Tuesday, March 19, 2019

गोव्यातील राजकारणाचा रात्रीस खेळ चाले

मनोहर पर्रीकर यांचे मुख्यमंत्रीपदी असताना निधन झाल्याने रिक्‍त मुख्यमंत्रीपदावर डॉ. प्रमोद सावंत यांची निवड करून उर्वरीत मंत्रिमंडळ आहे तसेच ठेवले गेले आहे. वरवर पाहता मंत्रिमंडळाचा केवळ नेता बदलला असे दिसत असले तरी हे सारे करण्यासाठी भाजपच्या धुरीणांना चक्क 30 तासांची राजकीय कसरत करावी लागली आहे.
पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याचे शनिवारी पहाटेच सगळ्यांच्या लक्षात आले होते. सोमवारपर्यंत ते आजाराशी लढू शकणार नाहीत असे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते. सोमवारी अप्रिय वार्ता समजेल त्याची मनाची तयारी स्थानिक भाजप नेत्यांनी केली होती. शनिवारी पहाटे त्यांचे ठोके पूर्ण मंदावले होते. प्राणवायूचा पुरवठा पर्रीकर यांच्या कुडीला करत त्यांचे प्राण वाचवण्याची शर्थ डॉक्‍टर करत होते. त्यांचा देह उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळल्याचे निकटवर्तीयांच्या लक्षात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तातडीने ही माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी रविवारी रात्री ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली आणि जगाला पर्रीकर हे आता या जगात राहिले नसल्याचे समजले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती रात्री 9.20 वाजता देण्यात आली.
त्यानंतर राजकीय हालचाली खऱ्या अर्थाने सुरु झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2017 मध्ये गोव्यातील सरकार आकाराला आणले होते. पर्रीकर यांचे निधन झाले तेव्हा गडकरी दिल्लीतील भाजप मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत होते. तेथेच त्यांना गोव्यातील संभाव्य राजकीय पेचाविषयी माहिती देण्यात आली. त्यांनी आणि भाजपचे केंद्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी खास विमानाने गोव्याला जावे असे ठरवण्यात आले. त्यामुळे पूर्वनियोजित नागपूर दौरा रद्द करून उत्तररात्री 2 वाजता गडकरी गोव्याच्या विमानतळावर उतरले आणि राजकीय नाट्याचा पहिला अंक सुरु झाला.
गडकरी आले तेव्हा भाजपच्या आमदारांची बैठक पणजीतील हॉटेल मांडवीत सुरु होती. गडकरी आले ते तडक दोनापावल येथील सिदाद द गोवा हॉटेलमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे नेते व आमदारही तेथे पोचले व नंतरचे 30 तास तेच हॉटेल राजकीय हालचालींचे केंद्रबिंदू ठरले. गडकरीनी सुरवातीला भाजपच्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. दिल्लीतून निघताना संतोष हे मागे राहिल्याने त्यांना नंतर यावे लागले ते या चर्चेत तासभर उशिराने सहभागी झाले. त्यानंतर मगोच्या तिन्ही आमदारांना गडकरी यांनी काही प्रश्‍न विचारले. गोवा फॉरवर्डचे तीन व दोन अपक्ष आमदार एकत्र आले. अपक्ष आमदार प्रसाद गावकर हे बैठकीच्या ठिकाणी फिरकले नव्हते. अखेर शोधशोध करून माजी मंत्री आतनासिओ मोन्सेरात त्यांना कुठेतरी जाऊन घेऊन आले. त्याआधी गावकर कोल्हापूरला गेल्याचे सांगण्यात आले होते. या बैठक सत्रानंतर भाजपने डॉ. प्रमोद सावंत, विश्‍वजित राणे, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचा विचार मुख्यमंत्रीपदासाठी चालवल्याचे समजले मात्र यापैकी कोणत्याही नावावर मतैक्‍य न झाल्याने पहाटे 5 वाजता ही चर्चा थांबवण्याचे गडकरी यांनी ठरवले.
पर्रीकर यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाची तयारी एका बाजूला सुरु असतानाच दुसरीकडे पुन्हा राजकीय बैठकांचे सत्र सोमवारी सुरु होते. दुपारी डॉ. प्रमोद यांचे नाव भाजपने विधीमंडळ नेता म्हणून समोर आल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्या नावाला घटक पक्ष व अपक्षांची संमती नव्हती. मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांना ज्येष्ठतेप्रमाणे मुख्यमंत्रीपद हवे होते तर ढवळीकर यांना मुख्यमंत्रीपद देण्यास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा आक्षेप होता. त्यांना उपमुख्यमंत्रीपद हवे होते. अपक्षांपैकी प्रसाद पावसकर यांना कोणत्या तरी चांगल्या महामंडळाचे अध्यक्षपद आणि मगोचे दीपक पाऊसकर यांना मंत्रिपद हवे होते. त्यामुळे तीन महामंडळांची अध्यक्षपदे आणि तीन मंत्रीपदे मगोने मागितली होती. पर्रीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापुरती दुपारी चार ते सायंकाळी सहा असे दोन तास ही राजकीय चर्चा थांबली असली तरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत ती पून्हा तीन तास चालली. त्यावेळी शहा यांनी कठोर भूमिका घेतली. घटक पक्षांना सरकार चालवायचे आहे की नाही असे त्यांनी सरळ विचारले. भाजपची निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आहे असे त्यांनी तोंडावर ऐकवले. भाजपच्या या आक्रमक रुपापुढे घटक पक्ष व अपक्षांची थोडी पिछेहाट झाली अखेर मगो व गोवा फॉरवर्डला एकेक उपमुख्यमंत्रीपद देण्यावर मतैक्‍य झाले. मात्र तोवर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणारे ढवळीकर हॉटेलमधून निघून गेले होते.
ढवळीकर यांची शोधाशोध करेपर्यंत रात्रीचे साडेअकरा वाजले. त्यांनीही अखेर गडकरींच्या मैत्रीखातर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि सारेजण पावणेबारा वाजता राजभवनावर निघाले. डॉ. सावंत हे विधानसभेचे सभापती असल्याने त्यांचा राजीनामा आधी घेणे आवश्‍यक होते. उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे त्यानी तेथल्या तेथे राजीनामा सादर केला. लोबो यांनी तो मंजूर केल्याचे पत्रही राजभवनावरच तयार करून दिले. घटक पक्षांच्या पाठींब्याची पत्रे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी राज्यपालांना सादर केली आणि राज्यपालांनी पाऊण वाजता मुख्यमंत्री नियुक्तीचा आदेश जारी केला. मागील आणि आताच्या सरकारच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावलेले लोबो यांना मंत्रिपद अपेक्षित होते मात्र पूर्वीचेच मंत्री कायम राहणार हे लक्षात आल्यावर ते निघून गेले व जाता आपण सभापतीपद स्वीकारणार नाही असे मोठ्या आवाजात सांगण्यास ते विरसले नाहीत. हे सारे गडकरींच्या उपस्थितीत होत होते.अखेरीस पावणेदोन वाजता राजभवनाच्या छोटेखानी दरबार सभागृहात राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी डॉ. सावंत यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली आणि तीस तास चाललेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला.