Wednesday, May 16, 2018

लढवय्या नेता ट्रोजन डिमेलो

पक्ष कोणताही असो गेल्या 15 वर्षात जोरकसपणे बाजू मांडणारा एकच प्रवक्ता चटकन लक्षात येतो. ती व्यक्ती म्हणजे सध्याचे गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो. मुद्देसुद मांडणी करत आपले म्हणणे पटवून देण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. किंबहुना मुद्दा चुकीचा आहे, हे त्यांना ठाऊक असले, तरी ते एवढ्या सफाईदारपणे बोलतात, की कित्येकवेळा पत्रकारांनाही तो मुद्दा चुकीचा होता, हे पत्रकार परिषद संपल्यावरच लक्षात येते. कित्येक राजकीय पक्षांचे पाणी चाखलेली ही व्यक्ती आजवर विधानसभेत पोचू शकलेली नाही, हेही तेवढेच सत्य. त्यामुळे ते आपल्या वाणीची मतदारांवर भुरळ पाडण्यात अपयशी ठरले, असे म्हणता येते. निवडणूक हरले तरी त्यांनी आपले सामाजिक काम सुरूच ठेवले आहे. "लोकांचो आधार' नावाची बिगर सरकारी संस्था ते चालवतात. कोणत्याही राजकीय पक्षाचा आसरा नसतो, तेव्हा पत्रकार परिषदा संबोधित करण्यासाठी या संस्थेच्या बॅनरचा ते उपयोग करतात. या व्यतिरिक्त ती संस्था काय करते, हे अनेकांना ठाऊकच नाही.
लढवय्या नेता अशी ट्रोजन यांची कोणी ओळख करून दिली, तर ती वावगी ठरणार नाही. त्यासाठी ते अब्रू नुकसानीची कोट्यवधी रुपयांची मागणी करणारी नोटीस आली तरी ते मागे हटत नाहीत. घेतलेली भूमिका ते अखेरपर्यंत निभावतात. त्यासाठी भले सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांना लढा का द्यावा लागू नये. ट्रोजन यांच्याशी पंगा घेणे परवडणारे नसते, असे अनेकांना वाटते ते त्याचमुळे. ट्रोजन हे आपसूकपणे नेते झाले, असे अनेकांना आज वाटते. मात्र त्यांचा आजवरचा प्रवास हा प्रदीर्घ आणि अनेक वळणांनी भरलेला आहे. अनेक टप्पे त्यांच्या सार्वजनिक जीवनात आले. मात्र ते खचले नाहीत. त्यांनी आपला बाणा कायम ठेवला आहे. ख्रिस्ती समाजाचे असूनही देवनागरी ते उत्तमपणे वाचतात. बातमी वाचली, की काही मुद्दे खटकले तर पत्रकारांशी थेट संपर्क साधून बोलण्यासही ते मागे राहत नाहीत.
ट्रोजन यांचा खरा राजकीय प्रवास भाजपमधून झाला, हे आज कोणास सांगितले तर खरेही वाटणार नाही. म्हापशालगतच्या गिरी गावचे (तेव्हाचे गिरवडे) ट्रोजन साडेसात वर्षे सरपंच होते. त्याकाळी सरपंचांना मानधन नसे. त्यामुळे रोजगारासाठी बहारीनला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी सरपंचपद सोडले. विदेशात त्यांचा कार्यकर्ता स्वभाव तेथे स्वस्थ बसू देईना म्हणून ते परत आले. विदेशात जाण्यापूर्वी ते जनता पक्षात होते. तो पक्ष फुटला आणि जनसंघातून भारतीय जनता पक्ष निर्माण झाला. जी. वाय भांडारे यांच्या नेतृत्वाखाली ट्रोजन भाजपमध्ये आले. नुसतेच आले नाही, तर भारतीय जनता युवा मोर्चाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मोहन आमशेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीत ते प्रदेश सरचिटणीस झाले. पुढे भाजपचे राज्य संयुक्त चिटणीसही झाले. आज त्यांची भाजपविषयी कडवट भूमिका ज्याने अनुभवली असेल त्याला ट्रोजन हे भाजपचे पदाधिकारी होते, हे सांगूनही पटणार नाही. विदेशातून परत आल्यावर ते भाजपमध्ये आले तरी डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या संपर्कात ते आले.
डिसोझा यांनी स्थापन केलेल्या गोवा कॉंग्रेसमध्ये ते गेले. डिसोझांचे विश्‍वासू म्हणून ते गणले जाऊ लागले. सार्वजनिक जीवनातील 14 वर्षे ते डिसोझांसोबत राहिले. पहिली दोन वर्षे पक्षात तर उर्वरित 12 वर्षे ते डिसोझा यांचे स्वीय सहायक वा स्वीय सचिव या भूमिकेत वावरत राहिले. त्या 12 वर्षात डिसोझा हे एकर मुख्यमंत्रिपदी तरी असायचे किंवा उपमुख्यमंत्रीपदी. त्यामुळे ट्रोजन हे सातत्याने तपभर सत्तेच्या एकदम जवळ होते. त्यातूनच त्यांना आपणही राजकारणात यावे विधानसभेत यावे असे वाटू लागले होते.
नाही म्हणायला गोवा कॉंग्रेस डिसोझांनी कॉंग्रेसमध्ये विलीन केली तेव्हा ट्रोजन यांना कॉंग्रेसचे संयुक्‍त चिटणीसपद द्यावे असा प्रस्ताव डिसोझांनीच तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष एदुआर्द फालेरो यांच्याकडे ठेवला होता. मात्र पक्ष विलीन झाला तरी डिसोझा व फालेरो यांचे फारसे न पटल्याने ट्रोजन यांना काही ते पद मिळाले नाही. पुढे साळगावातून लढण्यासाठी पक्षाने एकदा उमेदवारी दिली तेवढीच. मात्र स्वतःची खुमखुमी भागविण्यासाठी ते दोन वेळा अपक्ष लढले. एकदा प्रचारासाठी काढलेल्या सिडीमुळे पोलिस कारवाईलाही त्यांना सामोरे जावे लागले तरी ते नमोहरम झाले नाहीत. आताही संधी मिळाल्यास ते विधानसभा निवडणूक लढतील. गोवा फरवर्डमध्ये येण्यापूर्वी त्यांनी परत कॉंग्रेस तेथून राष्ट्रवादी कॉंग्रेस असाही राजकीय प्रवास केलेला आहे.

No comments:

Post a Comment