Sunday, March 20, 2011

कैगा परिसरात भेटलेल्या व्यक्तींचे म्हणणे

कैगा प्रकल्प येथे राहणार ही आजची वस्तुस्थिती आहे. प्रकल्पाचा विस्तार होणार अशा घोषणाही केल्या जात आहेत. अणू ऊर्जा महामंडळाने स्थानिकांना विश्वासात घेऊनच विस्तारकाम केले पाहिजे. प्रकल्प उभारणीवेळी बांधकाम कोसळले होते. आतातरी प्रकल्प किती सुरक्षित आहे हे जनतेला पटवून दिले पाहिजे. राजा रामण्णा हे अणू आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी किरणोत्सर्ग रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे व ते कैगा येथे वापरण्याची ग्वाही दिली होती. त्याची पूर्तता झाली का याचेही उत्तर मिळावे. प्रकल्प परिसरातील कुचेगार, हाटुगा, कुर्नीपेठ या गावातील लोकांची आरोग्य तपासणी नियमित व्हावी आणि किरणोत्सर्ग आहे की नाही याची माहिती मिळत रहावी अशी आमची आता मागणी आहे. सुरवातीला आम्ही प्रकल्पालाच विरोध केला होता. आता प्रकल्प आहे व राहणार ही वस्तुस्थिती मान्य करतानाच प्रकल्पाच्या 50 किलोमीटर परिसरात किरणोत्सर्गाच्या दृष्टीने सातत्याने सर्वेक्षण व्हावे असे आम्हाला वाटते.
शिवराम सिद्धरकर
तालुकाध्यक्ष, पर्यावरण रक्षण समिती



कैगामुळे कारवारचा अपेक्षित विकास झाला नाही. मी नगराध्यक्ष असताना राजा रामण्णा यांना कारवारमध्ये सन्मानित केले होते. त्यावेळी आणि त्यानंतरही नौदलाचा सीबर्ड प्रकल्प यांच्याकडून कारवारच्या विकासासाठी भरीव योगदानाची अपेक्षा होती. 1957 मध्ये मी डॉक्‍टरी पेशात शिरलो तेव्हापासून गेल्या पाच वर्षांपर्यंत कारवारचा विकास झाला नव्हता. कारवारचा विकास व्हावा या एकमेव उद्देशाने या प्रकल्पांचे संभाव्य दुष्परिणाम माहित असूनही विरोध केला नाही. किनारा सफाईसाठी दिलेले पैसे वगळता कैगाकडून कारवारला जास्त काही मिळाले नाही. इतर शहरांसारखेच आणि त्याचवेगाने आता कारवार विकसित होत आहे. कैगामुळे कारवार मोठ्या प्रमाणावर विकसित होणे , रोजगारसंधी आणि आर्थिक उलाढालीच्या पातळीवर देशात अग्रेसर असायला हवे होते. जगातील चार सर्वोत्तम बंदरापैकी कारवार एक असूनही विकासाची संधी आम्हाला सातत्याने नाकारलीच गेली आहे.
डॉ. एस. आर. पिकळे
माजी नगराध्यक्ष व प्रतिथयश डॉक्‍टर, कारवार



कैगासाठी आमची शेतजमीन गेली, त्याची नुकसानभरपाई तेव्हाच मिळाली, कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरीही मिळाली. आमच्या पाच एकर जमिनीत काही झाडे होती, त्याचे मूल्यांकन योग्य प्रकारे न झाल्याने आम्ही न्यायालयात दाद मागून भरपाई मिळविली. प्रकल्पामुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. रोजगाराच्या नानाविध प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संधी निर्माण झाल्या आहेत. पुनर्वसनासाठी जमीन दिली, रस्ते केले, पाणी पुरवठा योजनाही राबविली मात्र दुरूस्ती आणि देखभालीची जबाबदारी कैगा प्रकल्पाने घेतली नाही. त्यामुळे त्यादृष्टीने अद्याप विचार व्हावा. मल्लापूरला कर्मचाऱ्यांसाठी शहर उभारले त्या धर्तीवर मार्केट, इस्पितळ, क्रीडांगण यासुविधाही पुनर्वसित लोकांसाठी द्याव्यात.
कृष्णा नाईक 
पुनर्वसन झालेल्या कुटुंबातील व्यक्ती


आठवड्यातून एकदा हुबळी, बेळगाव आणि दररोज कारवारला जाण्यासाठी प्रकल्पाने बससेवा दिली आहे. मल्लापूर ते कारवार हे बसतिकीट 26 रुपये असताना प्रकल्पाची बस फक्त पाच रुपये तिकीट घेते. मल्लापूर येथे इस्पितळ आहे, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त पुनर्वसित लोकांसाठीही उपलब्ध केला जावा. 25 वर्षांपूर्वी आम्हालाही रोजगार देऊ असे आश्वासन देण्यात आले होते, आता कुटुंबातील एकाच व्यक्तीस नोकरी मिळाली आहे. आम्ही पूर्वी शेती करायचो आता पूनर्वसित वसाहतीत घरी बसून राहण्यापेक्षा जास्त काही करता येत नाही. पुनर्वसित वसाहतीत पाणी अर्धातास येते त्याची वेळ वाढविण्याची गरज आहे. रस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावे.
शांताबाई सदानंद नाईक
पुनर्वसित वसाहतीतील महिला


प्रकल्पाने केलेल्या विकासकामांची देखभाल दुरूस्ती स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी अशी कैगा प्रकल्प चालकांची इच्छा आहे. पण निधीअभावी तसे करण्यात अपयश येते. प्रकल्पाने राजगाराच्या संधी दिल्या, कधीनव्हे तो आमचा भाग विकसित झाला. रस्ते, वीज, पाणी आर्थिक सुबत्ताही आली पण अद्याप बरेचकाही प्रकल्पाला करण्यासारखे आहे. परिसरात प्रकल्पाचे इस्पितळ आहे, ते सर्वांसाठी खुले करावे. प्रकल्पातून त्यांच्या कर्मचारी निवास संकुलात वीज दिली गेली आहे, गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित तर त्या वसाहतीत विनाखंडित वीज असे परस्परविरोधी चित्र दिसते, ते बदलावे. पैसे घ्यावेत पण आम्हालाही कैगातूनच वीज मिळावी. पथदीप दुरुस्ती, रस्ता दुरूस्ती, नळपाणी योजनेची देखभाल यासाठी प्रकल्पाच्या भरीव अर्थसहाय्याची आम्हाला गरज आहे.
चंद्रशेखर बांदेकर
अध्यक्ष, मल्लापूर ग्रामपंचायत

स्थानिकांना रोजगार देण्यात कैगा प्रकल्पाने मोठी भूमिका बजावली आहे. गेले दशकभर येथे बांधकाम सुरू होते. त्यानिमित्ताने अनेकांना कंत्राटे मिळाले, काहींनी वाहने भाड्याने घेऊन प्रकल्पाला भाडेकराराने दिली आहेत. कंत्राटदाराकडे काम करणारे अनेकजण याच परिसरात राहत असल्याने खोल्या घरे भाड्याने देण्याचा नवा व्यवसाय सुरू झाला आहे. बाजारातील उलाढाल वाढली आहे. लोकांच्या हातात चार पैसे खेळू लागल्याने परिसरात नवी दुकाने आली आहेत. आज परिसरात हरचीजवस्तू त्याचमुळे मिळू लागली आहे. कर्मचाऱ्यांनाही सातत्याने सर्व सुविधा प्रकल्पाने दिल्या आहेत. एक कमरेचा पट्टा सोडला तर सारेकाही प्रकल्प आम्हाला देते. उत्पादनाशी निगडीत अशी प्रोत्साहन योजना विचाराधीन असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. सुरवातीला प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनीच आता पाचवी सहावी अणूभट्टी केव्हा उभारणार अशी आग्रही मागणी करणारा प्रश्‍न अलीकडेच जाहीररीत्या विचारला त्यातच या प्रकल्पाचे यश समावले आहे.
सुमंत हेबळेकर
अध्यक्ष, कैगा प्रकल्प कर्मचारी संघटना

No comments:

Post a Comment