Wednesday, June 8, 2011

आकाशविहार अन्‌ समुद्रावर नजर...!

किनारी भागातील जीवन कमालीचे बदलले आहे. मुळात क्रॉंक्रिटच्या जंगलाच्या दिशेने गोव्याच्या किनाऱ्यांची वाटचाल पूर्णत्वाला गेली आहे, त्याच्या जोडीला काही कारणांनी का होईना किनारे काळंवडत चालले आहेत. नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून परतताना हे दृश्‍य दिसले.सुमारे दीडशे सागरी मैलावर आतवर मासेमारी नौका काडेपेटीगत दिसत होत्या. एकीकडे ट्रॉलरची संख्या वाढल्याचे चर्चा सुरू असतानाच खोल समुद्रात आतवर अभावानेच एखादी नौका दिसे. किनाऱ्यापासून तिसेक मैलावर नौकांची गर्दी दिसली. पुढे आल्यावर माणसांची गर्दी उसळलेला पण काळवंडत जाणारा किनारा दिसला. दूरवर ठिपक्‍यागत वस्तीही दिसू लागली होती. मुंबई या युद्धनौकेच्या डेकवरून दुपारी हेलिकॉप्टरने उड्डाण केले त्यावेळी माझ्यासोबत मुंबईच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न जनसंपर्क अधिकारी आलोक मिश्रा होते. पहाटे जाताना हेलिकॉप्टर प्रवासाचा थरार ढगाळ हवामान आणि अंधाराने हिरावून घेतला होता. त्यामुळे साहजिकच दुपारच्या प्रवासाची मला प्रतीक्षा होती. दुपारी सव्वा दोन वाजता हेलिकॉप्टर उडाले नि आता उडी ठोकून पळ काढावा का असा माझ्या मनात विचार आला. चेतक या हेलिकॉप्टरला एकच इंजिन असते ही माहिती याच नको त्या वेळी मला आठवली. त्यातच हेलिकॉप्टरला दोन्ही बाजूला दरवाजे नाहीत. त्यामुळे कंबरेला बांधलेल्या दोन इंच रुंद पट्ट्याचा काय तो आधार. वर पकडायला काय आहे का याची अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनीच मी पाहणी केली. एका बाजूला पकडण्यासाठी असलेल्या पट्टा पकडण्यासाठी बाजूला सरकणे भाग होते. तसे करणे शक्‍यच नव्हते. एक तर वर जाताना हेलिकॉप्टर धडधडत होते. वाऱ्याचा दाब शरीराला जाणवत होता.त्यातच चारशे फुटावर हेलिकॉप्टर आल्यावर पायलटने ते पुढे दामटले.नजर सरावली असली तरी खोल समुद्रात पडल्यास काय होईल हा विचार मनातून जात नव्हता. गळ्यात लाइफ जॅकेट अडकवलेले होते. त्यातच या प्रवासाआधी निघताना नौदलाने अपघात झाल्यास नौदलाला जबाबदार धरणार नाही असा बॉण्ड लिहून घेतला होता. त्याचे विचारही मनात येत होते. दूरवर निळाशार समुद्र दिसत असताना सरावात सहभागी नौकांची मला पाहणी करता यावी म्हणून नौकांच्या ताफ्याभोवती पायलटने प्रदक्षिणा घातली. प्रत्यक्षात अवाढव्य दिसणाऱ्या नौका चारशे फुटावर कशा किरकोळ दिसतात हे पाहता आले. त्याचबरोबर वरून खालची नेमकी गोष्ट पाहणे कसे कठीण असते याचा प्रत्ययही आला. चालकाने आता निघू अशी हातानेच खूण केली आणि हेलिकॉप्टर दूरवर क्षितिजावर न दिसणाऱ्या किनाऱ्याच्या दिशेने घेतले.वाटेत मासेमारी करणारी मोठी नौका पाहण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर एका जागी स्थिर केल्यागत केले. तो नेमके काय सांगत होता हे वाऱ्यामुळे नेमकेपणाने माझ्यापर्यंत पोचत नव्हते. त्याच्या तोंडाच्या दिशेने कान करण्यासाठी बसल्याजागी काही अंशात हलण्याचीही माझ्या मनाची तयारी नव्हती. पुढे आल्यावर नौकांची गर्दी दिसली. किनाराही दिसू लागला. किनाऱ्यावरचा माणसांचा समुद्र पाहून हे गोवा आहे हे सांगावे लागले नाही. किनाऱ्याच्या एका कोपऱ्यात ट्रॉलर पाण्यातून बाहेर काढणे सुरू असल्याचे दृश्‍य सेकंदभर दिसले. किनाऱ्यालगत उभ्या राहिलेल्या इमारतींनी मोकळी जागाच सोडली नसल्याचे कटू सत्यही पाहता आले, पुढे वास्कोत शहर असे अस्ताव्यस्त पसरले आहे हेही पाहता आले मुख्य म्हणजे हंस या नौदलतळावर उतरण्याआधी विमाने ठेवण्यास जराही जागा नसलेला दाबोळी विमानतळ पाहता आला.