Wednesday, May 16, 2018

गोमंतकाचे सांस्कृतिक संचित - राजेंद्र केरकर

आपला मुद्दा ठामपणे मांडत असतानाच समोरच्या व्यक्तीच्या मनाला शब्दाने बोचकारे येणार नाहीत याची काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राजेंद्र केरकर. पर्यावरण व निसर्ग यांच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या माणसाची कथा जाणून घ्यायची असेल, तर केरकर यांच्या आयुष्य प्रवासाचा अभ्यास करायला हवा. विद्यापीठाची पीएचडी त्यांच्या आयुष्याच्या अभ्यासातून मिळू शकते एवढे समृद्ध आयुष्य ते जगत आले आहेत.
एखादी भूमिका घेतली की त्या भूमिकेशी कसे प्रामाणिक रहायचे हे त्यांच्याकडून शिकावे. अत्यंत साधी राहणी मात्र उच्च विचारसरणी याचे जिवंत उदाहरण म्हणजे केरकर. त्यांच्या रक्तातच लढाऊ वृत्ती आहे. त्या वृत्तीला योग्य दिशा त्यांनी अनुभवातून दिली आहे. कितीही दबाव आला तरी त्या दबावाला झुगारून द्यायचे कसे हे त्यांच्याकडून शिकावे. हे सारे करताना कुठेही समोरच्या माणसाचे मन दुखवायचे नाही हे जणू त्यांनी ठरवून टाकले आहे. सौम्य शब्दांतूनही धारदार भाषा कशी वापरावी ती केरकर यांनीच.
या साऱ्याचे बाळकडू त्यांना लहान वयातच मिळाले. त्यांचे पणजोबा पोर्तुगिजांविरुद्धच्या बंडात सहभागी झालेले तर वडील स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळे अन्यायाविरोधातील लढाऊ वृत्ती रक्तातच होती. मात्र, अन्याय कोणता हे केरकर यांनी अनुभवातून ठरवले. ते एकदम सामाजिक कार्यकर्ते झाले नाहीत. सुरवातीची त्यांची भूमिका ही जनजागृतीची होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी लेखणी हाती धरली ती आजतागायत कायम आहे. निसर्ग आणि पर्यावरणावर त्यांनी भरभरून लिहिले. अनेक नवीन माहिती वाचकांसमोर ठेवली. हे सारे करत असतानाच ते निसर्ग ओरबाडणाऱ्या खाणकामाचे अंतरंग लेखणीच्या माध्यमातून समोर आणू लागले आणि केरकर यांचा खरा स्वभाव सर्वांना कळून आला. त्यांच्या आयुष्याला दिशा देणारा असाच तो काळ होता. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणासाठी लढणारा एक पाईक त्यावेळी तयार होत होता. पुढे त्या विषयातून अनेक दबाव त्यांच्यावर आले, जीवघेणे हल्ले झाले तरी ते बधले नाहीत. जाब विचारण्यासाठी जमाव आला तरी ते धिरोदात्तपणे सामोरे गेले. एवढेच नव्हे, सौम्य शब्दांत आपले म्हणणे मांडत मुद्देही त्यांनी जमावाला पटवून दिले.
खाणकाम बंदीची टांगती तलवार सध्या राज्यावर आहे. संभाव्य बेरोजगारीचा मुद्दा सगळेचजण मांडत आहेत. मात्र, खाणकामातून शाश्‍वत रोजगार मिळणार नाही. एक दिवस खनिजमाती संपली की पुढे काय असा प्रश्‍न गेली दोन दशके केरकर विचारत आले आहेत. त्यांच्या लेखनाचा अभ्यास केला तर आज जी खाणकाम बंदी आली ती केव्हा तरी येणारच होती हे पटल्याशिवाय राहत नाही. निसर्ग टिकला तर माणूस टिकेल हे त्यांचे साधे सोपे तत्त्व लोकांना पटत होते, पण लोक पुन्हा खाण कंपन्यांनी दिलेल्या प्रलोभनांना भुलतही होते. आता केरकर यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरत आलेली आहे. खाण भागात पर्यायी रोजगार उभा न केल्याने बेरोजगारी टाळण्यासाठी खाणी सुरू ठेवा अशी मागणी करण्याची वेळ आली आहे. खाणींविरोधात केरकर किती ठाम भूमिका घेतात याचे दर्शन सालेली गावातील स्ट्रोन क्रशरविरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. ते क्रशर अखेरीस बंद झाले.
स्वामी विवेकानंद हे त्यांचे आदर्श. विसाव्या वर्षीच त्यांनी स्वामी विवेकानंद स्मृती संघ ही संस्था स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून समविचारी मित्रांसह गावागावांतून जनजागृतीचे कार्यक्रम केले. त्यातून अनेक आंदोलनांचा जन्म झाला. त्यामुळे ज्यांची रोजीरोटी जाते असे वाटले त्यांनी केरकर यांच्याविरोधात मोहीम राबवली. त्यांच्यावर हल्ले केले. त्यांना दमदाटीही केली. मात्र, या साऱ्याला केरकर पुरून उरले. एवढेच कशाला जुगारही बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि तो बंद करून दाखवलाही. त्यांना धमकीची पत्रेही अनेक आली, पण हा कर्मयोगी आपल्या ध्येयापासून ढळला नाही.
म्हादई अभयारण्य घोषित होण्यामागे केरकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. पट्टेरी वाघांचे रक्षण व्हावे यासाठी अभयारण्याच्या प्रस्तावाची पूर्वतयारी त्यांच्या केरीच्या घरातच झाली. त्यावेळी लोकनियुक्त सरकार नसल्याने राज्यपाल जे. एफ. आर. जेकब हेच प्रशासक होते. या सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरलला पटवण्याची जबाबदारी केरकर यांच्यावर सोपवण्यात आली. राज्यपालांनी पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाचा पुरावा मागितला. एक आठवड्याची मुदत मिळाली. पिसुर्लेच्या जंगलात एका वाघाची शिकार झाल्याचे राजेंद्र यांना कळले होते. त्यांचा दांडगा जनसंपर्क. विकली गेलेली नखे मिळवून त्यांनी राज्यपालांच्या हातात ठेवली. त्यानंतर आठवडाभरातच अभयारण्याची अधिसूचना निघाली.
केरी गावात वाघाची शिकार झाली. वाघ जाळून टाकण्यात आला. त्याविरोधातही केरकर यांनी आवाज उठवला. चौकशी सुरू झाली. हाडे, दात मिळाले. काहींना अटक झाली. गावातील वातावरण तापले. केरकर यांच्या घरावर बहिष्कार घालेपर्यंत वेळ आली. पण केरकर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यांनी हा दबाव हसत हसत पचवला.
इतिहास व समाजशास्त्र या दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेले केरकर यांनी काहीवेळ मूळगाव येथील ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापनही केले. त्यांच्या चळवळ्या स्वभावामुळे त्यांची नोकरी घालवण्याचा प्रयत्नही काहींनी करून पाहिला. पण संस्थाचालक पांडुरंग राऊत त्यांच्यापाठी उभे राहिले. केरकर ही एक स्वयंभू संस्था आहे. डॉ. नंदकुमार कामत यांनी केरकर गोमंतकाचे सांस्कृतिक संचित या शब्दात गौरवले आहे, आणखीन काय हवे? 

No comments:

Post a Comment