Wednesday, May 16, 2018

जीवनवादी कार्यकर्ते "रमेश गावस'

रमेश गावस हे नाव उच्चारल्यावर साधे, सरळ, सदा हसतमुख असे व्यक्तिमत्त्व नजरेसमोर येते. गेली कित्येक वर्षे निसर्गाच्या रक्षणासाठी ही व्यक्ती एकहाती लढा देत आहे. शिक्षक म्हणून केवळ आपली भूमिका चार भिंतीच्या आड न ठेवता ते "समाज शिक्षक' कधी झाले हे त्यांनाही समजले नाही. साने गुरुजींच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेले गावस राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते. भारत जोडो अभियान असेल वा अंधश्रद्धा निर्मूलनाचे शिबिर साऱ्यात गावस नेहमीच अग्रेसर असत. त्यासाठी गावागावात त्यांची भ्रमंती ठरून गेलेलीच असायची. ही व्यक्ती स्वतःसाठी कधी जगते असा प्रश्‍न पडावा असा त्यांचा व्याप त्यांनी वाढवून ठेवला आहे.
प्रसंगी वैयक्तिक सुख दुःखे बाजूला ठेवून समाजाच्या गरजेसाठी नेहमीच घराबाहेर पडणारा कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख आता रूढ झाली आहे. त्यांची मते कधी कधी टोकाची वाटू शकतात. मात्र, त्यामागे असलेली सत्याची झळाळी पाहिली तर त्यांचे म्हणणे पटल्याशिवाय राहू शकत नाही. "पर्यावरणवादी' असा त्यांचा उल्लेख नेहमीच केला जातो. मात्र ते स्वतःला "जीवनवादी कार्यकर्ता' म्हणवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ते जीवनाकडे नेहमीच आशावादी दृष्टिकोनातून पाहतात. पुरोगामी विचार मानतात. समाजात जे जे घडते ते टिपत जातात व चांगले ते समाजाला देण्याचा प्रयत्न करतात.
समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणी अतिशय कठोरपणे अंगिकारताना समाजातील विविध धार्मिक गटांचा कडवा विरोध धीरोदात्तपणे पचवत त्यांनी आपल्या समाजसेवी जीवनाची वाटचाल अतिशय अविचलपणे सुरू ठेवली आहे. बालपणात बेतकीसारख्या निसर्गरम्य परिसरात जीवन व्यतीत केलेल्या गावस यांना निसर्गाचा सहजपणे ध्यास लागला. मातेने पाठीवर दिलेला रपाटा जीवन घडवण्यासाठी व सार्थकी लावण्यासाठी उपयुक्त ठरला. तिच्या त्या वेळच्या शिक्षणासाठीच्या हट्टामुळेच आज ही वाटचाल करणे शक्‍य झाल्याचे ते मानतात. शालेय जीवनात निसर्गाची ओढ, भरपूर वाचन व त्याद्वारे एस. एस. जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यामुळे ते राष्ट्रसेवा दलाशी जवळ आले. दरम्यानच्या काळात त्यांनी सर्वण येथील गोविंद गुणाजी विद्यालयात शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. आपल्या वैचारिक प्रतिभेचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना देताना शिक्षणाबरोबरच समाजासाठी आदर्श ठरावेत अशी शेकडो माणसे त्यांनी घडवली. सर्वंकष जीवन जगण्यासाठी सकारात्मक आणि विधायक दृष्टी ही निसर्गानेच त्यांना दिली. समता आंदोलन, भारत जोडो, आंतरजातीय विवाह, प्रागतिक विवाह, सामाजिक सलोखा आदी विविध क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
दिसायला ते अत्यंत साधे वाटत असले तेवढेच मनाने ते खंबीर आहेत. मागे एकदा धबधबा डिचोली येथील सार्वजनिक रस्ता खाण कंपनीने कुंपण घालून बंद केला. एक पादचारी म्हणून आपल्या हक्काची पायमल्ली होत आहे, अशी भूमिका घेत त्यांनी सर्वांसह त्या रस्त्यावरून चालत जात तो रस्ता खुला करायला भाग पाडले होते. यावरून त्यांच्या मानसिक खंबीरपणाची साक्ष पटते.
अभ्यासू वृत्तीच्या गावस यांनी खाणकामाविषयी सर्व माहिती संकलित केली आहे. यावरून खाण कंपन्यांनी निसर्गाची कशी लूट चालविली आहे, याची माहितीच त्यांनी बेकायदा खाण कामाची चौकशी करण्यासाठी गोव्यात आलेल्या न्या. एम. बी. शहा आयोगासमोर सादर केली होती. त्यावेळी त्यांनी काही उपग्रह छायाचित्रेही सादर केली होती. यावरून त्यांच्या या विषयाच्या दांडग्या अभ्यासाची प्रचिती आली होती. त्यांनी मुद्देसूदपणे गोव्यात चालत असलेले खाणकाम हे बेकायदा आहे हे आयोगाला पटवून दिले होते. रमेश गावस एक झपाटलेले व तितकेच संघर्षमय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यासारख्या व्यक्ती आयुष्यभर संघर्षच करतात असे त्यांचे वर्णन केल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यांची समाजानेही दखल घेतली आहे. यु. एस. ए. कॅलिफोर्निया, राज्य शिक्षक पुरस्कार, गोमंतक विद्या निकेतन समाजसेवा पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार असे नानाविध पुरस्कार त्यांना आजवर मिळाले आहेत.
गावस म्हणजे एक चळवळ तसेच संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. आशावादी राहून सतत चळवळीच्या माध्यमातून समाजात जागृती करून माणुसकी हाच खरा धर्म मानून समाजाला दिशा देणारे ते एक कर्तव्यदक्ष समाज शिक्षक आहेत. अतिशय नम्र, शांत, संयमी, प्रसंगी आक्रमक अत्यंत साधेपणाची राहणी असणारे रमेश गावस यांचे आजपर्यंतचे कार्य थक्क करणारे आहे. मात्र याबाबत त्यांनी कधीच गवगवा केलेला नाही. हेच त्यांच्या प्रामाणिकपणाचे, सच्च्या सेवेचे गमक आहे. 

No comments:

Post a Comment