Thursday, July 28, 2011

आठवणीतले तारकर्ली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचे वारे वाहू लागले आहे. त्या संधीचा फायदा खऱ्या अर्थाने तारकर्ली गावाने घेतला आहे. तारकर्लीत घराघरात लॉजिंग व्यवसाय सुरू झाल्याने जिल्ह्यात तारकर्ली पर्यटनाच्या बाबतीत "मॉडेल व्हिलेज' म्हणून उभे राहिले आहे. मालवणपासून 15 किलोमीटरवर असलेल्या या गावाने जिभेवर घर केले आहे.तेथे रमेश मिठबावकर यांच्या घरगुती खानावळीत एकदा जेवलेला माणूस पुन्हा तेथे जाण्यासाठी केवळ निमित्त शोधत असतो. मी गेल्या चार वर्षांत अनेकदा मालवणला गेलो पण मिठबावकरांकडचे जेवण जेवल्याशिवाय दौरा पूर्ण झाला नाही. तारकर्ली पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या नकाशावर झळकत आहे. तेथे आज घराघरात पर्यटनाचे वारे पोहोचले आहे. तारकर्लीत प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे वायरीपासूनच रस्त्यानजीक प्रत्येक घरात फलक दिसतो, "तो इथे राहण्याची व जेवणाची सोय आहे' असाच. पूर्वी या भागातील लोकांचा व्यवसाय मच्छीमारी हा होता; परंतु लोकांनी आता पर्यटन हा पूरक व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे. पर्यटनामुळे या भागात बऱ्यापैकी रोजगारनिर्मिती झाली आहे. तारकर्लीसारख्या छोट्या गावात असलेली लॉजिंगची सोय पर्यटकांनाही सुखावते. तारकर्लीच्या टोकास एमटीडीसीने तंबू निवास उभारले आहेत. त्याच पद्धतीचे तंबू निवास आता खासगी तत्त्वावरही उभे राहिले आहेत. त्यामुळेच तारकर्लीत अगदी दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतच्या राहण्याच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. एका बाजूने कर्लीची खाडी आणि दुसऱ्या बाजूने अरबी समुद्राच्या कुशीत वसलेल्या देवबाग-तारकर्ली गावावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. नारळी पोफळीच्या बागा, सुरूचे बन आणि त्यात भर टाकणारा स्वच्छ समुद्रकिनारा! येथे येणाऱ्या पर्यटकाला या सगळ्याची भुरळ पडते. मालवण ते देवबाग या पंधरा किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक तंबू निवास आहेत. अगदी कमी पैशांत ते पर्यटकांची राहण्या- जेवण्याची सोय करतात. समुद्रातील स्कूबा डायव्हिंगच्या पर्यटनासाठीच्या वापरापाठोपाठ आता केरळच्या धर्तीवर हाउसबोट पर्यटनालाही सुरुवात झाली आहे. दत्तप्रसन्न कुलकर्णीसोबत या भागात फिरताना मी माहिती संग्रहीत करणे सुरूच ठेवले होते. आजही मला तारकर्ली म्हटली की सारे तपशील त्याचमुळे आठवू शकतात. डॉल्फिन दर्शन, कोकणचा विहंगम किनारा, देवबागचा संगम हे सर्व पाहण्यासाठी खाडीतूनच लज्जतदार मालवणी जेवणाचा आस्वाद घेत पर्यटक जाऊ शकतात. हे असे चित्र असले तरी तारकर्ली नदीचा बहुतांश भाग गाळाने बुजत चालला आहे. पावसाळ्यात तारकर्ली नदीला येणाऱ्या डोंगराकडील पाण्यामुळे नदीचे पात्र रुंदावून किनाऱ्याचा दुतर्फा भाग नदी गिळंकृत करीत आहे. तारकर्ली नदीमध्ये यापूर्वी बारमाही खोल पाणी असायचे, परंतु गेली कित्येक वर्षे या नदीच्या आणि खाडीच्या पात्रामध्ये साचलेल्या गाळामुळे छोट्या होड्यांना ये-जा करणे मुश्‍कील झाले आहे. शिवाय या खाडीपात्रामध्ये मिळणाऱ्या मासळीचे प्रमाणही घटले आहे. नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ भरल्याने तारकर्ली-कोरजाई तारीसाठी प्रवाशांना अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागते. येथे असलेल्या नैसर्गिक बेटामुळे होडीवाल्यांना या बेटाला वळसा घालून कोरजाईपलीकडे बंदरात जावे लागते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूस "किंग्ज गार्डन' येथे रंगीबेरंगी मासे, शेवाळ, शुद्ध पाणी, खडके पाहण्यासारखी आहेत. चिवला बीच या ठिकाणच्या "कोरल गार्डन'चे सौंदर्यही पर्यटकांना निश्‍चितच आनंद देणारे आहे. तारकर्ली येथील "सरग्यासम पॉइंट' येथे प्रवाळे, कोरल, आकर्षक असे मासे या ठिकाणी आहेत. देवबाग येथील "लगून पॉइंट' हे खाडीच्या बाजूने असून, एका बाजूस खडके तर दुसऱ्या बाजूस मासे या ठिकाणी तिन्ही बाजूंनी शुभ्र वाळू आहे. यासाठी तारकर्लीत स्कूबा डायविंगची सोय आहे हे विशेष महत्त्वाचे.