी माहिती दिली. सावंतवाडीत जाण्याचे प्रवेशद्वार म्हणजे गोलगावचा दरवाजा. आता ही वास्तू सुस्थितीत असली तरी 1998 मध्ये तिच्या दुरवस्थेबद्दल लिहिल्याबद्दल कोलगाव दरवाज्याचे मालक "सुकी' यांच्याकडून मला थोडे ऐकावे लागले होते.सावंतवाडीत आता शिल्पग्राम उभे राहत आहे. परवाच शिवप्रसाद देसाई यांच्याशी बोलताना ते लवकरच आकाराला येईल, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा सावंतवाडीत जाण्याची संधी मिळाली तर शिल्पग्राम पाहण्याचा मानस आहे.

Friday, April 22, 2011

पार्से गाव नव्हे, नररत्नांची खाण!

मुंबईचा भाऊंचा धक्का फार प्रसिद्ध आहे. साहित्यातही तो अजरामर झाला आहे. या धक्‍क्‍याचे नामकरण ज्यांच्या नावावरून झाले ते भाऊ पार्सेचे. पार्से गाव नव्हे, तर ही नररत्नांची खाणच आहे. देश पातळीवर गाजलेल्या अनेकजणांची जन्मभूमी. सध्या गोव्याच्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सव सुरू आहे.या मुक्तीसाठीच्या लढ्यातील पहिला उठाव याच पार्सेत झाला. त्यानिमित्ताने या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या.कोण कुठला ? तर तो पार्सेचा असे सांगितल्यावर गोवाभर नव्हे, तर कोकणातही आदराने पाहिले जाते. सेतू माधवराव पगडी पार्सेत आले, त्यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर झालेल्या प्रश्‍नोत्तराच्या वेळी गावाची महती अनेकांना कळली. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरवात पार्सेत झाली याचा उल्लेख होतो तेव्हा छाती अभिमानाने भरून येत नसेल असा पार्सेवासीय नाही. इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते, की हा केवळ गाव नव्हे तर अनेक नररत्नांची ही खाणच आहे आणि त्यातून यापुढेही इतिहास घडवणारी रत्ने जन्माला येतील असेच या गावचे वातावरण आहे.26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 19 डिसेंबरला श्री भगवती मंदिराजवळच्या स्मारकाला वंदन केले जाते. त्यावेळी भाषणे होतात. त्यात गावाविषयी फारसे अभावानेच बोलले जाते. नव्या पिढीला या गावाचा वारसा सांगण्याची गरज आज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे. क्रांतिकारकांचा गाव ही ओळख अनेक प्रश्‍नांवर गावाने घेतलेल्या प्रखर भूमिकेमुळे आजही गोव्याला आहे. सध्या नागरी विभागात समावेश झाल्याने दूरध्वनीचे मासिक भाडे वाढले आहे, त्याविरुद्ध पार्सेवासीय एकवटले आहेत.निसगार्ने मुक्तहस्ते उधळण केलेल्या या गावातील संपदाही गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक जपली आहे. चारशे वर्षांपूर्वी येथील लोक लढवय्ये होते अशी नोंद इतिहासात आढळते. गावात ताणतणाव असले, तरी जत्रा, गणेश चतुर्थी, दसरा सणांच्यावेळी एकत्र येण्याची परंपरा आजही कायम आहे. जत्रेला गावी न येणारा इथला रहिवासी विरळच. गावाला संगीताचीही मोठी परंपरा आहे. महिलांना आज आरक्षण देण्याची मागणी वाढत चालली आहे. आज कोणालाही खरे न वाटो परंतु 1917 मध्ये बाळा पार्सेकर यांनी स्त्री नाटक मंडळ सुरू केले होते. त्यात नाटकातील सर्व भूमिका महिलाच करायच्या. गोवा, उत्तर कर्नाटक, कोकण ते पार मुंबईपर्यंत या मंडळाने नाट्यप्रयोग सादर केले आहेत. आजही हौशी रंगभूमीवर शिमग्याच्यावेळी रंगमंचावर जाण्यास अनेकजण उत्सुक असतात.पार्से युवक संघाने रंगभूमीवर आणलेली नाटके नाट्यप्रेमी विसरूच शकणार नाहीत. गोव्याचे महाराष्ट्रात आणि दिल्लीत प्रतिनिधित्व करण्याचा मान या संघाने अनेकदा पटकावला आहे. या संघाच्या "अशी पाखरे येती'च्या आठवणी आजही सांगितल्या जातात. अशा अनेक गोष्टी या गावाबद्दल सांगता येतील. पार्सेत चार मार्गे येता येते. शिवोली चोपडे पुलाकडून आगरवाडामार्गे, केरी हरमलहून कोरगावमार्गे, कोलवाळ धारगळहून तुयेमार्गे किंवा सरळ पेडण्यातून किंवा मोरजीहून. पार्से म्हटल,े की स्व. गोविंद मंगेश लाड (अर्थशास्त्र तज्ज्ञ व संपादक), स्व. डॉ. भाऊ दाजी लाड (डॉक्‍टर, स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक), स्व. परशुरामबुवा पार्सेकर (गायक), स्व. दामू अण्णा पार्सेकर (तबला वादक), स्व. भालचंद्र पार्सेकर (तबला वादक), स्व. यशवंत बुगडे (स्वातंत्र्यसैनिक), स्व. श्रीधर पार्सेकर (व्हायोलिन वादक) यांची नावे आठवतात. त्यांच्यानंतरच्या पिढ्याही कर्तबगार निघाल्या. शिक्षण संचालक अशोक देसाई, औद्योगिक विकास महामंडळाचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक गोपाळ देसाई, लेखिका सुमेधा कामत देसाई, तियात्रीस मार्सेलीनो दी बेतीम, मुंबईच्या बेस्टचे माजी अध्यक्ष रामानंद लाड, मराठी नाट्यसृष्टीतील भालचंद्र कळंगुटकर, सुरेंद्र देसाई (वकील), अमोल म्हालदार (शल्यविशारद), अरुणा प्रभू (डॉक्‍टर), देवेंद्र आरोलकर (मेकॅनिकल इंजिनिअर), सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक केशव आत्माराम प्रभू, बाळकृष्ण कानोळकर (प्राध्यापक), हनुमंत गवंडी (वकील), दशरथ पेटकर (वकील) यांचीही नावे सहजपणे आठवतात.

कुडाळची घोडेबाव आणि बरेच काही

1998-99 मध्ये सावंतवाडीला असताना मी तेर्सेबांबर्डे येथे राहत होतो. तेथून कुडाळ सहा किलोमीटरवर. कुडाळला पत्रकार अर्जुन राणे यांनी सांगेपर्यंत कुडाळ म्हणजे काय ते मला कळले नव्हते. कुडाळचा पट राणे, देवेंद्र वालावलकर, नरेंद्र खोबरेकर, रवी गावडे यांनी उलगडून दाखविला.अकराव्या शतकापर्यंत कुडाळ प्रांताच्या राजधानीचे हे ठिकाण होते. सध्या येथे असलेली न्यायालयाची इमारत म्हणजे भुईकोट किल्ला होय. शिवाजी महाराजांनी बांधलेली ऐतिहासिक घोडबाव विहीर शहरात बसस्थानकासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर आहे. तेथेही मी अनेकदा राहिलो. तेथे आबा शिरसाट यांच्याशीही अनेकदा माझी कुडाळ व अनेक विषयांवर अनेकदा चर्चा होत असे.कुडाळपासून 20 कि.मी. अंतरावर नारूर गाव आहे. तेथून रांगणागडावर जाण्यासाठी दीड ते दोन तास पायी जावे लागते. तेथेही जाण्यासाठी पाय दुखेपर्यंत (आठवडाभरपर्यंत) मी चाललो. वाडोस, पांग्रड या ठिकाणाहूनही गडावर जाता येते. कुडाळ हायस्कूलपासून जरा पुढे आल्यावर शहरापेक्षा थोडे उंचीवर एका उंच सपाट टेकडीवर वसलेले जागृत देवस्थान म्हणजे श्री गवळदेव. वेंगुर्ला रोडवर आज कुडाळच्या एमआयडीसी विभागाची जेथून सुरवात होते ती टेकडीच या दैवताचे तीर्थक्षेत्र झाली आहे. कुडाळची पर्वती म्हणून या टेकडीचा मोठ्या अभिमानाने कुडाळवासीय गौरव करतात. तसेच आणखी पुढे आल्यावर राऊळ महाराजांच्या समाधीमुळे प्रसिद्ध पावलेला पिंगुळी गाव आहे. तेथे ठाकर समाजाने लोककलांचे जतन केले आहे. "कळसूत्री बाहुली' या कलेबरोबरच गोंधळ, पांगुळ, चर्म बाहुल्या, पोवाडा, पिंगळी, राधानृत्य, शॅडोपपेट आदी लोककला मला तेथे पाहता आल्या.कुडाळच्या दुसऱ्या बाजूला हळदीचे नेरूर येथे स्वयंभू जटाशंकर मंदिर आणि गणपती मंदिर ही पुरातन मंदिरे आहेत. मंदिराच्या एका बाजूला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याची हद्द असलेला हणमंते घाटाचा पहाडासारखा कडा, पश्‍चिमेला गावावर टेहळणी करण्यासाठी पुढे सरसावलेले रांगणागडाचे टोक, गडावरून खाली उतरत आलेली सह्याद्री पर्वताची विशाल रांग, अशा इंग्रजी "यू' आकाराच्या खोबणीत विसावलेला हा परिसर बाळा मेस्त्रींसोबत मी अनुभवला आहे. मंदिर परिसरात बारमाही वाहणारे छोटे-छोटे पाण्याचे प्रवाह आहेत. तेथेही मनसोक्त भटकंती मला करता आली. राहत होतो त्या तेर्सेबांबर्डे गावालगत झाराप हे गाव. राष्ट्रीय महामार्गावरच्या या गावाचे नाव मी गोव्यात असतानाही मूर्तींच्या संदर्भात ऐकले होते. कांता बाणे यांच्यासमवेत मी तो गाव पाहिला. गावात दीडशे ते दोनशे विविध आकाराचे मोठ-मोठे दगड पाहावयास मिळतात. झाराप गाव दगड-धोंड्यांचा, चिकण मातीचा म्हणून प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी मातीची मजबूत, टिकाऊ व नक्षीदार भांडी बनविली जायची. ही भांडी बैलगाडीने चिपळूणमार्गे वसई-मुंबई, दक्षिणेस गोव्यापर्यंत नेली जात. कुंभारवाडीत म्हारकटेश्‍वर मंदिराजवळ एकावर एक नैसर्गिकरीत्या रचलेले मोठ-मोठे दगड लक्षवेधी आहेत. वरचीवाडीत "चाळोबा' देवस्थान आहे. छोटीशी देवीची घुमटी भल्या मोठ्या दगडाच्या खालीच आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे मोठे दगड एकावर एक रचून वर्षानुवर्षे ठेवले आहेत. तो परिसर त्यामुळेच मनात कायमचा घर करून गेला आहे.

Thursday, April 21, 2011

असा आहे आडिवरेचा परिसर

जैतापूर येथे झालेल्या गोळीबारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे परिसर चर्चेत आला आहे. तो गाव आणि परिसर मी कित्येकदा हिंडलो आहे. राजापूरपासून विसेक किलोमीटरवरील आडिवरे येथील सदानंद पुंडपाळ यांच्याशी माझा विशेष स्नेह. रत्नागिरीहून मोटारसायकलने सावंतवाडी येथे जाताना मी मुद्दामहून आडिवरेमार्गे जात असे.पुंडपाळ यांच्यासोबत त्या परिसरात फिरताना सध्या भग्नावस्थेत असलेल्या पण एकेकाळी समृद्ध असलेल्या आडिवरेचे दृश्‍य डोळ्यासमोर तरळून जायचे. त्या परिसरात कातळ फोडून केलेली हापूस आंब्याची लागवड हे आणखीन एक वैशिष्ट्य. त्या आंब्याची चवच वेगळी. ती चाखण्यासाठीही मेमध्ये भर उन्हात घामाच्या धारा लागत असतानाही मोटारसायकलचे चाक आडिवरेकडे वळायचे. या आडिवरेजवळ नाटे आहे. तेथे असलेल्या यशवंत गडावरही आम्ही गेलो होतो. हा गड शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजारामाने बांधला, असे सांगितले जात असले, तरी तो शिवाजी महाराजांनीच बांधला आहे. त्याबाबतची माहिती आपण फार पूर्वी पत्की घराण्याच्या मोडी कागदपत्रांमध्ये वाचल्याचे गडाचे सध्याचे वारसदार विश्‍वनाथ रघुनाथ पत्की यांनी एकदा सांगितले होते. हा गड बांधत असताना शिवाजी महाराजांना इतरत्रही यश प्राप्ती झाली आणि म्हणूनच या गडाचे नाव यशवंतगड असे ठेवण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. स्वतःचे सुसज्ज आरमार उभारणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते. त्यामुळेच हा गड शिवाजी महाराजांनीच बांधला असावा या जाणकारांच्या मताला पुष्टी मिळते. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज इथे व्यापारासाठी आले आणि त्यांनी इथल्या राजकारणात ढवळाढवळ करण्यास सुरवात केली. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला असताना त्याला राजापूरच्या टोपीकरांनी तोफा पुरवल्या होत्या. त्याचा राजांना राग होताच. त्याची त्यांनी नंतर सव्याज फेड केली हा भाग वेगळा. राजापूर ही मोठी व्यापारी पेठ होती. राजापूर या ब्रॅंडखाली मोठी उलाढाल होत होती. त्यांचा सर्व माल गलबतातून जैतापूर खाडीतून येत-जात होता. या खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी बंदरानजीकच यशवंतगड असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते. पूर्णगडचा छोटेखानी किल्ला जिंकण्यासाठी महाराज यामार्गे गेल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. याच दरम्यान मार्च 1661 मध्ये त्यांनी कशेळीच्या कनकादित्य मंदिराला भेट दिल्याची नोंद उपलब्ध आहे. जैतापूर खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी या जुन्या व सुरक्षित बंदराजवळ सात एकर जागेवर गडाची उभारणी करण्यात आली असून सभोवती उंच व सुमारे दहा फूट रुंदीची अभेद्य तटबंदी आहे. तटबंदीतच आठ बुरूज असून एक बुरूज समुद्रालगत आहे, तर हनुमान बुरूज सर्वांत भक्कम असून तिथून पश्‍चिमेला आंबोळगड व अरबी समुद्र, तर दक्षिणेला विजयदुर्ग व उत्तरेला पूर्णगडपर्यंतचा मुलूख दिसतो. त्यावर टेहळणी करण्यासाठी व संदेश वहनासाठीही त्याचा वापर करण्यात येत होता. तटबंदीला पायऱ्यांचा रस्ता आहे. तटबंदीच्या आत बालेकिल्ला असून त्याला तिन्ही बाजूंनी खंदक आहे. जवळच सुमारे 80 फूट खोल विहीर आहे. प्रवेशद्वारे कमानीच्या आकाराची असून संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडातील आहे. हा स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुनाच मानावा लागेल. याच गावचे सुपुत्र आणि सर्जन (कै.) डॉ. रघुनाथ सीताराम पत्की हे पहिल्या महायुद्धाच्या वेळी लष्करात डॉक्‍टर होते. युद्धातील कामगिरी आणि पंचम जॉर्ज यांच्यावर उपचार करण्यासाठी भारतातून पाठवलेल्या डॉक्‍टरांच्या पथकातही ते होते. हे विचारात घेऊन पंचम जॉर्जने 1921 मध्ये हा किल्ला आणि विजयदुर्ग, पूर्णगड, जैतापूर, प्रभानवल्ली आदी 17 ठिकाणी त्यांना इनामी जमिनी दिल्या. त्या वेळी भेट मिळालेली तलवार त्यांच्या प्रभानवल्ली येथील घरात आहे, असे त्यांचे दत्तक पुत्र विश्‍वनाथ पत्की यांनी सांगितले. आता बऱ्याच जमिनी कुळकायद्याने गेल्या. पण गडावर आजही सुमारे 100 आंब्याची कलमे आणि सागाची हजारो झाडे आहेत. काळ बदलला. विश्‍वनाथ पत्कीही नोकरीनिमित्त मुंबईला गेले. त्यांचा मुलगा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. विश्‍वनाथ पत्कींचे शालेय शिक्षण जैतापूर हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यांचे बालपण या किल्ल्यात गेले. त्यामुळे ते इथे वास्तूच्या ओढीने येतात. काही काळ राहतात आणि भूतकाळात हरवतात. आडिवरेला पूर्वीच्या काळी संपन्न बाजारपेठ होती. त्याचे पुरावेही जागोजागी विखुरलेले आढळतात. पूर्वी शेती हाच या भागाचा मुख्य व्यवसाय होता. सरकारने फलोत्पादनाला शंभर टक्के अनुदानाची योजना राबविली आणि कातळावर आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. त्या आंब्यालाही वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरी, देवगड हापूस मागोमाग आडिवरे हापूस प्रसिद्ध झाला तर आश्‍चर्य वाटायला नको.

Monday, April 18, 2011

पीर भद्रेश्वर

पीर भद्रेश्वर नाव ऐकून काहीच बोध होत नाही. हिंदूंचे मंदिर की आणखी काही असा प्रश्‍न डोळ्यांसमोर येतो. सर्वसामान्य भाविकांना सरसकट तेथे जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे गूढतेचे वलय या वास्तूभोवती आहे. मलाही या वास्तूचे आणि त्या परिसराचे कुतूहल वाटत आले आहे. काही प्रमाणात का होईना गेल्या महिन्यात ते कुतूहल शमले. याचे कारण म्हणजे पीर भद्रेश्वरला भेट देता आली, तीही कॅमेऱ्यासकट. एरवी पीर भद्रेश्वरपासून वीस किलोमीटर अलीकडेच लष्कराच्या नाक्‍यावर कॅमेरा जमा करावा लागतो व येताना तो परत घ्यावा लागतो. फक्त मनातच आठवणी साठवाव्या लागतात. तेथे मला लष्कराच्या बसने जाता आले. डोंगराच्या माथ्यावर पोचल्यावर छोटेखानी असे मंदिर दृष्टीस पडले. एका वेळी गाभाऱ्यात सहा माणसे कशीबशी दाटीवाटीने राहू शकतील असे ते सुबक मंदिर मनाला भावल्यावाचून राहिले नाही. त्यावर कोरलेला शिलालेख वाचताना आपल्या जवानांनी प्राणाची बाजू लावून हा परिसर पाकिस्तानकडून कसा जिंकून घेतला आणि मंदिराची पुनर्उभारणी कशी केली याची माहिती मिळाली. भारतीय लष्कराच्या दृष्टीने हे तसे महत्त्वाचे ठाणे. कारण शंभर मीटरवर दरीत पाकव्याप्त काश्‍मीर सुरू. त्यामुळे इन्सास व एके 47 रायफली घेतलेल्या जवांनाचा खडा पहारा तेथे आहे.सहज म्हणून मी दुर्बीण घेऊन दरीत पाहिले असता समोरा समोर दोन चौक्‍या दिसल्या. त्या मला पाकिस्तानी चौक्‍या वाटल्या. मी कुतूहलाने विचारणा केल्यावर एक आपली व एक त्यांची चौकी. दोन्हींत केवळ नव्वद मीटरचे अंतर अशी माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तानने आता जाणीवपूर्वक सीमावर्ती भागात लोकवस्ती वाढविण्यावर भर दिल्याचे दिसून आले. नवी घरे त्यांच्या बाजूने उभी राहत आहेत. या वस्तीमागून भारताच्या बाजूने मारा करायचा आणि भारताने प्रत्युत्तर दिले की नागरी वस्तीवर हल्ला केल्याचा कांगावा करायचा असा सरळ हेतू यामागे आहे.या भद्रेश्वर मंदिराकडे जाताना वाटेत तुरळक वस्ती दिसते. शेळ्या चरायला घेऊन जाणारे गावकरी दृष्टीस पडतात. लष्करी वाहने पाहण्याची सवय असलेले हे लोक एखादे निराळे वाहन दिसले की पाहतच राहतात. कधी तरी हात उंचावून प्रतिसादही देतात. वाटेत प्रत्येक दहा मीटरवर खडा पहारा आहे.चौक्‍यांची तर गणतीच नाही. घुसखोर दहशतवादी सीमावर्ती भागातून मुख्य भागात पोचू नये यासाठी जंगलातील प्रत्येक इंचावर नजर असण्याची खास व्यवस्थाही आहे.दक्ष राजावर शिवपुत्र भद्रेश्वराने विजय मिळविल्याच्या स्मरणार्थ कनिष्क राजाने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख इतिहासात आहे. शिवाने जटा दगडावर आपटून या भद्रेश्वराची निर्मिती केली अशी श्रद्धा आहे. दक्षावर विजय मिळविल्यानंतर हिमालयात परत जाताना भद्रेश्वराने या मंदिराच्या ठिकाणीच विश्रांती घेतली होती असेही शिलालेखावर म्हटले आहे.1947-48 मध्ये पाकिस्तानने मारा करून मंदिर उद्‌ध्वस्त केले होते. या भागावरही पाकिस्तानने कब्जा केला होता. त्या वेळीच वीर भद्रेश्वराचे पीर भद्रेश्वर असे नामकरणही झाले. 20 ऑक्‍टोबर 1948 ला भारताने हा प्रदेश पाकिस्तानकडून जिंकून घेतला. कर्नल प्रेम प्रताप क्षत्रिय व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मंदिराची उभारणी केली. अलीकडेच मंदिरात शिवलिंगाची पुनर्स्थापनाही करण्यात आली आहे. सुमारे चार हजार फुटावरील हा परिसर मनात घर केल्याशिवाय राहत नाही.या भद्रेश्वराच्या मंदिराच्या परिसरात घंटांच्या माळा आहेत. या मंदिरात घंटा बांधून केलेला नवस पुरा होतो अशी श्रद्धा आहे. त्यासाठी मंदिरातच घंटा विकत मिळण्याची व्यवस्था आहे. फक्त मंदिरापर्यंत पोचण्यासाठी लष्कराची खास परवानगी तेवढी हवी.

Sunday, April 17, 2011

देखणे गाव आयी

गोव्यातील साखळीहून दोडामार्गला जाताना आयी हे गाव आहे. बांद्यापासून काही किलोमीटरवर असलेले हे गाव आपली वेगळी ओळख आजही टिकवून आहे. पोर्तुगीज काळातील गजबजलेली व्यापारी बाजारपेठ अशी ओळखही आयी गावाला आहे. तेथे आजही पोर्तुगीजकालीन इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या कित्येक वास्तूही आहेत.पर्ये येथून परतताना एक दिवस सहज उजवीकडे वळलेला हा रस्ता कुठे जातो असा प्रश्‍न पडला नि मी आयी येथे पोचलो.पोतुर्गिजांची गोव्यावर सत्ता असताना ब्रिटिशांच्या ताब्यातील व नंतर मुक्त भारताच्या हद्दीतून अनेक गोष्टी गोव्यात आणल्या जात. या गोष्टी चोरट्या मार्गाने आणण्यासाठी आयीचा वापर होत असे. चणे, वाटाणे, गूळ, चवळी, छत्र्या, कपडे, अगरबत्ती आणल्या जात असे मला तेथे कळले. दोडामार्गच्या बाजारपेठेतून बैलगाडीतून माल आयी येथे आणला जायचा. दोडामार्गातून एका वेळी 25 ते 50 बैलगाड्या सुटायच्या. दोडामार्ग, तळेखोल, कीटवाडी असा प्रवास करीत रात्री सुटलेल्या गाड्या पहाटेपर्यंत गावात पोचायच्या. तेथे सगळा माल उतरून ठेवला जायचा. उतरलेला माल रात्री सीमापार करून गोव्यात नेला जायचा. रात्रभरात 50 ते 60 कामगार मालाच्या गोणी सीमापार नेऊन द्यायचे. तेथे पुन्हा दुसरे कामगार हजर असायचे. इकडचा माल तिकडे जाऊ नये, यासाठी पोर्तुगिजांनी माटणे गावापासून रावण गावापर्यंत सुमारे पंचवीस किलोमीटर अंतर भरेल एवढे लोखंडी कुंपणही उभारले होते. त्याचे अवशेषही मला पाहता आले. तारेच्या पलीकडे पोर्तुगिजांचा, तर अलीकडे कस्टमच्या पहारेकऱ्यांचा पहारा असायचा. अशा या वेगळ्या बाजारपेठेच्या खुणा आजही आपले अस्तित्व जोपासत असून काही इमारती पडक्‍या, तर काही दिमाखात उभ्या आहेत. गोव्यातून ब्लेड, लवंग, सुपारी, सुके मासे याच पद्धतीने आणले जायचे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा बाजार बंद झाला, तरी त्याच्या खुणा इतिहास अभ्यासकांसाठी मागे राहिल्या आहेत. दोडामागर्मध्ये एकदा भटकंती करत असताना पारगडविषयी कळले. तेथील गावस नावाचे गृहस्थ मला तेथे नेण्यासही तयार झाले. पारगडाची भौगोलिक रचना अशी की, गोव्यातील पोर्तुगीज, सावंतवाडीचे खेम-सावंत यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग करण्यात आला. चंद्र-सूर्य असेपर्यंत या गडाची राखण करायची, अशी सनद (ताम्रपट) शिवाजी महाराजांनी दिली आणि अखेरपर्यंत हा गड अजिंक्‍य राहिला. 1857 च्या गडकऱ्यांच्या बंडातही हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ शकला नाही. उंच ताशीव कडे, पायथ्याला घनदाट जंगल आणि आकाशाशी स्पर्धा करणारी उंची यामुळे हा गड आपले अभेद्यपण टिकवून आहे.चंदगड-दोडामार्ग-गोवा रस्त्यावर पारगडकडे जाणारा फाटा मिळतो. तेथून पारगडला जाता येते. दोडामार्ग तालुक्‍यातील मोर्ले गावातून मिरवेलमार्गेही पारगडला जाता येते. त्यासाठी काही तास चालत जावे लागते. आम्ही दोन्ही बाजूने गडावर चढाई केली. दाट धुक्‍यात हरवलेली गर्द झाडी, घोंगावणारा गार वारा, आभाळ आणि अरण्य यांची एकमेकांना स्पर्श करण्यासाठी चाललेली स्पर्धा आणि निसर्गाचे अनेक विलोभनीय विभ्रम पारगडावरून पाहायला मिळाले. गडावर शिवरायांच्या वंशजांचे आजही अस्तित्व आहे. त्यांची घरे तीन-साडेतीनशे वर्षे तेथे उभी आहेत. मालुसरे, शेलार, झेंडे, शिंदे, कदम, नाईक, डांगे, जगताप, सूर्यवंशी, चव्हाण, माळवे, कुंडले, थोरात, जाधव, कारखानीस, फडणीस, सबनीस, मणेरकर ही गडावरची मूळ घराणी. गडावर पद्मावती तलाव, अन्य तीन बांधीव दगडाचे तलाव, याशिवाय अठरा विहिरी आहेत. गडाच्या पश्‍चिमेला तीन बुरूज आहेत. फडणीस बुरूज, भालेकर बुरूज आणि शेलार बुरूज अशी त्यांची ओळख आहे. शिवाय भांडे, झेंडे माळवे हे अन्य तीन बुरूज आणि पूर्व-पश्‍चिम-उत्तरेला भक्कम तटबंदी आहे.

Saturday, April 16, 2011

एक पणती त्यांच्यासाठी...

समाजाचा एक दखलपात्र घटक निराधार आहे ही जाणीवच मन बधीर करणारी आहे. बाजारपेठेत पैसे मोडताना अशांचा चेहरा डोळ्यासमोर निश्‍चितपणे आणायला हवा. या वर्षाच्या बजेटमधील काही वाटा त्यांच्यासाठी, याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. दान फक्त धनिकांनीच करावे हे मनातून काढून टाका. ....
काय काय घेतले या गुढी पाडव्याला?..नवे कपडे, वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रीज की नवी गाडी? वर्षातून एकदा येणारा हा उत्सव झगमगाटात साजरा करायचाच असतो. सर्वदूर लखलखाट, मिणमिणत्या पणतीच्या प्रकाशात आपल्या आप्तस्वकीयांच्या आरोग्याची शुभकामना करायची. त्यांना लक्ष्मीप्रसाद मिळावा, म्हणून शुभेच्छा द्यायच्या... हे सारे आपण आपल्यासाठी करणार, नाही का? पण... पण आपल्यातीलच काही दुर्दैवी जीव, ज्यांना एक वेळचे जेवणसुद्धा मिळणे कठीण असते, त्यांनाही आपल्यासारख्याच भावना आहेत. त्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नसले तरी समाजबांधव म्हणून त्यांच्या भावना जपणे हे आपलेच कर्तव्य नाही का? मग त्यांची दिवाळी आपल्यासारखीच व्हावी म्हणून प्रयत्नही आपणच करायला हवेत ना? आपल्या भरलेल्या फराळाच्या ताटातील अर्धी करंजी, लाडू, चकली, अनारसे आपण त्यांच्यासाठी दिले तर आपण नक्कीच उपाशी राहणार नाही. उलट भुकेल्या जीवाला दोन घास भरविल्याचा निखळ आनंद प्रत्यक्ष अनुभवता येईल. पाडव्यानिमित्त बाजारपेठेत झगमगाट होता. खरेदीसाठी ठिकठिकाणी झुंबड होती. एकीकडे प्रकाशपर्वाचा उत्साह ओसंडून वाहत असताना समाजातील काही उपेक्षित घटकांच्या मनामध्ये मात्र अंधार कोपरा कायम आहे. अशा कोपऱ्यातील अंधार दूर करून विश्‍वासाची दिवाळी निर्माण करण्याचे नियोजन आपण नाही तर कोणी करायचे? अनाथ मुले, भिकाऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुले अशा उपेक्षित घटकांसाठी नियमित काम करणाऱ्या अनेक संस्था शहरात आहेत. त्यांच्यातर्फे दिवाळीच्या दिवसांत राज्यात विविध उपक्रम राबविले जातीलही. त्यात साऱ्यांनीच खारीचा वाटा उचलणे ही खरी दिवाळी ठरणार आहे.गोव्यात गरीबी नाही, सगळीकडे आनंद मौजमजा आहे असे गोंडस पण फसवे चित्र रंगविले जाते. अन्य राज्यात गोवा म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्ग असाच समज आहे. हे खोटे आहे हे आपणास ठाऊक असल्याने समाजातील उपेक्षित घटकांना सणांच्या निमित्ताने आनंद देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. येथील काही टक्के लोकांचेच राहणीमान सुखवस्तू आहे. सरकारच्या दयानंद निराधार योजनेतील लाभार्थ्यांची यादी व आकडेवारी पाहिली तरी समाजाचे नेमके चित्र काय याचा प्रत्यय येऊ शकतो. ही मदत मिळविण्यासाठी कित्येकजण प्रतीक्षा यादीवर आहेत ही सांगूनही खरी न वाटणारी गोष्ट. तरीही समाजाचा एक दखलपात्र घटक निराधार आहे ही जाणीवच मन बधीर करणारी आहे. बाजारपेठेत पैसे मोडताना अशांचा चेहरा डोळ्यासमोर निश्‍चितपणे आणायला हवा. या दिवाळीच्या बजेटमधील काही वाटा त्यांच्यासाठी, याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी. दान फक्त धनिकांनीच करावे हे मनातून यानिमित्ताने काढून टाका. प्रगतीकडे झेपावणाऱ्या या राज्यातील दुःख आणि दारिद्य्र मिटविण्यासाठी खारीचा का होईना वाटा उचलला पाहिजे.याच संदर्भात आणखी एक धक्‍कादायक बाब म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साडेचार टक्के लोक दारिद्य्र रेषेखालील जीवन जगतात. त्यांच्यासाठी सरकाराच्या अनेक सुविधा सोयी आणि सवलतीही आहेत. त्याने त्यांची आसवे पुसली जातील काहा खरा प्रश्‍न आहे.

Friday, April 15, 2011

बारबाला आल्या गोव्यात

मुंबईतील डान्स बारवरील बंदीच्या घोषणेचे एकीकडे लोकांमधून स्वागत होत असले, तरी त्या बारबालांनी आता गोव्याची वाट चालणे सुरू केले आहे. अगदी चाळिशी उलटलेले "तरुण'ही येथे मनसोक्त ऐष करताना पाहायला मिळाले. ओळखणारे फार कोणी नसल्याने हवा तसा धिंगाणा घालता येतो, हे खरे यातील "युनिक सेलिंग प्रेपोझिशन' आहे. चाळिशी उलटलेल्यांची पावलेही किनाऱ्यालगत अशी सेवा पुरविणाऱ्या ठिकाणांचे उंबरठे झिजवताना दिसताहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत डान्स बारचे हे पीक मुंबईबाहेरही फोफावायला सुरवात झाली. गोव्याचे किनारे तर जगप्रसिद्ध. मुक्त वातावरणामुळे या जागा तर या दृष्टीने मोक्‍याच्या आहेत. शहराजवळ असूनही, शहराबाहेर असल्याने ओळखणारे फार कोणी नसते आणि त्यामुळे निःसंकोच "ऐष' करता येते, हे खरे यातील "युनिक सेलिंग प्रेपोझिशन' आहे, असे येथे जाणारेच सांगतात. येथे येणारे लोक कोण आहेत, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर या विधानाची सत्यता पटते. साध्या शीतपेयांचीच किंमत 120 रुपये असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तुमचा खिसा "गरम'च असावा लागतो. बाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारी आतमध्ये कोणत्या दर्जाचे लोक असतील, याची कल्पना देतात.बक्कळ पगारावर नोकरी करणारे तरुण, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी अशी मोठी "रेंज' येथे पाहायला मिळाली. आश्‍चर्याची बाब म्हणजे युवकांपेक्षाही मध्यमवयीन (साधारण चाळिशीचे) लोकांचा येथे मोठ्या प्रमाणावर राबता आहे. खऱ्या अर्थाने "चार पावसाळे' पाहिलेल्यांचा हा नवा षौक असल्याचे येथे प्रत्यक्ष गेल्यावर लक्षात येते. "आयटेम गर्ल'चे चित्रपटातील नृत्य पडद्यावर पाहणे वेगळे आणि "याचि देही, याचि डोळा' प्रत्यक्ष तो अनुभव घेणे वेगळे,' असे समर्थन करीत तेथे जाणारे लोकही काही कमी नाहीत! पबमध्ये बारबालांचे नृत्य नसते. सर्वसाधारणपणे येथे केवळ "कपल'नाच प्रवेश असतो. तेथे येणाऱ्या ग्राहकांसाठीच "डान्स फ्लोअर' केलेला असतो. ज्या कोणाला नृत्य करायचे, तो तेथे नृत्य करू शकतो. पण ग्राहकासोबत बारबाला आल्या तर त्यांना अडविण्यासाठी कुठलीही कायदेशीर तरतूद नसल्याने त्याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे दिसून येते. नृत्याची नशा केवळ पैशाची उधळपट्टी करून थांबत नाही. त्यापुढील अनेक गोष्टी घडतात. काळ्या पैशाचे मोठे व्यवहारही येथे चालतात, असे जाणकार सांगतात. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच एका "कर्तव्यदक्ष' पहारेकऱ्याने सलाम ठोकून स्वागत केले. प्रत्यक्ष अशा ठिकाणी आत जाईपर्यंत तेथील "माहोल'ची काहीसुद्धा कल्पना येत नाही. आत गेल्यावर मात्र कर्कश संगीतानेच स्वागत होते. येथेही "रिमिक्‍स'चा प्रभाव जाणवतो! आतिथ्यशील वेटर तुम्हाला जागा सुचवतात. नेहमी येणारे "शौकीन' गिऱ्हाईक असेल, तर "डान्स फ्लोअर'च्या अगदी शेजारचे टेबल राखीव असते. प्रत्यक्ष "डान्स फ्लोअर'वर दिव्यांचा झगमगाट होता. संगीताच्या ठेक्‍यानुसार, प्रकाशयोजना बदलत असल्याचे दृश्‍य सध्या किनारी भागात पाहाता येते. अनेक मुली स्वखुशीने यामध्ये आल्याचीही माहिती मिळाली, तर काहीजणी गरजेपोटी करारावर (करार अर्थात तोंडीच असतो) येतात. ती मुलगी बारमालकाला अमुक एक रक्कम मिळवून देईपर्यंत संबंधित बारमध्ये काम करील, अशा प्रकारचा करार केला जातो. मात्र, थोड्या कष्टात मिळणारे बरेच पैसे हेच त्यांचे या व्यवसायाकडे वळण्याचे मुख्य आकर्षण आहे. येथील पैशाच्या उधळपट्टीची तर मोजदादच होऊ शकत नाही. ही धुंदी रात्र चढेल तशी उत्तरोत्तर रंगतच जाते आणि गिऱ्हाईकांचे खिसे रिकामे होतच राहतात.

Thursday, April 14, 2011

शिरोडा एकदा तरी भेट देण्याजोगे

वेंगुर्लेहून मोचेमाड ओलांडली की लागते आरवली. जयवंत दळवी यांचे गाव. तेथील परिसरावर आधारित अनेक कादंबऱ्या, कथा दळवींनी लिहिल्या, त्यांच्या नाटकाची बिजेही याच परिसरात अंकुरली असे सांगितले जाते. माझे मित्र अरुण नाईक यांच्यासोबत मी एकदा आरवलीला गेलो. तेथील भिके डोंगरी अरुणच्या श्रद्धेचा विषय. वि. स. खांडेकर शिरोड्यात असताना त्या डोंगरीवर जात म्हणून आम्हीही गेलो. शिरोड्यात रामपुरूष मंदिरासमोर विठ्ठल परब यांचे घर. रेडी येथे बंदर पूर्ण क्षमतेने सुरू असताना तेथील कॅन्टीन हे गृहस्थ चालवत. त्यांनी मला शिरोडा म्हणजे काय ते पायी फिरून दाखवले.नाबरवाडीत खांडेकर राहत ती वास्तू मला त्यांच्यामुळेच पाहता आली. रेडीला जाण्यापूर्वी मिठाचे आगर आहेत. त्या आगराच्या काठावर एक मोठा वृक्ष आहे. 1930 मध्ये दांडी येथे महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला त्याचवेळी शिरोड्यातही मिठाचा सत्याग्रह झाला होता. त्या वेळी लावलेल्या वृक्षाचे आज अजस्त्र वृक्षात रूपांतर झाले आहे. आज आगरात मीठ काढण्याऐवजी मत्स्यपालन करणे परवडत असल्याने मिठागरे काळाच्या उदरात गडप होण्याचाही धोका शिरोड्यासमोर आहे.शिरोडयात मी रमलो कारण तेथील खटखटे ग्रंथालय. सुटीच्या दिवसात 10-15 दिवस शिरोड्यात राहून या ग्रंथालयात असलेली विविध विषयांवरची पुस्तके वाचणे महाविद्यालयीन जीवनात आनंदाचे वाटे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयाखालोखाल या ग्रंथालयात ग्रंथसंपदा आहे असे मला वाटते. या ग्रंथालयाकडून मुख्य बाजाराकडे येताना समोरच माउलीचे मंदिर आहे.या मंदिरावरून न्यायालयीन लढा सुरू होता त्या वेळी जत्रोत्सव बंद होता तो काळही मी तेथे अनुभवला आहे. शिरोडा परिसरातील जत्रोत्सवाला दारूकामाची आतषबाजी एक खास आकर्षण असते. हे दारूकाम आरवली येथील मधुकर कुडव बंधू आणि आजगाव येथील राधाकृष्ण नार्वेकर यांनी बनविलेले असते. जत्रोत्सव म्हटला की भाविकांची अलोट गर्दी, पाहुण्यांची रेलचेल आणि दशावतारी नाटक (दहिकाला) अशी अनेकविध वैशिष्ट्ये असतात; परंतु शिरोडा परिसरातील जत्रोत्सवांचे वेगळे खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या भागात बनविलेल्या शोभेच्या दारूकामाची आतषबाजी. डोळ्याचे पारणे फेडणारी ही आतषबाजी असते. शिंगात भरलेल्या शोभेच्या दारूच्या जोरावर गोल फिरणारी "घिरट' न विझता फिरतच राहावी, असे वाटणारी आतषबाजी. आकाशात उंच उडल्यावर त्या ठिकाणी पुन्हा फुटणाऱ्या दारूकामातील वेगवेगळ्या प्रकारच्या चांदण्या या शिवकाशीमधील रेडिमेड नरसाळ्यारूपी दारूकामामुळे स्थानिक शोभेच्या दारूकाम वापराचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले आहे; मात्र शिरोडा येथील देवी माउली पंचायतन देवस्थान, आजगाव येथील देव रवळनाथ, रेडी येथील देवी माउली, आरवली येथील देव वेतोबा, देवी सातेरी, कंदवाडा देवी माउली आदी देवस्थानच्या जत्रोत्सवाला स्थानिक शोभेच्या दारूकामाची आतषबाजी पाहण्यास भाविकांची, रसिकांची बरीच गर्दी असते. ती अनुभवण्यासाठी डिसेंबरध्ये शिरोड्यात जायलाच हवे.

Wednesday, April 13, 2011

कोकणातील खेडे

कोकणात जाणे मला नेहमीच आवडत आले आहे. दाभोळचे अण्णा शिरगावकर, चिपळूणचे प्रकाश देशपांडे, सागरचे संपादक निशिकांत जोशी, सावंतवाडीचे अरविंद शिरसाट, वेंगुर्ल्यातील संजय मालवणकर, वैभववाडीचे प्रकाश काळे, गुहागरचे संकेत गोयथळे, रत्नागिरीचे गिरीश बोंद्रे, मंडणगडचे विकास शेटये यांच्यामुळे कोकण बरेच समजून घेता आले.त्यांच्याकडून मी संकलीत केलेल्या माहितीनुसार कोकणातील प्राचीन खेडी स्वयंपूर्ण होती. मात्र बदलत्या काळानुसार खेड्यातील चांगल्या चालीरीती, परंपरा नष्ट झाल्या आणि खेडी भकास झाली आहेत. चौसोपी कौलारू घर, ओटी, पडवी, माजघर, न्हाणीघर, अंधारात असणारे स्वयंपाकघर, घरापाठीमागे गुरांचा गोठा, नारळी-पोफळीच्या बागा, शेतमळा, पाटाचे पाणी, कौलारू घरातून बाहेर पडणारा धूर, गावातून वाहणारी नदी, प्राचीन इतिहासाची साक्ष देणारी मंदिरे खेड्यात आजही पाहता येतात. स्वयंपूर्ण खेड्यातील लोकजीवन, संस्कृती, बारा बलुतेदारांचे व्यवसाय, एकोपा, चालीरीती, पद्धती तेथे राहून अभ्यासण्यासारख्या आहेत. कोकणातील गावे डोंगराळ भागात वसलेली असतात. दोन गावे किंवा एकाच गावातील दोन वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जायचे झाले, तरी एखादा छोटासा डोंगर पार करावा लागतो. तो कष्टप्रद अनुभव दत्तप्रसन्न कुलकर्णीसोबत मी अनेकदा घेतला आहे. दरीतून जाणाऱ्या पक्‍क्‍या पाऊलवाटांनी जाण्याचा अनुभव घेण्यासाठी चिपळूणजवळील पोफळी परिसरात जायला हवे. लाल चिऱ्याच्या दगडापासून बांधलेल्या या वाटांना बांधघाटी किंवा पाखाडी म्हणतात. रत्नागिरी शहर आणि परिसरात अशा अनेक पाखाड्या आजही सुस्थितीत आहेत. गूळपाणी देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करून घेण्याची मजा फक्त कोकणातच अनुभवता येते.कोकणात फिरताना कुठे तरी डोंगरात भेटते परशुरामाची मूर्ती. कोकणाला परशुरामभूमी म्हणून संबोधले जाते. परशुरामाकडून झालेले निःक्षत्रीयीकरण, समुद्र हटवून कोकणाची निर्मिती आदी कथा चिपळूणच्या निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांच्याकडूनच ऐकायला हव्यात. परशुराम शास्त्रज्ञ कसा होता हे नानांच्या तोंडून ऐकताना समाधीच लागली पाहिजे. कोकणात फिरताना ग्रामदैवत वाघजाईचे मंदिर सापडायचे. हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव असताना कोकणातल्या देवीचे नाव वाघजाईच का, असा प्रश्‍न मला एकदा पडला. वाघ असलेले जंगल पर्यावरणदृष्ट्या समृद्ध समजले जाते. त्याची उपास्य देवता म्हणून वाघजाईची पूजा केली जाते. संपूर्ण गाव याच एका ठिकाणी एकत्र होत असे. येथील निवाडे अंतिम असत, अशी माहिती अनेकांशी या विषयावर चर्चा केल्यावर मिळाली.पूर्वी गावाच्या प्रारंभीच नाभिकाचे दुकान असे. गावाचा प्रमुख असलेला खोत, विविध शस्त्रांसह शेतीची अवजारे तयार करून देणारा लोहार, अल्प वस्त्रात असला तरी गावाचे पोषण करणारा- शेती करणारा कुणबी, कासार, कुंभार, सुतार, चर्मकार, धनगर, कोळी असे बलुतेदार भेटण्यासाठी कोकण दौऱ्याला पर्याय नाही.

Tuesday, April 12, 2011

वेंगुर्ले मी पाहिलेले

गेल्या आठवडयात नातेवाईकांकडे जाण्याच्या निमित्ताने कोकणातील वेंगुर्लेत गेलो होतो. वेंगुर्ले सागर किनाऱ्यावर वसलेले एक देखणे गाव. वेंगुर्ल्यात संजय मालवणकर यांच्याबरोबर अनेकदा मी फिरलो. एक दोनदा शिरोड्याच्या अनिल निखार्गे यांच्याकडूनही वेंगुर्लेबाबत माहिती घेतली.वेंगुर्लेच्या मार्केटबाबत मला त्या वेळी नेहमीच कुतूहल वाटत असे. हे मार्केट कुठे तरी पाहिल्याचे राहून राहून वाटत असे. गुरुनाथ कदम यांच्याबरोबर एकदा भल्या पहाटे वेंगुर्ल्याला जाताना वाटेत सहज गप्पा मारताना त्यांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट बांधण्यापूर्वी क्रॉफर्ड वेंगुर्ल्यात होते त्यांनीच वेंगुर्ल्यातील मार्केट बांधल्याची माहिती दिली. म्हणजेच मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे वेंगुर्ल्यातील मार्केटची मोठी प्रतिकृती होय. त्या मार्केटची नंतर तपशीलवार पाहणी मी केली. छायाचित्रेही टिपली. 60-70 च्या दशकात वाहतुकीचा प्रमुख मार्ग समुद्र होता. त्यामुळे जहाजे, गलबते ही मालवाहतुकीची साधने होती. त्यामुळे अगदी कोल्हापूर-बेळगावपर्यंतचाही माल वेंगुर्ले बंदरातून जात होता. त्यामुळे दुकानांच्या संख्येएवढीच किंबहुना जास्त संख्येने येथे मालाचा "क्‍लिअरन्स' करणाऱ्या पेढ्या होत्या. आज शहरातील स्टेट बॅंक, सिंडिकेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया अशा बॅंका पूर्वीच्या व्यापारी पेढ्यांच्या इमारतीत स्थानापन्न झाल्या आहेत. यावरूनच या पेढ्यांच्या व्यवसायाचा आवाका लक्षात येईल.विदेशींनी व्यापारासाठी बांधलेली वखारही वेंगुर्लेत भग्नावस्थेत आहे. तत्कालीन लष्करी तळ असलेला परिसरही आज कॅम्प या नावानेच ओळखला जातो. वेंगुर्लेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र आहे. तेथे विकसित करण्यात आलेले वेंगुर्ले जातीची काजूची कलमे आता सर्वमान्य झाली आहेत. तेथेही अनेकदा मी गेलो.  समुद्राच्या कुशीत विसावलेल्या वेंगुर्ले येथे सेंट लुक्‍स हॉस्पिटल गेली शंभरेक वर्षे आरोग्यदानाच्या सेवेचे कार्य करीत आहे. सेंट लुक्‍स हॉस्पिटल मिशनरी लोकांनी सुरू केले. आजपर्यंत लाखो रुग्णांना जीवदान देणारे हे हॉस्पिटल आहे. सिंधुदुर्गातील सर्वांत जुन्या हॉस्पिटलमध्ये याचा समावेश होतो. बॅ. खर्डेकर विद्यालय, वेंगुर्ले हायस्कूल, सेंट लुक्‍स हॉस्पिटल आदी संस्था वेंगुर्ले तालुक्‍याबाहेरील लोकांनी येथे सुरू केल्या. त्या व्यक्ती आज जिवंत नाहीत. त्यांच्या आठवणी मात्र आजही जिवंत आहेत. 1915 मध्ये स्थापन झालेल्या या हॉस्पिटलमध्ये त्या काळी गोव्यातूनही रुग्ण येत अशी माहिती मला तेथे मिळाली. आज मात्र उलटी स्थिती आहे. आज लोक मासे आणण्यासाठी वेंगुर्लेत जातात आणि तेथील रुग्ण बांबोळीला येतात.

Sunday, April 10, 2011

मुंबापुरीच्या सागरी पर्यावरणालाही घरघर

सागराच्या पोटात साठणाऱ्या शेवाळामुळे जन्माला येणाऱ्या बॅक्‍टेरियांमुळे समुद्राच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने हे अत्यंत धोकेदायक असून, कोट्यवधींची लोकसंख्या सहन करीत कशीबशी उभी असणारी महानगरी मुंबई आता या धोक्‍याच्या कड्यावर पोहोचली आहे... पणजीजवळच्या दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांनी मुंबईतील बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे गेल्या 40 वर्षांत सागरी पर्यावरणावर पडलेल्या ताणाचे विश्‍लेषण करून काढलेल्या अहवालात वरील निष्कर्ष नोंदविणयात आला आहे."एनआयओ'चे एस. एस. सावंत, लीना प्रभुदेसाई, के. व्यंकट हे शास्त्रज्ञ जहाजातून सोडण्यात येणाऱ्या बलास्ट वॉटरचा अभ्यास करताना (जहाज समतोल राहावे म्हणून जहाजाच्या वेगवेगळ्या कप्प्यांत गरजेनुसार पाणी भरण्यात येते. गरजेनुसार पाणी जहाजाबाहेर फेकलेही जाते. या पाण्यातून त्या त्या ठिकाणचे जीवजंतू नव्या ठिकाणी येतात. या पाण्याला बलास्ट वॉटर म्हणतात) मुंबई बंदर आणि परिसरातील पाण्यात बॅक्‍टेरियांचा वाढलेला वावर या संशोधकांना अस्वस्थ करून गेला. समुद्रातील पाण्याच्या अभ्यासासाठी निर्माण केलेल्या वीस केंद्रांवर नियमितपणे या पाण्याचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करणे सुरू होते. मुख्य कामाबरोबर समांतर असे हे काम सुरू होते. वर्ष दोन वर्षाने लक्षात आले, की या मुंबईलगतच्या पाण्यात अन्नद्रव्यांचे प्रमाण फार आहे. असे असले तर सागराच्या पोटातील पूर्ण विकसित अशी जीवसृष्टी तेथे असायला हवी होती. पण तसे काही चित्र दिसत नव्हते. परिसरातील कंपन्या, हॉटेलांचे सांडपाणी आणि शहरातील गटारे यांतून अन्नद्रव्ये समुद्राच्या पाण्यात मिसळत असतात. मुंबईलगतच्या समुद्रात शास्त्रज्ञांना हेच नेमके आढळले. तेथे बॅक्‍टेरियांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. बॅक्‍टेरियांना पाण्यात मिसळलेला प्राणवायू मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने तेथे अन्य जीवजंतू जगू शकत नाहीत. त्यामुळे अन्नद्रव्याने श्रीमंत अशा मुंबईलगतच्या समुद्रातल्या जीवसृष्टीला ओहोटी लागल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी तसा शोधनिबंधही सादर केला आहे.ंबईची लोकसंख्या 1060 मध्ये चार दशलक्ष होती, तर 2001 मध्ये ती 18.3 दशलक्षवर पोचली व 2011 मध्ये ती 22.4 दशलक्षवर पोचण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यातील संबंधित अन्नद्रव्यांच्या घटकांच्या उपस्थितीची 1960 पासूनची उपलब्ध माहिती या शास्त्रज्ञांनी अभ्यासणे सुरू केले. त्यातून हा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला. त्यांनी 2001-02 मध्ये प्रत्यक्षपणे अनेक नमुनेही गोळा केले त्यांचे विश्‍लेषणही त्यांच्या निष्कर्षाचीच पुष्टी करते. "नायट्रेट'चे वाढते प्रमाण सागरी पर्यावरणाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार असा प्रश्‍न शास्त्रज्ञांना आता पडला आहे.

एडनच्या आखातातील पाण्याचे अंतरंग उलगडले

एडनच्या आखातातील वरून एकच दिसणाऱ्या; पण प्रत्यक्षात तसे नसलेल्या पाण्याचे अंतरंग उलगडण्यात एका संशोधकाला यश आले आहे. विशेष म्हणजे, हा संशोधक गोवा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. येमेनच्या साना विद्यापीठातील महम्मद अली अल साफानी यांनी गोवा विद्यापीठात "पीएचडी'साठी संशोधन सुरू केले आहे. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत (एनआयओ) डॉ. सतीश शेणॉय यांच्यासोबत संशोधन करताना साफानींनी हा शोध लावला आहे. त्यांनी या पाण्याबाबत 1920 पासून आजवर उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचे विश्‍लेषण केले. त्यातून, क्षारतेनुसार एडनच्या आखातात चार प्रकारचे पाणी अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले आहे. या आखातात तांबड्या समुद्रातून येणाऱ्या पाण्याचे प्राबल्य असून, ते एकूण पाण्याच्या 37 टक्के असल्याचे साफानी यांनी आपल्या संशोधनपर निबंधात म्हटले आहे. आखाताच्या पृष्ठभागावरील पाणी हे तीन टक्‍क्‍यांहून कमी आहे आणि पश्‍चिमेकडील अरबी समुद्र व स्थानिक पातळीवर जमा झालेले पाणी, यातून ते बनलेले आहे. उन्हाळ्यात तांबड्या समुद्रातून आलेले पाणीही यात मिसळते. या पाण्याचे प्रमाण नऊ टक्के आहे, तर त्याची क्षारता सर्वांत कमी म्हणजे प्रत्येक घनमीटरला 26.50 किलो असल्याचेही आढळले आहे. आखाताच्या तळाचे पाणी तांबडा समुद्र आणि दक्षिणेकडून येणाऱ्या पाण्याने बनले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आखातातील पाणी एकच दिसत असले, तरी शास्त्रीय तपासणी केल्यावर त्याचे चार प्रकार स्पष्ट झाले आहेत.साफानी 2003 मध्ये "एनआयओ'मध्ये रुजू झाले. त्यापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातून सागरी विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी घेतली होती. याविषयी डॉ. शेणॉय यांनी सांगितले, की यासाठी किमान वीस ठिकाणच्या पाण्याचे नमुने गोळा करावे लागले आणि ते सर्व वेगवेगळ्या ऋतूतील होते. एडनच्या आखातातील पाणी एकसारखे नाही, असा शास्त्रज्ञांचा या पूर्वीही समज होता; पण नेमकी पाण्याची विभागणी कशी आहे, यापर्यंत कोणाला पोचता आले नव्हते. क्षारता हा मुद्दा महत्त्वाचा मानून आम्ही पाण्याच्या पृथःकरणासाठी काही प्रमेये स्थापित केली. त्यानुसार विश्‍लेषण केल्यावर हाती आलेली माहिती थक्क करणारी असून, तिच्या आधारे जैवचक्रात होणारे बदल, घटते मत्स्योत्पादन आदींविषयी पुढील संशोधन शक्‍य होणार आहे.

Tuesday, April 5, 2011

खाणींच्या दुष्परिणामांचा अभ्यास आता कसला?

खाणींमुळे होणाऱ्या पर्यावरण हानीच्या अभ्यासार्थ प्रा. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय योग्य असला तरी त्याला फार उशीर झाला आहे. खाणपट्ट्यातील जनजीवनावर खाणकामाचा किती परिणाम झाला आहे याचा व्यापक शोध घेऊन सरकारने खरेतर याविषयी श्‍वेतपत्रिकाच काढण्याची गरज आहे. खाणकामामुळे पाण्याचे स्त्रोत आटण्यासह आरोग्याची झालेली धूळदाण पाहण्यासाठी समिती कशाला हवी? खनिज उद्योगाने आर्थिकदृष्ट्या उभारी दिली असली तरी पर्यावरणाची झालेली अपरिमित हानी कधीही भरून न येणारी आहे.
खाणकाम म्हणजे खुदाई हे ठरून गेलेलेच आहे. मध्यंतरी चीन, जपानसह सर्वत्र खनिजांची मागणी वाढल्याचे पाहून खाणकामाचे वाढलेले प्रमाण केवळ चिंता करण्यास लावणारेच नव्हे तर गोव्याच्या निसर्गावर घाला घालणारे ठरले आहे. गाडगीळ यांची समिती दोन वर्षांनी अहवाल देणार आहे. येत्या वर्षभरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. नव्याने सत्तेवर येणाऱ्या सरकारपुढे हा अहवाल येईल. सत्तेवर कुणी असला तरी त्याच्यावर मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक असते हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्षात केवळ सरकारच नव्हे तर खात्याचा मंत्री बदलला तरी होणारे दृश्‍य बदल इतके असतात की नवे सरकार या अहवालाकडे कसे पाहिल आणि त्यातील शिफारशींची अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे करेल याची कल्पना आता करता येणार नाही.
खाणपट्ट्यात ट्रकांची वाहतूक हा एक स्वतंत्र विषय. मध्यंतरी ट्रकाच्या धडकेत मृत्यू पावलेल्याच्या कुटूंबियांस अमूक लाख रुपये देण्याची आणि त्यानंतर असे प्रकार घडल्यास अशीच भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यातून खाण व्यवसायात गुंतलेल्यांचे निर्ढावलेपण ठळकपणे समोर आले होते. विधानसभेतही खाणपट्ट्यातील रहदारीचा विषय अनेकदा चर्चेला आला. खाणपट्ट्यातील ट्रकांची भीती वाटल्याने आपण सरकारकडून उंच गाडी घेतल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही म्हटले आहे. सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी वाहतूक कोंडीमुळे आपण अडकून पडल्यानंतर पोलिसांना कसे बोलवावे लागले याचाही किस्सा सांगितला आहे.
सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही. त्याला प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यावाचून गत्यंतर नसते. खाण क्षेत्रातील विद्यार्थी जीव मुठीत धरून कसे शाळेत जातात याची कल्पना शहरात बसून येणार नाही. या बालमनावर आपण काय बिंबवतो आहोत याचे भान कुणालाही नाही. सतत धूळ फुफुस्सात गेल्याने आरोग्यावर होणारे परिणाम आयुष्यभर सोबत करणारे असतात. अशा पिढ्याच्या पिढ्या उध्वस्त होणे आणि दुसऱ्या बाजूने खाणकामातून मिळणारी रॉयल्टी वाढली आणि त्यातून आम्ही जनतेसाठी चार योजना राबविणार असे सरकार कोणत्या तोंडातून सांगू शकते? सारेजण असंवेदनशील होत चालल्याचेच हे लक्षण आहे.
खाणीमुळे काहींचे भलेही झाले असेल पण अशा व्यक्ती अगदी कमी संख्येने आहेत. खाणींचा चटका बसणारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. कावरे येथे हा समाज एकत्र झाला, खाण संचालकांना रात्री उशिरापर्यंत थांबण्यास भाग पाडून त्यांनी खाण बंदचा आदेशही मिळविला. रस्त्यावर आल्याने प्रश्‍न सुटतो असे उदाहरण या घटनेने घालून दिले आहे. आजवर खाणकामाच्या विरोधात समाज एकत्र आल्याचे तसे ठळक उदाहरण नव्हते. आता कावरेवासींयाप्रमाणे इतरत्र लोकांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला तर खाणकाम चालूच शकणार नाही. खाणी सुरू करण्यापूर्वी होणाऱ्या जनसुनावणीत लोक उपस्थित राहून विरोध करू लागले आहेत. खाणींमुळे समाजाचे भले होत नसल्याने गोवा मुक्‍तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तरी लोकांच्या लक्षात येऊ लागले हेही नसे थोडके.
एकेकाळी खाणकाम प्रतिष्ठेचे मानले जात होते. मात्र तसे चित्र आज राहिलेले नाही. मध्यंतरी बेकायदा खाणकामाने उरली सुरली प्रतिष्ठा धुळीस मिळविल्याने खाणकामाने कमावलेले नाव गमावण्याची वेळ आली आहे.
या साऱ्यामुळे झालेल्या ऱ्हासाचा अभ्यास माधव गाडगीळ यांची समिती करणार आहे पण दोन वर्षे खाणकाम सुरू तर राहिले पाहिजे. सध्याचा खुदाईचा वेग पाहिल्यास कदाचित ही समिती अहवाल सादर करून त्यावर विचार होईपर्यंत खाणकाम करण्यासाठी खनिजच शिल्लक राहणार नाही अशी आजची स्थिती आहे. त्याचमुळे आता समिती नेमण्याचे प्रयोजनच संशयात आले आहे.

Monday, April 4, 2011

सेतुसमुद्रमचा अभ्यास "एनआयओ'कडे

केंद्रीय जहाज उद्योग मंत्रालयाने गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडे (एनआयओ) सेतुसमुद्रम प्रकल्पाच्या अभ्यासाचे काम सोपविले आहे. सेतुसमुद्रमच्या नव्या मार्गाच्या आखणीचे काम सध्या सुरू आहे. त्याचा समुद्रीय पर्यावरणावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास ही संस्था करणार आहे.भारताचे दक्षिणेकडील टोक आणि श्रीलंकेचे उत्तर टोक या कालव्याद्वारे जोडण्यात येणार आहे. या कालव्याच्या मार्गाबाबत सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. या समितीनेच "एनआयओ'च्या नावाची शिफारस केली होती. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. आर. के. पचौरी आहेत. "एनआयओ' या अभ्यासात आणखी दोन संस्थांचीही मदत घेत आहे. त्यासाठी नऊ कोटी 45 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी (निरी) व बेंगळुरु येथील भारतीय व्यवस्थापनशास्त्र संस्था याकामी "एनआयओ'ला मदत करणार आहे. कोची येथे असलेल्या "एनआयओ'च्या केंद्रामार्फत हे काम मार्गी लावले जाणार आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. सनीलकुमार हे काम पाहणार आहेत.न्नारच्या आखातातील, पाल्कच्या समुद्रधुनीतील पर्यावरणीय माहितीचे संकलन व विश्‍लेषण याअंतर्गत केले जाणार आहे. सेतुसमुद्रम प्रकल्पाची उपयुक्तता यावरही अभ्यासात भर देण्यात येणार आहे.

Friday, April 1, 2011

बुडालेले मंदिर सापडले

समुद्राचे जमिनीवर आक्रमण होत असल्याचे पुरावे यापूर्वीच शोधण्यात आले आहेत. पण, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) शास्त्रज्ञांना आता जमिनीचेही समुद्रावर आक्रमण होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर समुद्र मागे हटल्याचे पुरावे हाती आले असून, पिंदारा येथे बुडालेले मंदिर संकुलच सापडले आहे. "एनआयओ'च्या सागरी पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. के. एच. व्होरा यांनी "गोमन्तक'ला ही माहिती दिली. समुद्रात शेकडो तास डायविंगचा अनुभव असलेले ए. एस. गौर व सुंदरेश यांनी पिंदारात सापडलेल्या मंदिर संकुलाचा अभ्यास सुरू केला. हे संकुल पूर्वी समुद्राच्या पोटात गाडले गेले होते, अशी धक्कादायक माहिती प्रयोगशाळांतील चाचण्यांतून पुढे आली. सौराष्ट्र किनाऱ्यावर कच्छच्या आखातापासून 36 किलोमीटरवर पिंदारा आहे. हा भाग म्हणजे दलदल आहे. ती "ओखा रण' नावाने ओळखली जाते. समुद्राचे पाणी ओसरत जाऊन ती जमीन तयार झाल्याची माहिती स्थानिकांनी गौर यांना दिली. त्यानंतर तेथे उत्खननाचा निर्णय घेतला. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर तेथे आता मंदिराचे संकुल च आढळले आहे. पाच मीटर खोल अशी दलदल त्यासाठी हटवावी लागली आहे. त्याखाली असलेल्या पाण्यात हे संकुल आहे. त्या भागात एक ते चार मीटरच्या लाटा येत होत्या, असेही आढळून आले आहे. त्यामुळे कोणे एके काळी हा भाग समुद्राच्या पोटात गडप झाला होता याचा अंदाज घेत बांधकामांवर विविध चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून ही मंदिरे बराच काळ पाण्याखाली होती, असे सिद्ध झाले आहे. सातव्या ते दहाव्या शतकात पिंदाराचे बांधकाम झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.पिंदारा तरकक्षेत्र म्हणून आठव्या शतकात हा भाग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होता, असा पुरावाही शास्त्रज्ञांच्या हाती आला आहे. देवपुरी नावाचे शहर द्वारका अस्तित्वात येण्यापूर्वीच अस्तित्वात होते असे सांगितले जाते. ऋषी दुर्वास, अगस्ती यांचे मठ तेथे होते असेही सांगितले जाते. पिंदारा सापडल्याने त्याच्यातून देवपुरीच्या शोधासाठी काही पुरावे मिळतात याचा शोध शास्त्रज्ञांनी सुरू केला आहे. समुद्राच्या पातळी होणारे बदल, किनाऱ्याची धूप, पाण्याच्या तापमानातील चढ-उतार या घटकांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी सुरू ठेवला आहे. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी समुद्राच्या तळाशी केले जाणारे उत्खनन तर महत्त्वपूर्ण ठरते आहे. आपल्या पूर्व किनाऱ्यावर पंपहार बुडाल्याचा उल्लेख तमीळ वाङ्‌मयात आहे. द्वारकेचाही असाच उल्लेख आढळतो. किनारी भागातील बदलांमुळे असे होत असावे, असा ढोबळ निष्कर्ष काढून पुरातत्त्व तज्ज्ञांनी अभ्यास सुरू केला असता पंपहार व द्वारका शोधण्यात त्यांना यश आले. महाबलीपूरम हा कित्येक मंदिरांचा समूहच समुद्राच्या उदरात गडप झालेल्या स्थितीत शास्त्रज्ञांना सापडल्याने आजवर समुद्रच भूमीवर आक्रमण करतो असा समज सार्वत्रिकरीत्या रूढ झाला होता. आता तो समज मागे पडून जमिनीचेही समुद्रावर मर्यादित स्वरूपात का होईना आक्रमण होते व समुद्रही मागे हटतो असे म्हणता येण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे.

Thursday, March 31, 2011

पाण्यात काम करणारे स्वयंचलित यंत्र विकसित

दोन वर्षांच्या परिश्रम आणि संशोधनानंतर दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला (एनआयओ) पाण्यातील माहितीचे संकलन करणाऱ्या स्वयंचलित यंत्राची निर्मिती करण्यात यश आले आहे. केरळच्या इडूकी धरणाच्या जलाशयात या यंत्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच यंत्रणा आहे.आता पाण्याखालील तापमान, क्‍लोरोफिलचे प्रमाण तसेच अन्य घटकांचे प्रमाण तपासण्यासाठी पाणबुडे पाठविण्याची गरज एनआयओला भासणार नाही. या यंत्राचा वापर या महिन्यातच सुरू होणार आहे. मोसमी पावसाचा अंदाज आणि लहरीपणात अरबी समुद्राचा वाटा किती या विषयावरील संशोधन सध्या एनआयओत सुरू आहे. त्यासाठी माहिती संकलनासाठी आणि प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठीही या यंत्राचा बराच उपयोग होणार आहे. स्वायत्त पाण्याखालील वाहन (ऑटोनोमस अंडरवॉटर व्हेईकल) नावाने ही यंत्रणा ओळखली जाते. या यंत्रणेचे नामकरण "माया' (चअधअ) असे करण्यात आले आहे. डॉ. एल्गार डिसा, आर. माधन, शिवानंद प्रभुदेसाई, प्रमोद मौर्य, गजानन नावेलकर, संजीव अफजलपूरकर, ए. मस्कारेन्हास, आर. जी. प्रभुदेसाई, एस. एन. बांदोडकर आणि युवा सहायकांनी मिळून हा प्रकल्प तडीस नेला आहे. खरे तर या यंत्राची बांधणी गेल्या वर्षीच पूर्ण झाली होती. वर्षभर चाचणी स्वरूपात यंत्रातून विविध माहितीचे संकलन करत यंत्रातील प्राथमिक त्रुटी दूर करण्यात येत होत्या. या यंत्राची शेवटची चाचणी 12 मे रोजी केरळमधील इडूकी धरणाच्या जलाशयात घेण्यात आली.संगणकीकृत कार्यक्रमाच्या आधारे हे यंत्र काम करते. त्यात नोंदविलेल्या सूचनांनुसार पाण्याच्या तळाशी असलेली माहिती आणि नमुने घेऊन यंत्र परत येते. त्यात काही बदल करावयाचा असल्यास रेडिओ संदेशांद्वारे यंत्राला आज्ञा देण्याचीही व्यवस्था आहे. दिसायला अगदी नरसाळ्यासारखे असणाऱ्या या यंत्राची जाडी 0.234 मीटर असून लांबी 1.8 मीटर आहे. केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने हा प्रकल्प पुरस्कृत केला होता. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च आला आहे.या यंत्राला माहितीचे संकलन करण्यासाठी वेगवेगळे सेन्सर्स बसविण्याचीही सोय आहे. अगदी उथळ पाण्यातही माहितीचे संकलन करण्यात यंत्राला कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे. सध्या 21 मीटर खोलीवर जाण्याची या यंत्राची क्षमता आहे. एक मीटर खोलीवरून चार किलोमीटरपर्यंतचा प्रवासही हे यंत्र करू शकते.

Wednesday, March 30, 2011

पेज, भाकरीची जागा घेतली पावाने

जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे माणसाची जीवनशैलीच बदलली आहे. राहणीमान, मनोरंजनाची साधने, पेहराव अशा दैनंदिन जीवनातील विविध गोष्टींतही बदल होत गेले. खाद्य संस्कृतीला त्याचे वारे लागणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार सकाळच्या न्याहरीतील पेज व भाकरीची जागा बेकरी उत्पादनांनी घेतली. सणासुदीच्या पुरणपोळीची जागा श्रीखंड व आम्रखंडाने कधी घेतली हे कळलेही नाही.पूर्वी सकाळच्या नाश्‍त्याला महत्त्व नव्हते, असे नाही; परंतु त्यातील पदार्थ वेगळे असावेत, असे बंधन नव्हते. रात्रीसाठी भाजीभाकरी असली, तरी चालत होती. कधीतरी पोहे किंवा शिरा यापुढे ही यादी जात नसे. पोर्तुगीजांच्या काळात गोव्यात बेकरी व्यवसाय मूळ धरू लागला. आरंभी फक्त श्रीमंतांच्या खाण्यात असणारे हे पदार्थ हळूहळू सर्वसामान्यांच्या जिभेवरही रुळू लागले. ख्रिस्ती लोकांच्या वस्तीत या पदार्थांच्या खपाचे प्रमाण जास्त असायचे. सध्याचे चित्र वेगळे आहे. घरातील कामाच्या रचनेत बदल झाले. पती- पत्नी दोघेही नोकरी करू लागल्याने तयार मालाला प्राधान्य देण्याची मानसिकता वाढीला लागली. व्यावसायिकांनी त्याचा लाभ घेत नवनवीन चवीचे पदार्थ ग्राहकांच्या जिभेपर्यंत पोचवले. यातूनच पूर्वी मोठ्या प्रमाणात बटर व साध्या पावापर्यंत मर्यादित असणाऱ्या बेकरी पदार्थांची यादी मसाला बटर, टोस्ट, मसाला टोस्ट, खारी, मिल्क ब्रेड, केक, डोनेट अशी वाढत जाऊन दैनंदिन जीवनात रुजली. गोव्यातील बेकरी व्यावसायिकांनीही उत्तम दर्जा, रास्त किंमत, ताजा माल यांची सांगड घालत नुसत्या चवीद्वारे ग्राहक उत्पादकाचे नाव सांगू शकेल, अशी ओळख निर्माण केली आहे. अशीच परिस्थिती दुग्धजन्य व इतर खाद्यपदार्थांच्या बाबतीत आहे. फरसाण, पापडी, गाठी असे पदार्थ निवडक हॉटेल व्यावसायिक करत असत; परंतु माल तयार करण्याचे प्रमाण कमी असल्याने किंमत वाढीव असायची.
तसेच ग्राहकाला तीच चव पाहिजे असल्यास त्याच हॉटेलवर जावे लागे; परंतु मार्केटिंगच्या तंत्रामुळे एकाच कारखान्यात मोठ्या संख्येने तयार झालेली उत्पादने राज्यात वितरित होत आहेत. यामुळे ग्राहकांना स्वस्तात त्याच चवीचा व गुणवत्तेचा पदार्थ मिळू लागला, तसेच फरसाण, वेफर्स, चिवडा, डाळी, शेंगदाणे, या पदार्थांचे विविध प्रकार उपलब्ध झाले. दुधापासून तयार होणारे श्रीखंड, बासुंदी, आम्रखंड असे पदार्थही सहज मिळू लागले आहेत. यामुळे गृहिणी सणादिवशी पुरणपोळीचा घाट घालण्यापेक्षा कमी वेळात जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी या पदार्थांच्या वापरावर भर देतात, असे दिसून येते. बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, फरसाण, वेफर्स यासारख्या उत्पादनांनी गोव्याच्या खवय्येगिरीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यात अर्थातच पावाचा वाटा मोठा आहे.

Tuesday, March 29, 2011

जामनगरची द्वारका हीच खरी

जामनगरची द्वारका हीच खरी श्रीकृष्णाची द्वारका आहे, अशी माहिती सोसायटी फॉर मरिन अर्किओलॉजीचे अध्यक्ष डॉ. एस. आर. राव यांचे म्हणणे आहे.द्वारकेचा सागराच्या तळाशी शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकाचे नेतृत्व डॉ. राव यांनी केले होते. अलीकडेच जुनागड येथे द्वारका सापडल्याचा दावा "इस्रो'ने केला आहे. त्याविषयी डॉ. राव यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की "इस्रो'च्या दाव्यात जराही तथ्य नाही. मुख्य म्हणजे जुनागडच्या आजूबाजूला कुठेही समुद्र नाही. द्वारका किनाऱ्यालगत होती, याचे महाभारतकालीन पुरावे आहेत. तेथील समुद्र हटला, असेही क्षणभर गृहीत धरले, तरी तो सतराशे वर्षांत एवढा मागे हटणेही शक्‍य नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. जुनागड येथे राईवथका नावाची टेकडी आहे. तिचा उल्लेख महाभारतात आहे. त्यामुळे टेकडीशेजारी द्वारका असावी, असा ढोबळ अंदाज असू शकतो; पण त्या टेकडीचे पूर्वीचे नाव ऊर्जैंता होते, हे आम्ही अभ्यासाअंती शोधून काढले आहे. त्यामुळे "इस्रो'ने केलेल्या जुनागडच्या दाव्यात दम नाही.ते म्हणाले, की इतिहासातील वर्णने पडताळूनच आम्ही द्वारकेपर्यंत पोचलो. आजवर द्वारका बुडल्याचाच उल्लेख सर्वत्र आहे. नवव्या शतकातही आद्य शंकराचार्यांनी द्वारकेला भेट दिली, त्यावेळीही त्यांनी द्वारका पाण्यात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जवळपास कुठेही समुद्र नसणाऱ्या जुनागडमध्ये द्वारका असणे शक्‍यच नाही. अहमदाबादच्या काही अभ्यासकांनी यापूर्वी जुनागडची पाहणी केली होती. त्यांनीही द्वारका तेथे नसल्याचा निष्कर्ष काढला होता.आजही काही जण द्वारका अफगाणिस्तानात असल्याचे मानतात, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, की पुरावा काय म्हणतो, यालाच महत्त्व आहे. पुराव्याशिवाय दावा टिकू शकत नाही. आम्हालाही सौराष्ट्रात उजयवाडा आणि माधेपूर येथे समुद्रतळाशी गाडली गेलेली काही प्राचीन बांधकामे आढळली. ती सुरचित शहरे होती. मात्र, द्वारकेचा शोध घेताना आम्हाला ती सापडली. असे मानले जाते, की श्रीकृष्णांच्या पूर्वजांनी वसविलेले एक शहर (द्वारका) होते. श्रीकृष्णांनी दुसरे शहर (द्वारका) वसवले. ही दोन्ही शहरे सापडली आहेत. शहरात प्रवेश घेण्यासाठी केवळ नागरिकांना दिलेल्या मुद्रा या उत्खननात सापडल्या आहेत. त्यामुळे गोमती द्वारका आणि कुशस्थळी द्वारका सापडली आहे. महाभारतातील वर्णनाप्रमाणे तेथे बांधकाम असल्याचे समुद्रतळाशी केलेल्या उत्खननातून सिद्ध झाले आहे. त्यावेळी वापरात असलेल्या काही वस्तूही सापडल्या आहेत. त्यावरून हे शहर ख्रिस्तपूर्व 1700 ते 1800 वर्षांपूर्वी बुडाले असावे. आपण कलियुगाची सुरवात ख्रिस्तपूर्व 3100 वर्षांपूर्वी झाल्याचे मानतो. त्यामुळे महाभारताचा कालखंड ख्रिस्तपूर्व 1800 च्या दरम्यानचा असावा, असे म्हणण्यास वाव आहे.

Monday, March 28, 2011

धोलार पडली बडी

एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर सप्तरंगांचे फराटे ओढल्याप्रमाणे पांढऱ्या कपड्यांवर अनेक रंगांचा साज चढवून युवक-युवतींनी सागरकिनारा गाठला. चेहरा अनेक रंगांनी एवढा माखलेला असल्याने दातांचे धवल रूप प्रकर्षाने चमकत होते. जलक्रीडेचा यथेच्छ आनंद लुटला जात होता. कोणाच्या तरी मोबाइलवर ट्यून वाजली "रंग बरसे....' आणि चिंब भिजलेल्या कपड्यांनिशी गाण्याच्या चालीवर पाय थिरकू लागले. हे दृश्‍य होते दोन दिवसांपूर्वी दुपारनंतर मिरामार किनाऱ्यावरचे. मित्रमैत्रिणींच्या साथीने होळीची धुळवड साजरी केल्यानंतर तरूणाईचे पाय वळले ते समुद्राकडे, तेथेही मस्तीने पाठ सोडली नाही. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत मध्येच एकट्याला गाठून त्याला वा तिला नाकातोंडात पाणी जाण्याचा "अनुभव' धक्कादायक पद्धतीने देण्याचे प्रकारही केले जात होते. आधीच रंगाने अंग माखून गेले होते. त्यात समुद्राच्या पाण्याची भर पडल्याने समुद्राबाहेर येणाऱ्या व्यक्तीच्या अंगभर रंगाचे विचित्र मिश्रण होत काळ्या रंगाने अंगाचा कब्जा घेतल्यागत दिसत होते. गावोगावीही रंगपंचमीची धूम होती. शिमगोत्सवाच्या निमित्ताने वाड्यावाड्यावार मिरवणुका काढून रंगाची उधळण केली जाते. पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस, 15 दिवस असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या दिवशी रोंबाट काढले जाते. त्याला अलीकडे "रोमाट' असेही म्हटले जाते. खरे तर शिगम्यात ढोल-ताशाखेरीज धूम हा मोठा नगारा असतो. याला "रोमाट' (रोंबाट) म्हणायचे. पण अलीकडे मिरवणुकीलाच रोमाट म्हटले जात आहे. सध्या प्रत्येक सण "इव्हेंट' म्हणून साजरा होतो, त्याला होळी-धुळवड किंवा रंगपंचमीही अपवाद नाही. हिंदी चित्रपटही त्यापासून दूर राहिलेला नाही. त्यामुळे "शोले'तील "होली के दिन...' पासून ते अगदी अलीकडच्या "मोहब्बतें'पर्यंत अनेक चित्रपटांतून होळीची गाजलेली गाणी आपल्या स्मृतींमध्य
े असतातच. "गज्जर का हलवा'प्रमाणे गोपाळकाला आणि होळी हे चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांचे आवडते सणच म्हणायला हवेत! त्याचे दर्शनही काल छोट्या पडद्याद्वारे झाले. ती मजा लुटणेही कोणी कमी केले नाही. दिवसभर भटकंती करून थकलेले पाय दूरचित्रवाणीसमोर विसावले आणि त्यांनी स्वप्नातच आपली होळी आणि चित्रपटांतील होळी ताडून पाहिली. या दिवसात रोंबटात नाचणाऱ्यांना लाडू, खाजे असे काही खाद्यपदार्थ दिले जातात. बहुधा सोबत फेणीची बाटलीही. फेणी पोटात रिचवल्यानंतर नाचणं होतं अधिक जोशात. तेही आता पाहता येणार आहे. धुळवड आणि रंगपंचमी हे सण म्हणजे "रंगां'च्या उत्सवांचे दूतच जणू! रंगाच्या विश्‍वातील प्रवास कालपासून खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या या कृत्रिम रंगांचा "साइड इफेक्‍ट' त्वचेवर होऊ नये, यासाठी अनेक प्रकारचे "इको फ्रेंडली' रंगही उपलब्ध होते. प्रदूषण रोखण्यासाठी या रंगांचा वापरही हल्ली वाढताना दिसतो. वेगवेगळ्या वनस्पती आणि अगदी फळभाज्यांपासून अनेक नैसर्गिक रंगांची निर्मिती सध्या होत असून, तरुणांकडून त्याचा वापरही केला जातोय, ही गोष्ट निश्‍चितच स्वागतार्ह आहे की नाही?

म्हादई प्रश्‍नी भर आकड्यांवर!

म्हादई प्रश्‍नी केंद्राने लवाद नेमल्याने आता लवादासमोर रंगणार आहे ते आकड्यांचे नाट्य. गोवा सरकारच्या म्हणण्यानुसार मांडवीच्या खोऱ्यात केवळ 1,531 दशलक्ष घनमीटर पाणी आहे, तर कर्नाटकच्या म्हणण्यानुसार 5,600 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. गोवा संघप्रदेश असताना व घटक राज्य झाल्यानंतर काही काळ केंद्र सरकारने नदीतील पाणी मोजण्याचे काम केले. त्या यंत्रणेने मोजलेले आकडे राज्य सरकार मान्य करत नाही. पुन्हा यंत्रे बसवून पाणी मोजावे, अशी भूमिकाही राज्य सरकार स्वीकारू शकते. त्यासाठी किमान 10-15 वर्षे जाणार असल्याने तोवर हा प्रश्‍नही अनिर्णित राहू शकतो. राज्य सरकारने 9 जुलै 2002 ला केंद्र सरकारला पत्र लिहून या प्रकरणी लवाद नेमण्याची मागणी केली होती. त्यानंतर 16 एप्रिल 2002 ला कर्नाटक सरकारने एक पत्र केंद्राला लिहिले आणि जल आयोगाने काही पाणी वळविण्यास परवानगी दिली. त्यानंतर परवानगी स्थगित करण्यास केंद्राला राज्य सरकारने भाग पाडले आहे. आंतरराज्य पाणी तंटा कायद्याच्या कलम चारनुसार लवाद नेमावा, अशी मागणी गोव्याने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. या प्रश्‍नी लवादासमोर मांडण्यासाठी सरकारने 917 पानांची माहितीही तयार केली आहे. 1974 पासूनचा सर्व आकडेवारीचा संदर्भ यात घेतला आहे. त्यामुळे मांडवी खोऱ्यात उभे राहू शकणाऱ्या 61 प्रकल्पांवर भर दिला जाणे स्वाभाविक ठरणार आहे. त्यातल्या त्यात सोनाळ येथील जलविद्युत प्रकल्पासाठी राज्य मोठ्या प्रमाणावर इच्छुक असेल. मांडवीचे थोडे पाणी जरी वळविले, तरी हा प्रकल्प रद्दबातल ठरेल याकडे केंद्राचे राज्य सरकार लक्ष वेधू शकते.

सी हॉर्स'ची प्रजाती जपण्यासाठी

घोडयासारखे डोके व निमुळते होत जाणारे शेपटीगत अंग आकार काही इंचाचाच ही झाली खारफुटी व तिवरांच्या जंगलात आढळणाऱ्या अनोख्या प्राण्यांची ओळख. हेच ते "सी हॉर्स' आता जगात दुर्मिळ होऊ लागले आहेत. म्हणूनच वन्यजीव संरक्षण कायद्याच्या पहिल्या परिशिष्टात त्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या मासेमारीवर अर्थातच त्यामुळे बंदी आहे.या सी हॉर्सची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याची चिंता शास्त्रज्ञांना भेडसावत होती. त्यांच्या पुनरूत्पादनाची तुटत चाललेली साखळी सांधण्यासाठी प्रयोगशाळेतच त्यांना नैसर्गिक अधिवास देऊन "सी हॉर्स' जन्माला येण्याची प्रक्रिया करण्याचे आव्हान होते. दोनापावलच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील आर. ए. श्रीपाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आव्हान पेलले. नर व मादी "सी हॉर्स' यांच्या संयोगातून पिल्ले जन्माला आली आहेत. त्यांच्यापासून सहा महिन्यांनी आणखी पिल्ले जन्माला येतील, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. जगातून नष्ट होण्याची भीती असणाही ही प्रजाती वाचविण्यासाठी काय करता येईल यावर आता संशोधन करण्यात येणार आहे.सध्या एनआयओत प्रयोगशाळेत आणलेले "सी हॉर्स' हे रत्नागिरीतील आहेत. वन्यजीव कायद्यानुसार त्यांच्यावरील प्रयोगासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. तीही घेण्यात आली आहे. रत्नागिरी आणि गोव्यात सापडणाऱ्या "सी हॉर्सच्या जातीत साध्यर्म असल्याने त्यावरील संशोधन गोव्यातही "सी हॉर्स' चे संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे श्रीपाद यांनी सांगितले.

Sunday, March 20, 2011

कैगा परिसरात भेटलेल्या व्यक्तींचे म्हणणे

कैगा प्रकल्प येथे राहणार ही आजची वस्तुस्थिती आहे. प्रकल्पाचा विस्तार होणार अशा घोषणाही केल्या जात आहेत. अणू ऊर्जा महामंडळाने स्थानिकांना विश्वासात घेऊनच विस्तारकाम केले पाहिजे. प्रकल्प उभारणीवेळी बांधकाम कोसळले होते. आतातरी प्रकल्प किती सुरक्षित आहे हे जनतेला पटवून दिले पाहिजे. राजा रामण्णा हे अणू आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी किरणोत्सर्ग रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे व ते कैगा येथे वापरण्याची ग्वाही दिली होती. त्याची पूर्तता झाली का याचेही उत्तर मिळावे. प्रकल्प परिसरातील कुचेगार, हाटुगा, कुर्नीपेठ या गावातील लोकांची आरोग्य तपासणी नियमित व्हावी आणि किरणोत्सर्ग आहे की नाही याची माहिती मिळत रहावी अशी आमची आता मागणी आहे. सुरवातीला आम्ही प्रकल्पालाच विरोध केला होता. आता प्रकल्प आहे व राहणार ही वस्तुस्थिती मान्य करतानाच प्रकल्पाच्या 50 किलोमीटर परिसरात किरणोत्सर्गाच्या दृष्टीने सातत्याने सर्वेक्षण व्हावे असे आम्हाला वाटते.
शिवराम सिद्धरकर
तालुकाध्यक्ष, पर्यावरण रक्षण समिती



कैगामुळे कारवारचा अपेक्षित विकास झाला नाही. मी नगराध्यक्ष असताना राजा रामण्णा यांना कारवारमध्ये सन्मानित केले होते. त्यावेळी आणि त्यानंतरही नौदलाचा सीबर्ड प्रकल्प यांच्याकडून कारवारच्या विकासासाठी भरीव योगदानाची अपेक्षा होती. 1957 मध्ये मी डॉक्‍टरी पेशात शिरलो तेव्हापासून गेल्या पाच वर्षांपर्यंत कारवारचा विकास झाला नव्हता. कारवारचा विकास व्हावा या एकमेव उद्देशाने या प्रकल्पांचे संभाव्य दुष्परिणाम माहित असूनही विरोध केला नाही. किनारा सफाईसाठी दिलेले पैसे वगळता कैगाकडून कारवारला जास्त काही मिळाले नाही. इतर शहरांसारखेच आणि त्याचवेगाने आता कारवार विकसित होत आहे. कैगामुळे कारवार मोठ्या प्रमाणावर विकसित होणे , रोजगारसंधी आणि आर्थिक उलाढालीच्या पातळीवर देशात अग्रेसर असायला हवे होते. जगातील चार सर्वोत्तम बंदरापैकी कारवार एक असूनही विकासाची संधी आम्हाला सातत्याने नाकारलीच गेली आहे.
डॉ. एस. आर. पिकळे
माजी नगराध्यक्ष व प्रतिथयश डॉक्‍टर, कारवार



कैगासाठी आमची शेतजमीन गेली, त्याची नुकसानभरपाई तेव्हाच मिळाली, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीही मिळाली. आमच्या पाच एकर जमिनीत काही झाडे होती, त्याचे मूल्यांकन योग्य प्रकारे न झाल्याने आम्ही न्यायालयात दाद मागून भरपाई मिळविली. प्रकल्पामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. रोजगाराच्या नानाविध प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संधी निर्माण झाल्या आहेत. पुनर्वसनासाठी जमीन दिली, रस्ते केले, पाणी पुरवठा योजनाही राबविली मात्र दुरूस्ती आणि देखभालीची जबाबदारी कैगा प्रकल्पाने घेतली नाही. त्यामुळे त्यादृष्टीने अद्याप विचार व्हावा. मल्लापूरला कर्मचाऱ्यांसाठी शहर उभारले त्या धर्तीवर मार्केट, इस्पितळ, क्रीडांगण यासुविधाही पुनर्वसित लोकांसाठी द्याव्यात.
कृष्णा नाईक 
पुनर्वसन झालेल्या कुटुंबातील व्यक्ती


आठवड्यातून एकदा हुबळी, बेळगाव आणि दररोज कारवारला जाण्यासाठी प्रकल्पाने बससेवा दिली आहे. मल्लापूर ते कारवार हे बसतिकीट 26 रुपये असताना प्रकल्पाची बस फक्त पाच रुपये तिकीट घेते. मल्लापूर येथे इस्पितळ आहे, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त पुनर्वसित लोकांसाठीही उपलब्ध केला जावा. 25 वर्षांपूर्वी आम्हालाही रोजगार देऊ असे आश्वासन देण्यात आले होते, आता कुटुंबातील एकाच व्यक्तीस नोकरी मिळाली आहे. आम्ही पूर्वी शेती करायचो आता पूनर्वसित वसाहतीत घरी बसून राहण्यापेक्षा जास्त काही करता येत नाही. पुनर्वसित वसाहतीत पाणी अर्धातास येते त्याची वेळ वाढविण्याची गरज आहे. रस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावे.
शांताबाई सदानंद नाईक
पुनर्वसित वसाहतीतील महिला


प्रकल्पाने केलेल्या विकासकामांची देखभाल दुरूस्ती स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी अशी कैगा प्रकल्प चालकांची इच्छा आहे. पण निधीअभावी तसे करण्यात अपयश येते. प्रकल्पाने राजगाराच्या संधी दिल्या, कधीनव्हे तो आमचा भाग विकसित झाला. रस्ते, वीज, पाणी आर्थिक सुबत्ताही आली पण अद्याप बरेचकाही प्रकल्पाला करण्यासारखे आहे. परिसरात प्रकल्पाचे इस्पितळ आहे, ते सर्वांसाठी खुले करावे. प्रकल्पातून त्यांच्या कर्मचारी निवास संकुलात वीज दिली गेली आहे, गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित तर त्या वसाहतीत विनाखंडित वीज असे परस्परविरोधी चित्र दिसते, ते बदलावे. पैसे घ्यावेत पण आम्हालाही कैगातूनच वीज मिळावी. पथदीप दुरुस्ती, रस्ता दुरूस्ती, नळपाणी योजनेची देखभाल यासाठी प्रकल्पाच्या भरीव अर्थसहाय्याची आम्हाला गरज आहे.
चंद्रशेखर बांदेकर
अध्यक्ष, मल्लापूर ग्रामपंचायत

स्थानिकांना रोजगार देण्यात कैगा प्रकल्पाने मोठी भूमिका बजावली आहे. गेले दशकभर येथे बांधकाम सुरू होते. त्यानिमित्ताने अनेकांना कंत्राटे मिळाले, काहींनी वाहने भाड्याने घेऊन प्रकल्पाला भाडेकराराने दिली आहेत. कंत्राटदाराकडे काम करणारे अनेकजण याच परिसरात राहत असल्याने खोल्या घरे भाड्याने देण्याचा नवा व्यवसाय सुरू झाला आहे. बाजारातील उलाढाल वाढली आहे. लोकांच्या हातात चार पैसे खेळू लागल्याने परिसरात नवी दुकाने आली आहेत. आज परिसरात हरचीजवस्तू त्याचमुळे मिळू लागली आहे. कर्मचाऱ्यांनाही सातत्याने सर्व सुविधा प्रकल्पाने दिल्या आहेत. एक कमरेचा पट्टा सोडला तर सारेकाही प्रकल्प आम्हाला देते. उत्पादनाशी निगडीत अशी प्रोत्साहन योजना विचाराधीन असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. सुरवातीला प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनीच आता पाचवी सहावी अणूभट्टी केव्हा उभारणार अशी आग्रही मागणी करणारा प्रश्‍न अलीकडेच जाहीररीत्या विचारला त्यातच या प्रकल्पाचे यश समावले आहे.
सुमंत हेबळेकर
अध्यक्ष, कैगा प्रकल्प कर्मचारी संघटना

कैगात अनेक विकासकामे मार्गी

कैगा अणूउर्जा प्रकल्प सामाजिक जबाबदारी म्हणून सभोवतालच्या गावात स्वतःहून अनेक विकासकामे दरवर्षी करतो. किमान चाळीस ते पन्नास लाख रुपये यासाठी खर्च केले जातात असे प्रकल्पाचे अतिरीक्त मुख्य अभियंता तसेच जनकल्याणकारी प्रकल्प समितीचे प्रमुख बी. के. चेन्नकेशव यांनी सांगितले.
ते म्हणाले, कैगा प्रकल्पाने सुरवातीपासूनच समाजाप्रती देय असलेल्या जबाबदारीचे भान ठेवले आहे. त्याचमुळे 2002-03 वर्षात दोन कोटी 40 लाख रुपये, त्यानंतर दोन कोटी 40 लाख, आणि त्यानंतरच्या प्रत्येक वर्षात 40-50 लाख रुपयांची विकासकामे परिसरात केली आहेत. प्रकल्पाने अशी कामे करण्यासाठी प्रत्येक विभागाचे प्रतिनिधीत्व असणारी आमची समिती नेमली आहे. गावकरी या समितीशी पत्रव्यवहार करतात व समितीचे सदस्यही ग्रामस्थांशी अधूनमधून संवाद साधतात. त्यातून नेमकी कशाची गरज आहे हे अधोरेखित होते. ती विकासकामे हाती घेतली जातात.
राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करणे अपेक्षित असलेली रस्ता बांधकाम, पुल बांधकाम, शाळा इमारत बांधणी ही कामेही प्रकल्पाने परिसरात केल्याचे सांगून त्यांनी त्या कामांची जंत्रीच सादर केली. ते म्हणाले, कैगा मल्लापूर या 22 किलोमीटर रस्त्याची देखभाल दुरूस्ती प्रकल्प करतो. कैगाहून यल्लापूरला जाण्यासाठी बारेघाटमार्गे असलेल्या 14 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकामही तीन कोटी रुपये खर्चून प्रकल्पाने केले आहे. अनेक प्राथमिक शाळांच्या इमारतीही बांधल्या आहेत. त्यात विरजे, कुर्नीपेठ, हातुगा, कुचेगार, मल्लापूर येथील शाळा इमारतींचा समावेश आहे. त्याशिवाय मल्लापूरच्या पेयजल पुरवठ्यासाठी एक लाख लीटर क्षमतेची टाकी उभारली आहे. कुर्नीपेठ येथे 75 हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी तर शिंगेवाडी कद्रा येथेही पाणी पुरवठ्यासाठी प्रकल्पाने टाकी उभारली आहे. हातुगा, कुचेगार येथे विंधन विहिरी प्रकल्पाने दिल्या आहेत. याशिवाय हातुगा, कुचेगार, मल्लापूर, कद्रा, यल्लापूर येथील शाळांना आवश्‍यक ते फर्निचर तर विरजे, कद्रा,मविनमणे, वज्राली येथील शाळांना संगणकही प्रकल्पाने भेट दिले आहेत. याशिवाय परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या- पुस्तके आणि दप्तरही प्रकल्प पुरवितो.
हरूर या शेजारील गावाला पथदीप प्रकल्पाने बसवून दिले आहेत शिवाय मल्लापूर पुनर्वसन कॉलनी, लक्ष्मीनगर, अणशी, कद्रा,वैलवाडा येथे बहुउद्देशीय सभागृहेही प्रकल्पाने बांधून दिल्याचे सांगून चेन्नकेशव म्हणाले, महिलांना स्वयंरोजारासाठी शिलाई यंत्रेही दिली आहेत, शिवाय त्यांना आवश्‍यक ते कामही पुरविले जाते. हरुर येथील पूलही प्रकल्पाने उभारला आहे.
हातुगा या गावाला राज्य सरकारने प्रत्येक घरामागे एकाच बल्बचे कनेक्‍शन दिले होते. तेथील 80 घरात एक पंखा व ट्यूबलाईट बसविण्याचे काम कैगा प्रकल्पाने केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पहिली शिकणाऱ्या विशेष  चमक दाखविणाऱ्या विद्यार्थ्यास प्रकल्पाच्या केंद्रीय विद्यालयात दाखल करून घेतले जाते. त्या विद्यार्थ्यांचा त्यानंतर बारावीपर्यंतचा शिक्षणाचा व आरोग्याचा पूर्ण खर्च प्रकल्पाकडून केला जातो. याशिवाय विद्यार्थ्यास मासिक तिनशे तर विद्यार्थिनीस मासिक चारशे रुपये प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय उच्च शिक्षणासाठी मदतीचा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे धोरण प्रकल्पाने राबविल्याचे चेन्नकेशव यांनी सांगितले.

जैतापूरमुळे मच्छीमारांवर निर्बंध नाहीत

जैतापूर येथील अणू ऊर्जा प्रकल्प झाल्यानंतर साखरीनाटे व जैतापूर येथील बंदरातील मच्छीमारांच्या हालचालीवर कोणतेही निर्बंध येणार नाहीत. त्यांच्या व्यवसायाला कोणताही फटका बसणार नाही, असे जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाचे विशेषाधिकारी जुगल किशोर सिंह यांनी मला सांगितले.
ते म्हणाले, या प्रकल्पापासून जनतेला कोणताच धोका नाही. उलट फायदाच आहे. कैगा येथे प्रकल्प सुरवात होण्यापूर्वीपासून मी कैगात आहे. तेव्हाचे कैगा आणि आताचे कैगा यावर त्याचमुळे मी अधिकाराने बोलू शकतो. त्याहीपेक्षा मल्लापूर येथील अधिकृत निवास संकुलापेक्षाही प्रकल्पाच्या अगदी जवळ माझे घर आहे, तेथे माझे कुटूंब आहे त्यामुळे प्रकल्प सुरक्षित आहे हे सांगण्याचा अधिकारही मला त्याचमुळे पोचतो.
कैगा हे गावाचे नावही प्रकल्प येण्याअगोदर कोणाला माहित नव्हते आज कैगाला जागतिक नकाशावर स्थान आहे, असे नमूद करून ते म्हणाले, प्रकल्पात नोकरी मिळाल्याने जंगलाच्या एका कोपऱ्यात मर्यादीत साधनसुविधांच्या आधारे जगणाऱ्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली. एरव्ही फारतर माध्यमिक शिक्षणापर्यंत मजल मारणाऱ्या इथल्यांची मुले आज वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. त्या पुढची पिढी त्याही पुढे मजल मारेल. त्यामुळे मानवी विकासाला चालना देण्याचे काम प्रकल्पाने केले असे म्हणता येईल. मनुष्यबळ विकास असे आम्ही म्हणतो ते यापेक्षा काही वेगळे असते? या परिसरात प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला गती आली. गेले दशकभर बांधकामाच्यानिमित्ताने हजारो लोक या परिसरात होते. त्यांच्या निवासापासून इतर गरजांही याच परिसरातने भागविल्या. तो पैसा स्थानिकांच्याच हातात गेला. साधनसुविधा या परिसरात विकसित झाल्या आहेत. त्याचाही फायदा स्थानिकांनाच होत आहे व होत राहील.
जीवनाकडे एका वेगळ्या नजरेतून बघण्याचे भान प्रकल्पाने या परिसरातील जनतेला दिले असे त्यांच्याशी बोलताना जाणवल्यावाचून राहणार नाही असा दावा करून सिंह म्हणाले, विकासाला पूरक अशी दृष्टी कैगाच्या लोकांकडे होती व आहे. अणू ऊर्जेबाबत तत्कालीन अखरेचा शब्द असलेले राजा रामण्णा तर कर्नाटकचे भूमीपूत्र. त्यांनी कैगा येथे हा प्रकल्प आणताना सुरक्षिततेविषयी विचार केलाच असणार. हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने चार डोंगराच्या मध्ये हा प्रकल्प साकारला आहे. त्याने निसर्गाला कोणताही उपसर्ग पोचला नसल्याचे सिद्ध झाले आहे.
 
 
पाषणयुगात मानवाने दगडापासून पहिल्यांदा हत्यार तयार केले नंतर तो इमारती बांधण्यास शिकला. अणूबॉंब तयार झाल्यानंतर आता अणूपासून ऊर्जा म्हणजेच वीज मिळविणेही त्याच धर्तीवर विकसित झाले आहे.
जुगल किशोर सिंह विशेषाधिकारी जैतापूर प्रकल्प

जैतापूराचा लोकजीवनावर परिणाम नाही


जैतापूर येथील नियोजित अणू प्रकल्पामुळे तेथील लोकजीवन वा पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही. कैगाचा आमचा प्रकल्प म्हणूनच आम्ही निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेस अणूभट्टीपासून काही मीटरवर झाडे असताना चालवत आहोत, असे कैगा अणू उर्जा प्रकल्पाचे प्रमुख आणि संचालक जे. पी. गुप्ता यांनी मला सांगितले.
ते म्हणाले, लोकांनी सुरवातीच्या टप्प्यात आक्षेप घेणे नैसर्गिक आहे पण नंतर उर्जेची म्हणजेच विजेची गरज आणि आता अणूउर्जेइतका अन्य कोणताही अप्रदूषणकारी मार्ग वीज निर्मितीसाठी उपलब्ध नाही हेही समजून घेतले पाहिजे. जैतापूरची जागा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असल्याचा एक आक्षेप आहे पण त्यांनी जगाकडे पहावे. जपान हा भूकंपग्रस्त देश म्हणून ओळखला जातो. जपानी घरांची रचना भूकंपाला तोंड देणारी का असते असे आम्ही शाळेत शिकलो आहोत. त्याच जपानमध्ये साठ टक्‍के वीज अणू प्रकल्पातून मिळते. त्यामुळे भूकंपप्रवण क्षेत्र आहे वा नाही हा विरोधाचा मुद्दा असू शकत नाही.
प्रकल्पासाठी हजारो कोटी लीटर पाणी लागेल, वापरलेले पाणी जास्त तापमान असताना समुद्रात सोडल्याने जलचरांचे प्रजनन क्षेत्रच नष्ट होईल ही भीतीही निराधार असल्याचे सांगत ते म्हणाले, कैगाचे पाणी आम्ही काळी नदीत सोडण्यापूर्वी ते पूर्ववत थंड करतो. ते एका टाकीत जमा होते. ते पाणी नैसर्गिकदृष्ट्या जलचरांसाठी सुरक्षित आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही त्या टाकीचेच मत्स्यपैदास केंद्रात रुपांतर केले आहे. तेथे वाढलेले मासेही नंतर आम्ही काळी नदीत सोडतो. त्यामुळे जलचरांसाठी ते पाणी हानीकारक आहे हे न पटणारे नाही. त्याही पुढे जात आम्ही सारेचजण तेच पाणी पिण्यासाठीही वापरतो.
ते म्हणाले, लाखो युनिट उष्णता हवेत सोडली जाऊन आंबा, फणस, काजू, नारळी पोफळीच्या बागांवर गंभीर परिणाम होणार असा असलेला आक्षेपही कैगा पाहिल्यास किती चुकीचा आहे हे कळते. चहुबाजूने निसर्गाने कैगा प्रकल्प वेढलेला आहे. बांधकामापुरतीच इथली झाडे तोडली आहे. प्रकल्पाच्या बाहेरील सर्व निसर्ग अबाधित आहे प्रकल्पातील अगदी अणूभट्टीला टेकून असलेल्या झाडांनाही काहीही झालेले नाही. आम्ही उलट एक लाख झाडे लावली आणि निसर्गालाच देणगी दिली आहे.
किरणोत्सर्गाचा मानवी आरोग्यावर परिणाम शक्‍य असल्याच्या आक्षेपाकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, इथे अणूभट्टीत काम करणारे वैज्ञानिक, तंत्रज्ञ हे त्यांच्या क्षेत्रातील अत्यंत हुशार व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांना हा धोका कळत नाही असे कोणाला म्हणायचे आहे का? विमानाने प्रवास करताना, क्ष किरण तपासणी करताना वीस मिडीराम (किरणोत्सर्ग मोजण्याचे परिमाण) किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते. इथे अणूभट्टीत काम करणाऱ्याला वर्षाला केवळ एक मिडीराम किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागते. अहो, आम्ही आमचे कुटूंब काही शंभर किलोमीटरवर राहत नाही. प्रकल्पासाठी सडकमार्गे 17 किलोमीटरवर (हवाईमार्गे कितीतरी कमी) आम्ही राहतो. धोका असता तर आम्ही आमच्या कुटुंबाला येथे का ठेवले असते? याहीशिवाय मणिपाल आरोग्य विद्यापीठाच्या सहकार्याने आरोग्यविषयक सर्वेक्षण नियमितपणे केले जाते. त्यातही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही.
चाळीस वर्षांनी अणूभट्टी बंद पडल्यानंतर बाहेर पडणाऱ्या कचऱ्यातून किरणोत्साराचा धोका असेल का असे विचारल्यावर त्यांनी चाळीस वर्षे असे अणूभट्टीचे ढोबळ आयुष्यमान तारापूर अणूउर्जा प्रकल्प उभारताना ठरविले होते. चाळीसवर्षांनंतरही तारापूरची अणूभट्टी अद्याप सुरूच आहे. कैगामध्ये तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अणूभटट्या आहेत त्या आणखी कितीतरी वर्षे चालतील. जैतापूरला फ्रेंच तंत्रज्ञानाच्या अणूभट्ट्या बसविल्या जाणार आहेत. त्यांचे आयुर्मान कैगापेक्षाही असेल. त्यामुळे ही भीती बाळगणे चूक आहे.
तरीही कचऱ्याचे काय असे विचारल्यावर ते म्हणाले, तो कचरा हवाबंद पद्धतीने ठेवला जातो. तो कधीही प्रकल्पाबाहेर टाकला जात नाही. त्याचे प्रमाणही वर्षाला अत्यंत नगण्य असते. त्यामुळे कचऱ्यातून किरणोत्सार ही शक्‍यताच नाही. चर्नेबेल येथील उदाहारण अनेकजण देतात पण तेथे झालेले बहुतांश मृत्यू हे लागलेल्या आगीमुळे होते याकडे सोयीस्करपणे दूर्लक्ष केले जाते.

अणूभट्टीची इमारत दोनस्तरीय दोन कंटेनर एकावर एक या पद्धतीने ठेवल्यासारखी असते. या दोन भितींमध्ये निर्वात पोकळी असते. त्यामुळे अपघात झाल्यासही किरणोत्सर्ग बाह्य वातावरणापर्यंत पोहोचूच शकत नाही.
जे. पी. गुप्ता

असा आहे कैगा प्रकल्प

कारवारहून कैगाकडे जाताना साठ किलोमीटर परिसरात दुतर्फा घनदाट वन आहे. गाडी वळणे घेत पुढे जात असताना पुढे अणु उर्जा प्रकल्प असेल याची जराही कल्पना येत नाही. जुनी वठलेली झाडे कापण्याचे, शेतात मशागतीसाठी पाचोळा आणून टाकण्याचे काम तर चार पाच ठिकाणी शेतातच क्रिकेटचे सामने सुरू होते. विसेक वर्षापूर्वी हा प्रकल्प होऊ नये म्हणून गावकरी संघटित झाले होते. याच रस्त्यावर प्रकल्पाकडे जाणाऱ्या गाड्याही अडविल्या गेल्या होत्या. त्या घटना आता विस्मृतीत गेल्याचे जाणवत होते.
आता प्रकल्पाविषयीची भीती कुठच्या कुठे पळाली असल्याचे दिसते. गेले दशकभर मी या प्रकल्पाविषयी वार्तांकनासाठी जात आहे. प्रत्येकवेळी रस्त्यात झालेली सुधारणा तर नजरेत भरतेच याशिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरात उभ्या राहिलेल्या शाळांच्या इमारती लक्ष वेधून घेतात. या खेपेस मल्लापूर येथे महिलांच्या स्वयंसहाय्य गटासाठी उभारलेल्या सभागृहाचे दर्शन झाले. तेथील महिलांना प्रकल्पानेच शिवण यंत्रे पुरविली आहेत. त्या या सभागृहात प्रकल्पासाठी लागणाऱ्या गणवेश शिवतात. परिसरातील शाळांना शैक्षणिक साहित्य पुरविणे ही तर आता नित्याचीच बाब झाली आहे. त्यापुढे जात प्रकल्पाने सरकारने करावयाची कामेही करणे सुरू केले आहे. पावसाळ्यात सभोवतालच्या गावांचा संपर्क तुटतो. गेल्या दोन वर्षात अशा गावांना बारमाही संपर्कासाठी साकव बांधून पूर्ण झाले आहेत.
प्रकल्प कार्यान्वित होण्याअगोदर कारवार परिसरात किरर्णोत्सर्गाच्या भीतीची चर्चा दशकभर जोरात होती. गल्लीबोळातील पुढारीही त्याविषयावर तावातावाने बोलायचे. काही स्वयंसेवी संस्थांनीही त्यावेळी पुढाकार घेतला होत. शिवराम कारंथसारख्या ज्येष्ठ कलावंताने प्रकल्पविरोधी भूमिका घेतल्याने आंदोलकांच्या अंगावर मूठभर मांस चढले होते.त्यानंतर मात्र केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी बाजी मारली. प्रकल्पातून किरणोत्सर्ग होणार ही भीती अनाठायी ठरविताना त्यांनी प्रकल्पाजवळच नवे शहर वसवले. तेथे कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुले उभारली. ते आता तेथे कुटुंबासह राहतात तर डोंगर दऱ्या कपारीत राहणाऱ्या गावकऱ्यांना कसली भीती हा मुद्दा निर्णायक ठरला. तेथून आंदोलनाची धार बोथट होत गेली. आता तर प्रकल्पाच्या माध्यमातून परिसराचा विकासच होत आहे. दरवर्षी किमान 40-50 लाख रूपयांची विकासकामे उभी राहत आहेत. एवढेच नव्हे तर कर्नाटक सरकारने आजवर दुर्लक्षित ठेवलेल्या कारवार यल्लापूर रस्त्याचे काम प्रकल्पातर्फे काही कोटी रूपये खर्चून केले आहे. या रस्त्यासाठी वनसंपदेची कटाई हा कळीचा मुद्दा होता. वन खाते त्यासाठी परवानगी देईल का हाही प्रश्‍न होता. गेल्या सहा वर्षात प्रकल्प परिसरात एवढी झाडे लावली आहेत की वन खात्याच्या नियमानुसार एक झाड कापले तर दोन झाडे लावायची असे करण्याची गरजच भासणार नाही. त्यामुळे नजीकच्या काळात कारवारहून हुबळीला जाणेही सोपे झाले आहे. कारवार ते हुबळी अंतर साठ किलोमीटरने कमी झाले आहे. प्रकल्पामुळे 133 कुटुंबे विस्थापित झाली. त्यांचे पुनर्वसन मल्लापूरजवळ करण्यात आले. या कुटुंबांपैकी 188 जणांना प्रकल्पाच्या सेवेत सामावून घेतले आहे. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस तरी रोजगार मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे.
विकास करणे हे काही प्रकल्पाचे मुख्य काम नव्हे. वीजनिर्मिती हे मुख्य कामही तेवढ्याच तत्परतेने पार पाडले जाते. आजवर प्रकल्प निर्विघ्न चालला आहे.
या प्रकल्पाची मुहूर्तमेढ तशी खऱ्या अर्थाने जुलै 1985 मध्ये रोवली गेली. अणु उर्जा खात्यातर्फे नेमलेल्या एका समितीने कारवारपासून 60 किलोमीटरवरील कैगाचे नाव भारतातील सातव्या अणुउर्जा प्रकल्पासाठी सुचविले. 24 सप्टेंबर 1999 ला प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर वीजनिर्मिती सुरू झाल्यावर कैगा जगाच्या नकाशावर आले. अतिउच्च दाबाच्या जड पाण्यावर चालणाऱ्या रिऍक्‍टरचा वापर करून 220 मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या उभारण्यास जून 1987 मध्ये प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली. प्रकल्पासाठी 732 हेक्‍टरवरील जंगल नष्ट करण्यात आले. त्यापैकी 120 हेक्‍टरवर सहा अणुभट्ट्या असतील तर उर्वरित 612 हेक्‍टरवर वीज वाहिन्यांचे जाळे असेल असे नियोजन करण्यात आले. कापलेल्या वृक्षसंपदेची भरपाई म्हणून 171 खासगी संपादित जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आजवर तीस हेक्‍टरमध्ये एक लाख नव्वद हजार झाडे लावण्यात आली आहेत. अन्य 750 हेक्‍टरवर वृक्ष लागवड करण्यासही प्रकल्पाने वन खात्याला अर्थसहाय्य केले आहे. प्रकल्पाभोवती घनदाट जंगलाची निर्मिती केल्याने धूळ प्रदूषणापासून प्रकल्पाचा परिसर मुक्त आहेच याशिवाय आपत्तकालीन स्थितीत किरणोत्सर्गी हवा प्रकल्पातून बाहेर सोडावी लागली तरी त्याचा त्रास शेजारीच असलेल्या लोकवस्तीला होऊ नये म्हणूनही जंगलाची ही भिंत उपयोगी पडणार आहे. कैगा म्हणजे अणु प्रकल्प हे आता रूढ झाले आहे. दशकभरापूर्वी अधिकारी कारवारात राहून ये जा करत. त्यामुळे प्रकल्पाविषयी कारवारच्या जनमानसात कुतूहल असे. आता प्रकल्पाविषयी तेवढी चर्चा नसते. त्यातच प्रकल्प चालकांचे यश सामावले आहे.

Friday, March 18, 2011

मासेमारी करणाऱ्यांसाठी खूषखबर

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्यांना आता सागरी वातावरणाची माहिती त्यांच्याच संगणकावर उपलब्ध करून देण्याची किमया दोना पावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने ("एनआयओ') साध्य केली आहे. इंटरनेट या प्रभावी माध्यमाचा त्यांनी त्यासाठी वापर केला आहे.च्छमारांना मासेमारीसाठी खोल समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज मिळणे महत्त्वाचे असते. वादळ होणार की, जोराचा पाऊस येणार याकडे त्यांचे लक्ष असते. आजवर अशा माहितीचे आधी संकलन व मग तिचे विश्‍लेषण करून ते मच्छिमारांपर्यंत पोहोचवण्यासाठी किमान सहा तास लागायचे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने आता समुद्रात व वातावरणात कसा फरक पडत चालला आहे याची प्रत्येक सेकंदागणिक माहिती संगणकाची कळ दाबताच उपलब्ध केली आहे.भारतीय राष्ट्रीय समुद्री माहिती सेवेच्या मदतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. आर्द्रता, वाऱ्याचा वेग, तापमान, समुद्राच्या पाण्यातील चढउतार याबाबतची माहिती स्वयंचलित प्रयोगशाळेच्या माध्यमातून उपलब्ध केली जात आहे. त्यासाठी समुद्रात तरंगती प्रयोगशाळा उपलब्ध आहे. या http://inet.nio.org/Pondicherry संकेतस्थळावर इंटरनेट सुरू केल्यावर ही माहिती उपलब्ध होईल. आजवर माहितीचे संकलन केल्यावर त्याचे विश्‍लेषण केले जायचे. आकाशवाणी, दूरदर्शन व प्रसार माध्यमातूंन ती माहिती मच्छिमारांपर्यंत पोचविण्यात येत असे.त्यात बराच वेळ जात असे. आता तो वाचणार असून ही महत्त्वाची माहिती मच्छिमारांना घरबसल्या मिळणार आहे. उद्याच्या हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आता त्यांना सरकारी प्रसारमाध्यमांवर अवलंबून राहावे लागणार नाही. श्री. प्रभुदेसाई डॉ. अँथनी जोसेफ, अशोक कुमार, विजय कुमार या शास्त्रज्ञांनी मच्छिमारांना ही ताजी माहिती पुरविण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.

Wednesday, March 16, 2011

खानापूरचे वास्तव!

नाखूष शिक्षक, दूर अंतरावरील शाळा आणि येथील जनतेकडे पाहण्याचा शासनाचा उदासीन दृष्टिकोन यामुळे म्हादई नदीच्या उगमस्थानातील या भागातील कित्येक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. या विभागात निवासी शाळांची संख्या वाढविण्याबरोबरच येथे खऱ्या अर्थाने शैक्षणिक चळवळ राबविली जाण्याची गरज आहे.दुगर्म डोंगरदऱ्यांत जीवन जगताना येथील नागरिकांना बाहेरील जग किती पुढे जात आहे, याची जाणीवच होऊ शकली नाही. येथील कष्टाचे जीवन, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, अज्ञान आणि दारिद्य्र यामुळे येथे शिक्षणाची गंगा लवकर पोचली नाही आणि जेव्हा पोचली, त्यावेळी सरकारी लाल फितीत ती अडकत राहिली. त्यानंतर येथे कशाचीच घडी बसली नाही. शिक्षणाचा सारा खेळखंडोबा होऊन गेला. अनमोड घाट काढला की हेमडगा, देगाव, तळेवाडीपासून या भागास सुरवात होते. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांत अनेक वस्त्या विखुरलेल्या आहेत. या वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शाळा होत्या. नंतर शिक्षक या जंगलात येण्यास तयार नव्हते. सध्या शेजारच्याच गावात शिकलेले दथरथ गजानन गावकर सध्या शिक्षकाची भूमिका बजावत आहेत. तळेवाडीला तर मारूतीच्या मंदिरातच पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत; मात्र या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. अवघड डोंगर, वाहने आणि रस्त्यांचा अभाव, इतर कोणत्याही सुविधा नसल्यामुळे येथे जाण्यास शिक्षक नेहमीच नाखूष असतात. नोकरीस नव्याने लागलेले किंवा अधिकाऱ्यांच्या, तालुक्‍यातील पुढाऱ्यांच्या मर्जीत नसलेल्या शिक्षकांना या दुर्गम भागात पाठविले जाते. यामुळेही जावळीतील शिक्षणाची दुरवस्था झाली आहे. शाळा घरापासून दूर अंतरावर असल्यानेही प्राथमिक शिक्षणाची येथे हेळसांड होते. आठ-दहा वर्षे वयाच्या अनेक मुलांना शाळेसाठी चार ते १० किलोमीटरची पायपीट करावी लागते. घनदाट जंगल ओलांडून पलीकडे जावे लागते, तरीह
ी अनेक मुले हा त्रास सहन करीत शिक्षण घेत आहेत. या भागातील नागरिकांना शेतीशिवाय इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्त्या माणसांना पोटासाठी बेळगाव वा गोव्यात जावे लागते. घरात शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन नसल्यास, कोणी नोकरीस नसल्यास दहा-पंधरा वर्षांच्या मुलांनाही गोव्याला धाडले जाते. शाळांमध्ये पट कमी असण्याचे हे मुख्य कारण आहे. यामुळे मुले शिक्षणापासून मोठ्या प्रमाणावर वंचित राहतात. पाचवीचे शिक्षण घेण्यासाठी खानापूरला रहावे लागते. तेथे नातेवाइक असल्यास ठीक अन्यथा कुठेतरी व्यवस्था करणेही पालकांच्या खिशाला परवडत नाही. नाहीतर दररोज किमान ३० किलोमीटरची पायपीट करावी लागते. ते शाररिकदृष्ट्या शक्‍य नसते. परिणामी अनेक हुशार विद्यार्थीही शिक्षणापासून वंचित राहतात. शहरात नातेवाईक असतील, अशीच मुले पुढे शिक्षण घेतात. सध्या या भागात अक्षरशः निसर्गाच्या भरवशावर जगणे सुरू आहे. कधी काय होईल याची शाश्‍वती नसल्याने नशीबावर भरवसा हाच जगण्याचा प्रमुख आधार बनला आहे.या परिसरात खाण व्यवसाय या परिसरात दहा वर्षापूर्वी सुरू होता. तोवर येथे निसर्गाच्या भरवशावर जगणाऱ्या लोकांच्या जीवनातील निसर्गाचे सानिध्य हिरावले नव्हते. त्यांच्या पाठीशी डोंगरदऱ्या खंबीरपणे उभ्या होत्या. शेतकऱ्यांच्या हिमतीला त्यांनी साथ दिली. त्यांच्यापाशी कसायला जमीन नव्हती; पण नसानसांत कष्ट भिनले होते. खोऱ्या कुदळींच्या साह्याने त्यांनी खडकाशी धडका घेतल्या. डोंगर उतारावर तुकड्या तुकड्यांची शेती उभी केली. त्यात ते भात, वरी, नाचणी पिकवू लागले.येथे वेडयासारखा पाऊस कोसळायचा. चारा डौलात डोलायचा. त्यावर गाई-म्हशींचे पालन केले जाऊ लागले. त्यांच्यापैकी काही दूध दुभते झाले. कष्टाला आकार येऊ लागले; पण या साऱ्याला मर्यादा होत्या. पिकलेल्यांत भागायचे नाही. आजही भागत नाही. म
ुले तरुण झाली, की त्यांना "गोव्याची'ची वाट धरावी लागते. पोरं पैसे पाठवितात; पण डोंगररानांत गावाकडे राहणाऱ्यांची अवस्था वाईट आहे. आजही त्यांच्या कष्टांना सीमा नाही. दळणवळणासाठी रस्ते नाहीत. इतर साधने नाहीत. अनेक वर्षांच्या मागणीनंतर या भागात एक रस्ता झाला; पण तो वन विभागाच्या फितीत अडकला. आरोग्याच्या सुविधा नाहीत. शिक्षणाच्या शाळा मुलांच्या कुवतीतील अंतराच्या बाहेर झाल्या. रस्ते नसल्याने सरकारी नोकर येथे फिरकत नाहीत. आणि जरी फिरकले तरी ते आपल्या मदतीसाठी नव्हे तर, त्रास देण्यासाठीच येतात, अशी भावना येथे निर्माण झाली आहे. निवडणुकांनंतर त्यांना येथील माणसांच्या अवस्थेचे सोयरसुतक नसते. इथे जगण्यासाठी माणसे पाय रोवून उभी आहेत. ती केवळ आपल्या मातीसाठी. म्हादईच्या पाणलोट क्षेत्रातील या जिवंत माणसांचे अरण्यरुदन आजही सुरू आहे. वन विभाग जंगलात फिरकू देत नाही, पुरेशी जमीन नाही, उत्पन्नाचे दुसरे साधन नाही आणि आमचे गाऱ्हाणे ऐकायला कोणी येत नाही, अशी खंत आजही खानापूरच्या जंगलातील लोक व्यक्त करीत आहेत. म्हादई बचाव मोहीम सुरू झाल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा या परिसरातील वावर वाढला आहे. त्यानेच जनतेच्या दैनंदिन जीवनाची घडीच बिघडवून टाकली आहे.या भागातील घनदाट अरण्यातून मुबलक जंगल, जमीन, तुटपुंजे पण हमखासपणे मिळणारे पाणी यांसारख्या समृद्ध जीवनस्रोतावर एक स्वयंपूर्ण समाज पिढ्यान्‌ पिढ्या स्थिरावला आहे. भरपूर पाऊस, जंगलात वर्षभर वाहणारे झरे, भात, नाचणी-वरी, मुबलक दूधदुभते देणारी जनावरे, अन्न म्हणून तसेच औषधे देणाऱ्या वनस्पती त्यांच्या हाताशी. येथे मुबलक निसर्गसंपत्तीला कष्टांची जोड देत येथील माणसे जीवन जगत आहेत. जमिनीत भात, नाचणी- नाचणी पिकवून आपले जीवन कंठत आहेत. डोंगरउतारावर वन विभागाचे राज्य असल्यामुळे जादा जमीन उपलब्ध येत नाही. त्य
ामुळे तुटपुंज्या जमिनीतच त्यांना कष्ट करीत राहावे लागते. उन्हाळ्यात खाचरे भाजून पाऊस पडताच रोपे टाकली जातात आणि तेथूनच तेथील शेतकऱ्यांच्या कष्ट आणि हालांना सुरवात होते. रोपे वाढली आणि खाचरे पाण्याने तुडुंब भरली, की उभ्या पावसातच भातलावणीला सुरवात होते. सतत कोसळणारा पाऊस, झोंबणारा वारा अशा कशाचीच पर्वा न करता माणसे शेतात कष्ट करीत राहतात. एवढे करूनही पोटापुरते पिकेलच याची काहीच शाश्‍वती नसते. आधीच जमीन अपुरी. त्यातच रानडुकरे, अस्वले, मोर अशा प्राणी आणि पक्ष्यांच्या तावडीतून वाचेल तेवढेच धान्य शेतकऱ्यांच्या पदरात पडते. शेत राखणीला जावे, तर श्‍वापदांचे भय. कधी कोठून बिबट्या येईल आणि फडशा पाडेल हे सांगता येत नाही. भाताच्या काढणीनंतर शेतीला पाण्याची व्यवस्था नसल्याने परत कोणतेही पीक घेता येत नाही. यामुळेच जगण्यासाठी त्यांना इतर मार्ग चोखाळावे लागतात. या खोऱ्यात राहणाऱ्या माणसांच्या एकूणच जीवनाचा अभ्यास करायला हवा. त्यांना सर्वांनीच वाऱ्यावर सोडले आहे. डोंगरदऱ्यात राहत आहेत, त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना आहे त्या परिस्थितीतच कोणत्या सुविधा देता येतील, हे पाहिले पाहिजे. त्यांच्या तुटपुंज्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी त्यांना कृषी विभागाने पुरेशी मदत करावयास हवी. दुर्गमपणामुळे येथे कोणत्याही योजना पोचत नाहीत. जास्त दूध देणारी आणि तेथील वातावरणात टिकू शकणारी जनावरे तेथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावयास हवीत.या परिसरात विपुल जंगल आहे. सारा प्रदेश डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. येथे दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नाहीत. रस्ता नसल्याने येथे कोणतेही उद्योग-धंदे येणे शक्‍यच नाही, तरीही येथील माणसांना उद्योग-धंदा उपलब्ध होऊ शकतो, फक्त प्रामाणिक आणि तळमळीने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. येथील जंगलात विपुल प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. या वनस्पती गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे कारखाने काढल्यास येथील नागरिकांना सहज रोजगार उपलब्ध होऊ शकतो.शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी पुरेसेच नव्हे तर थोडेही लक्ष देत नाहीत, अशी तेथील लोकांची तक्रार आहे.