Friday, January 2, 2015

गोव्याच्या पर्यटनाला आता रेल्वेची चाके

रेल्वेमंत्रिपदी सुरेश प्रभू आले आणि गोव्यासाठी खास पर्यटक रेल्वे धावू लागली आहे. ही एक सुरवात आहे, पल्ला अजून बराच दूर आहे.
राज शिष्टाचारमंत्री म्हणून पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे स्वागत करण्यासाठी दाबोळी विमानतळावर जातात. परतीच्या प्रवासात एखादी पर्यटक रेल्वे गोव्यासाठी सुरू झाली तर पर्यटनाला मोठा हातभार लागेल असे सांगतात आणि आठवडाभरातच अशी रेल्वे धावूही लागते. स्वप्नवत वाटावे अशी ही गोष्ट रेल्वेमंत्र्यांच्या धडाडीतून शक्‍य झाली आहे.
रेल्वेमंत्री प्रभू यांनी थिवी रेल्वे स्थानकाचा विस्तार हाती घेतला आहे. करमळी येथे लेक रिसॉर्टचे बांधकाम सुरू केले आहे. या साऱ्यामुळे पर्यटकांची पावले अधिक संख्येने वळण्यास मदत होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासाला रेल्वेची चाके आता लाभली आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. रेल्वेमंत्र्यांनी तर त्यापुढे जात कर्नाटक गोवा व महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे जोडणारी रेल्वे सुरू करण्याचा विचार चालविला आहे.
कोकण रेल्वे महामंडळ व राज्य सरकार यांचे नाते नवे नाही. कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी राज्य सरकारने त्यात आपले पैसे गुंतवले आहेत. त्याच्या लाभांशही दरवर्षी मिळत असतो. विधानसभेत सादर करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाचा वार्षिक अहवाल पाठविला जातो त्याच हक्कातून. मात्र पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी कोकण रेल्वेचा उपयोग किती झाला याचे खरे उत्तर मर्यादितच झाला असे म्हणावे लागेल. मुंबईहून कोणी पर्यटक येणार असेल तर त्याला गोव्याकडे येण्यासाठी कोकण रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे. अन्य ठिकाणाहून रेल्वे येतात व जातात. पाचेक मिनिटांसाठी मडगावला या गाड्या थांबतात. लांब पल्ल्यांच्या या रेल्वे गाड्यांत गोव्यासाठी मोजकी आसनेच उपलब्ध असतात. त्यामुळे पर्यटनवृद्धीसाठी या गाड्यांचा काडीचाही उपयोग नाही.
महाराष्ट्र सरकारने कोकणात पर्यटन क्षेत्र वाढीचे प्रयत्न चालविले आहेत. स्क्‍यूबा डायविंगपासून सारेकाही उपलब्ध केले आहे, हाऊसबोटी आणल्या आहेत. कर्नाटक सरकारही मागे नाही. त्यांनी दांडेलीत व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग सुरू केले आहे. धबधबे विकसित केले आहेत. जंगलातून मार्ग काढले आहेत. त्यामुळे शेजाऱ्यांचे या प्रयत्नांशी गोव्याने जुळवून घेतल्यास पर्यटक कोकणात येऊ शकतील. यासाठी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकचा समन्वय हवा.
महाराष्ट्राने पर्यटकांसाठी खास रेल्वे गाडी सुरू केली. त्याची मोठी जाहिरातबाजी केली. कर्नाटकानेही त्याच पावलावर पाऊल टाकून खास रेल्वे आणली आणि ती पर्यटकांच्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू बनविली. मध्यंतरी या दोन्ही गाड्या गोव्यात आणण्याचा प्रयत्न झाला होता मात्र नंतर तो ढेपाळला. त्यामुळे भौगोलिक सलगता आणि साम्यस्थळे असूनही पर्यटनदृष्ट्या एकसंधपणे विकास या भागाचा होऊ शकलेला नाही. आता रेल्वेमंत्री प्रभू यांच्या प्रयत्नाने या तिन्ही राज्यांना जोडणारी रेल्वे सुरू झाली की या दिशेने आणखी एक पाऊल पडणार आहे.
कोणतेही पर्यटनस्थळ म्हटले की तेथे जाण्यासाठी साधनांची वानवा नसावी अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा असते. दाबोळी विमानतळाची मर्यादा मान्य करून रस्ते आणि रेल्वेमार्गे म्हणावा तसा विकास या दिशेने झालेला नाही हे मान्य करावेच लागते. देशातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांपासून गोव्यात येण्यासाठी रेल्वे सुरू करण्याचा विचार आता सुरू झाला आहे. जयपूर मडगाव, कोलकता - थिवी, कन्याकुमारी - पेडणे, जम्मू मडगाव अशा गाड्यांचा विचार तरी कोणी कधी केला होता काय? याच नव्हे तर अशा नानाविध गाड्या रेल्वे सुरू करणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासात रेल्वे भागीदार होणार आहे.
देशाच्या कोणत्याही भागातून थेटपणे गोव्यात येण्यासाठी रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे. यातून देशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. द्वितीय श्रेणी शयनयानातून कुटुंबासह पर्यटनासाठी फिरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. आजवर अजमेर, जयपूर, आग्रा, द्वारका अशा पर्यटनातच अडकलेल्या या मध्यमवर्गीयांना गोव्याकडे वळविण्यासाठी रेल्वेची उपलब्धता हे मोठे आकर्षण ठरू शकते. रेल्वेमंत्री प्रभू यांनी थिवी येथील जाहीर कार्यक्रमात शक्‍य ते सारे करू अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यामुळे येत्या वर्ष दोन वर्षात महत्त्वाचे बदल यातून दिसतील अशी अपेक्षा बाळगता येते.
रेल्वे म्हणजे केवळ कोकण रेल्वे नव्हे. दक्षिण पश्‍चिम रेल्वेच्या नकाशावरही गोवा आहे. लोंढ्याहून पूर्वी येण्यासाठी मीटरगेज मार्ग होता. आता तो ब्रॉडगेज करण्यात आला. देशाला गोव्याला जोडणारा असा हा रेल्वेमार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरही अनेक गाड्या सुरू कराव्या लागतील. एकतर वालांकणी आणि तिरुपती येथे जाण्यासाठी थेट रेल्वे हवी. त्याचा विचार रेल्वेला करावाच लागणार आहे. वास्को ते मिरज अशी पॅसेंजर सेवा दैनंदिन तत्त्वावर चालवता येऊ शकते. त्याशिवाय वास्को विजापूर, सोलापूर मार्गावरही रेल्वे सुरू करता येईल. वास्को यशवंतपूर ही आठवड्यातून दोन वेळा धावणारी रेल्वे दररोज चालविल्यास गोव्याचा बंगळूरशी असलेला संपर्क अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. विजयवाडा ते हुबळी अमरावती एक्‍स्प्रेस वास्कोपर्यंतही आणता येईल. या साऱ्याचा विचार रेल्वेच्या येत्या अर्थसंकल्पात झाला तर गोव्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी ते दुसरे पाऊल असेल. रेल्वेमंत्र्यांनी ग्वाही दिल्याने दक्षिण पश्‍चिम रेल्वेमार्गावरही विकासाचा सूर्य गोव्यासाठी लवकरच उगवेल, अशी आशा करण्यास हरकत नाही.
पर्यटनाला चालना देण्यासाठी जगभरात हवे ते प्रयत्न केले तरी आपल्या देशातील विविध राज्यातील लोकांनाही बरेच आकर्षण आहे. मात्र गोव्यात येण्यास थेट रेल्वे नसल्याने अनेकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. उदाहरण द्यायचेच झाल्यास गोव्यातून नागपूरला जाण्यासाठी दोन दिवसाचा रेल्वे प्रवास सध्या आहे. हवाईमार्गे प्रवास करायचा ठरवला तरी एक दिवस जातो. त्यामुळे सोलापूर यवतमाळमार्गे रेल्वे सुरू केल्यास 30 तासाच्या आत नागपूरहून गोव्यात येता येणार आहे. जागतिक पर्यटन नकाशावर मानाचे स्थान पटकावलेल्या गोव्याला रेल्वेच्या नकाशावरही तसे भक्कम व अढळ स्थान मिळायला हवे. पर्यटनाचा चेहरा बदलण्याच्या या काळात हे सारे झाले तर पर्यटनाला रेल्वेची चाके खऱ्या अर्थाने मिळणार आहेत.
रेल्वे आणि पर्यटनाचेही नाते आहे. पर्यटन विकासासाठी रेल्वे मंत्रालयांतर्गत स्वतंत्र महामंडळच आहे. रेल्वे खानपानसेवा व पर्यटन विकास असे त्याचे नाव आहे. त्या महामंडळाच्या माध्यमातून गोव्यासाठी खास पर्यटक रेल्वे सुरू करण्यात आली आहे. गोमंतकीय वाटावी अशी या रेल्वेची अंतर्बाह्य रचना करण्यास वाव आहे. गोमंतकीय खाद्यपदार्थ उपलब्ध करावेत शिवाय जोडीला गोमंतकीय संगीतही हवे. पर्यटकाने या रेल्वेत पाय ठेवल्यापासून गोमंतकीय आतिथ्यशीलतेचा अनुभव त्याला यायला हवा यासाठी कर्मचारी गोमंतकीयच लागतील हे काही वेगळे सांगायला नको. त्यामुळे या दिशेने अद्याप बराच पल्ला गाठण्यास वाव आहे मात्र त्याची सुरवात नववर्षाच्या पूर्वसंध्येला झाली हे आणखी एक वैशिष्ट्य. या लेखाच्या सुरवातीला म्हटल्याप्रमाणे चर्चा, सामंजस्य करार ते प्रत्यक्षात रेल्वे धावण्यास एक आठवड्याहूनही कमी कालावधी लागला यावरून रेल्वे मंत्रालयाने पर्यटन क्षेत्राला मदत करणे किती गांभीर्याने घेतले आहे याची पुष्टी मिळते.
राज्य सरकारची गुंतवणूक असलेली पूजा नावाची तीन डब्यांची एक रेल्वे आहे. सध्या कारवार मडगाव मार्गावर ती चालविली जाते. खास करून सरकारी निमसरकारी आस्थापनांत साडेनऊ ते पावणेसहा काम करणाऱ्यांसाठी ती उपयोगी ठरते. या गाडीचा वापरही राज्यांतर्गत पर्यटकांची ने आण करण्यासाठी करता येऊ शकते. करमळीचे तळ्याकाठचे रिसॉर्ट लवकरात लवकर पूर्ण झाल्यास पर्यटकांना वाजवी दरात राहण्याची सोय उपलब्ध होऊ शकेल. थिवी स्थानकाचा मडगावच्या धर्तीवर विकास केल्यास तेथूनही अनेक गाड्या सोडल्या जाऊ शकतात. रेल्वेमंत्र्यांच्या विषयसुचीवर प्राधान्यक्रमाने कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण हे विषय आहेतच. या साऱ्यातून पर्यटन क्षेत्रासाठी नव्या वर्षात आशादायी चित्र तयार झाले आहे.