Wednesday, May 16, 2018

पर्यावरण मास्तर सुजितकुमार डोंगरे

काहीजण आपल्या आयुष्याची वाटचाल आपणच ठरवतात. त्यांना मळलेल्या वाटेवरून चालायचे नसते. आपण वाट निर्माण करून त्यावर चालण्यात त्यांना मजा येत असते. ती वाट शोधताना भले कितीही कष्ट उपसावे लागले, तरी त्याची तमा त्यांना नसते. या जातकुळीत सुजितकुमार डोंगरे यांचा समावेश होतो.
पर्यावरण शिक्षण केंद्र या केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयासोबत काम करणाऱ्या संस्थेचे गोव्यातील अधिकारी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही. तशी ती राहू शकत नाही एवढे ते गोमंतकीय समाजजीवनाशी एकरूप झाले आहेत. कोणती वनस्पती कोणत्या भागात आहे इथपासून कोणता प्राणी कोणत्या भागात कधी दृष्टीस पडतो याची माहिती चटकन हवी असेल तर डोंगरे यांनाच विचारावे. पर्वरीतील आपल्या कार्यालयात ते काम करत असले तरी त्यांची नजर चौफेर असते. गोव्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या विविध घटनांचा मागोवा ते घेत असतात.
सरकारी सेवेत गेले असते तर ते एव्हाना वन संरक्षक झाले असते. सरकारी सेवेत वनाधिकारी म्हणून दाखल होण्याला आवश्‍यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त पात्रता असूनही त्यांनी ही वेगळी वाट मुद्दामहून चोखाळली आहे. सरकारी सेवेतील बंधनांपेक्षा मोकळ्या आकाशाखाली मोकळेपणे विहाराचे असणारे स्वातंत्र्य त्यावेळी त्यांना खुणावत होते व तसे ते आजही खुणावते. काहीजण लोकांत रमतात. लोकसंग्रह त्यांना भावतो, डोंगरे यांचे मात्र उलटे आहे. लोकांचा त्यांना तिटकारा नाही. मात्र, त्यांना एकांत आवडतो. त्यांना सातत्याने नवे काहीतरी शिकण्याचा ध्यास असतो. त्यामुळे त्यांना हा वेळ स्वतःसाठी हवा असतो.
पर्यावरणाची अधिसूचना कितीही क्‍लिष्ट भाषेत का जारी होईना, ती सोप्या शब्दांत समाजावून सांगण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. गोवा सरकारला तटस्थपणे एखाद्या विषयाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास करून अहवाल हवा असतो त्यावेळी सुजितकुमार यांच्या नावाला पर्याय नसतो. असे अनेक अहवाल आजवर त्यांनी तयार केले आहेत. अहवाल तयार करण्यासाठी लागणारा अभ्यास ते न कंटाळता करतात. त्यात स्थानिकांशी संवादाचा विषय असेल तर तेही ते करतात. उगाच एखाद्या विषयाचा बाऊ न करता हसत खेळत विषय हातावेगळा कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावे.
किनाऱ्यांची धारण क्षमता असेल वा कासवांचे संवर्धन असेल यावेळी सुजितकुमारच मार्गदर्शन करू शकतात. प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारी व्यक्ती असाही त्यांचा उल्लेख केल्यास तो चुकीचा ठरणार नाही.
प्रा. माधव गाडगीळ या ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासकांबद्दल सुजितकुमार यांच्या मनात देवतुल्य स्थान आहे. गाडगीळ गोव्यात आले की ते त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. निसर्ग वाचनाचे बारकावे त्यांच्याकडूनच त्यांनी घेतले असावेत. त्यांना पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधायला विशेष आवडते. युवा पिढीला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले, तर भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी कडक कायद्यांची आवश्‍यकता भासणार नाही असे त्यांचे गृहीतक या विचारामागे आहे. त्यामुळे शिबिरांत अनेकदा मार्गदर्शक म्हणून त्यांची हजेरी ही ठरून गेलेली असते.
त्यांचे शिक्षणही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या शिरसी या गावात झाले. वनीकरण या विषयात त्यांनी तेथील महाविद्यालयातून पदवी घेतली. पुढे वन संशोधन संस्थेतून त्याच विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. एवढे शिक्षण झाले की वन खात्यातील नोकरी सहज मिळते. केवळ एक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचीच गरज असते. मात्र, सुजितकुमार यांनी पर्यावरणाच्या संवर्धन, शिक्षणाकडे आपला मोर्चा वळवला. ते 1999 मध्ये पर्यावरण शिक्षण केंद्रात रुजू झाले. तेथून गोव्यात आले आणि तेव्हापासून गोव्याच्या पर्यावरणाशी एकरूप होऊन गेले आहेत.
कामाच्या निमित्ताने विदेशात अनेकदा गेले. स्वीडनमधील उप्पासाला विद्यापीठात 9 महिन्यांचे प्रगत प्रशिक्षण त्यांनी घेतले. त्यांच्या प्रशिक्षणाचा विषय होता नियमित पाठ्यक्रमात निरंतर विकासासाठी शिक्षण. शांघाय (चीन) येथील तोंग्जी विद्यापीठात निरंतर विकासासाठी उच्च शिक्षणातील शिक्षण या विषयावर प्रगत प्रशिक्षण त्यांनी घेतले. विदेशातील असे शिक्षण घेतल्यानंतरही त्यांच्या वागण्या बोलण्यात वावरण्यात विदेशात प्रशिक्षित हा बडेजाव कधीच जाणवला नाही. आजही ते पर्वरीतील कार्यालयात त्याच पद्धतीने काम करत असतात. कोणी गावात पर्यावरण संवादासाठी निमंत्रित केले, तर तेथे जाण्यासाठी ते कोणतेही आढेवेढे घेत नाहीत. आपण कोणीतरी आहे हा अहंभाव अद्याप तरी त्यांना शिवलेला नाही.
पर्यावरण शिक्षण आणि निरंतर विकासाचे शिक्षण, पर्यावरण सूचना सेवा, पर्यावरण रक्षणासाठी मनुष्यबळ विकास, जैव विविधतेची तपासणी त्याच्या नोंदी ठेवणे, धोरणात्मक निर्णयासाठी अभ्यास करणे आदी कामे न कंटाळता गेली अनेकवर्षे ते करत आहेत. वन खातेही आपण घेतलेल्या निर्णयांची वा आपल्या प्रकल्पांचा तटस्थ आढावा घेण्याचे काम त्यांच्याकडे सोपवते यावरून त्यांच्या विश्‍वासार्हतेची कल्पना येऊ शकते.
सध्या त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. देशातील 15 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळणार आहे. त्या किनाऱ्यांचा अभ्यास करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. विविध राज्य सरकारे, केंद्र सरकार, सल्लागार आणि विदेशातील संस्था यांच्यात समन्वय ठेवून हे काम करावे लागत आहे. यासाठी भ्रमंती तर खूपच आहे. मात्र, नेहमीप्रमाणे पर्यावरण संवर्धन हे जीवनध्येय असल्याने न कंटाळता सुजितकुमार हे काम करत आहेत. सारेकाही करून पडद्याआड राहण्याची कला त्यांना बऱ्यापैकी जमली आहे त्यातच त्यांच्या कामाचे यश सामावले आहे. 

लढवय्या नेता ट्रोजन डिमेलो

पक्ष कोणताही असो गेल्या 15 वर्षात जोरकसपणे बाजू मांडणारा एकच प्रवक्ता चटकन लक्षात येतो. ती व्यक्ती म्हणजे सध्याचे गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो. मुद्देसुद मांडणी करत आपले म्हणणे पटवून देण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. किंबहुना मुद्दा चुकीचा आहे, हे त्यांना ठाऊक असले, तरी ते एवढ्या सफाईदारपणे बोलतात, की कित्येकवेळा पत्रकारांनाही तो मुद्दा चुकीचा होता, हे पत्रकार परिषद संपल्यावरच लक्षात येते. कित्येक राजकीय पक्षांचे पाणी चाखलेली ही व्यक्ती आजवर विधानसभेत पोचू शकलेली नाही, हेही तेवढेच सत्य. त्यामुळे ते आपल्या वाणीची मतदारांवर भुरळ पाडण्यात अपयशी ठरले, असे म्हणता येते. निवडणूक हरले तरी त्यांनी आपले सामाजिक काम सुरूच ठेवले आहे. "लोकांचो आधार' नावाची बिगर सरकारी संस्था ते चालवतात. कोणत्याही राजकीय पक्षाचा आसरा नसतो, तेव्हा पत्रकार परिषदा संबोधित करण्यासाठी या संस्थेच्या बॅनरचा ते उपयोग करतात. या व्यतिरिक्त ती संस्था काय करते, हे अनेकांना ठाऊकच नाही.
लढवय्या नेता अशी ट्रोजन यांची कोणी ओळख करून दिली, तर ती वावगी ठरणार नाही. त्यासाठी ते अब्रू नुकसानीची कोट्यवधी रुपयांची मागणी करणारी नोटीस आली तरी ते मागे हटत नाहीत. घेतलेली भूमिका ते अखेरपर्यंत निभावतात. त्यासाठी भले सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांना लढा का द्यावा लागू नये. ट्रोजन यांच्याशी पंगा घेणे परवडणारे नसते, असे अनेकांना वाटते ते त्याचमुळे. ट्रोजन हे आपसूकपणे नेते झाले, असे अनेकांना आज वाटते. मात्र त्यांचा आजवरचा प्रवास हा प्रदीर्घ आणि अनेक वळणांनी भरलेला आहे. अनेक टप्पे त्यांच्या सार्वजनिक जीवनात आले. मात्र ते खचले नाहीत. त्यांनी आपला बाणा कायम ठेवला आहे. ख्रिस्ती समाजाचे असूनही देवनागरी ते उत्तमपणे वाचतात. बातमी वाचली, की काही मुद्दे खटकले तर पत्रकारांशी थेट संपर्क साधून बोलण्यासही ते मागे राहत नाहीत.
ट्रोजन यांचा खरा राजकीय प्रवास भाजपमधून झाला, हे आज कोणास सांगितले तर खरेही वाटणार नाही. म्हापशालगतच्या गिरी गावचे (तेव्हाचे गिरवडे) ट्रोजन साडेसात वर्षे सरपंच होते. त्याकाळी सरपंचांना मानधन नसे. त्यामुळे रोजगारासाठी बहारीनला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी सरपंचपद सोडले. विदेशात त्यांचा कार्यकर्ता स्वभाव तेथे स्वस्थ बसू देईना म्हणून ते परत आले. विदेशात जाण्यापूर्वी ते जनता पक्षात होते. तो पक्ष फुटला आणि जनसंघातून भारतीय जनता पक्ष निर्माण झाला. जी. वाय भांडारे यांच्या नेतृत्वाखाली ट्रोजन भाजपमध्ये आले. नुसतेच आले नाही, तर भारतीय जनता युवा मोर्चाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मोहन आमशेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीत ते प्रदेश सरचिटणीस झाले. पुढे भाजपचे राज्य संयुक्त चिटणीसही झाले. आज त्यांची भाजपविषयी कडवट भूमिका ज्याने अनुभवली असेल त्याला ट्रोजन हे भाजपचे पदाधिकारी होते, हे सांगूनही पटणार नाही. विदेशातून परत आल्यावर ते भाजपमध्ये आले तरी डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या संपर्कात ते आले.
डिसोझा यांनी स्थापन केलेल्या गोवा कॉंग्रेसमध्ये ते गेले. डिसोझांचे विश्‍वासू म्हणून ते गणले जाऊ लागले. सार्वजनिक जीवनातील 14 वर्षे ते डिसोझांसोबत राहिले. पहिली दोन वर्षे पक्षात तर उर्वरित 12 वर्षे ते डिसोझा यांचे स्वीय सहायक वा स्वीय सचिव या भूमिकेत वावरत राहिले. त्या 12 वर्षात डिसोझा हे एकर मुख्यमंत्रिपदी तरी असायचे किंवा उपमुख्यमंत्रीपदी. त्यामुळे ट्रोजन हे सातत्याने तपभर सत्तेच्या एकदम जवळ होते. त्यातूनच त्यांना आपणही राजकारणात यावे विधानसभेत यावे असे वाटू लागले होते.
नाही म्हणायला गोवा कॉंग्रेस डिसोझांनी कॉंग्रेसमध्ये विलीन केली तेव्हा ट्रोजन यांना कॉंग्रेसचे संयुक्‍त चिटणीसपद द्यावे असा प्रस्ताव डिसोझांनीच तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष एदुआर्द फालेरो यांच्याकडे ठेवला होता. मात्र पक्ष विलीन झाला तरी डिसोझा व फालेरो यांचे फारसे न पटल्याने ट्रोजन यांना काही ते पद मिळाले नाही. पुढे साळगावातून लढण्यासाठी पक्षाने एकदा उमेदवारी दिली तेवढीच. मात्र स्वतःची खुमखुमी भागविण्यासाठी ते दोन वेळा अपक्ष लढले. एकदा प्रचारासाठी काढलेल्या सिडीमुळे पोलिस कारवाईलाही त्यांना सामोरे जावे लागले तरी ते नमोहरम झाले नाहीत. आताही संधी मिळाल्यास ते विधानसभा निवडणूक लढतील. गोवा फरवर्डमध्ये येण्यापूर्वी त्यांनी परत कॉंग्रेस तेथून राष्ट्रवादी कॉंग्रेस असाही राजकीय प्रवास केलेला आहे.

जीवनवादी कार्यकर्ते "रमेश गावस'

रमेश गावस हे नाव उच्चारल्यावर साधे, सरळ, सदा हसतमुख असे व्यक्तिमत्त्व नजरेसमोर येते. गेली कित्येक वर्षे निसर्गाच्या रक्षणासाठी ही व्यक्ती एकहाती लढा देत आहे. शिक्षक म्हणून केवळ आपली भूमिका चार भिंतीच्या आड न ठेवता ते "समाज शिक्षक' कधी झाले हे त्यांनाही समजले नाही. साने गुरुजींच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेले गावस राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते. भारत जोडो अभियान असेल वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे शिबिर साऱ्यात गावस नेहमीच अग्रेसर असत. त्यासाठी गावागावात त्यांची भ्रमंती ठरून गेलेलीच असायची. ही व्यक्ती स्वतःसाठी कधी जगते असा प्रश्‍न पडावा असा त्यांचा व्याप त्यांनी वाढवून ठेवला आहे.
प्रसंगी वैयक्तिक सुख दुःखे बाजूला ठेवून समाजाच्या गरजेसाठी नेहमीच घराबाहेर पडणारा कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख आता रूढ झाली आहे. त्यांची मते कधी कधी टोकाची वाटू शकतात. मात्र, त्यामागे असलेली सत्याची झळाळी पाहिली तर त्यांचे म्हणणे पटल्याशिवाय राहू शकत नाही. "पर्यावरणवादी' असा त्यांचा उल्लेख नेहमीच केला जातो. मात्र ते स्वतःला "जीवनवादी कार्यकर्ता' म्हणवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ते जीवनाकडे नेहमीच आशावादी दृष्टिकोनातून पाहतात. पुरोगामी विचार मानतात. समाजात जे जे घडते ते टिपत जातात व चांगले ते समाजाला देण्याचा प्रयत्न करतात.
समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणी अतिशय कठोरपणे अंगिकारताना समाजातील विविध धार्मिक गटांचा कडवा विरोध धीरोदात्तपणे पचवत त्यांनी आपल्या समाजसेवी जीवनाची वाटचाल अतिशय अविचलपणे सुरू ठेवली आहे. बालपणात बेतकीसारख्या निसर्गरम्य परिसरात जीवन व्यतीत केलेल्या गावस यांना निसर्गाचा सहजपणे ध्यास लागला. मातेने पाठीवर दिलेला रपाटा जीवन घडवण्यासाठी व सार्थकी लावण्यासाठी उपयुक्त ठरला. तिच्या त्या वेळच्या शिक्षणासाठीच्या हट्टामुळेच आज ही वाटचाल करणे शक्‍य झाल्याचे ते मानतात. शालेय जीवनात निसर्गाची ओढ, भरपूर वाचन व त्याद्वारे एस. एस. जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यामुळे ते राष्ट्रसेवा दलाशी जवळ आले. दरम्यानच्या काळात त्यांनी सर्वण येथील गोविंद गुणाजी विद्यालयात शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. आपल्या वैचारिक प्रतिभेचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना देताना शिक्षणाबरोबरच समाजासाठी आदर्श ठरावेत अशी शेकडो माणसे त्यांनी घडवली. सर्वंकष जीवन जगण्यासाठी सकारात्मक आणि विधायक दृष्टी ही निसर्गानेच त्यांना दिली. समता आंदोलन, भारत जोडो, आंतरजातीय विवाह, प्रागतिक विवाह, सामाजिक सलोखा आदी विविध क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
दिसायला ते अत्यंत साधे वाटत असले तेवढेच मनाने ते खंबीर आहेत. मागे एकदा धबधबा डिचोली येथील सार्वजनिक रस्ता खाण कंपनीने कुंपण घालून बंद केला. एक पादचारी म्हणून आपल्या हक्काची पायमल्ली होत आहे, अशी भूमिका घेत त्यांनी सर्वांसह त्या रस्त्यावरून चालत जात तो रस्ता खुला करायला भाग पाडले होते. यावरून त्यांच्या मानसिक खंबीरपणाची साक्ष पटते.
अभ्यासू वृत्तीच्या गावस यांनी खाणकामाविषयी सर्व माहिती संकलित केली आहे. यावरून खाण कंपन्यांनी निसर्गाची कशी लूट चालविली आहे, याची माहितीच त्यांनी बेकायदा खाण कामाची चौकशी करण्यासाठी गोव्यात आलेल्या न्या. एम. बी. शहा आयोगासमोर सादर केली होती. त्यावेळी त्यांनी काही उपग्रह छायाचित्रेही सादर केली होती. यावरून त्यांच्या या विषयाच्या दांडग्या अभ्यासाची प्रचिती आली होती. त्यांनी मुद्देसूदपणे गोव्यात चालत असलेले खाणकाम हे बेकायदा आहे हे आयोगाला पटवून दिले होते. रमेश गावस एक झपाटलेले व तितकेच संघर्षमय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यासारख्या व्यक्ती आयुष्यभर संघर्षच करतात असे त्यांचे वर्णन केल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यांची समाजानेही दखल घेतली आहे. यु. एस. ए. कॅलिफोर्निया, राज्य शिक्षक पुरस्कार, गोमंतक विद्या निकेतन समाजसेवा पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार असे नानाविध पुरस्कार त्यांना आजवर मिळाले आहेत.
गावस म्हणजे एक चळवळ तसेच संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. आशावादी राहून सतत चळवळीच्या माध्यमातून समाजात जागृती करून माणुसकी हाच खरा धर्म मानून समाजाला दिशा देणारे ते एक कर्तव्यदक्ष समाज शिक्षक आहेत. अतिशय नम्र, शांत, संयमी, प्रसंगी आक्रमक अत्यंत साधेपणाची राहणी असणारे रमेश गावस यांचे आजपर्यंतचे कार्य थक्क करणारे आहे. मात्र याबाबत त्यांनी कधीच गवगवा केलेला नाही. हेच त्यांच्या प्रामाणिकपणाचे, सच्च्या सेवेचे गमक आहे. 

गोमंतकाचे सांस्कृतिक संचित - राजेंद्र केरकर

आपला मुद्दा ठामपणे मांडत असतानाच समोरच्या व्यक्तीच्या मनाला शब्दाने बोचकारे येणार नाहीत याची काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राजेंद्र केरकर. पर्यावरण व निसर्ग यांच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या माणसाची कथा जाणून घ्यायची असेल, तर केरकर यांच्या आयुष्य प्रवासाचा अभ्यास करायला हवा. विद्यापीठाची पीएचडी त्यांच्या आयुष्याच्या अभ्यासातून मिळू शकते एवढे समृद्ध आयुष्य ते जगत आले आहेत.
एखादी भूमिका घेतली की त्या भूमिकेशी कसे प्रामाणिक रहायचे हे त्यांच्याकडून शिकावे. अत्यंत साधी राहणी मात्र उच्च विचारसरणी याचे जिवंत उदाहरण म्हणजे केरकर. त्यांच्या रक्तातच लढाऊ वृत्ती आहे. त्या वृत्तीला योग्य दिशा त्यांनी अनुभवातून दिली आहे. कितीही दबाव आला तरी त्या दबावाला झुगारून द्यायचे कसे हे त्यांच्याकडून शिकावे. हे सारे करताना कुठेही समोरच्या माणसाचे मन दुखवायचे नाही हे जणू त्यांनी ठरवून टाकले आहे. सौम्य शब्दांतूनही धारदार भाषा कशी वापरावी ती केरकर यांनीच.
या साऱ्याचे बाळकडू त्यांना लहान वयातच मिळाले. त्यांचे पणजोबा पोर्तुगिजांविरुद्धच्या बंडात सहभागी झालेले तर वडील स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळे अन्यायाविरोधातील लढाऊ वृत्ती रक्तातच होती. मात्र, अन्याय कोणता हे केरकर यांनी अनुभवातून ठरवले. ते एकदम सामाजिक कार्यकर्ते झाले नाहीत. सुरवातीची त्यांची भूमिका ही जनजागृतीची होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लेखणी हाती धरली ती आजतागायत कायम आहे. निसर्ग आणि पर्यावरणावर त्यांनी भरभरून लिहिले. अनेक नवीन माहिती वाचकांसमोर ठेवली. हे सारे करत असतानाच ते निसर्ग ओरबाडणाऱ्या खाणकामाचे अंतरंग लेखणीच्या माध्यमातून समोर आणू लागले आणि केरकर यांचा खरा स्वभाव सर्वांना कळून आला. त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा असाच तो काळ होता. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणासाठी लढणारा एक पाईक त्यावेळी तयार होत होता. पुढे त्या विषयातून अनेक दबाव त्यांच्यावर आले, जीवघेणे हल्ले झाले तरी ते बधले नाहीत. जाब विचारण्यासाठी जमाव आला तरी ते धिरोदात्तपणे सामोरे गेले. एवढेच नव्हे, सौम्य शब्दांत आपले म्हणणे मांडत मुद्देही त्यांनी जमावाला पटवून दिले.
खाणकाम बंदीची टांगती तलवार सध्या राज्यावर आहे. संभाव्य बेरोजगारीचा मुद्दा सगळेचजण मांडत आहेत. मात्र, खाणकामातून शाश्‍वत रोजगार मिळणार नाही. एक दिवस खनिजमाती संपली की पुढे काय असा प्रश्‍न गेली दोन दशके केरकर विचारत आले आहेत. त्यांच्या लेखनाचा अभ्यास केला तर आज जी खाणकाम बंदी आली ती केव्हा तरी येणारच होती हे पटल्याशिवाय राहत नाही. निसर्ग टिकला तर माणूस टिकेल हे त्यांचे साधे सोपे तत्त्व लोकांना पटत होते, पण लोक पुन्हा खाण कंपन्यांनी दिलेल्या प्रलोभनांना भुलतही होते. आता केरकर यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरत आलेली आहे. खाण भागात पर्यायी रोजगार उभा न केल्याने बेरोजगारी टाळण्यासाठी खाणी सुरू ठेवा अशी मागणी करण्याची वेळ आली आहे. खाणींविरोधात केरकर किती ठाम भूमिका घेतात याचे दर्शन सालेली गावातील स्ट्रोन क्रशरविरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. ते क्रशर अखेरीस बंद झाले.
स्वामी विवेकानंद हे त्यांचे आदर्श. विसाव्या वर्षीच त्यांनी स्वामी विवेकानंद स्मृती संघ ही संस्था स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून समविचारी मित्रांसह गावागावांतून जनजागृतीचे कार्यक्रम केले. त्यातून अनेक आंदोलनांचा जन्म झाला. त्यामुळे ज्यांची रोजीरोटी जाते असे वाटले त्यांनी केरकर यांच्याविरोधात मोहीम राबवली. त्यांच्यावर हल्ले केले. त्यांना दमदाटीही केली. मात्र, या साऱ्याला केरकर पुरून उरले. एवढेच कशाला जुगारही बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि तो बंद करून दाखवलाही. त्यांना धमकीची पत्रेही अनेक आली, पण हा कर्मयोगी आपल्या ध्येयापासून ढळला नाही.
म्हादई अभयारण्य घोषित होण्यामागे केरकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. पट्टेरी वाघांचे रक्षण व्हावे यासाठी अभयारण्याच्या प्रस्तावाची पूर्वतयारी त्यांच्या केरीच्या घरातच झाली. त्यावेळी लोकनियुक्त सरकार नसल्याने राज्यपाल जे. एफ. आर. जेकब हेच प्रशासक होते. या सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरलला पटवण्याची जबाबदारी केरकर यांच्यावर सोपवण्यात आली. राज्यपालांनी पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाचा पुरावा मागितला. एक आठवड्याची मुदत मिळाली. पिसुर्लेच्या जंगलात एका वाघाची शिकार झाल्याचे राजेंद्र यांना कळले होते. त्यांचा दांडगा जनसंपर्क. विकली गेलेली नखे मिळवून त्यांनी राज्यपालांच्या हातात ठेवली. त्यानंतर आठवडाभरातच अभयारण्याची अधिसूचना निघाली.
केरी गावात वाघाची शिकार झाली. वाघ जाळून टाकण्यात आला. त्याविरोधातही केरकर यांनी आवाज उठवला. चौकशी सुरू झाली. हाडे, दात मिळाले. काहींना अटक झाली. गावातील वातावरण तापले. केरकर यांच्या घरावर बहिष्कार घालेपर्यंत वेळ आली. पण केरकर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यांनी हा दबाव हसत हसत पचवला.
इतिहास व समाजशास्त्र या दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले केरकर यांनी काहीवेळ मूळगाव येथील ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापनही केले. त्यांच्या चळवळ्या स्वभावामुळे त्यांची नोकरी घालवण्याचा प्रयत्नही काहींनी करून पाहिला. पण संस्थाचालक पांडुरंग राऊत त्यांच्यापाठी उभे राहिले. केरकर ही एक स्वयंभू संस्था आहे. डॉ. नंदकुमार कामत यांनी केरकर गोमंतकाचे सांस्कृतिक संचित या शब्दात गौरवले आहे, आणखीन काय हवे? 

खमक्‍या "प्रतिमा कुतिन्हो'

स्वस्त दरातील नारळ विक्रीमुळे सध्या महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो चर्चेत आल्या आहेत. महिला कॉंग्रेसला आजवर अनेक प्रदेशाध्यक्ष लाभल्या मात्र प्रतिमा यांनी आपल्या आक्रमक शैलीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॉंग्रेसच्या विविध संघटना चाचपडत असतानाच महिला कॉंग्रेस मारत असलेली मुसंडी ही केवळ प्रतिमा यांच्यामुळेच आहे हे कोणी नाकारू शकत नाही.
टॅक्‍सीवाल्यांनी मध्यंतरी आंदोलन केले. तेथे गेलेल्या भल्या भल्या नेत्यांची फिरकी आंदोलकांनी घेतली. मात्र तेथे पहिल्या प्रथम धाव घेऊन पाठिंबा देण्याचे धाडस प्रतिमा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. या आंदोलनामागे कॉंग्रेस ठामपणे उभी राहील, असे आश्‍वासनही कॉंग्रेसचे नेते तिथवर पोचेपर्यंत प्रतिमा यांनी देऊन टाकले होते. यावरून त्यांचा खमकेपणा दिसतो.
मडगावातील राजकारणातून राज्याच्या राजकारणात येत सक्रिय भूमिका बजावणे तसे सोपे नाही. विशेषतः कॉंग्रेससारख्या पक्षात जेथे ज्येष्ठ नवोदितांना संधी देऊ इच्छित नाहीत, तेथे प्रतिमा यांनी आपले स्थान निर्माण करणे हेच मुळी त्यांचे वेगळेपण सांगून जाते. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पाठिंबा लाभलेले झेवियर फियेलो यांचा पराभव करत प्रतिमा यांनी 2011 मध्ये अनेक वर्षांनी झालेली कॉंग्रेस युवक अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कोण या प्रतिमा अशी विचारणा त्यावेळी अनेकांनी केली होती.
चर्चिलकन्या वालंका आलेमाव हिला या निवडणुकीत अपात्र ठरवल्यामुळे प्रतिमा कुतिन्हो व झेवियर फियेलो यांच्यातच सरळ लढत होणार हे निश्‍चित होते. मात्र, प्रतिमा कुतिन्हो मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी समर्थन दिलेल्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या होत्या व त्यामुळे कामत यांच्याशी त्यांचे तसे सख्य नव्हते. प्रतिमा युवा अध्यक्ष होणे हा आपला नैतिक पराभव ठरणार असल्यामुळे कामत यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, प्रचारप्रमुख माविन गुदिन्हो व कन्येच्या निलंबनामुळे दुखावलेले चर्चिल आलेमाव यांना हाताशी धरून प्रतिमा यांच्या पाडावासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यासाठी कुंभारजुवे येथील युवा उमेदवार झेवियर फियेलो यांच्या मागे त्यांनी आपली सर्व शक्ती उभी केली. परंतु, राज्यातील युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वरील चौकडीचे मनसुबे धुळीला मिळवत युवक कॉंग्रेससाठी गेली बारा वर्षे काम केलेल्या मडगावच्या तत्कालीन नगरसेविका प्रतिमा यांना विजयी केले होते.
त्या विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेवेळी प्रतिमा म्हणाल्या होत्या, मला पराभूत करण्यासाठी अनेकांनी भरपूर प्रयत्न केले. पण कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी दबाव झुगारून आपले कार्य पाहून आपणास मते दिली. फातोर्ड्याचे विजय सरदेसाई, युवक अध्यक्ष संकल्प आमोणकर व पती सावियो कुतिन्हो यांच्या पाठिंब्यामुळेच आपण निवडून आले. विजय सरदेसाई यांनी भले त्यांना त्यावेळी मदत केली असेल मात्र नारळाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्यावर विजय यांच्यावर टीका करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. कृषिमंत्री काहीच करत नाहीत हे दाखवून देण्यासाठी त्यांनी स्वस्त दरात नारळ विक्री आंदोलन सुरू केले. उपाध्यक्ष बीना नाईक, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावित्री कवळेकर यांच्यासह त्यांनी ही मोहीम राज्यभर राबविली. माध्यमांनी या आंदोलनाची बऱ्यापैकी दखल घेतली. गृहआधार योजनेची मदत ही महागाईवर मात करण्यासाठी सरकार देत असलेली मदत हा सरकारचा युक्तिवाद या आंदोलनापुढे फिका पडला. त्याचवेळी कृषिमंत्र्यांनी स्वस्त दरात नारळ विक्रीची घोषणा केली. हीच संधी साधत आपले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करत प्रतिमा भाव खाऊन गेल्या.
कोणत्यावेळी काय भूमिका घ्यावी हे त्यांना अचूक समजते. भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल होबळे यांच्या सुनेने त्यांच्याविरोधात छळाची तक्रार करताच त्या तक्रारीचे राजकीय वजन लगेच प्रतिमा यांना कळाले. त्यांनी लगेच तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांची भेट घेऊन या प्रकरणी पारदर्शी तपासाची मागणी केली. प्रतिमा यांचा राजकीय प्रवास मडगावातून सुरू झाला आहे. तेथेही संस्मरणीय कामगिरी केली आहे. मडगावच्या उपनगराध्यक्ष असताना बाजार समितीच्या अध्यक्ष या नात्याने अतिक्रमण विरोधी त्यांनी राबविलेली मोहीमही अशीच चर्चेची ठरली होती. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
आताही डिचोलीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वस्त दरातील नारळ विक्री आंदोलन हे केवळ प्रसिद्धीसाठी होते असा आरोप केल्यावर गप्प राहतील त्या प्रतिमा कुठल्या. त्यांनी लगेच प्रत्युत्तर देताना विरोधात असताना मनोहर पर्रीकर करत असलेली आंदोलनेही ही प्रसिद्धीसाठीच होती का? असा बोचरा प्रश्‍न उपस्थित केला आहे. यावरून त्या राज्य राजकारणात किती मुरल्या आहेत हे दिसते.

भन्नाट "आयरीश रॉड्रिग्ज'

हा किस्सा आहे मुख्य नगर रचनाकार यांच्या दालनातील. एका व्यक्तीने मे महिन्यात एक भूखंड खरेदी केला होता. त्याने त्या भूखंडाच्या रूपांतरासाठी अर्ज केला होता. त्याला तालुका पातळीवरील नगररचनाकारांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी सप्टेंबरमध्ये सरकारने एक अधिसूचना जारी करून 225 चौरस मीटरखालील भूखंड हे अवैध भूखंड म्हणून जाहीर केले होते. त्या व्यक्तीचे म्हणणे होते की, मे मध्ये मी 200 चौरस मीटरचा भूखंड घेताना मला सरकार पुढे असा निर्णय घेणार याची कल्पना नव्हती. नंतर घेतलेला निर्णय माझ्या पूर्वी झालेल्या व्यवहाराला लागू करून भू रूपांतरापासून मला वंचित ठेवू नका. कारण, भूखंडाशेजारी विकत घ्यायची म्हटली तरी इंचभरही जमीन शिल्लक नाही.
योगायोगाने त्याची गाठ ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांच्याशी पडली. रॉड्रिग्ज यांनी एका परिच्छेदाचा एक अर्ज तिथल्या तिथे त्या व्यक्तीला लिहून दिला आणि त्या व्यक्तीने तो मुख्य नगररचनाकारांच्या पुढ्यात ठेवला. तो अर्ज पाहिल्यावर नाकारलेले भू-रूपांतर मंजूर झाले. ती व्यक्ती आयरीश यांचे आभार मानत परत गेली.
कायद्याचे खाचखळगे पुरेपूर कोणाला ठाऊक असतील तर आयरीश यांनाच. त्यांच्या कामाचा उरक दांडगा आहे. तसाच त्यांचा जनसंपर्क. रात्रीबेरात्री कधीही फोनवर उपलब्ध असणारा कार्यकर्ता असे त्यांचे वर्णन करता येऊ शकते. त्यांची व्यवस्थेशी टक्कर देण्याची जिद्द वाणाखण्याजोगी आहे. त्यामुळे अनेकजण दुखावलेही गेले आहेत. त्यामुळे आयरीश यांना शारीरिक हल्ल्यालाही सामोरे जावे लागले आहे. त्याची बोटे जायबंदी होऊन त्यांना किंमतही चुकवली आहे. एकाच व्यक्‍तीचे लष्कर ही उपाधी त्यांना चपखल ठरते. विषय कोणताही असो, तेथे सरकारविरोधात काही दिसले तरी त्या वादात आयरीश यांनी उडी घेतलीच म्हणून समजा. उगाच वाईटपणा कशाला म्हणून बरेचजण सार्वजनिक जीवनात वावरताना पंगा घेणे टाळतात. मात्र त्याच्या नेमके उलट आयरीश यांचे वागणे आहे. त्यांना वाद आवडतात. भल्या भल्यांशी पंगा घेणे आवडते. एक दिवस कधी कोणाशी वाद ओढवून घेतला नाही तर त्यांना जेवण गोड लागत नसावे की काय अशी शंका यावी एवढे ते वादाच्या आहारी गेले आहेत.
गेल्या काही वर्षात सोशल मिडीयाचा मोठा बोलबाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअप अशी नवीन माध्यमे समोर येत गेली आहेत. पूर्वी मुद्रित व दृकश्राव्य माध्यमावर जनतेपर्यंत पोचण्यासाठी अवलंबून रहाव्या लागणाऱ्या आयरीश यांच्यासाठी या माध्यमांचे आगमन हे वरदानच ठरले. सकाळी लोक गुड मॉर्निंगचे चांगले संदेश शोधून पाठविण्याच्या तयारीत असतानाच आयरीश यांचा भलामोठ संदेश येऊन आदळतो. त्याचे टंकलेखन कधी पहाटे केलेले असते त्यांनाच ठाऊक. त्यावेळी त्यांचा जो दिवस सुरू होतो तो कधी मावळतो हे कळतच नाही. मिळेल ती माहिती रात्री उशिरापर्यंत ते देतच राहतात.
माहिती हक्क कार्यकर्ता ही त्यांची आणखीन एक ओळख. आयरीश यांनी माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागितली ही त्यांना ती विनासायास आणि लगेच मिळते. आयरीश आपली आणखी कोणती गोष्ट बाहेर काढतील ही भीती अनेकांना वाटते. त्यामुळे आयरीश यांना शक्‍यतो दुखावू नये, अशी सोईस्कर भूमिका सरकारी कार्यालयात घेतली जाते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणालाही माहिती अधिकारात माहिती हवी असली तरी त्या अर्जाखाली आयरीश यांची स्वाक्षरी घेतली की झाले.
आयरीश अनेक गोष्टी प्रकाशात आणत असतात. त्या गोष्टींचा त्यांना पूर्वी शोध घ्यावा लागत असते. त्यासाठी मोठा पाठपुरावा करावा लागत असे. मात्र ते निर्भीडपणे विषय हाती घेतात याची खात्री लोकांना पटल्यापासून लोक आपसूकपणे त्यांना विषय पुरवतात. त्यांना पूरक कागदपत्रेही देतात. पूरक माहिती कुठे मिळेल तेही सांगतात. फक्त व्यक्तिगत विषय ते हाताळतात असे नव्हे. पोलिसांना दुपारी वेळच्या वेळी आणि उत्कृष्ट जेवण मिळणे हा त्यांचा अधिकार त्यांना मिळावा यासाठीही आयरीश यांनी प्रयत्न केले. ब्रिक्‍स परिषदेवेळी पोलिसांना दिलेल्या जेवणात काळेबेरे झाल्याच्या संशयावरून त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. स्व. सतीश सोनक बऱ्याचदा मानवाधिकार आयोगासमोर पीडितांचे खटले विनामोबदला लढायचे. सोनक यांच्या मृत्यूनंतर ते अर्धवट राहिलेले खटले विनामोबदला लढवून आयरीश यांनी आपले मूळ रूप दाखवून दिले होते. आयरीश यांचे जीवनातील अनेक पैलू आहेत, विद्यार्थी दशेपासून लढवय्या ही त्यांची ओळख आजतागायत कायम आहे. 

साहित्यविश्‍वातील अजातशत्रू कोमरपंत सर

एकाच अर्थाचे अनेक शब्द असू शकतात, हे समजण्यासाठी कधीतरी डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे भाषण ऐकायला हवे. शब्दांचे षटकार मारावे तर सरांनीच. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व हे अतुलनीय, कोणता शब्द कुठे व कसा वापरावा याचे उदाहरण हे त्यांच्या लेखनातून अनेकदा दिसून येते. लाघवी स्वभाव, मृदू आवाज आणि नम्रता ही कोमरपंत सरांची ओळख. अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व.
मराठी साहित्य हा तसा बोजड प्रांत. त्यातच समीक्षकांच्या फुटपट्टीने अनेकजण गारद होत असतानाच कोमरपंत सरांच्या रूपाने या प्रांतातही आनंद निर्माण करणारा अवलिया निर्माण होतो हेच मुळी विलक्षण. त्यांचा हा प्रवास व्यासंगाने समृद्ध झाला आहे. त्यांचा साहित्याचा व्यासंग अत्यंत मुलगामी आणि दांडगा आहे. कोमरपंत यांचे शब्दभांडार हे त्यांच्या प्रचंड वाचनाची प्रचिती देणारे आहे. व्यासंगी समीक्षेचा ठसा त्यांनी संपूर्ण मराठी साहित्य जगतात उमटवला आहे. महाराष्ट्रातील अनेक थोर साहित्यिकांशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ललित साहित्यापासून वैचारिक साहित्यापर्यंत कुठल्याही साहित्य प्रकारावर भाष्य करणारा, त्यांच्यासारखा समीक्षक विरळाच!
साहित्य संमेलन असो, वा चर्चासत्र किंवा साहित्यावरील परिसंवाद असो, अग्रक्रमाने पुढे नाव येते ते कोमरपंत सरांचेच. कोमरपंत सर हे व्यक्ती नसून चालती बोलती संस्थाच आहे. एवढेच नव्हे तर ते एक चालते बोलते ग्रथांलय आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. गोव्यातील अनेक वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांत अभ्यासू लेख लिहून त्यांनी दिलेले योगदान अपूर्व असेच आहे. अनेक साहित्यिकांना कोमरपंत सर हे हक्काचे मार्गदर्शक वाटतात.
साहित्यिक प्रांतातील त्यांची प्रतिभा ही अलौकिक अशा स्वरूपाचीच आहे. तरीही या प्रतिभेला अहंकाराचा लवलेशही कधी स्पर्श करू शकलेला नाही, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मौलिक असे वैशिष्ट्य आहे. गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. त्यांच्यात साहित्य निर्मितीचे अंकुर फुलविण्याचे काम कोमरपंत सरांनी केले. कुठल्याही थोर साहित्यिकाच्या साहित्यकृतीवर अधिकारवाणीने बोलण्याचा मान केवळ कोमरपंत सरांचाच असतो. तो त्यांनी आपल्या दीर्घ व्यासंगाने मिळवला आहे. त्यामागे त्यांची मोठी साहित्यिक तपश्‍चर्या आहे.
मराठी व संस्कृत विषयाचे त्यांनी शिक्षण घेतले आहे. या दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे. यानंतर ते अध्यापनाच्या क्षेत्रात आले. मडगावच्या न्यू इरा हायस्कूलमध्ये त्यांनी सुरवातीला वर्षभर विद्यादान केले. तेथून मग फोंड्याच्या ए. जे. डी. हायस्कूलमध्ये दोन वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यावर ते महाविद्यालयीन पातळीवर मराठी शिकविण्यासाठी मडगावच्या श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात दाखल झाले. तेथे 14 वर्षे त्यांनी मराठीची सेवा बजावली. अनेक विद्यार्थ्यांवर मराठीचे संस्कार केले. त्यानंतर राज्यातील सर्वोच्च अशा शैक्षणिक संस्थेत म्हणजे गोवा विद्यापीठात कोमरपंत सर आले. तेथे 18 वर्षे त्यांनी सेवा बजावली. त्यात 1990 ते 2005 पर्यंत ते मराठी विभाग प्रमुख होते.
त्यांचा साहित्यिक संचार हा थक्क करणारा आहे. त्याचमुळे गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली, राम शेवाळकर, मधू मंगेश कर्णिक, अ. का. प्रियोळकर, अनिल, सुभाष भेंडे यांच्यावरील ग्रंथांत त्यांचे लेखन समाविष्ट झाले आहे. असा मान क्वचितच दुसऱ्या गोमंतकीय साहित्यिकाला मिळाला असेल. त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा समाजासाठी व्हावा हे सदोदित पाहिले. याच हेतूने त्यांनी गोमंतक मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची आणि स्वागताध्यक्षांची भाषणे (संकलन व संपादन), गोमंतकीय मराठी साहित्याचा इतिहास खंड 2 (प्रा. एस. एस. नाडकर्णी यांच्यासमवेत संपादन), चैत्रपुनव ः बा. भ. बोरकर यांची जन्मशताब्दी गौरव ग्रंथ (डॉ. सचिन कांदोळकर आणि डॉ. प्रकाश पर्येकर यांच्यासमवेत संपादन) आदी ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आहे. अनेक वर्तमानपत्रांतून त्यांनी नियमितपणे सदर लेखन केले. गोमन्तकमध्ये त्यांनी अनुबंध हे सदर लिहिले होते. वसंत मासिक व अन्यत्रही त्यांनी स्फुट लेखन केले आहे.
समीक्षक म्हटला की लेखक कवीला झोडपतो. निरनिराळ्या फुटपट्टया लावून साहित्याची मापे काढतो असा सार्वत्रिक समज आहे. बव्हंशी तो खराही आहे. त्यामुळे समीक्षकाकडे बघण्याचा समाजाचा आणि विशेष करून साहित्यिकांचा दृष्टिकोनही तसाच बनला आहे. या साऱ्याला छेद दिला तो कोमरपंत सरांनी. त्यांनी आस्वादात्मक समीक्षा लिहिली. साहित्य अधिक सकस कसे करता येईल हे सुचवले. लिहिणाऱ्याला नाउमेद न करण्याकडे त्यांचा नेहमीच कल राहिला आहे. त्यामुळे कोमरपंत सर समीक्षक असले तरी साहित्यिकांना ते नेहमीच आपल्यातील आणि मार्गदर्शक वाटत आले आहेत.
विनम्र, निष्ठावान, नीतिमान, चारित्र्यवान अशा या साहित्यिक समीक्षकाचा आदर्श कुणीही घ्यावा. अशा प्रकारचेच हे व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या मृदू स्वभावामुळे त्यांचा सर्वांशी स्नेहभाव जुळला आहे. कोमरपंत सरांबद्दल कोणी वावगे काही बरळेल याची कल्पनाही करवत नाही. आज समाजात कुठल्याही क्षेत्रात ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे, अशी व्यक्तिमत्त्वे दुर्मिळ झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोमरपंत सरांचे अस्तित्व ठळकपणे जाणवल्याशिवाय राहत नाही.