Wednesday, May 16, 2018

साहित्यविश्‍वातील अजातशत्रू कोमरपंत सर

एकाच अर्थाचे अनेक शब्द असू शकतात, हे समजण्यासाठी कधीतरी डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे भाषण ऐकायला हवे. शब्दांचे षटकार मारावे तर सरांनीच. भाषेवरील त्यांचे प्रभुत्व हे अतुलनीय, कोणता शब्द कुठे व कसा वापरावा याचे उदाहरण हे त्यांच्या लेखनातून अनेकदा दिसून येते. लाघवी स्वभाव, मृदू आवाज आणि नम्रता ही कोमरपंत सरांची ओळख. अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व.
मराठी साहित्य हा तसा बोजड प्रांत. त्यातच समीक्षकांच्या फुटपट्टीने अनेकजण गारद होत असतानाच कोमरपंत सरांच्या रूपाने या प्रांतातही आनंद निर्माण करणारा अवलिया निर्माण होतो हेच मुळी विलक्षण. त्यांचा हा प्रवास व्यासंगाने समृद्ध झाला आहे. त्यांचा साहित्याचा व्यासंग अत्यंत मुलगामी आणि दांडगा आहे. कोमरपंत यांचे शब्दभांडार हे त्यांच्या प्रचंड वाचनाची प्रचिती देणारे आहे. व्यासंगी समीक्षेचा ठसा त्यांनी संपूर्ण मराठी साहित्य जगतात उमटवला आहे. महाराष्ट्रातील अनेक थोर साहित्यिकांशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. ललित साहित्यापासून वैचारिक साहित्यापर्यंत कुठल्याही साहित्य प्रकारावर भाष्य करणारा, त्यांच्यासारखा समीक्षक विरळाच!
साहित्य संमेलन असो, वा चर्चासत्र किंवा साहित्यावरील परिसंवाद असो, अग्रक्रमाने पुढे नाव येते ते कोमरपंत सरांचेच. कोमरपंत सर हे व्यक्ती नसून चालती बोलती संस्थाच आहे. एवढेच नव्हे तर ते एक चालते बोलते ग्रथांलय आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. गोव्यातील अनेक वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांत अभ्यासू लेख लिहून त्यांनी दिलेले योगदान अपूर्व असेच आहे. अनेक साहित्यिकांना कोमरपंत सर हे हक्काचे मार्गदर्शक वाटतात.
साहित्यिक प्रांतातील त्यांची प्रतिभा ही अलौकिक अशा स्वरूपाचीच आहे. तरीही या प्रतिभेला अहंकाराचा लवलेशही कधी स्पर्श करू शकलेला नाही, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मौलिक असे वैशिष्ट्य आहे. गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. त्यांच्यात साहित्य निर्मितीचे अंकुर फुलविण्याचे काम कोमरपंत सरांनी केले. कुठल्याही थोर साहित्यिकाच्या साहित्यकृतीवर अधिकारवाणीने बोलण्याचा मान केवळ कोमरपंत सरांचाच असतो. तो त्यांनी आपल्या दीर्घ व्यासंगाने मिळवला आहे. त्यामागे त्यांची मोठी साहित्यिक तपश्‍चर्या आहे.
मराठी व संस्कृत विषयाचे त्यांनी शिक्षण घेतले आहे. या दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे. यानंतर ते अध्यापनाच्या क्षेत्रात आले. मडगावच्या न्यू इरा हायस्कूलमध्ये त्यांनी सुरवातीला वर्षभर विद्यादान केले. तेथून मग फोंड्याच्या ए. जे. डी. हायस्कूलमध्ये दोन वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यावर ते महाविद्यालयीन पातळीवर मराठी शिकविण्यासाठी मडगावच्या श्रीमती पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात दाखल झाले. तेथे 14 वर्षे त्यांनी मराठीची सेवा बजावली. अनेक विद्यार्थ्यांवर मराठीचे संस्कार केले. त्यानंतर राज्यातील सर्वोच्च अशा शैक्षणिक संस्थेत म्हणजे गोवा विद्यापीठात कोमरपंत सर आले. तेथे 18 वर्षे त्यांनी सेवा बजावली. त्यात 1990 ते 2005 पर्यंत ते मराठी विभाग प्रमुख होते.
त्यांचा साहित्यिक संचार हा थक्क करणारा आहे. त्याचमुळे गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली, राम शेवाळकर, मधू मंगेश कर्णिक, अ. का. प्रियोळकर, अनिल, सुभाष भेंडे यांच्यावरील ग्रंथांत त्यांचे लेखन समाविष्ट झाले आहे. असा मान क्वचितच दुसऱ्या गोमंतकीय साहित्यिकाला मिळाला असेल. त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा समाजासाठी व्हावा हे सदोदित पाहिले. याच हेतूने त्यांनी गोमंतक मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची आणि स्वागताध्यक्षांची भाषणे (संकलन व संपादन), गोमंतकीय मराठी साहित्याचा इतिहास खंड 2 (प्रा. एस. एस. नाडकर्णी यांच्यासमवेत संपादन), चैत्रपुनव ः बा. भ. बोरकर यांची जन्मशताब्दी गौरव ग्रंथ (डॉ. सचिन कांदोळकर आणि डॉ. प्रकाश पर्येकर यांच्यासमवेत संपादन) आदी ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आहे. अनेक वर्तमानपत्रांतून त्यांनी नियमितपणे सदर लेखन केले. गोमन्तकमध्ये त्यांनी अनुबंध हे सदर लिहिले होते. वसंत मासिक व अन्यत्रही त्यांनी स्फुट लेखन केले आहे.
समीक्षक म्हटला की लेखक कवीला झोडपतो. निरनिराळ्या फुटपट्टया लावून साहित्याची मापे काढतो असा सार्वत्रिक समज आहे. बव्हंशी तो खराही आहे. त्यामुळे समीक्षकाकडे बघण्याचा समाजाचा आणि विशेष करून साहित्यिकांचा दृष्टिकोनही तसाच बनला आहे. या साऱ्याला छेद दिला तो कोमरपंत सरांनी. त्यांनी आस्वादात्मक समीक्षा लिहिली. साहित्य अधिक सकस कसे करता येईल हे सुचवले. लिहिणाऱ्याला नाउमेद न करण्याकडे त्यांचा नेहमीच कल राहिला आहे. त्यामुळे कोमरपंत सर समीक्षक असले तरी साहित्यिकांना ते नेहमीच आपल्यातील आणि मार्गदर्शक वाटत आले आहेत.
विनम्र, निष्ठावान, नीतिमान, चारित्र्यवान अशा या साहित्यिक समीक्षकाचा आदर्श कुणीही घ्यावा. अशा प्रकारचेच हे व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या मृदू स्वभावामुळे त्यांचा सर्वांशी स्नेहभाव जुळला आहे. कोमरपंत सरांबद्दल कोणी वावगे काही बरळेल याची कल्पनाही करवत नाही. आज समाजात कुठल्याही क्षेत्रात ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे, अशी व्यक्तिमत्त्वे दुर्मिळ झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोमरपंत सरांचे अस्तित्व ठळकपणे जाणवल्याशिवाय राहत नाही. 

No comments:

Post a Comment