Tuesday, February 25, 2020

नव समाज निर्मितीचे आव्हान

नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विरोधात पणजीच्या आझाद मैदानावर दोन वेळा नागरिक मोठ्या संख्येने एकवटले. सत्ताधारी भाजपने या कायदा दुरुस्तीच्या समर्थनार्थ मोठी फेरी पणजीत काढली. परस्परविरोधी विचारांचे दर्शन यातून घडले. समाजमन दुभंगवणाऱ्या अशा या घटना शांतताप्रिय गोव्यात दुहीस कारणीभूत ठरणाऱ्या आहेत. मागे भाषावादावेळी निर्माण झालेली तेढ कुठे विस्मृतीत जात आहे तोवर समाजमनावर ओरखडे काढणाऱ्या अशा या घटना घडत आहेत. समान नागरी कायदा लागू असलेल्या गोव्याचे उदाहरण हे धार्मिक सामाजिक सलोख्यासाठी सर्वत्र दिले जाते. साडेचारशे वर्षे विदेशी सत्तेखाली राहूनही गोमंतकीय समाज बहुतांशपणे सहिष्णू राहिला हेही मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. गोवा तसाच पुढे राहिल का याविषयी चिंता वाटावी अशी वातावरण निर्मिती आता होऊ लागली आहे. यातून विचारांचे धृवीकरण करण्यात काही समाजधुरीणांना यश आल्याचे आता वाटत असले तरी समाजदुहीची आज रोवलेली बिजे भविष्यात गोव्याची ओळख पुसण्यास कारणीभूत ठरतील याची ना खंत वा खेद असे त्यांचे मार्गक्रमण आहे.
अशा काहीशा गढूळ वातावरणात जिल्हा पंचायतीची निवडणूक आता जाहीर झाली आहे. तिची उमेदवारी मिळण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. मतदारसंघ आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप झडू लागले आहेत. विकासकामे सुचवण्यापलीकडे काहीही अधिकार नसलेल्या जिल्हा पंचायतीचा सदस्य होण्यासाठी ही अहमिका का लागली असेल असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जाऊ  शकतो, त्याचे उत्तर साधे, सोपे, सरळ आहे. आमदारकीची वाट जिल्हा पंचायत सदस्यत्वातून जाते. सध्या आमदार असलेले आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, चंद्रकांत कवळेकर, जयेश साळगावकर आदी पूर्वी जिल्हा पंचायत सदस्य होते. विधानसभा मतदारसंघाचा आकार आणि विधानसभा मतदारसंघाची रचना मिळती जुळती असल्याने जिल्हा पंचायत सदस्य झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय मशागत करणे सोपे जाते असा हिशेब यामागे असतो. त्याचमुळे जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर फारसे अधिकार मिळणार नाहीत हे ठाऊक असतानाही मोठ्या अहमिकेने ही निवडणूक लढवली जाते.
राज्याने त्रिस्तरीय लोकशाही स्वीकारल्यानंतर जे बदल प्रशासकीय पातळीवर होणे आवश्यक होते ते झाले नाहीत. ग्रामपंचायती वा जिल्हा पंचायती यांना पुरेसे अधिकार देण्याकडे कोणत्याही सरकारचा कल नव्हता नाही. सत्ता केवळ राज्य सरकारच्या हाती एकवटावी असा स्वार्थी राजकीय हेतू ठरवून राज्यशकट हाकण्यात येतो हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. सरकारने जिल्हा पंचायती वा ग्रामपंचायती यांच्याशी स्पर्धा नव्हे तर सहयोगाचे तत्व स्वीकारावे लागेल. ज्या व्यवस्थेत मनुष्य परस्पराचा विचार करेल. स्वार्थ आणि परमार्थ साधेल. निसर्गाची रचनाच सहयोगावर अवलंबून आहे. मनुष्य, पशु, पक्षी, किडे, पतंग, वनस्पती सर्वच परस्पराच्या सहकार्याने जगतात. तुकाराम महाराजांनी वक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षीही सुस्वरे आळविती. उगीच असे म्हटले नाही. हा सहकाराचा सिद्धांतच जीवनात लागू करावा लागेल. राज्यातील सहकारी क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे लोकमानस सहकार शब्दाला प्रतिकूल बनले आहे. तो भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा महिमा आहे. विकेंद्रीत अर्थव्यवस्थेची रचना करून त्याला तोंड देता येईल.मुठभर पुढाऱ्यांच्या हाती सत्ता देण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकाला दैनंदिन कारभारात सहभागी करून भ्रष्टाचारावर तोडगा काढता येईल.
जन्माला आलेले मूल आईच्या वात्सल्यामुळे विकसित होत असते. प्रत्येक मनुष्य प्रथम कुटुंबात विकसित होतो. त्याच्या शरीर बुद्धी मनाचा विकास समाजाच्या सहयोगामुळे होतो. हीच परिवार भावना, कौटुंबिक भावना समाजात लागू करावी लागेल. गावात ग्रामसभेच्या स्वाधीन गावचा कारभार देण्यामागे हाच तर्क आहे. अनेकांना आज अव्यवहार्य वाटणारा हा सहयोगाचा कार्यक्रमच समाजातील दयनीय अवस्था मूळातून बदलण्यास कारणीभूत ठरेल. राज्य सरकारपुढे त्याशिवाय दुसरा मार्ग सध्या नाही. सर्वोदयातच राज्याचे कल्याण लपले आहे. जॉन रास्कीन यांचे अन टू दी लास्ट हे पुस्तक वाचून १९०४ सालीच गांधीचे जीवन बदलले होते. त्यांनी वकीली सोडून फिनिक्स आश्रमाची स्थापना दक्षिण आफ्रीकेत केली होती. अन टू दी लास्ट या पुस्तकाच्या विचार मंथनातूनच सर्वोदय शब्दाचा जन्म झाला. आज मूळ गोमंतकीय गोव्यात नंतर स्थायिक झालेले असा भेद केला जावा हाही जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. राज्य घटनेने दिलेल्या नागरी स्वातंत्र्याचा संकोच अशा मागण्यांतून होणार आहे हेही कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. अशा वेळी महात्मा गांधी यांनी मांडलेला स्वराज्याचा विचारच गोव्याला तारू शकणार आहे. पाश्चिमात्य विचार वा आचार यांचे अंधाधुकरण गोव्यात केले गेले तर मूळ गोवा कुठे हरवेल हे सांगता येणारे नाही.
गांधीजींच्या दृष्टीने स्वशासन-आत्मशासन म्हणजेच स्वराज्य, जे सर्व मानवामात्रासाठी आवश्यक आहे. वाढत्या भौतिकवादी सुख सुविधा मानवाचे कल्याण करु शकणार नाहीत. उच्च आध्यात्मिक पुरुषार्थाची जोड द्यावी लागेल. गळाकापू स्पर्धेऐवजी सहयोग हे जीवनाचे सूत्र बनले पाहिजे. सहयोगाचा आरंभ शेजाऱ्यांपासून केला पाहिजे. यालाच ते स्वदेशी म्हणतात. पैसा परमेश्वर नाही. नीति, धर्म, ईश्वरनिष्ठा याला जीवनात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले पाहिजे. शहरीकरणाने मानवाचे कल्याणह होऊ शकत नाही. संपत्तीच्या लोभापायी यंत्राच्या मागे धावू नका असे ते म्हणत असत. मुक्तीनंतरच्या गोव्यात मागे वळून पाहिल्यावर काय दिसते याचे सिहावलोकन केल्यास भौतिक सुख मिळवण्याच्या नादात  समाजाने श्रमप्रतिष्ठा गमावली. त्यातून निर्माण झालेल्या रोजगारसंधी इतर राज्यातून आलेल्यांनी घेतल्या आणि आज द्वेष भावनेची किनार गोमंतकीय समाजमनाला चिकटू लागली आहे. मुक्तीनंतर स्वराज्य निर्माण करता आले नाही हे खेदाने का होईना मान्य करावेच लागेल.
यातून मार्ग नाहा का असा प्रश्न आता पडू शकतो पण समाजमनाला आता घुमजाव करावे लागेल. स्पर्धेचे तत्व मानवाला कड्याच्या काठावर घेऊन आले आहे. कडेलोटीपासून बचाव करायचा झाल्यास सहयोगाच्या तत्वाची कास धरण्यासाठी घुमजाव करावे लागेल. मार्ग बदलावा लागेल.चार पावले मागे यावे लागेल. नवीन रस्ता पकडून सहयोगाचा मार्ग अवलंबावा लागेल. स्वदेशीचा कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी लागेल. स्वदेशी म्हणजे शेजाऱ्याची सेवा. शेजाऱ्यांनी जे उत्पादन केले असेल त्याचा वापर करणे प्रत्येकाने कर्तव्य मानले पाहिजे. गावच्या गरजा गावातच भागल्या पाहिजे. यातून गावात उत्पादन वाढत जाणार आहे. श्रमसंस्कृती नव्याने रुजणार आहे. समाजात प्रत्येकाला सन्मान्य रोजगार देण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

यासाठी शहरीकरणावरही मर्यादा घातली पाहिजे. सध्याचे शहरीकरण सर्वनाशाकडे धावत आहे. शहरीकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. शहरीकरण म्हणजे कॉक्रीटीकरण, पर्यावरण असंतुलनाचा विक्रम, अनियोजित वस्त्या. शहरीकरणातून असंतोष, पर्यावरण असंतुलन, जमीन पाणी जंगल यासारख्या संपत्तीचा नाश. याला सर्वाला गावांचा विकास करून उत्तर देता येईल. स्वायत्त, स्वावलंबी समाताधिष्ठीत गाव याचा सत्याग्रह झाला पाहिजे. राज्यासमोर समाजदुहीचे हे संकट आज उभे ठाकत आहे त्याला हेच उत्तर सध्याच्या घडीला दिसते. यावर चर्चा, वादविवाद चालत राहतील. त्याचबरोबर नव गोवा निर्मितीच्या दिशेने पावले पडत गेली पाहिजेत. प्रत्येकाला तो आहे तेथून सुरवात करता येईल. थांबण्यास वेळ नाही, थांबला तो संपला म्हणायची पाळी येऊ नये.