Wednesday, May 16, 2018

खमक्‍या "प्रतिमा कुतिन्हो'

स्वस्त दरातील नारळ विक्रीमुळे सध्या महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो चर्चेत आल्या आहेत. महिला कॉंग्रेसला आजवर अनेक प्रदेशाध्यक्ष लाभल्या मात्र प्रतिमा यांनी आपल्या आक्रमक शैलीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॉंग्रेसच्या विविध संघटना चाचपडत असतानाच महिला कॉंग्रेस मारत असलेली मुसंडी ही केवळ प्रतिमा यांच्यामुळेच आहे हे कोणी नाकारू शकत नाही.
टॅक्‍सीवाल्यांनी मध्यंतरी आंदोलन केले. तेथे गेलेल्या भल्या भल्या नेत्यांची फिरकी आंदोलकांनी घेतली. मात्र तेथे पहिल्या प्रथम धाव घेऊन पाठिंबा देण्याचे धाडस प्रतिमा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. या आंदोलनामागे कॉंग्रेस ठामपणे उभी राहील, असे आश्‍वासनही कॉंग्रेसचे नेते तिथवर पोचेपर्यंत प्रतिमा यांनी देऊन टाकले होते. यावरून त्यांचा खमकेपणा दिसतो.
मडगावातील राजकारणातून राज्याच्या राजकारणात येत सक्रिय भूमिका बजावणे तसे सोपे नाही. विशेषतः कॉंग्रेससारख्या पक्षात जेथे ज्येष्ठ नवोदितांना संधी देऊ इच्छित नाहीत, तेथे प्रतिमा यांनी आपले स्थान निर्माण करणे हेच मुळी त्यांचे वेगळेपण सांगून जाते. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांचा पाठिंबा लाभलेले झेवियर फियेलो यांचा पराभव करत प्रतिमा यांनी 2011 मध्ये अनेक वर्षांनी झालेली कॉंग्रेस युवक अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. कोण या प्रतिमा अशी विचारणा त्यावेळी अनेकांनी केली होती.
चर्चिलकन्या वालंका आलेमाव हिला या निवडणुकीत अपात्र ठरवल्यामुळे प्रतिमा कुतिन्हो व झेवियर फियेलो यांच्यातच सरळ लढत होणार हे निश्‍चित होते. मात्र, प्रतिमा कुतिन्हो मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी समर्थन दिलेल्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या होत्या व त्यामुळे कामत यांच्याशी त्यांचे तसे सख्य नव्हते. प्रतिमा युवा अध्यक्ष होणे हा आपला नैतिक पराभव ठरणार असल्यामुळे कामत यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, प्रचारप्रमुख माविन गुदिन्हो व कन्येच्या निलंबनामुळे दुखावलेले चर्चिल आलेमाव यांना हाताशी धरून प्रतिमा यांच्या पाडावासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यासाठी कुंभारजुवे येथील युवा उमेदवार झेवियर फियेलो यांच्या मागे त्यांनी आपली सर्व शक्ती उभी केली. परंतु, राज्यातील युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वरील चौकडीचे मनसुबे धुळीला मिळवत युवक कॉंग्रेससाठी गेली बारा वर्षे काम केलेल्या मडगावच्या तत्कालीन नगरसेविका प्रतिमा यांना विजयी केले होते.
त्या विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेवेळी प्रतिमा म्हणाल्या होत्या, मला पराभूत करण्यासाठी अनेकांनी भरपूर प्रयत्न केले. पण कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी दबाव झुगारून आपले कार्य पाहून आपणास मते दिली. फातोर्ड्याचे विजय सरदेसाई, युवक अध्यक्ष संकल्प आमोणकर व पती सावियो कुतिन्हो यांच्या पाठिंब्यामुळेच आपण निवडून आले. विजय सरदेसाई यांनी भले त्यांना त्यावेळी मदत केली असेल मात्र नारळाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्यावर विजय यांच्यावर टीका करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. कृषिमंत्री काहीच करत नाहीत हे दाखवून देण्यासाठी त्यांनी स्वस्त दरात नारळ विक्री आंदोलन सुरू केले. उपाध्यक्ष बीना नाईक, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावित्री कवळेकर यांच्यासह त्यांनी ही मोहीम राज्यभर राबविली. माध्यमांनी या आंदोलनाची बऱ्यापैकी दखल घेतली. गृहआधार योजनेची मदत ही महागाईवर मात करण्यासाठी सरकार देत असलेली मदत हा सरकारचा युक्तिवाद या आंदोलनापुढे फिका पडला. त्याचवेळी कृषिमंत्र्यांनी स्वस्त दरात नारळ विक्रीची घोषणा केली. हीच संधी साधत आपले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करत प्रतिमा भाव खाऊन गेल्या.
कोणत्यावेळी काय भूमिका घ्यावी हे त्यांना अचूक समजते. भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल होबळे यांच्या सुनेने त्यांच्याविरोधात छळाची तक्रार करताच त्या तक्रारीचे राजकीय वजन लगेच प्रतिमा यांना कळाले. त्यांनी लगेच तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांची भेट घेऊन या प्रकरणी पारदर्शी तपासाची मागणी केली. प्रतिमा यांचा राजकीय प्रवास मडगावातून सुरू झाला आहे. तेथेही संस्मरणीय कामगिरी केली आहे. मडगावच्या उपनगराध्यक्ष असताना बाजार समितीच्या अध्यक्ष या नात्याने अतिक्रमण विरोधी त्यांनी राबविलेली मोहीमही अशीच चर्चेची ठरली होती. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
आताही डिचोलीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वस्त दरातील नारळ विक्री आंदोलन हे केवळ प्रसिद्धीसाठी होते असा आरोप केल्यावर गप्प राहतील त्या प्रतिमा कुठल्या. त्यांनी लगेच प्रत्युत्तर देताना विरोधात असताना मनोहर पर्रीकर करत असलेली आंदोलनेही ही प्रसिद्धीसाठीच होती का? असा बोचरा प्रश्‍न उपस्थित केला आहे. यावरून त्या राज्य राजकारणात किती मुरल्या आहेत हे दिसते.

No comments:

Post a Comment