Wednesday, May 16, 2018

पर्यावरण मास्तर सुजितकुमार डोंगरे

काहीजण आपल्या आयुष्याची वाटचाल आपणच ठरवतात. त्यांना मळलेल्या वाटेवरून चालायचे नसते. आपण वाट निर्माण करून त्यावर चालण्यात त्यांना मजा येत असते. ती वाट शोधताना भले कितीही कष्ट उपसावे लागले, तरी त्याची तमा त्यांना नसते. या जातकुळीत सुजितकुमार डोंगरे यांचा समावेश होतो.
पर्यावरण शिक्षण केंद्र या केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयासोबत काम करणाऱ्या संस्थेचे गोव्यातील अधिकारी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही. तशी ती राहू शकत नाही एवढे ते गोमंतकीय समाजजीवनाशी एकरूप झाले आहेत. कोणती वनस्पती कोणत्या भागात आहे इथपासून कोणता प्राणी कोणत्या भागात कधी दृष्टीस पडतो याची माहिती चटकन हवी असेल तर डोंगरे यांनाच विचारावे. पर्वरीतील आपल्या कार्यालयात ते काम करत असले तरी त्यांची नजर चौफेर असते. गोव्याच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या विविध घटनांचा मागोवा ते घेत असतात.
सरकारी सेवेत गेले असते तर ते एव्हाना वन संरक्षक झाले असते. सरकारी सेवेत वनाधिकारी म्हणून दाखल होण्याला आवश्‍यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त पात्रता असूनही त्यांनी ही वेगळी वाट मुद्दामहून चोखाळली आहे. सरकारी सेवेतील बंधनांपेक्षा मोकळ्या आकाशाखाली मोकळेपणे विहाराचे असणारे स्वातंत्र्य त्यावेळी त्यांना खुणावत होते व तसे ते आजही खुणावते. काहीजण लोकांत रमतात. लोकसंग्रह त्यांना भावतो, डोंगरे यांचे मात्र उलटे आहे. लोकांचा त्यांना तिटकारा नाही. मात्र, त्यांना एकांत आवडतो. त्यांना सातत्याने नवे काहीतरी शिकण्याचा ध्यास असतो. त्यामुळे त्यांना हा वेळ स्वतःसाठी हवा असतो.
पर्यावरणाची अधिसूचना कितीही क्‍लिष्ट भाषेत का जारी होईना, ती सोप्या शब्दांत समाजावून सांगण्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. गोवा सरकारला तटस्थपणे एखाद्या विषयाचा पर्यावरणीय दृष्टिकोनातून अभ्यास करून अहवाल हवा असतो त्यावेळी सुजितकुमार यांच्या नावाला पर्याय नसतो. असे अनेक अहवाल आजवर त्यांनी तयार केले आहेत. अहवाल तयार करण्यासाठी लागणारा अभ्यास ते न कंटाळता करतात. त्यात स्थानिकांशी संवादाचा विषय असेल तर तेही ते करतात. उगाच एखाद्या विषयाचा बाऊ न करता हसत खेळत विषय हातावेगळा कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावे.
किनाऱ्यांची धारण क्षमता असेल वा कासवांचे संवर्धन असेल यावेळी सुजितकुमारच मार्गदर्शन करू शकतात. प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारी व्यक्ती असाही त्यांचा उल्लेख केल्यास तो चुकीचा ठरणार नाही.
प्रा. माधव गाडगीळ या ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासकांबद्दल सुजितकुमार यांच्या मनात देवतुल्य स्थान आहे. गाडगीळ गोव्यात आले की ते त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. निसर्ग वाचनाचे बारकावे त्यांच्याकडूनच त्यांनी घेतले असावेत. त्यांना पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधायला विशेष आवडते. युवा पिढीला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले, तर भविष्यात पर्यावरण रक्षणासाठी कडक कायद्यांची आवश्‍यकता भासणार नाही असे त्यांचे गृहीतक या विचारामागे आहे. त्यामुळे शिबिरांत अनेकदा मार्गदर्शक म्हणून त्यांची हजेरी ही ठरून गेलेली असते.
त्यांचे शिक्षणही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या शिरसी या गावात झाले. वनीकरण या विषयात त्यांनी तेथील महाविद्यालयातून पदवी घेतली. पुढे वन संशोधन संस्थेतून त्याच विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. एवढे शिक्षण झाले की वन खात्यातील नोकरी सहज मिळते. केवळ एक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचीच गरज असते. मात्र, सुजितकुमार यांनी पर्यावरणाच्या संवर्धन, शिक्षणाकडे आपला मोर्चा वळवला. ते 1999 मध्ये पर्यावरण शिक्षण केंद्रात रुजू झाले. तेथून गोव्यात आले आणि तेव्हापासून गोव्याच्या पर्यावरणाशी एकरूप होऊन गेले आहेत.
कामाच्या निमित्ताने विदेशात अनेकदा गेले. स्वीडनमधील उप्पासाला विद्यापीठात 9 महिन्यांचे प्रगत प्रशिक्षण त्यांनी घेतले. त्यांच्या प्रशिक्षणाचा विषय होता नियमित पाठ्यक्रमात निरंतर विकासासाठी शिक्षण. शांघाय (चीन) येथील तोंग्जी विद्यापीठात निरंतर विकासासाठी उच्च शिक्षणातील शिक्षण या विषयावर प्रगत प्रशिक्षण त्यांनी घेतले. विदेशातील असे शिक्षण घेतल्यानंतरही त्यांच्या वागण्या बोलण्यात वावरण्यात विदेशात प्रशिक्षित हा बडेजाव कधीच जाणवला नाही. आजही ते पर्वरीतील कार्यालयात त्याच पद्धतीने काम करत असतात. कोणी गावात पर्यावरण संवादासाठी निमंत्रित केले, तर तेथे जाण्यासाठी ते कोणतेही आढेवेढे घेत नाहीत. आपण कोणीतरी आहे हा अहंभाव अद्याप तरी त्यांना शिवलेला नाही.
पर्यावरण शिक्षण आणि निरंतर विकासाचे शिक्षण, पर्यावरण सूचना सेवा, पर्यावरण रक्षणासाठी मनुष्यबळ विकास, जैव विविधतेची तपासणी त्याच्या नोंदी ठेवणे, धोरणात्मक निर्णयासाठी अभ्यास करणे आदी कामे न कंटाळता गेली अनेकवर्षे ते करत आहेत. वन खातेही आपण घेतलेल्या निर्णयांची वा आपल्या प्रकल्पांचा तटस्थ आढावा घेण्याचे काम त्यांच्याकडे सोपवते यावरून त्यांच्या विश्‍वासार्हतेची कल्पना येऊ शकते.
सध्या त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. देशातील 15 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळणार आहे. त्या किनाऱ्यांचा अभ्यास करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. विविध राज्य सरकारे, केंद्र सरकार, सल्लागार आणि विदेशातील संस्था यांच्यात समन्वय ठेवून हे काम करावे लागत आहे. यासाठी भ्रमंती तर खूपच आहे. मात्र, नेहमीप्रमाणे पर्यावरण संवर्धन हे जीवनध्येय असल्याने न कंटाळता सुजितकुमार हे काम करत आहेत. सारेकाही करून पडद्याआड राहण्याची कला त्यांना बऱ्यापैकी जमली आहे त्यातच त्यांच्या कामाचे यश सामावले आहे. 

No comments:

Post a Comment