Saturday, October 1, 2011

जिथे सागरा सरिता मिळते..!

पणजी हे गोवा सरकारच्या मालकीचे बंदर. मांडवी नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर उभ्या राहणाऱ्या बोटीत खनिज माल चढविण्याची दृश्‍ये कित्येकदा पणजीतूनही दिसतात. या बंदराला मुरगाव पोर्ट ट्रस्टने हरकत घेतली आहे. पणजी बंदराला धक्का नाही, येथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा नाही. सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना नाही असे म्हणूनएमपीटीने पणजी बंदरालाच आक्षेप घेतला आहे. हे बंदर फक्त कागदावरच अस्तित्वात आहे असेही एमपीटीचे म्हणणे आहे. या नदीच्या मुखाशी जाण्याची संधी भारतीय नौदलाच्या सौजन्याने मला मिळाली होती.
छोट्या नौकेला मीटर अर्धा मीटर वरखाली फेकणाऱ्या लाटा, जवळून जाणाऱ्या मोठाल्या बार्ज, दूरवर दिसणारे राजभवन आणि ठिपक्‍यागत दिसणारे पणजी शहर हे वर्णन आहे मांडवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगम स्थळाचे. दोनापावलच्या राजभवनाला पाण्यात समांतर असे हे ठिकाण आहे. नदीचे मुखही असेही नाव या भागाला आहे. मुंबई ते कोची जलमार्गावरील नौदलाच्या नौकानयन मोहीम पाहण्याच्या निमित्ताने या भागाला मी भेट दिली होती. दुपारी कडक उन्हात नौदलाच्या आयएनएस मांडवी या अकादमीच्या छोट्या नौकेतून वेरे बेती येथील बोट क्‍लबकडून निघताना नदीचे वरवर शांत वाटणारे पात्र एवढे खोड्या काढणारे असेल याची सुतराम कल्पना आली नाही. नौका निघाली तर नदीच्या पलीकडील काठावर पूर्वी नदी परिवहन खात्याचे कार्यालय होते तो परिसर ठळकपणे दिसत होता. हळूहळू नौकेच्या चालकाने वेग वाढविला आणि लाटा व नौका यांचा पाठशिवणीचा खेळच जणू सुरू झाला. लाटांच्या हेलकाव्याने खालीवर होणारी नौका क्षणातच लाटांवर स्वार होत पुढे जात होती. हळूहळू पणजी शहर मागे पडत गेले नि पर्यटकांनी सदा गजबजलेल्या मिरामारचा किनारा नजरेच्या टप्प्यात आला. आपणाला कोणी पाहत नाही अशा स्थितीत मिरामार परिसरात गप्पागोष्टींसाठी बसलेले पाण्यातून कसे दिसतात याचेही दर्शन घडले. दुसऱ्या बाजूला वेरे बेती आणि त्यापुढील नेरुलच्या परिसरात किनारी भागात लोकांच्या चाललेल्या हालचाली दिसत होत्या.नौका पुढे पुढे सरकत गेली आणि दोनापावलच्या राजभवनाच्या इमारतीचे दर्शन घडले. त्याचे लाल छप्पर ठळकपणे नजरेत भरत होते. दुसऱ्या बाजूला आयएनएस मांडवी या नौदल अकादमीतील इमारतीही दिसू लागल्या होत्या. दीक्षांत संचलनासाठी उपस्थित राहण्यासाठी गेल्या दशकभरात अनेकदा अकादमीत जाण्याचा योग आला होता. तेथून परतताना मांडवीतून जा ये करणाऱ्या नौकांचे दर्शनही घडत होते. आता मात्र नदीतून अकादमी कशी दिसते हे पाहण्याची संधी मिळाली. त्याचेही लाल छप्पर राजभवनाच्या छप्पराची आठवण करून देणारे. मांडवी नदी अरबी समुद्रास मिळते ते ठिकाण म्हणजे नदी की सागर याचा थांग लागणे कठीण. त्याच स्थितीत हेलकावे खात नौकेतून चारही दिशेला नजर टाकल्यावर दोन्ही बाजूला दूरवर ठिपक्‍यागत मानवी वस्ती दिसत होती. किनाऱ्यालगत काय हालचाली सुरू आहेत हे स्पष्टपणे दिसत नव्हते. पणजीतील उंच इमारती मात्र दिसत होत्या. मिरामार आणि दोनापावल भागात गेल्या पाच वर्षात उभ्या राहिलेल्या इमारतीही दिसत होत्या. दूरवर अंधूकपणे मुरगाव बंदर दिसत होते. बंदरात नांगरलेल्या नौकांचे आकार तेवढे दिसत होते. बित्रा या युद्धनौकेभोवती आमच्या नौकेचे प्रदक्षिणा घालणे सुरू ठेवले होते. नौका एका जागी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ती लाटांमुळे वरखाली होत होती, वाऱ्यामुळे उडणारे तुषार खाऱ्या पाण्याचे अस्तित्व नको तितके दाखवून देत होते. त्यातच सूर्याच्या तिरप्या किरणांमध्ये इंद्रधनुष्य दिसत असल्याचा शोध कुणीतरी लावला आणि काही वेळ इंद्रधनुष्य शोधण्यात गेला. नौका वर्तुळाकार फिरती ठेवल्याने चारही दिशांचा परिसर डोळ्यासमोर येऊन जात होता. अखेर नौदलाच्या मोहिमेस सुरवात झाली नि परतीचा प्रवास सुरू झाला. काहीवेळातच ठिपक्‍यागत दिसणारी पणजी डोळ्यासमोर मोठी होत गेली आणि वेरे बेतीच्या बोट क्‍लबवर केव्हा नौका नांगरली गेली हेच कळले नाही.