Monday, March 9, 2020

विकासाची किंमत आता मोजा

पेडणे तालुक्यातील मोप येथे हरित आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन वर्षात विमानोड्डाण होईल असे सरकारचे म्हणणे आहे. तेथील जमीन मालकी, पूरर्वसनाला धरून कित्येकांचा लढा आज सुरु आहे. साळावली धरण होऊन कित्येक वर्षे झाली तरी त्यातील विस्थापितांचे प्रश्न आजही सुटलेले नाहीत. अधून मधून त्यांचे प्रश्न चर्चेत येत असतात. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आता अनेकजणांना विस्थापित व्हावे लागत आहे. लोंढा ते वास्को लोहमार्गाच्या रुंदीकरणामुळेही काहीजण विस्थापित होतील. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजपासून पुढील काही वर्षे चर्चेत राहील. या साऱ्या पार्श्वभूमीवर आम्ही विकासाचा विचार केला पाहिजे. राज्याचादेशाचा विकासतर व्हायलाच हवा पण तो कसा कुणाच्या त्यागावर अवलंबून असेल हेही बघावे लागेल. अश्रुविना विकास असे त्याचे स्वरुप असावे लागेल. कुणाच्या भल्यासाठी कुणाच्या खांद्यावर ओझे लादायचे असाही प्रश्न यातून उपस्थित होतो. म्हणूनच रस्ते रुंद केले जातात, धरणे बांधली जातात पण कुणासाठी, कशासाठी हा प्रश्न कायमच राहतो.
जंगले तोडली जातात पण तेही कुणासाठी कशासाठी याचे उत्तर शोधावे लागेल. आजचे तथाकथित पुनर्वसन धोरणही चुकीचे आहे. बेदखल होणाऱ्याचे अगर धरणग्रस्तांचे पूनर्वसन संपूर्णपणे झाल्याचे दिसत नाही. पुनर्वसन झाले तेव्हा जमिनीचा तुकडा मिळाला त्यातून पोट भरत नाही. काही प्रमाणात नगदी पैसे मिळाले पण ते कुठे गुंतवावेत याची योजना नव्हती. मार्गदर्शन नाही म्हणून ते पैसे खर्च करून संपवले. बेदखल लोकांचे केवळ पैसे देऊन पूनर्वसन करता येते, ही भुमिकाच सदोष अप्रामाणिकपणाची आहे. हे पैशाचे अर्थशास्त्र, अनर्शशास्त्र स्वार्थशास्त्र आहे. हे पर्यावरणाच्या क्षेत्रात अनर्थ करीत आहे. या सर्वांना मंगळाची नव्हे चंगळाची बाधा झाली आहे. चंगळवादी जीवन प्रणालींचा सर्वात जास्त धोका पर्यावरणास आहे.
आजवरच्या अनुभवांवरून हे सिद्ध झाले आहे, की विस्थापितांचे खरे पुनर्वसन कधी होतच नाही. याशिवाय पूनर्वसन फक्त शाररिक नसते, तर ते मानसिक, सामाजिक सांस्कृतिक असावे लागते. म्हणून आता पूनर्वसनाऐवजी आधी वसन म्हणजे प्रथम वसतीची सोय करायची मगच विस्थापित होऊ द्यायचे हा सिद्धांत मान्य करावा लागेल. मोप येथील प्रस्तावित हरित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी घरे पाडण्याआधी कासारवर्णे येथे घरे बांधून सोय केली गेली अशी पावले सर्वत्र टाकावी लागतील. एक झाड कापण्यापूर्वी दहा झाडे प्रथम लावायची मगच एक झाड तोडायचे. मोप विमानतळ प्रकल्पासाठी शेकडो झाडे कापण्यापूर्वी त्याचमुळे सरकारने हजारो झाडे आधी लावली पाहिजेत. आदर्श विस्थापनासाठी जे विस्थापित होतील असे वाटतात त्यांची राहण्याची प्रथम सोय केली पाहिजे. तेथे त्यांना स्थापत करायचे मगच त्यांचे घर पाडायचे असा कार्यक्रम असावा लागेल
अशी वस्ती अगर घरे जवळपास, त्याच आसमंतात असावी लागतील. एरवी अनेक सामाजिक सांस्कृतिक प्रश्न निर्माण होतात. जातीपातीवर आधारलेल्या समाज रचनेमुळे त्यांना त्यांच्या समाजापासून तोडून टाकले, तर विवाह आदीचे व्यावहारीक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे त्यांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन होतच नाही. विस्थापन वास्तव ठरते तर पुनर्वसन केवळ दिखाऊ असा आभास असतो या साऱ्या प्रक्रीयेत गरीब सामान्य माणसाचा बळी जातो. विकास इतरांचा होतो विस्थापितांचे जीवन भकास होते. त्यांना केवऴ आश्वासने मिळतात. कधी कधी पैशाच्या रुपात मोबदला मिळतो. जो पैसा कधीच टिकत नाही. खरे पाहिले तर जमीनजुमला घेऊन त्याचा मोबदला पैशात देणे ही भरपाई नव्हेच. जमिनीसाठी जमीन हाच भारतीय कृषीसंस्कृतीच्या पुनर्वसनाचा गमक असला पाहिजे. गरीबांची कच्ची घरे पाडून,वृक्ष कटाई करून, जंगले नेस्तनाबूत करून, त्यावर श्रीमंतांचे महाल बांधणे म्हणजे विकास नव्हे. विकास विवेकपूर्ण मानवीयच असावा लागेल.
अथर्व वेदातील भूमी सुक्तातील स्तोत्रांतील ऋचांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. त्याचा भावार्थ असा आहे
धरती माते तुझ्या टेकड्या
तुझी हिमाच्छादित पर्वत- शिखरे
तुझी वने
आमची दयाबुद्धी चेतवतील
पिंगट, काळ्या, आरक्त
बहुरंगी छटा असलेल्या
या प्रचंड धरतीला
रक्षितो चंद्र
अभेद्य, अजेय, अनांकित
अपायहीन या धरित्रीवर
थाटले आहे मी माझे घर
धूळ उधळतो जसा वारू तद्‌वत
धरणीने माणसे विखुरलेली
अस्तित्वात येताना
जगन्नायिका, जगत्‌तारिणी पृथ्वी
वृक्षांना वल्लरीनाही बसते कवटाळून

या साऱ्या पार्श्वभूमीवर दिसते की आपण तर नदी, पर्वत यांच्याशी कौटुंबिक नातेच जोडले आहे. म्हादईस आपण मातेसमान तर सह्याद्रीस आपण पित्यासमान मानले आहे. काकासाहेब कालेलकरांनी नद्यांना लोकमाता म्हटले आहे. हीच भावना संपूर्ण सृष्टीबाबत असणे आवश्यक आहे. म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने पळवणे सुरु केले आहे, त्यासाठी सर्वांनी लोकलढा उभारावा असे आवाहन करण्याची वेळ येते यावरून आमची भावना किती उदात्त आहे याची कल्पना येते. आपण पृथ्वीला वसुंधरा किंवा वसुमती म्हणतो. वसु म्हणजे संपत्ती. सारी संपत्ती पृथ्वीच्या उदरात सामावली आहे अशी आपली भावना आहे. परंतु आताशा निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर विजय मिळवण्याचीच आकांक्षा दिसून येते. निसर्ग आपला मित्र आहे, शत्रू नव्हे हेही आपण विसरत चाललो आहोत. निसर्गाशी सहयोग करून सहजीवन प्रस्थापित करण्याऐवजी निसर्ग नैसर्गिक संपत्तीचे शोषण करण्याचीच वृत्ती बळावते आहे. खाणकामावर उत्खननाची मर्यादा नको असा जो सूर सध्या ऐकू येत आहे तो याच वृत्तीची परंपरा सांगणारा आहे
राज्य घटनेच्या नागरिकांची मुलभूत कर्तव्ये नमूद करणाऱ्या कलम ५१ मध्ये अरण्ये, सरोवरे, नद्या वन्य जीवसृष्टी यासुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून, त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्याबाबत दयाबुद्धी बाळगणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य ठरेल असे घोषित कऱण्यात आले आहे. हीच खरी करुणावृत्ती. करुणा या शब्दातील हे अक्षर कर्तृत्व कर्तव्य निदर्शक आहे आणि या कर्तव्य भावनेचाही आज विसर पडतो आहे. शेवटी संस्कृती अगर प्रगती निसर्गासोबतच्या सहजीवनातच आहे, निसर्गाचे शोषण करून त्याचा विध्वंस करण्यात नाही हे तरी कळायला हवे. आजचे आज पाहू, उद्याचे उद्या ही प्रवृत्ती विनाशाकडे नेणारी आहे. ती स्वार्थमूलक आहे. असांस्कृतिक आहे अमानवीयही आहे. संस्कृती दोन प्रकारची असते, त्यागावर आधारीत किंवा भोगावर आधारीत. महात्मा गांधी त्यागवादी होते ही वृत्तीच निसर्गाचे संरक्षण संवर्धन करु शकते. आता पर्याय निवडणे आपल्याच हातात आहे.
विज्ञानाने आज जग जवळ आले आहे. आता दोन ठिकाणांतील अंतर तास, मिनिटे आणि सेकंदात मोजण्यात येत आगे. मोबाईलचे युग आहे असे म्हणतात. पण शेवटी दोन माणसे, देश आणि जग परस्परांजवळ आले ते सहयोगासाठी की द्वंद्व युद्धासाठी हाच खरा यक्षप्रश्न आहे. सभ्यता किंवा संस्कृती ही दोन प्रकारचीच असते. एक त्यागावर आधारीत तर दुसरी भोगावर आधारीत. ती पौर्वात्य किंवा पाश्चिमात्य अशी नसते. सृष्टीशी तादात्म्य ही भावना अत्यंत मंगलकारी सांस्कृतिक आहे. दोहोंतील सुसंवाद हेच विज्ञानाचेही ध्येय असावे लागेल. एरवी वैज्ञानिक प्रगतीचा उपयोग निसर्गाचे, पर्यावरणाचे शोषण संहार यासाठीच होईल अशी भीती वाटते. वसुंधरेस समृद्ध करण्याऐवजी लोभापोटी आपण तिला विद्रुप करीत आहोत. तिची नैसर्गिक साधन संपत्ती नैसर्गिक समतोल टिकवणे आवश्यक आहे. नैसर्गिक समतोल बिघडल्यामुळे जल, जंगल, जमीन, उर्जा आदी साधनांचा भविष्यकाळात तुटवडा जाणवेल असे स्पष्टपणे दिसते आहे. जागतिक तापमानवाढ, दुष्काळ, पूर, वादळ अशा अनेक समस्यांना आजच सामोरे जावे लागत आहे. हे प्रश्न फक्त राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे नाहीत तर त्याचे स्वरुप आंतरराष्ट्रीय आहे. आपण पृथ्वीचे मालक नाही, सेवक विश्वस्त आहोत याची जाणीव ठेवावी लागेल अन्यथा पुढील पिढी आपणास मुळीच क्षमा करणार नाही.