Thursday, June 27, 2013

फणसाख्यान

गोवा विद्यापीठातील डॉ. नंदकुमार कामत यांनी एक ईमेल पाठविले. त्यात केरळमध्ये झालेल्या फणस महोत्सवाची निमंत्रण पत्रिका होती आणि त्या महोत्सवाची एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीची लिंक होती. त्यामुळे फणसापासून किती प्रकारचे पदार्थ केले जाऊ शकतात याची कल्पना आली. आंबा, काजूची व्यावसायिक लागवड केली जाते मात्र फणसाची तशी लागवड केली जात नाही. फणसाचे झाड वर्षानुवर्षे पीक देऊ शकते. नैसर्गिकरीत्या उगवलेल्या झाडापासूनच उत्पन्न घेतले जाते.
गोव्याबरोबरच फिलिपिन्स, श्रीलंका, मलेशिया येथे फणस मोठ्या प्रमाणात आढळतात.
फणसाचे कापा आणि बरका असे दोन प्रकार आहेत. यातील कापा फणस अधिक लोकप्रिय आहे. याचे गरे पिवळे धम्मक व घट्ट असतात. याची चव अप्रतिम असते. शिवाय तो अधिक काळापर्यंत टिकतो. साधारण पक्व झाल्यानंतर तीन ते चार दिवसापर्यंत हा फणस खाण्यायोग्य असतो. बरक्‍या फणसाचे गरे मऊ असतात. या गऱ्यांनाही चांगली चव असते. मात्र हा फणस पक्व झाल्यानंतर जास्त काळ टिकत नाही. या फणसाच्या गऱ्यांचा वापर सर्रास प्रक्रिया उद्योगासाठी केला जातो. फणस साधारण फेब्रुवारीपासून लागायला सुरवात होतात. मार्चच्या मध्यापासून फणसाचे खऱ्या अर्थाने उत्पन्न मिळायला सुरवात होते. अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा हंगाम चालतो. फणसाच्या झाडापासून साधारण आठ ते दहा वर्षापासून उत्पन्न मिळायला सुरू होते. फणस कापा असणार, की बरका हे तो लागेपर्यंत सांगणे कठीण असते. या झाडाला खूप पाण्याची आवश्‍यकता नसते. याचा वृक्षही मोठा डेरेदार आणि दाट सावली देणारा असतो. फणसाच्या झाडाचे आयुष्यही 80 ते 100 वर्षापर्यंत असू शकते. त्यापेक्षाही जास्त काळ झालेले वृक्ष गोव्यात अनेक ठिकाणी आहेत. झाड जितके जुने तितके त्याचे इमारती लाकूड अधिक किमती असते. याच्या लाकडाला जास्त किंमत असल्याने गेल्या काही वर्षात फणसाच्या झाडांची तोड वाढली आहे.
काजू, आंबा, कोकम यांची तुलना करता फणसाचा प्रक्रिया उद्योगात तितकासा उपयोग होताना दिसत नाही. फणसाचे गरे खाण्याबरोबरच कच्च्या फणसाच्या गऱ्यांपासून बनविलेली भाजी लग्नाच्या हंगामात जास्त लोकप्रिय असते. फणसाच्या हंगामात ग्रामीण भागात सर्रास पेज आणि फणसाची भाजी असा आहार अगदी रोज घेतला जातो. फणसाची भाजी अतिशय रुचकर आणि आरोग्यदायक असते.
या बरोबरच बरक्‍या फणसापासून फणसपोळी, फणसाचे साठे असे पदार्थ बनविले जातात. अलीकडे फणसाचे चिप्ससुध्दा बनविले जातात. कच्चे गरे सुकवून त्याची भाजीही करता येते. अतिशय रुचकर फळ असूनही गोव्यात तरी ते दुर्लक्षित राहिले आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण प्रॉलिफीक ही फणसाची नवी जात विकसित केली आहे. हा अतिशय रुचकर आणि कापा फणस आहे.