Thursday, April 21, 2011

असा आहे आडिवरेचा परिसर

जैतापूर येथे झालेल्या गोळीबारामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे परिसर चर्चेत आला आहे. तो गाव आणि परिसर मी कित्येकदा हिंडलो आहे. राजापूरपासून विसेक किलोमीटरवरील आडिवरे येथील सदानंद पुंडपाळ यांच्याशी माझा विशेष स्नेह. रत्नागिरीहून मोटारसायकलने सावंतवाडी येथे जाताना मी मुद्दामहून आडिवरेमार्गे जात असे.पुंडपाळ यांच्यासोबत त्या परिसरात फिरताना सध्या भग्नावस्थेत असलेल्या पण एकेकाळी समृद्ध असलेल्या आडिवरेचे दृश्‍य डोळ्यासमोर तरळून जायचे. त्या परिसरात कातळ फोडून केलेली हापूस आंब्याची लागवड हे आणखीन एक वैशिष्ट्य. त्या आंब्याची चवच वेगळी. ती चाखण्यासाठीही मेमध्ये भर उन्हात घामाच्या धारा लागत असतानाही मोटारसायकलचे चाक आडिवरेकडे वळायचे. या आडिवरेजवळ नाटे आहे. तेथे असलेल्या यशवंत गडावरही आम्ही गेलो होतो. हा गड शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजारामाने बांधला, असे सांगितले जात असले, तरी तो शिवाजी महाराजांनीच बांधला आहे. त्याबाबतची माहिती आपण फार पूर्वी पत्की घराण्याच्या मोडी कागदपत्रांमध्ये वाचल्याचे गडाचे सध्याचे वारसदार विश्‍वनाथ रघुनाथ पत्की यांनी एकदा सांगितले होते. हा गड बांधत असताना शिवाजी महाराजांना इतरत्रही यश प्राप्ती झाली आणि म्हणूनच या गडाचे नाव यशवंतगड असे ठेवण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. स्वतःचे सुसज्ज आरमार उभारणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते. त्यामुळेच हा गड शिवाजी महाराजांनीच बांधला असावा या जाणकारांच्या मताला पुष्टी मिळते. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज इथे व्यापारासाठी आले आणि त्यांनी इथल्या राजकारणात ढवळाढवळ करण्यास सुरवात केली. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला असताना त्याला राजापूरच्या टोपीकरांनी तोफा पुरवल्या होत्या. त्याचा राजांना राग होताच. त्याची त्यांनी नंतर सव्याज फेड केली हा भाग वेगळा. राजापूर ही मोठी व्यापारी पेठ होती. राजापूर या ब्रॅंडखाली मोठी उलाढाल होत होती. त्यांचा सर्व माल गलबतातून जैतापूर खाडीतून येत-जात होता. या खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी बंदरानजीकच यशवंतगड असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते. पूर्णगडचा छोटेखानी किल्ला जिंकण्यासाठी महाराज यामार्गे गेल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. याच दरम्यान मार्च 1661 मध्ये त्यांनी कशेळीच्या कनकादित्य मंदिराला भेट दिल्याची नोंद उपलब्ध आहे. जैतापूर खाडीच्या मुखाशी, मुसाकाजी या जुन्या व सुरक्षित बंदराजवळ सात एकर जागेवर गडाची उभारणी करण्यात आली असून सभोवती उंच व सुमारे दहा फूट रुंदीची अभेद्य तटबंदी आहे. तटबंदीतच आठ बुरूज असून एक बुरूज समुद्रालगत आहे, तर हनुमान बुरूज सर्वांत भक्कम असून तिथून पश्‍चिमेला आंबोळगड व अरबी समुद्र, तर दक्षिणेला विजयदुर्ग व उत्तरेला पूर्णगडपर्यंतचा मुलूख दिसतो. त्यावर टेहळणी करण्यासाठी व संदेश वहनासाठीही त्याचा वापर करण्यात येत होता. तटबंदीला पायऱ्यांचा रस्ता आहे. तटबंदीच्या आत बालेकिल्ला असून त्याला तिन्ही बाजूंनी खंदक आहे. जवळच सुमारे 80 फूट खोल विहीर आहे. प्रवेशद्वारे कमानीच्या आकाराची असून संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडातील आहे. हा स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुनाच मानावा लागेल. याच गावचे सुपुत्र आणि सर्जन (कै.) डॉ. रघुनाथ सीताराम पत्की हे पहिल्या महायुद्धाच्या वेळी लष्करात डॉक्‍टर होते. युद्धातील कामगिरी आणि पंचम जॉर्ज यांच्यावर उपचार करण्यासाठी भारतातून पाठवलेल्या डॉक्‍टरांच्या पथकातही ते होते. हे विचारात घेऊन पंचम जॉर्जने 1921 मध्ये हा किल्ला आणि विजयदुर्ग, पूर्णगड, जैतापूर, प्रभानवल्ली आदी 17 ठिकाणी त्यांना इनामी जमिनी दिल्या. त्या वेळी भेट मिळालेली तलवार त्यांच्या प्रभानवल्ली येथील घरात आहे, असे त्यांचे दत्तक पुत्र विश्‍वनाथ पत्की यांनी सांगितले. आता बऱ्याच जमिनी कुळकायद्याने गेल्या. पण गडावर आजही सुमारे 100 आंब्याची कलमे आणि सागाची हजारो झाडे आहेत. काळ बदलला. विश्‍वनाथ पत्कीही नोकरीनिमित्त मुंबईला गेले. त्यांचा मुलगा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. विश्‍वनाथ पत्कींचे शालेय शिक्षण जैतापूर हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यांचे बालपण या किल्ल्यात गेले. त्यामुळे ते इथे वास्तूच्या ओढीने येतात. काही काळ राहतात आणि भूतकाळात हरवतात. आडिवरेला पूर्वीच्या काळी संपन्न बाजारपेठ होती. त्याचे पुरावेही जागोजागी विखुरलेले आढळतात. पूर्वी शेती हाच या भागाचा मुख्य व्यवसाय होता. सरकारने फलोत्पादनाला शंभर टक्के अनुदानाची योजना राबविली आणि कातळावर आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. त्या आंब्यालाही वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरी, देवगड हापूस मागोमाग आडिवरे हापूस प्रसिद्ध झाला तर आश्‍चर्य वाटायला नको.

No comments:

Post a Comment