Monday, April 13, 2020

हागणदारीमुक्तीची अपरिहार्यता

प्रत्येक घराला शौचालय आहे का म्हणजे राज्य हागणदारीमुक्त झाले की नाही हा मध्यंतरी वादाचा मुद्दा झाला होता. आता जरा तो विस्मृतीत गेला आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत प्रत्येक घराला शौचालय पुरवण्यात येणार होते. त्यासाठी त्या घराच्या मालकाने नाममात्र रक्कम सरकारकडे जमा करायची आणि उर्वरीत रकमेचा भार राज्य केंद्र सरकारने उचलायचा अशी ही योजना आहे. देशभरातील बहुतांश राज्यांनी आपले राज्य हागणदारीमुक्त झाल्याचे याआधीच जाहीर केल्याने आकाराने छोट्या पण प्रगत असलेल्या गोव्याला मागे पडल्याचे लाजीरवाणे वाटल्याने राज्य सरकारने घाईघाईने राज्य हागणदारीमुक्त जाहीर केले. ज्या ठिकाणी घरांना स्वतंत्र शौचालये पुरवणे शक्य झालेले नाही तेथे सामुदायिक शौचालये, फिरती शौचालये, तात्पुरती शौचालये पुरवून सरकारने आपले लक्ष्य गाठले.
जगात शौचालयांचा प्रसार वेगाने झाला तरी आपल्या देशात त्या दिशेने होणारा प्रवास संथगतीचा आहे. राज्यातील कित्येक घरे शौचालयाविना आहेत असा सरकारी अहवाल ज्यावेळी प्रसिद्ध झाला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते. आपली ओळख ही शेतीप्रधान राज्य अशी आहे. उघडी शेत जमीन, मैदाने आणि आडोशाला झाडे झुडपे सहजगत्या आढळतात. अनेकदा घरात शौचालय असूनही प्रातर्विधीसाठी लोक घराबाहेर जातात. अशा तऱ्हेने गावाबाहेरीलस घराबाहेरील वातावरण प्रदुषित होते हे चांगले माहित असूनही शौचालयांचा वापर केला जात आहे. पिढ्यान पिढ्या अंगवळणी पडलेल्या या सवयीमुध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. उघड्यावर शौच केला जातो त्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरते, नाक बंद करून पुढे सरकावे लागते. आपल्याला चांगले वाईट यातील फरक कळूनही आपण चांगले वागण्याचा, चांगल्या सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न करत नाही. अशासाठी संत तुकाराम म्हणतात
जेवताहि धरी| नाक हागतिया परी||||
ऐसिचाया करी चाळा| आपुलीच आवकळा ||||
सांडावे मांडावे| काय ऐसे नाही ठावे||||
तुका म्हणे करी| टाक दुधा एक सरी||||
राज्यात बांधण्यात येणाऱ्या शौचालयांचे तंत्रज्ञान कोणते असावे याचा सरकारी पातळीवर मोठी चर्चा करण्यात आली. येत्या १० मार्च रोजी कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन पुण्यतिथी आहे. कणकवलीजवळील वागदे येथे त्यांनी गोपुरी आश्रमाची स्थापना केली. त्या आश्रमात शौचालयांची विविध मॉडेल्स असलेले स्थायी प्रदर्शन आहे. ते पाहिले असते तरी सरकारी अधिकाऱ्यांना राज्यातील घराघरांत बांधण्यात येणाऱ्या शौचालयांसाठी विविध पर्याय सापडले असते. तंत्रज्ञानासाठी विदेश वारी करण्यास मागे पुढे पाहणाऱ्यांना आपल्या शेजारच्याच जिल्ह्यात याविषयी मोठे संशोधन झाले आहे याची माहितीही नसावी यासारखे दुसऱे दुर्दैव नाही. सफाई हा अप्पांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग होता. परिसर स्वच्छतेच्या अभावी ग्रामीण भागात ७० टक्के आजार घाणीमुळे होतात. याला एकमेव उत्तर म्हणजे गावोगावी सोपा शौचालय, नेडॅंप, गांडूळखत, शौषखड्डा, बायोगॅस अशी साधने प्रवृत्तींचा वापर झाला पाहिजे. यासाठी अप्पांनी याचे प्रयोग गोपुरी आश्रमात स्वतः केले. यासाठी गोपुरी आश्रमामध्ये वर्धा येथील आचार्यकुल यांच्या सहकार्याने अप्पांचे कृतिशील शिष्य डॉ. पु. वि. मापुसकर आणि तोडणकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सफाई प्रदर्शन उभारलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने या प्रदर्शनाला सॅनिटरी पार्क म्हणून मान्यता दिली आहे. ते पाहिले असते तरी विविध पर्याय सरकारला उपलब्ध झाले असते.
राज्य खऱ्या अर्थाने हागणदारीमुक्त करायचे झाल्यास दोन आघाड्यांवर प्रयत्न करावे लागणार आहेत. पहिली, स्वच्छता व्यवस्थेत सर्वांगीण पायाभूत रचना निर्माण करणे आणि जनमानसात वैचारीकदृष्ट्या मल निःस्सारणासाठी, विल्हेवाटीसाठी, शौचालयांचा आवर्जून वापर करण्याची सवय रुजवण्याची. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या शौचालयांचा वापर केला जातो. पीट शौचालये, वायुविजन उन्नत पीट शौचालये, पोर-फ्लश शौचालये, लीच शौचालये आदी. १९९३ मध्ये केंद्र सरकारने डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या कामास शुष्क शैाचालय बनवण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला. त्यानंतर सुलभ इंटरनॅशनल संस्थेने ट्वीन पीट शौचालय पद्धतीचे शौचालय बनवले आणि त्याला लोकप्रियता लाभली. हे तंत्रज्ञान वापरावे की संरक्षण संशोधन विकास संस्थेने विकसित केलेले बायोडायजेस्टर तंत्रज्ञान वापरावे हा सरकारसमोरील प्रश्न आहे.
सेप्टीक टॅंक पद्धतीचे शौैचालय सगळ्यात अधिक वापरात असलेली पद्धती आहे. यात आहे त्या ठिकाणी मलनिःस्सारणाची सोय केली आहे. या पद्धतीत विष्ठेचे विघटन निचरा काही अंशी होतो. कालांतराने एकत्रित झालेला जैव विघटीत मल चोथा नियमितपणे काढावा लागतो. त्याची पुढे इतर ठिकाणी विल्हेवाट लावावी लागते. सेप्टीक टॅंकमध्ये असलेल्या घाण द्रव पाण्यात आढळणारे असंख्य रोगाणुकारक जंतू जवळपासची जमीन पाणी दूषित करतात.

आयएस २४३० मानकानुसार सेप्टीक टॅंकचा चोथा दर दोन वर्षांनी काढला गेला पाहिजे पण प्रत्यक्षात ही टाकी भरेपर्यंत ती उपसली जात नाही हे वास्तव आहेत्यावर उपाय म्हणून जैव शौचालय (बायोडायजेस्टर) हे स्थीर तंत्रज्ञान उदयाला आले. संरक्षण मंत्रालयातील संस्थेने त्यावर संशोधन करावे यातच त्याचे महत्त्व अधोरेखित होते. बायोडायजेस्टर (जैव शौचालय) हे आहे त्याच ठिकाणासाठी वापरण्यासाठी पद्धती, तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान मल निः स्सारणाच्या पुढील प्रक्रियांना पूर्ण विराम देणारे आहे. हे तंत्रज्ञान स्थीर आहे. संपूर्णपणे पर्यावरणास अनुकूल, जल संरक्षक (जल प्रदूषण टाळणारी) आणि वायू आधारीत इंधनाचा निर्माण करणारे आहे. जैव शौचालय (बायोडायजेस्टर) बनवण्यापासून त्याची निगा राखण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. जैव शौचालय हे वापरणाऱ्या व्यक्तींच्या संख्येनुसार तसेच स्थानिक परिस्थितीनुसार बनवले जाऊ शकते हा या पद्धतीचा मोठा फायदा आहे. तसेच त्याला एकाच जागी कायमस्वरुपी चलीत शौचालय (मोबाईल टॉयलेट) अशा दोन्ही प्रकारे वापरू शकतो. एका आधारभूत संरचनेद्वारा तसेच विशिष्ट मापकानुसार जैविक शौचालय तयार झाल्यानंतर त्याला कुठल्याही देखभालीची (निगा राखण्याची) गरज भासत नाही. जैविक शौचालयातून उत्सर्जित होणाऱ्या द्रव पदार्थाचा (पाणीयुक्त) वेळू वाफा (reed-bed) पद्धतीने बाहेर टाकून बगिच्यासाठी किंवा कुंपणासाठी, झाडे झुडुपांसाठी वापर करता येऊ शकतो. हे तंत्रज्ञान आणण्यास वापरण्यास सोपे आहे. कोणत्याही प्रकारची निगा राखण्याची आवश्यकता नाही. फक्त एकदाच नैसर्गिक विघटन द्रव्य टाकावे लागते. सेप्टीक टॅंकमधून कुठल्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही, चोथा बाहेर काढावा लागत नाही. बाहेर पडणारे विघटीत द्रव पदार्थ (पाणी) दुर्गंधीरहित, रंगहीन बगिच्यांसाठी उपयोगी असते. हानिकारक वायू (कार्बन सल्फाईड) तसेच रोगाणुला ९९ टक्के आळा बसतो. त्यामुळे सरकारने याच तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास कागदावरील हागणदारीमुक्ती प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी आता केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

No comments:

Post a Comment