Monday, April 13, 2020

कोविड, निसर्गाने दिलेली शिक्षा?

कोविड १९ च्या प्रसाराच्या भीतीने देशव्यापी टाळेबंदी सध्या जारी आहे. अनेक राज्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. याही परिस्थितीत ज्याची त्याची गाव गाठण्याची धडपड ठळकपणे जाणवत आहे. या साऱ्यातून डोकावतो आहे, तो असमतोल विकासाचा भकास चेहरा. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी आपली खेडी स्वयंपूर्ण व्हावीत अशी संकल्पना मांडली होती. गावांचा विकास झाला तर आपोआप देशाचा विकास होईल ही त्यांची संकल्पना पुढे नेली गेली नाही. केवळ शहरी विकासावर भर दिला गेला. अलीकडे कुठे ग्रामीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. तोवर फार उशीर झाला आहे. त्यामुळे रोजगाराच्या म्हणजेच भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी लोंढेच्या लोंढे शहराकडे येऊ लागले. आता तेच लोंढे माघारी फिरू लागले आहेत. विकासाचा समतोल राखल्याचा फटका या कष्टकऱ्यांना आज बसत आहे
काहींच्या मते माणूस निसर्गाची फटकून वागल्याने आजची परिस्थिती उद्‌भवली आहे.भगवद्‌गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःची ओळख करून देताना, आपले कार्य कर्तृत्व सांगताना ज्या अनेक गोष्टी सांगतात त्यात याचाही समावेश आहे. ते म्हणतात...
तपाम्यहमहं वर्षं नगृहणाम्युत्सृजमि
अमृतं चैव मृत्यूश्र्च सदासच्चाहमर्जुन
म्हणजे मी सुर्यरुपी असलेला तापतो, तसेच पाऊस पाडतो आणि अडवतोही. आणि हे अर्जुना, अमृत आणि मृत्यू, सत्‌ आणि असत्‌ सारे काही मीच आहे. हा सगळा म्हणजे निसर्ग आहे. निसर्ग आणि पर्यावरण याबाबतीत भारताची एक भूमिका होती असावी लागेल. भारतात जेवढी विषमता सर्व क्षेत्रात आहे तेवढी जगात कुठेच नाही. विषमता जोपासण्यात आपणास कोणतेही कारण चालते अस्तित्वात असलेली कारणे कमी पडतात म्हणून आपण नवनवीन कारणे शोधून काढतो. हा देश धार्मिक, परमार्थिक आहे असा गोड समज आहे. पण खऱ्या अर्थाने तो परलौकीक आहे. त्याला स्वर्गात जागेच्या आरक्षणाची आकांक्षा आहे. तेच त्याचे ध्येय आहे. हे जग तर त्याच्यासाठी रैनबसेरा आहे तर नीजधाम स्वर्गलोकात आहे. म्हणूनच आपण स्वर्गवासी असा शब्द मरणाच्या संदर्भात वापरतो. गांधीजीना इहलोकातच नंदनवन स्थापन करायचे होते. त्यांनी तर म्हटले होते, की `माझे घर चोहोबाजूंनी कोटबंद बंद खिडक्यांचे असावे अशी माझी इच्छा नाही. देशोदेशींच्या संस्कृतीचे वारे माझ्या घरातून स्वच्छंद वाहावेत अशी माझी इच्छा आहे. परंतु त्यात मी वाहून अगर उडून जाण्यास इन्कार करतो. मी अन्य लोकांच्या घरात आगंतुकासारखा, भिकाऱ्यासारखा किंवा गुलामासारखा लाहू इच्छित नाही. माझा धर्म बंदीखान्यासारखा नाही`. म्हणून गांधीना कालबाह्य म्हणणाऱ्यांनी जरा खोलात जाऊन मोकळ्या मनाने विचार करावा.
पैसा कमावण्यासाठीच आहे, हे विसरावे लागेल. आज तर पैसा फक्त विनियोगाचे साधन राहिले नाही. त्याचा उपयोग तर माणसेही विकत घेण्यासाठी केला जातो. ते साधनही उरले नाही, तर तेच ध्येय झाले आहे. त्यात गांधींना अभिप्रेत असलेला साधनशुद्धीचा सिद्धांतही उरला नाही. साध्य- साधन विवेकही संपृष्टात आला. सर्वोदयाचे ध्येय या संदर्भात काय आहे हेही समजून घ्यायला हवे. सर्वोदयापुढे विश्वकुटुंबाचे ध्येय आहे. म्हणजे परिवर्तनाच्या प्रक्रियेत आपले पाऊल कौटुंबिक भावनेवर आधारीत समाजरचनेच्या दिशेने पडले पाहिजे. त्यादृष्टीने वितरणाचा आधार सहउपभोग किंवा सहभाग असणे अधिक श्रेयस्कर आहे. वस्तुंचे आपापसात वितरण झाले पाहिजे. दरेकाला वस्तू उपलब्ध झाली पाहिजे. अधाशीपणाने किंवा हावरेपणाने आवश्यकतेपेक्षा जास्त उपभोग घेण्याचा हव्यास बाळगू नका.या अर्थाने कौटुंबिक भावना ही कल्याणकारी समावेशक भावना आहे.
हे विचार आणि काल परवाचा समाजाचा आचार पाहिला तर आपण कोठे होतो कोठे पोचलो हे दिसते. टाळेबंदीची चाहूल लागल्यावर सर्वच जण दुकानांत धावले. हाताला मिळेल त्या वस्तू घेत सुटले. टाळेबंदी किती कालावधीसाठी आहे. दुकानात साठा किती आहे आपल्यामागे खरेदी करणारे कितीजण आहेत याची तमा कोणी बाळगली नाही. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय घरात एक महिना पुरेल एवढा धान्यसाठा, जीवनावश्यक वस्तू असतात. मात्र टाळेबंदी कायमचीच लागणार असा समज करून एकेकाने तीन चार महिने पुरेल एवढे साहित्य खरेदी केले. ते साहित्य गाडीत टाकून घरी नेताना आपण कोण लढाई जिंकल्याचे समाधान त्याच्या त्याच्या चेहऱ्यावर होते. याच समाजात हाताच्या पोटावर असणारे अनेकजण आहेत. त्यांना नेहमीच उद्याची चिंता असते असे अनेकजण आहेत. त्यांच्यासाठी मी काही करू शकतो का ही भावना कोणाच्याही ठायी त्यावेळी तरी नव्हती. जो तो मी आणि माझे कुटुंबिय यापुरताच मर्यादीत झाला होता. सरकारी यंत्रणा कामाला लागली म्हणून ठिक अन्यथा समाजातील अशा घटकांचा भूकबळी हा ठरून गेलेलाच होता. अशातून सामाजिक ताणतणाव निर्माण होतात. त्याच्याकडे आहे, पण माझ्याकडे नाही ही भावना अस्वस्थ करून जाते. यातून लुटालुटीचे प्रकारही जन्माला येऊ शकतात. विश्व कुटुंब हा सिद्धांत लक्षात ठेऊन वागल्यास समाजात सौदार्य नांदेल.
बर्ट्राड रसेल या विचारवंताने एके ठिकाणी म्हटले होते, की `आज अस्तित्वात असलेल्या अनेक कलहांत माणूस आणि निसर्ग यांच्यातील कलह सारखा वाढतो आहे. हा कलह भौतिक विज्ञानाच्या अविवेकी प्रगतीद्वारा वाढतो आहे`. याचे निराकरण करायचे झाल्यास प्रकृती ही माणसाला भूरळ पाडणारी मायाविनी मानली जाऊ नये. किंवा त्याची भोग वस्तू बनू नये. तर ती त्याची प्रिय सखी सहयोगीनी बनली पाहिजे. आज मानवी जीवनात अनेक प्रकारचे विरोधी भाव आढळून येतात. ) माणूस आणि निसर्ग यांच्यातील विरोध ) माणूस समाज किंवा परिस्थिती यांच्यातील विरोध ) व्यक्ती- व्यक्तीतील विरोध, ) माणसाच्या अंतरंगातील भिन्न - भिन्न विसंगत भावना आकांक्षा यांच्यातील विरोध. यातील निसर्ग माणूस यांच्यातील अंतर्विरोधाचा विचार केला तर तर काय दिसते ते पाहू. निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे, हे प्रकर्षाने जाणवत आहे. कवी कालिदासांसाठी हिमालय देवतात्मा होता तर व्यापाऱ्याला तो बघून वाटेल की हिमालयावर इतका बर्फ आहे, तो वाया जात आहे, येथे कितीतरी बर्फाचे आईस्क्रीमचे कारखाने काढता येतील. गिरसप्पाचा धबधबा बघताच त्याला फक्त वीज निर्मितीचा स्रोतच आठवतो. गुलाबाची फुले बघताच उपयुक्ततावाद्याला गुलकंद तयार करण्यासाठी ती उपयु्क्त आहेत हेच सुचते. या सर्वांचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किती उपयोग आहे याचा साधा विचारही तो करू इच्छीत नाही. खरेच आपल्या सगळ्यांचे असेच झाले आहे का?

माणूस का जगतो असा प्रश्न विचारला तर त्याचे काही जण सरळ उत्तर मरण येत नाही असे देतात. जन्म आणि मरण या दोन्हीही अपघाती गोष्टी आहेत. त्या माणसाच्या हातात नाहीत ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे. मात्र जन्म आणि मरण या दरम्यानचाकाळ मात्र माणसाच्या हातात आहे. परंतु तोसुद्धा त्याने निर्मिलेला नाही, तर तो समाजविकासक्रमाच्या प्रक्रीयेत इतिहासाने त्याच्यापुढे वाढून ठेवलेला आहे. माणसांचे सामर्थ्य हे आहे् की माणूस त्यात हस्तक्षेप करू शकतो. त्याला स्वतःसाठी आणि समाजासाठी अनुकूल बनवू शकतो. म्हणूनच माणूस हा इतिहासाचे अपत्य असला तरी तो इतिहासाचा निर्मातासुद्धा आहे. माणूस त्याच्या काळातील परिस्थिती बदलू शकतो आणि स्वतःही बदलत जातो. तयाच्या विकासक्रमातील प्रत्येक टप्प्यावर तो जगण्याचे प्रयोजन शोधत होता. त्याच्या प्रयोजनाला साध्य करणारी समाजव्यवस्था घडवीत होता. त्या प्रयोजनाला बाधा आणणारी समाजव्यवस्था मोडून काढीत होता आणि नवी घडवीत होता. म्हणून त्याने अनेक देशांत क्रांत्या घडवून आणल्या. सध्याही कोविड १९ विषाणूने माणसाला सध्याच्या जीवन पद्धतीचा फेरविचार करण्यास भाग पाडले आहे. यातूनही एखादी क्रांती जन्माला येईल आणि मानवी जन्माचे कल्याण होईल एवढीच अाशा करणे आपल्या हाती राहिलेले आहे.

No comments:

Post a Comment