Wednesday, May 11, 2011

कोझिकोड, अल्वाये, कोची, कोवालम

कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील खुदाईवर लक्ष ठेवणाऱ्या कंपनीतील अभियंता अब्राहम वार्के याच्या लग्नाच्या निमित्ताने केरळमध्ये राहण्याचा व भटकण्याचा योग आला होता. खऱ्या अर्थाने कालीकतला भटकलो ते सॉटर डिसोझासह. जानेवारीत कन्याकुमारीला जाताना सॉटर माझ्यासोबत होता. वाटेत कालिकतला थांबावे असे ठरले. आम्हाला वास्को द गामाने पहिला पाय ठेवला ती जागा बघायची होती. शहरापासून पंचवीस किलोमीटरवरील त्या जागेकडे गेलो तर तेथे पुरुषभर उंचीचा एक स्तंभ दिसला. स्थानिकांनी सांगितले की पूर्वी स्तंभ असलेल्या जागेवर समुद्राने अतिक्रमण केल्याने आजवर तीनदा स्तंभाची उभारणी केल्याचे सांगितले.कालिकतला मिळणारे मासे व उकडा भात आणि जेवणानंतर चघळायला देण्यात येणारा काळा हलवा कधीच विसरला न जाणारा असा होता. पण भावली ती रेल्वे स्थानकावरील स्वच्छता. कट्टर कम्युनिस्ट असलेल्या प्रा. एन. शोबिंद्रन यांच्याशी म्हणूनच मी रेल्वेच्या प्रतीक्षालयात अनेक विषयांवर दोन तास वाद घालू शकलो. तेथे स्वच्छतेची वेळ झाली की स्वच्छतागृहे सर्वांसाठी बंद केली जातात. दर चार तासांनी तसे केले जाते. यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.वार्केचे घर कोट्टायमजवळ एका बेटावर आहे. तेथे जाण्यासाठी फेरीबोट पकडून ये असा त्याचा निरोप. मी गोव्यात जशी फेरीबोट असते तशा फेरीबोटीची प्रतीक्षा कुमन्नम येथे अर्धा दिवस केली. अखेरीस एकाला विचारले त्या वेळी ट्रॉलरवजा बोटीलाच फेरीबोट म्हणतात असा साक्षात्कार झाला. पुढे घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत काळ्या चहाने करतात हाही धक्का बसला. त्याच्या घराभोवती असलेल्या पाण्यातून एकमेकांकडे जाण्यासाठीही छोट्या होड्यांचा वापर कसा केला जातो इथपासून जीप आणण्यासाठी दोन होड्यांच्या मध्ये फळ्या रचून तराफा कसा केला जातो हेही पाहता आले.कोची येथे इंडियन एक्‍सप्रेसमधला माझा मित्र मनु पबी याच्यासह फोर्ट कोची भागात ताजे मासे पकडून ते लगेच तळून कसे दिले जातात याचे प्रात्यक्षिक अनुभवले. पुढे गोमन्तक टाइम्समधील ऍण्ड्य्रू परेरा याच्यासह भटकंती करताना अल्वाये येथे हाउसबोटीच्या व्यवसायाचे अंतरंगही न्याहाळता आले. तीन वर्षांच्या मुलांना नदीत पोहायला शिकविणारे धाडसी लोकही तेथेच पाहता आले. मोठ्या बोटीवरील खोल्या ते वातानुकूलित रेस्टॉरंट व खोल्या असा हाउस बोटीचा प्रवास झाला आहे.गेल्या दशकातील केरळ आणि आजचे केरळ यात बराच बदल झाला आहे. 1994 ते 98 पर्यंत गावागावात कौलारू घरे दिसत. क्वचित एखादा उघडाबंब माणूस फक्त लुंगीवर दिसे. आज लुंगी टिकून असली तरी घरे मात्र बदलू लागली आहे. कॉंक्रिटीकरणाचे वारे पोचले आहे. पूर्वी लुंगीवर कुठेही जाण्यास मुभा होती. ते प्रतिष्ठेचे लक्षणही मानले जात होते. पण गेल्यावर्षी युवा वर्गाने पॅन्टला आणि त्यातील फॅशनलाही पाठिंबा दिल्याचे दिसले. स्वस्तात काजूगर पुरविण्याची किमया केरळने साधली आहे, कष्टाळू अशा केरळी समाजाला त्याला बुद्धीची जोड देत राज्य विकासपथावर नेले आहे. साक्षरतेचे प्रमाण केरळमध्ये जास्त असले तरी स्थानिक मल्याळम वगळता इतर भाषा न येण्याने होणारे तोटे कुठल्या पारड्यात टाकले जाणार?कनार्टकाला लागून असलेल्या अझीमला येथे नौदलाची अकादमी उभी राहत आहे. वेरे बेती येथील नौदल अकादमी तेथे हलविली जाणार असे जाहीर झाल्याने तेथे भेट न देणे शक्‍यच नव्हते. अकादमी दोन डोंगराच्या मधल्या भागात विस्तारली आहे. या दोन डोंगरांचा उल्लेख वास्को द गामाच्या प्रवास वर्णनात आहे. संरक्षणदृष्ट्याही टेहळणीसाठी ती मोक्‍याची जागा असल्याने तेथे अकादमी होणे हा निव्वळ योगायोग नव्हे. सध्या संचलन मैदान, मुख्य प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण झाले असून प्रशिक्षणार्थींच्या वसतीगृहाची इमारत उभी राहत आहे. केरळच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या तिरुअनंतपुरम येथे सुती टॉवेल फार स्वस्त मिळतात. त्याही पुढे असलेल्या कोवालमला तर जगात उपलब्ध असणारे सर्वकाही मिळते. फक्त तिथे सध्या कॉंक्रिटचे जंगल उभे राहिले आहे इतकेच.

Monday, May 2, 2011

गोपुरी आश्रम

1999 मध्ये कणकवलीत असताना एक दिवस अमरसिंह घोरपडे नावाचे माझे सहकारी मला वागदे या तीन किलोमीटरवरील गावी असलेला गोपुरी आश्रम दाखविण्यास घेऊन गेले. तेथे प्रा. राजेंद्र मुंबरकर या तिशीतील तरुणाचा परिचय झाला. मुंबरकर कणकवली महाविद्यालयात ग्रामीण विकास विषय शिकवतात. आता ते पीएचडी मिळवून प्रा. चे डॉ. मुंबरकरही झाले, तरी आमची मैत्री त्याच पातळीवर कायम आहे. मुंबरकर यांनी तेथील गोशाळा, शेती फिरून दाखविली. त्या वेळी या आश्रमाच्या व्यवस्थापनाचा ताबा एक दिवस माझ्याकडे येईल अशी पुसटशी कल्पना देखील माझ्या मनाला शिवली नाही. समाजवादी चळवळीशी असलेली जवळीक त्यासाठी उपयोगी ठरली. जयवंत मठकर, गणपत सावंत, रमाकांत आर्ते, गोविंदराव शिंदे दादा यांना मी कणकवलीत आल्याचे कळले. एकदा मठकरकाका आले नि माझ्या जानवलीतील खोलीतील सर्व साहित्य गोपुरीतील विश्रामगृहात हलविण्याचा जणू आदेशच दिला. त्यानंतर मला व्यवस्थापन समितीवर कायम निमंत्रित असे स्थान देण्यात आले. दैनंदिन व्यवस्थापनात माझा शब्द अखेरचा ठरू लागला. तेथे असताना संस्था फायद्यात आणण्याची किमया सर्वांच्या मदतीने साधली. नर्सरी सुरू केली. नर्सरी प्रशिक्षण वर्ग सुरू केला. खतविरहीत ताजी भाजी मोठ्या प्रमाणावर मिळण्यासाठी प्रयत्न केले. गणपत पाटील यांच्या मदतीने उसाची शेती केली. केळीच्या नव्या जातींची लागवड केली. जुनाट पंप बदलून नवा जादा अश्‍वशक्तीचा पंप बसविला. अप्पासाहेबांच्या या कार्याची साक्ष देत गोपुरी आश्रम आजही कणकवलीनजीक वागदे येथे कार्यरत आहे. कोकण गांधी म्हणून ओळखले जाणारे अप्पासाहेब 1922 मधील द्विपदवीधर. इंग्रजांच्या त्या आमदनीत त्यांना प्रशासनात उच्च अधिकाराची नोकरी करणे सहज शक्‍य होते; पण त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. 1930 ला महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला, तर अप्पासाहेबांनी सिंधुदुर्गातील शिरोडा येथे हा सत्याग्रह केला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या चिरस्थायी विकासाचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पटवर्धन यांनी आपल्या मायभूूमीची वाट धरली. कणकवलीनजीक वागदे गावात त्यांचे सहकारी मित्र प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या सहकार्याने 18 एकर टाकावू जमिनीवर 5 मे 1948 रोजी गोपुरी आश्रम या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. केवळ संकल्पना न मांडता आपले विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. युरोपियन देशातील उच्च राहणीमान अप्पांनी अनुभवले होते. भारतीय लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छतेचा मूलमंत्र जपला पाहिजे हे धोरण त्यांनी अवलंबिले. गोरगरीब लोकांना परवडतील, असे शौचालय बांधण्याचे प्रयोग त्यांनी केले. सोन खतापासून उत्तम खत निर्माण होते हेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्यांनी उभारलेली मॉडेल्स आजही गोपुरी येथे पाहायला मिळतात. गोबरगॅस आणि त्यावर जेवण शिजविण्याचा त्यांचा प्रयोग म्हणजे सुरवातीला आक्रीतच वाटले. उत्तम बायोगॅस निर्माण करता येऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी कणकवलीतील छात्रालय येथे "मैला गॅसप्लॅन्ट' उभारला. अप्पांनी ग्रामीण ऊर्जा व स्वच्छतेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेक प्रयोग केले. धवल क्रांतीची कोकणात सुरवात व्हावी यासाठी संकरित गायी आणल्या. पुण्याहून चारा आणला. फलोत्पादन, शेतीचे नवे प्रयोग, पेरू, केळी, आंबा, यावर वेगवेगळे प्रयोग, मसाले पिकांची लागवड त्यांनी स्वतः केली व शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. आजही गोपुरीत अनेक प्रयोग सुरू आहेत. काजू सरबताचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. आजही कृषी सहली गोपुरीला आवर्जून भेट देतात. नंदकिशोर परब, सरिता धामापूरकर, जया सदडेकर, उमेश जाधव, प्रसाद आचरेकर यांनी गोपुरी आश्रमात नव्या कल्पना राबविण्यासाठी चांगले सहकार्य केले. त्या आश्रमात असताना कोकण दौऱ्यावर आलेले अण्णा हजारे माझ्या खोलीत एक दिवस मुक्कामाला राहिले ही आठवण मी हृदयात जपून ठेवली आहे.