Thursday, March 10, 2011

खानापूरातील अरण्यरुदन

खानापूरच्या जंगलातील वास्तव समोर आणण्यासाठी मी यापूर्वी ब्लॉगवर लिहिलेले मलाच अपुरे वाटल्याने त्याचा आणखीन तपशील येथे देत आहे.
गोव्यापासून जवळच असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुका आजही उपेक्षिताचे जीणे जगत आहे. तेथील जंगलमय भागात कसेबसे जीवन कंठणाऱ्या लोकांची अवस्था तर दयनीय बनली आहे. आजचा दिवस ढकलला, उद्याचे काय, हा प्रश्‍न त्यांना सातत्याने सतावत आहे. रस्ते व वाहतुकीची साधने नसल्याने येथील घनदाट जंगलातील नागरिकांपुढे आजही दळणवळणासाठी पायपीट करण्याखेरीज पर्याय नाही. विकासासाठी आसुसलेले हे भूमिपुत्र गेली कैक वर्षे एका रस्त्यासाठी साकडे घालत आहेत. मात्र, अरण्यातील माणसांचे हे गाऱ्हाणे आजही अरण्यरुदन ठरत आहे. वाहतुकीची पुरेशी सुविधा नसल्याने या परिसरातील माणसांना जनावरांपेक्षाही वाईट पद्धतीने जीवन जगावे लागत आहे, अशी संतप्त भावना महिला व्यक्त करतात. दाट जंगल तेही राखीव. त्यामुळे रस्ते करण्यासाठी जंगल तोड करायला हवी. त्यासाठी केंद्र सरकारचीा परवानगी घ्यावी लागणार. या साऱ्या प्रक्रियेमुळे पक्के रस्ते कोणी केलेच नाहीत,किंबहुना तेवढ्या तळमळीने रस्ते तयार करण्याकडे कोणी लक्ष दिले नाही.या भागात जाण्याचा जवळचा मार्ग म्हणजे अनमोड घाटाकडूनच. तेथे जाण्यासाठी अनमोड घाट काढल्यानंतर डावीकडे वळायचे. बस कधीच जात नसल्याने स्वतःचे वाहन अनेक खाचा खळगे चुकवत न्यावे लागते. समोरून अन्य वाहन आल्यास जंगलातच कुठेतरी आपले वाहन घुसवून त्या वाहनाला वाट करून द्यावी लागते.तळेवाडी पर्यंतच असे वाहनाने जाता येते तेथून पुढे चार ते पाच तासाची पायपीट ठरलेली. तळेवाडीपर्यंत हा संपूर्ण रस्ता जणू एक दिव्य आहे. रस्ता अद्यापही कच्चा आहे. खानापूरहून अनमोडच्या दिशेने किलोमीटरभर आल्यावर डावीकडे वळलेला हा रस्ता जलाशयात जंगलाला वळसा घालत पुढे जातो. असंख्य वळणांच्या या रस्त्यावर वाटेतील ओढे आणि डोंगरातून ओहळ वाहत येताना दिसतात. त्यावर सिमेंटचे पूल बांधण्यात आले आहेत. काही प
ुलांची मोठी पडझड झाली आहे. काही पुलांचे अस्तित्व केवळ उभ्या असलेल्या सिमेंटच्या पडक्‍या बीमच्या रूपात पाहावयास मिळते. पावसाळ्यात येथे सुमारे भरपूर पाऊस पडतो. डोंगरातून वेगाने येणारे पाणी रस्त्यावर येते. जून ते सप्टेंबरअखेर रस्त्यावरून सतत पाणी वाहत असते. यामुळे रस्त्याची दुर्दशा होते. रस्त्यात मोठे खड्डे पडतात. ठिकठिकाणी रस्ता वाहून जातो. पण खड्डे पडल्यानंतर रस्ता दुरुस्त केला जात नाही. वर्षानुवर्षे या रस्त्याची दुर्दशा सुरू आहे.याच रस्त्याला पुढे पायवाट आहे. त्या पायवाटेने सरळ गोव्यात उतरता येते.गोव्यातून या भागात येण्यासाठी घाट चढावा लागतो. वन विभागाच्या विरोधामुळे या भागात नव्या पायवाटाही सुरू होऊ शकत नाहीत. सध्या तळेवाडीपर्यंत 15 दिवसातून एकदा टेम्पो येतो आणि परत जातो. एवढीच काय ती या भागातील वाहतूक. या टेम्पोतूनच खानापूरला खरेदीसाठी लोक जातात. माणसी 30 ते पन्नास रुपये या प्रवासासाठी मोजावे लागतात.रस्ता झाल्यास वाहनांची आणि माणसांची वर्दळ वाढेल आणि अभयारण्यातील प्राण्यांचे आणि वनस्पतींचे जीवन, अस्तित्व धोक्‍यात येईल, हे कारण देऊन वन विभागाने रस्ता अडविला आहे. वास्तविक अनेक राखीव वनांतून रस्ते झाले आहेत. महाबळेश्‍वरसारख्या दाट जंगलातून रस्ता झालेला चालतो, मात्र खानापूरनजीकच्या या जंगलातच का चालत नाही, असा प्रश्‍न येथील नागरिक विचारीत आहेत. आम्हाला या जंगलातील काही नको, आम्हाला फक्त रस्ता द्या, अशी येथील नागरिकांची मागणी आहे; परंतु वन विभाग आपल्या निर्णयावर ठाम आहे. एखादा माणूस गंभीर आजारी पडला तर त्याला डॉक्‍टरकडे नेण्यासाठी त्याला शेजारच्या गावात कुणी पाहूणा आला असेल तर त्याच्या दुचाकीचा वापर करावा लागतो. दळणवळणाच्या साधनांसाठी या जंगलात रस्ता होणे आवश्‍यक आहे. या लोकांसाठी वन विभाग सवलत देत नाही; किंबहुना वन आणि प्राण्यांना माणसांचा त्रास नको म्हणून ही माणसेच येथे वन विभागाला नको आहेत. डोंगरदऱ्यांत राहणारी येथील माणसे विकासाची वाट पाहात अनवाणी पळत आहेत. विकासाच्या गप्पा खूप मारल्या जातात; पण खानापूरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील माणसे एका रस्त्यासाठी अद्यापही आसुसलेली आहेत.

No comments:

Post a Comment