Sunday, March 6, 2011

कोकणचा इतिहास समजेल

रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळवर मी एक लेख लिहिला. त्याची दखल घेत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने कालपासून कोकणात संशोधन मोहिम सुरु केली आहे. सागरी पुरातत्वशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी ही मोहिम हाती घेतली असून शास्त्रज्ञांचा चमू दाभोळ मंडणगडकडे रवाना झाला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनूप गुजर यांच्या वाचनात ही मंडगड परिसरातील कोरीव अशा खडकाळ किनाऱ्याची माहिती आली, त्यानंतर सागरी गुंफाचे छायाचित्रही लेखासोबत होते, दाभोळवरच्या लेखात दगडी नांगर सापडल्याचा उल्लेख होता तर दहागावजवळील झऱ्याच्या काठावर मूर्ती सापडल्याचा उल्लेख होता. दगडी नांगर सापडल्याने त्याबाबत संशोधन करून कोकण आणि इतर देशांशी चाललेल्या व्यापाराविषयी व पूरातन संस्कृतीविषयी अधिक माहिती मिळेल असे त्यांना वाटले. त्यांनी ही बाब सागरी पुरातत्व विभागप्रमुख के. एच. व्होरा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी त्यासाठी काही लेखांचे भाषांतरही केले. व्होरा यांना यापूर्वी अनेक ठिकाणी दगडी नांगर सापडले होते. त्यांना कोकणात असे नांगर असल्याचे समजल्याने त्याविषयी संशोधन करावेसे वाटू लागले. यापूर्वी विजयदुर्ग परिसरात सुकी गोदीही सापडली होती.व्होरा आणि त्यांचे सहकारी गुजर, सुंदरेश आणि अनेक तास डायविंगचा अनुभव गाठीशी असलेले ए. एस. गौर यांनी याविषयी माझ्याशी चर्चा केली. कान्होजी आंग्रे यांचा मुख्य तळ जर विजयदुर्गमध्ये होता तर जहाजे कुठे ठेवली जायची, हर्णेलगत बुडालेल्या नौकांची माहिती स्थानिक पातळीवर कोणाकडे मिळेल, राजापूरच्या जून्या बंदराचा इतिहास कोण सांगेल, दाभोळमध्ये कोण मदत करेल असे प्रश्‍न या संशोधकांना पडले होते. त्यांची उत्तरे मिळाल्यावर त्या दगडी नांगरांची पाहणी करण्यासाठी दाभोळला जावे असे ठरले.
खरेतर यातून कोकणाचा दडलेला इतिहास सर्वांसमोर येईल अशी मला अशा आहे. किनारी भागात काही कारणास्तव उत्खनन केले जाते. काहींना मातीच्या भांड्यांचे अवशेष मिळतात. लोक अशा गोष्टी फेकून देतात पण संशोधनासाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. यातून संशोधनाला दिशा मिळते. कृष्णाची बुडालेली द्वारका याच पद्धतीने शोधली गेली. त्यासाठी किनारी भागात अशा गोष्टी सापडल्या तर त्यांनी त्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, दोनापावल गोवा या पत्त्यावर पाठवाव्यात.

No comments:

Post a Comment