Saturday, June 16, 2018

होय, असा होता गोवा

गोवा आज सर्वच क्षेत्रात विकसित झाला आहे, होत आहे. गोव्याने ही क्रांती सहजासहजी अनुभवली नाही. गोव्याच्या सत्ताधाऱ्यांची दूरदृष्टी आणि जनतेचा चांगल्या जीवनासाठीचा आग्रह यातून गोव्याचा हा प्रवास झाला आहे. 18 जून रोजी मडगाव येथे झालेल्या आंदोलनातून गोवा मुक्ती संग्रामाचे स्फूल्लींग पेटले असे मानले जाते. गोवा मुक्तीनंतर खऱ्या अर्थाने गोव्याचा विकास होऊ लागला आहे. मात्र आजच्या विकासाची तुलना पूर्वीच्या गोव्याशी केल्याशिवाय प्रगतीचा टप्पा लक्षात येणार नाही. त्याचसाठी गोवा कसा होता याचा हा धांडोळा.

गोवा म्हटल्यावर विकसित झालेले राज्य कोणाही भारतीयाच्या नजरेसमोर येते. गोवा हे नाव उच्चारल्यावर जगाच्या कानाकोपऱ्यात पर्यटनस्थळरुपी गोवा नजरेसमोर येतो हा भाग वेगळा. विकासाचे परीमाण देशाला जणू गोवा घालून देत आहे तसा विकास राज्याने अनुभवला आहे.केवळ पायाभूत सुविधाच नव्हेत तर वैद्यकीय, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्याच पातळ्यांवर गोव्याने मोठे परीवर्तन मुक्तीनंतरच्या काळात अनुभवले आहे. पोर्तुगीजांच्या जोखडाखालील गोवा, गोवा संघराज्य आणि गोवा घटक राज्य असा हा प्रवास आहे. त्यात अनेक टप्पे आले, ते लिलया पार केले गेले आहेत.
हे सारे पाहताना, मागे वळून पाहिल्यास वेगळाच गोवा दृष्टीस पडतो. आज गोव्याची लोकसंख्या 15 लाखावर पोचली तरी 1971 च्या जनगणनेनुसार ती केवळ 4 लाख 31 हजार 214 होती. त्याच्याही मागे गेल्यास 1851 मध्ये झालेल्या जनगणनेत गोव्याची लोकसंख्या केवळ 3 लाख 63 हजार 788 होती. गोव्यात पहिली जनगणना 1850 साली झाली होती मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. 1881 च्या जनगणनेत लोकसंख्या 4 लाख 6 हजार 757 नमूद करण्यात आली होती. सरकारी आकडेवारीनुसार गोव्याच्या लोकसंख्या वाढीचा दर 1920 ते 1940 दरम्यान 7.05 टक्‍के होता. तर 1940 -1950 मध्ये तो 1.21 टक्के होता. गोवा मुक्तीनंतर हा दर अचानक वाढला आणि 1960-1970 दरम्यान हा दर 34.7 टक्के झाला होता.
जगभरातील फॅशनची आज गोव्यात चलती आहे. जगातील फॅशन जुनेगोवेच्या फेस्ताच्या वेळी अवतरते असे काही वर्षांपूर्वीपर्यंत मानले जायचे. बोट सुरु असतेवेळी मुंबईतून येणारे उतारू ही फॅशन आपल्यासोबत आणत मात्र आता दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अहोरात्र फॅशन शो बघण्याची सोय झाल्यापासून फॅशन कधी अवतरली आणि त्यात कसा बदल होत गेला हेच समजेनासे झाले आहे. मात्र 1910ते 1950 या कालावधीचा विचार केला तर महाराष्ट्र आणि मुंबई इलाक्‍याचा ठसा येथील पेहेरावावर मोठा होता. पागोटी, धोतर, अंगरखा, उपरणे आणि जोडा असा हिंदूंचा पेहराव असे. खिस्ती पुरुषांचा पेहराव पाश्‍चिमात्य धाटणीचा होता.
खाणकाम बंदीची आज मोठी चर्चा आहे. खाणी बंद झाल्यामुळे तिनेक लाख जणांवर बेरोजगारीचे संकट कोसळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र सरकारी आकडेवारी पाहिल्यास 1970 मध्ये खाणकामात केवळ 16 हजार 237 जणच काम करत होते. त्याचवेळी 350 जणांना रोजगार देणारी चौगुले टेक्‍सटाईल मिल शेल्डे येथे होती. त्यासाठी लागणारा कापूस मुंबई आणि विजापूर येथून आणला जायचा अशीही आठवण सांगितली जाते. गावोगावी बॅंकांच्या शाखा सुरु झाल्या असल्या तरी गोवा मुक्तीपूर्व काळात केवळ एकच बॅंक गोव्यात कार्यरत होती हे सांगितल्यास आश्‍चर्य वाटेल, पण ती वस्तुस्थिती आहे. खासगी कर्जे देणारे सावकार मात्र अनेक होते. कर्जे फेडू न शकल्याने अनेकांच्या मालमत्ता सावकारांनी जप्त केल्या होत्या. त्या परत देण्याचा विचार करण्यासाठी 25 नोव्हेंबर 1968 रोजी सरकारने आयोगही नेमला होता. आज हा सारा इतिहास झाला आहे. गोवा मुक्तीपूर्व काळात अस्तित्वात असलेल्या बांको नासिनल उल्ट्रामारीनोच्या पणजी, मडगाव, वास्को व म्हापसा येथे शाखा होत्या मात्र ही बॅंक ठेवीवर व्याज देत नव्हती हे आता वाचून खरेही वाटणार नाही. आज प्रत्येक वस्तूचा विमा उतरविण्याचे युग असले तरी गोवा मुक्तीपूर्व काळात व गोवा मुक्तीनंतरच्या काही वर्षात आयुर्विम्याविषयीही उदासिनता होती. 1962-63 मध्ये केवळ 2 हजार 451 जणांनीच विमा उतरविला होता.
गोव्यातील लोकसंख्येच्या गरजेनुरुप विदेशातून साहित्यांची आयात थेटपणे केली जात असे. आता केंद्र सरकार आयात करते आणि वस्तू राज्यांना पुरवते. पूर्वी राज्येही आयात करत असत. 1969-70 मध्ये गोव्याने ब्रिटन, पश्‍चिम युरोप, जपान व इतर देशांकडून आयात केल्याची आकडेवारी सरकार दप्तरी नोंद आहे. अन्नधान्ये, खते, खनिज तेल, लुब्रिकंट्‌स आदींची आयात करण्यात आली होती. नारळाचे भाव मध्यंतरी चढल्याने केरळ, श्रीलंकेतून नारळ आणण्याच्या गोष्टी ऐकावयास मिळाल्या होत्या. मात्र 1907 मध्ये गोव्यातून 3 कोटी 30 लाख 88 हजार, 1927 मध्ये 4 कोटी 23 लाख 20 हजार, 1928 मध्ये 3 कोटी 36 लाख, 66 हजार नारळ निर्यात करण्यात आले होते. त्याशिवाय आंबे, मीठ, मासे, सुपारी, आणि काजूची निर्यात गोव्यातून त्या काळात झाली होती. खनिज निर्यातीसाठी गोव्याची ओळख असली तरी गोव्यातून मॅंगनीजची पहिली निर्यात 1947 मध्ये झाली होती. लोह खनिज निर्यात 1959 मध्ये सुरु झाली होती.
वाहनांच्या संख्येसाठी गोव्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वाहन चालविण्यायोग्य लोकसंख्येपेक्षा आज वाहनांची संख्या जास्त आहे. गोवा मुक्तीपूर्व काळात व नंतरच्या काळात सायकल हेच वाहतुकीचे प्रमुख साधन मानले जाई. सायकली गावोगावी भाड्याने मिळत. सायकलची नोंदणी होत असे व त्यावर करही भरावा लागत असे. 1971-72 मध्ये पालिका क्षेत्रांत 6 हजार 272 सायकली होत्या. त्यापैकी 4 हजार 737 सायकली खासगी मालकीच्या होत्या तर 1 हजार 535 सायकली भाड्याने देण्यासाठीच्या होत्या. राज्यातील एकूण सायकलींची संख्या त्यावेळी 22 हजार 679 होती. त्याचवेळी राज्यात 1 हजार 394 बैलगाड्याही होत्या. कोकण रेल्वे व दक्षिण पश्‍चिम रेल्वेने गोवा देशाच्या इतर भागाशी जोडला गेला तरी याची सुरवात 1881 मध्ये झाली होती. मुरगाव ते सावर्डे हा 41 किलोमीटरचा लोहमार्ग त्यावेळी खुला करण्यात आला. सदर्न मराठा रेल्वेशी तो जोडला गेला होता.
मुरगाव बंदर सगळ्यानाच माहित आहे. कधीतरी मांडवी नदी व अरबी समुद्राच्या संगमावर वसलेल्या पणजी बंदराचा उल्लेख होतो. मात्र इतर अनेक बंदरे मुक्तीपूर्व व त्यानंतरच्या काळात अस्तित्वात होती हे आज इतिहासजमा झाले आहे. कोलवाळ येथेही बंदर होते. 1970-71 मध्ये त्या बंदरात 11 लाख 85 हजार 495 कौले आयात झाल्याची नोंद आहे. बेतुल बंदरातून सुके मासे, बॉक्‍साईट मिळून 49 हजार 191 मेट्रीक टन माल निर्यात झाल्याची नोंद आहे. तळपण बंदरातून मातीची भांडी निर्यात केली गेली आहेत.
केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाळ्यानंतर गोवा ते मुंबई जलमार्गावर क्रुझसेवा सुरु होईल अशी घोषणा केली आहे. गोवा जलमार्गाने मुंबईला 1930 च्या दरम्यान जोडला गेला होता. किलीक निक्‍सन कंपनी आणि माईन शिपिंग कंपनीच्या आगबोटी त्या काळात गोवा ते मुंबई व परतीच्या जलमार्गावर आठवड्यातून दोन वेळा या पद्धतीने प्रवासी वाहतूक करायच्या. मंगळूरपर्यंत नंतर या सेवेचा विस्तार झाला होता. मुंबई ते गोवा हा जलप्रवास 18 ते 20 तासांचा असे. आज रेल्वेने 8 तासात मुंबई गाठता येते. जलमार्गावर प्रवास करणाऱ्यांना तिकीटाव्यतिरीक्त सरकारला 10 आणे कर द्यावा लागत असे. त्याशिवाय राज्यात पणजी ते सावर्डे, पणजी ते वळवई, पणजी ते हळदोणे, पणजी ते बेती आणि वेरे, पणजी ते मुरगाव अशा जलमार्गावर वाहतूक चाले. पणजीहून सावर्डेला जाण्यासाठी सकाळी 11 वाजता निघालेली बोट सायंकाळी 5 वाजता पोचत असे. रायबंदर, जुनेगोवे, कुंभारजुवे, कुंडई, डोंगरी, मडकई, उंडीर, दुर्भाट, बोरी, रायतूर, मानकी आणि सावर्डे येथे बोट थांबे घेत असे. दुसऱ्या दिवशीस सकाळी 8 वाजता परतीच्या प्रवासाला ही बोट निघून दुपारी 2 वाजता पणजीला पोचत असे. पणजी ते सावर्डे प्रवासासाठी अडीच रुपये तिकीट वरच्या वर्गासाठी तर खालच्या वर्गासाठी तिकीट 12 आणे असे. पणजी ते वळवईसाठी वरच्या वर्गाचे तिकीट 1 रुपया तर खालच्या वर्गासाठी 8 आणे असे.
पेडणे तालुक्‍यातील मोप येथे येत्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिल. दाबोळी येथेही विमानतळ कार्यरत आहे. गोवा मुक्तीपूर्व काळात दाबोळीहून फारशी हवाई वाहतूक व्हायची नाही. 1959 मध्ये 7 हजार 223 प्रवाशांनी या विमानतळाचा वापर केला होता. 41 हजार किलो साहित्याची हवाई वाहतूक या विमानतळाच्या माध्यमातून झाली होती. 1962 मध्ये दाबोळीवरून नियमित हवाई वाहतूक सुरु झाली. त्यावेळी मुंबईहून कोचीकडे जाणाऱ्या विमानात गोव्यासाठी केवळ तीन आसने आरक्षित होती. 1966 मध्ये गोव्यासाठी आरक्षित आसनांची संख्या 48 पर्यंत वाढविण्यात आली. 1968 मध्ये त्यात आणखीन 20 आसनांची भर पडली होती. 1968-69 मध्ये 20 हजार 473 प्रवाशांनी दाबोळीवरून प्रवास केल्याची नोंद आहे.
टपाल खात्याच्या कार्यालयात आता पासपोर्टसाठीचे अर्जही मिळू लागले आहेत. पोष्टाची बॅंकही सुरु झाली आहे. स्पीड पोस्ट कुरीयर सेवेला स्पर्धा करू लागले आहे. मात्र गोव्यात टपाल सेवा सुरु करण्यासाठी पोर्तुगीजांना ब्रिटीशांशी करार करावा लागला होता. या करारानंतर 1833 मध्ये टपाल सेवा गोव्यात सुरु झाली. गोव्याहून बेळगाव व मालवणला टपाल नेऊन ते इतरत्र नेले जाई. आजच्या जमान्यात तार हा प्रकार विस्मृतीत गेला असला तरी पणजीतील तारघर ब्रिटीश व पोर्तुगीजांनी मिळवून चाववले होते. 1874-75 मध्ये 1 हजार 294 संदेश पणजी तार कार्यालयातून पाठवले गेले तर 1 हजार 869 संदेश पणजीत आले. राज्यांतर्गत तार संदेशासाठी पहिल्या 12 शब्दांसाठी आठ आणे तर तेवढ्याच जलद संदेशासाठी 1 रुपया शुल्क होते.
आता मोबाईलवर दूरचित्रवाणी वाहिन्या बघण्याची सोय झाली असली तरी गोवा सरकारने 1963 मध्ये सरकारी कार्यक्रम,योजना यांचा प्रसार करण्यासाठी राज्यभरातील पंचायतींत रेडिओ उपलब्ध केले होते. दररोज दोन ते अडीचतास या रेडिओवर सरकारी कार्यक्रम असत ते जनतेने ऐकावे अशी सरकारची अपेक्षा असे. या रेडिओंची देखभाल आणि दुरूस्ती करण्यासाठी तत्कालीन माहिती व पर्यटन खात्याने एक पथकच नेमले होते. ते राज्यभरात फिरत असे. तीन मॅकॅनिक व एक भांडारपाल यांचा त्यात समावेश होता, अशी माहिती मिळते.
सरकारने आपल्या प्रशासनातील रिक्त पदे भरावीत अशी सगळ्यांचीच मागणी आहे. सरकारी नोकरी हेच बेरोजगारी नष्ट करण्याचे एकमेव साधन आहे असा सत्ताधाऱ्यांनीही समज करून घेतला आहे. काही मंत्री तर मुख्यमंत्री आल्यावर नोकरभरती होईल असे सांगणे सुरुही केले होते. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कुठे पोचली, किती जणांमागे किती सरकारी कर्मचारी हे प्रमाण कुठे पोचले हेही कोणी पाहत नाही. मात्र 1963 मध्ये केवळ 8 हजार 463 सरकारी कर्मचारी होते. 1972 मध्ये ही संख्या दुपटीने वाढली होती. सरकारी नोंदी तपासताना 1968 मध्ये टेलरचे दैनंदिन वेतन 5 रुपये होते अशीही नोंद सापडते. इफ्फीसाठी कायम केंद्र ठरलेल्या गोव्यात 1972-73 मध्ये 24 चित्रपटगृहे होती, त्यापैकी 13 कायम तर 11 तात्पुरत्या स्वरुपाची होती.
अशा नानाविध क्षेत्रांचा धांडोळा घेत गेल्यास तो एका लेखापुरता आटोपता राहणार नाही. गोव्याने आज बरीच प्रगती केली आहे. मात्र त्याची सुरवात बऱ्याच आधी झाली आहे. शिक्षण, सेवा, पायाभूत सुविधा असा प्रगतीचा आलेख आहे. तो आणखीन उंचावत जाणार यात शंका नाही. नव्या गोव्यात वावरताना पूर्वीचा गोवा कसा होता हे समजून घेतले तर गोव्याचा एकूण प्रवास काय हे जाणवल्याशिवाय राहत नाही.