Tuesday, March 8, 2011

खानापूरची वस्तुस्थिती

मी गेल्या महिन्यात बेळगावला गेलो होतो. पतंग महोत्सव पाहणे हे एक निमित्त होते. फोंडा अनमोडमार्गे जाताना वाटेत खानापूर लागते. खानापूरला पोचल्यावर मला देगाव, कृष्णापूर हा परिसर आठवला. त्याच परिसरातून म्हादई उगम पावते. त्या परिसरात खाण काम सुरू होत असल्याचे कळाल्याने मी जीव धोक्‍यात घालून तेथे गेलो होतो व तेथील ग्रामस्थांनी मला पाच तास स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथून परत जीवंत कधी परतेन याची आशाही मी सोडली होती. असो. पण तेथील लोक आजही 18 व्या शतकातले जीवन जगत आहेत. 21 व्या शतकातील कुठल्याही सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत.
अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य व शिक्षण अशा सर्वच बाबतीत दुर्लक्षित राहिलेला समाज खानापूर तालुक्‍यात ठिकठिकाणी वस्ती करून राहिला आहे. या समाजातील लोकांपुढे मूलभूत गरजांबरोबर रोजची भाकरी कशी मिळवायची हाच प्रश्‍न आहे. म्हादईला पाणी पुरवठा करणारे झरे या जंगलातून वाहतात. हे झरे आटल्यास म्हादई पर्यायाने मांडवी नदीवर प्रतिकूल परिणाम होईल म्हणून खानापूरच्या आग्नेय दिशेला असलेल्या या जंगलाकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष गेले आहे. काहींनी जंगल बचावासाठी न्यायालयातही धाव घेतली आहे.या साऱ्या हालचालींमुळे वन खाते या परिसरात बऱ्यापैकी सक्रिय झाले आहे. या जंगलाला राखीव जंगल असे संबोधणारे फलक त्यांनी जागोजागी लावले आहेत. या जंगलातील गावांकडे कोणा फिरकू नये म्हणून फाटकही घालण्यात आले आहे. गावकऱ्यांशिवाय अन्य कोणी या भागात सध्या उपवनसंरक्षकांच्या परवानगीशिवाय राजरस्त्याने प्रवेशच करू शकत नाही. वनखात्याच्या उपस्थितीमुळे जंगलातील अवैध तोड जरी थांबली असली तरी खासगी जमिनीतील एक झाडही तोडणे कठीण झाले आहे. या साऱ्यांमुळे स्थानिक जनता भरडली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाने 1196 मध्ये कोणाच्याही मालकीच्या जमिनीवरील जंगल हटविण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी अनिवार्य केल्यानंतर कर्नाटकातील खासगी जंगलांचा प्रश्‍न चर्चेत आला आहे. आजही किती क्षेत्रावर खासगी जंगल आहे याची निश्‍चित माहिती मिळत नाही.वषार्नुवर्षे या जंगलातील गावांत कोणत्याही मूलभूत सुविधांच्या अभावी अनेक जण राहतात. काही गावातच प्राथमिक शाळा आहेत. तळेवाडीला तर गावकऱ्यांनीच शाळा चालविली आहे. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण खानापूरलाच अठरा किलोमीटरवर जाऊन घ्यायचे. ते आर्थिक चणचणीमुळे सहज शक्‍य होत नाही. त्यामुळे निरक्षरांचेच या भागात प्रमाण अधिक. कोणी आजारी पडला तर केवळ नशिबावर हवाला ठेवू
न दिवस काढायचे. 15 दिवसातून एकदा गावात येणाऱ्या वाहनातून त्याला खानापूरला हलवायचे.रोजी रोटी मिळविण्यासाठी त्यांचा नेहमीचा संघर्ष ठरलेलाच. मोळी विक्री, वनौषधींची विक्री, मध गोळा करणे हे करणे भागच पडते. बऱ्यापैकी पाऊस पडणारा हा भाग तसा नापिकच अशी माहिती जानू बयाजी वरक यांनी दिली.यापरिसराचा पायी दौरा केल्यावर दिसून आले, की पाण्याचा स्रोत उपलब्ध असलेल्या ठिकाणी लोकांची वस्ती आढळते. छोट्या घरांतून ते राहतात जंगल संपत्ती गोळा करणे हे या लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन. रानावनातून हिंडून मध गोळा करून त्याची विक्री बाजारात करतात. वनाधिकाऱ्यांच्या वावरामुळे या व्यवसायांवर निर्बंध आले आहेत. या समाजातील लोकांच्या गरजा व प्रश्‍न इतरांपेक्षा वेगळे आहेत. अज्ञानामुळे त्यांच्यापुढे समस्यांचे दुष्टचक्रच निर्माण झाल्याचे दिसून येते. वरक म्हणाले, ""पूर्वी आणि आजही आम्ही जंगलावरच अवलंबून आहोत. आज शासनाचे आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष आमच्या जंगलाकडे गेल्याने आमच्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे मजुरीसाठी बाहेरगावी जाण्याशिवाय पर्याय नाही. अधूनमधून गोव्यातील शेतात मोलमजुरी करण्यासाठी येथील पुरूषवर्ग येतो. दिवसभर कष्ट केल्यावर कशीबशी रोजीरोटी मिळते. ती मिळविणे हेच आमचे जगणे आहे. यामुळे मुलांच्या शिक्षण व आरोग्याकडे दुर्लक्ष होते, असे कृष्णापूरच्या शंकर नाईक यांनी सांगितले.वस्तीच्या परिसरात लहान मुले खेळत होती. शिक्षणाअभावी या मुलांचे भवितव्य अंधकारमय आहे. पालकांच्या दृष्टीने मुले म्हणजे उत्पन्नाला हातभार लावणारे साधन मानले जाते. पोटात अन्न आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र मिळत नाही, तर मुलांना शिकवायचे कसे, हा यक्षप्रश्‍न या लोकांच्यापुढे आहे. एका बाजूने पयार्वरण प्रेमाला उभारी आली असतानाच तेथील जनतेला मात्र जगण्याचीच चिंता
आहे. पर्यावरणप्रेमी त्यांना उपदेशांऐवजी जगण्यासाठी काही पर्याय देतील का या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना हवे आहे.

No comments:

Post a Comment