Sunday, August 25, 2013

पाकच्या गोळीबारातून मुत्सद्देगिरीला आव्हान

पाकिस्तानकडून सीमेपलीकडून केला जाणारा गोळीबार हा नवी बाब नाही असे वाटू लागेल, मात्र आजवर हा गोळीबार जम्मू परिसरात मर्यादित होता. तेथे आंतरराष्ट्रीय सीमा आहे. बाघासारखीच सीमा जम्मू लगतच्या ऑक्‍ट्रॉय येथेही आहे याची अनेकजणांना कल्पना नाही. आता तेथून फक्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनांना ये-जा करण्यास मुभा आहे. तेथून पुढे मेंढर ते द्रास अशी प्रत्यक्ष ताबा रेषा आहे. काश्‍मीरमधील पूँछ जवळील चाकन दा बाग येथे प्रत्यक्ष ताबा रेषेवर अर्धा दिवस व पूर्ण रात्र राहण्याची संधी मला संरक्षण मंत्रालयाच्या सौजन्याने मिळाली होती. कर्नल एस. के. सखुजा यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याची संधीही दिली. त्यावेळी एक किस्सा मला ऐकता आला. सध्याच्या पाकिस्तानातील परिस्थितीवर तो भाष्य करणारा आहे असे मला वाटते. चाकन दा बाग येथे दोन्ही बाजूने पेरलेले भू सुरुंग निकामी केल्यानंतर महामार्ग बांधण्यात आला. तेथे फाटके बसविण्यात आली. ती फाटके काही काळासाठी खुली केल्यानंतर पाकिस्तानातील हजारोजण भारतात येण्यासाठी धावत निघाले, त्यांना थोपविण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सना गोळीबार करावा लागला. यावरून पाकिस्तानात सर्वसामान्य जनता कशी भरडली जात आहे याची कल्पना येऊ शकते. सर्व काही सुरळीत करण्यासाठी पावले टाकल्याचा दावा पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ भले कितीही व कसाही करू देत, पण पाकिस्तानमध्ये भयानक स्थिती असल्याचे सत्य नाकारता येत नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानला मिळणारी जागतिक मदत लष्करी सामग्रीच्या खरेदीसाठी वापरल्याने तेथे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
जम्मूपासून वीस किलोमीटरवर असलेली ऑक्‍ट्रॉय ही सीमा वगळता इतर दोन ठिकाणी प्रत्यक्ष ताबारेषेवर सीमावर्ती भागातील लोकांना काही महिन्यांसाठी सीमापार जाण्यासाठी परवाने देण्यात येतात. त्यासाठी महिन्यातून एकदा या सीमा एका दिवसासाठी खुल्या केल्या जातात. त्यावेळी भारतात नातेवाइकांकडे आलेले पाकिस्तानी नागरिक जीवनावश्‍यक वस्तू कशा नेतात याची वर्णने ऐकली तरी तेथे महागाईने सर्वसामान्यांचा कणा कसा मोडला गेला आहे याचे दृश्‍य डोळ्यासमोर तरळल्याशिवाय राहत नाही.
पाकिस्तानने यापूर्वीच वझिरिस्तान करार केला आहे. पाकिस्तानमधील या डोंगराळ केंद्रशासित प्रदेशात स्थानिक जमाती शक्तिशाली आहेत. त्यांच्याशी करार केल्यामुळे तालिबानला या भागात मुक्त वावर करणे शक्‍य झाले आहे. प्रचार, भरती, निधी, शस्त्रास्त्रांची जमवाजमव, दारूगोळा, वाहने, इंधन, प्रशिक्षण... या सर्व बाबी करणे शक्‍य झाले आहे. जनरल हमीद गुल यासारखे "आयएसआय' अधिकारी तालिबानला खुलेपणाने मदत करीत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. तालिबानींकडे आता आधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने असल्याचे निरीक्षकांनी नोंदवले आहे. तालिबानच्या या हालचालींना मदत करणारे आणखीही काही घटक आहेत. पहिली बाब म्हणजे उदंड भ्रष्टाचार, अकार्यक्षम आणि लाचखोर प्रशासन. यामुळे पाकिस्तानमधील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. यामुळे लोक सरकारपासून, प्रशासनापासून दूर जात आहेत. आपसांतील तंटे सोडविण्यासाठी लोक तालिबानकडे जात असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे या मुद्यांपासून लोकांचे लक्ष भारताकडे वळवण्यासाठी हा केला जाणारा गोळीबार आहे.
भारताने पाकव्याप्त प्रदेशही आमचाच आहे याचा संसदेत संमत केलेला ठरावही पाकिस्तानला लोकांच्या मनात भारताविषयी अकारण भीती निर्माण करण्यासाठी असा उपकारक ठरला आहे.
दुसरा राहिला मुद्दा चाकन दा बाग परिसरात झालेल्या भारतीय सैनिकांच्या हत्येचा. पूंछवरून विसेक किलोमीटरवर चाकन दा बाग हे भारताचे शेवटचे ठाणे. त्या पलीकडे रावलाकोट हे पाक व्याप्त काश्‍मीरमधील गाव. सध्या चाकन दा बाग भागातील लोक वगळता बाहेरच्या लोकांसाठी या परिसरात प्रवेश निषिद्ध. कारण ही आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. अवघ्या काही मीटरवर पाकिस्तानी लष्कर (रेंजर्स नव्हेत) मशिनगनच्या चापावर बोट ठेवून खडे. आपल्याकडेही तसेच चित्र. कुठून केव्हा गोळी सुटेल व गोळ्यांचा वर्षाव सुरू होईल हे सांगणे महाकठीण काम. तसेच सीमावर्ती भाग भू सुरूंगांनी भरलेला. एखाद्या नको त्या ठिकाणी पाय पडला तर जीवच गमवावा लागायचा (नाहीतर पाय गमवावा लागणे हे ठरून गेलेलेच). त्यामुळे मी तेथे जाण्याअगोदर सोबत असलेल्या मेजरचा सल्ला तंतोतंत पाळण्याबाबत वारंवार सूचना करायला वरिष्ठ लष्करी अधिकारी विसरले नव्हते. सुरुंग कुठे आहेत याचे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार फलक लावलेले असतात तरी प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य अशीही स्थिती असते. त्यामुळे रस्ता सोडून विशेष म्हणजे मेजरची साथ सोडून कुठे जाऊ नये असे सांगण्यात आले होते.
काश्‍मिरी जनतेला पाकव्याप्त काश्‍मीरमधील आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी (पाकव्याप्त काश्‍मीरमधील लोकांना काश्‍मीरमधील नातेवाइकांनीही भेटण्यास येण्यासाठी) तीन मार्ग खुले करण्याबाबत भारत पाकिस्तानचे एकमत झाले होते. त्यापैकी एक मार्ग उरी येथून खुला करण्यात आला. दुसरा मार्ग चाकन दा बाग येथून खुला करण्यात आला, तिसरा मार्ग (जम्मू सियालकोट) ऑक्‍ट्रॉय येथून खुला होणार आहे. चाकन दा बाग हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा परिसर असल्याने तेथे निर्मनुष्य प्रदेश (नो मेन्स) नाही. भारताचे नियंत्रण संपते त्याच्या दुसऱ्या इंचालाच पाकिस्तानचे नियंत्रण सुरू होते. तेथे आंतरराष्ट्रीय सीमेसारखे फाटक बसवावे अशी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. पण सरकारी इच्छेमुळे ते शक्‍य झाले आहे. चाकन दा बाग येथील घनदाट अरण्य साफ करून तेथे आता हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरण केलेला रस्ता अस्तित्वात आला आहे. दोन्ही बाजूला फाटके बसविण्यात आली. फाटकांना समांतर अशी तारेच्या कुंपणाचीही व्यवस्था करण्यात आली. एमिग्रेशनचा परवाना देण्यासाठी आता प्रशस्त कार्यालयही चाकन दा बाग येथे सुरू करण्यात आले आहे.
महिन्यातून दोन सोमवारी पाकिस्तानकडून चाळिसेक नातेवाइकांना भारतात प्रवेशासाठी पाठविले जाते. तेवढेच नातेवाईक भारताकडूनही पलीकडे पाठविले जातात. एरवीही या लोकांना पाकिस्तानात जाण्यासाठी पंजाबमधील बाघा सीमेवरून पाकिस्तानात जाऊन पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये यावे लागत असे वा त्याच पद्धतीने पलीकडच्या लोकांनाही द्राविडी प्राणायामाचा अनुभव येत असे. आता या सीमेवरून (चाकन दा बाग) फक्त जम्मू काश्‍मीरमधील लोकच पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊ शकतात, त्यासाठीही सीमेपलीकडे नातेवाइकांची यादी देऊन त्या नातेवाइकांनीही या प्रवासाला मान्यता द्यावी लागते. हीच पद्धती तेथून भारतात येणाऱ्यांसाठीही लागू आहे. मात्र पाकिस्तानकडून केल्या गेलेल्या आगळिकीमुळे दोन्ही देशातील लष्करात स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या विश्‍वासाला तडा गेला आहे.
अफगाणिस्तानमधून नाटोच्या सैन्याने काढता पाय घेतल्यानंतर तेथे विरोध करण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यामुळे आजवर रसद पुरवठा करून जगविलेल्या लढवय्या अफगाणींच्या हातातील बंदुकांना कुठेतरी काम हवे ते देण्याचाही हा प्रयत्न आहे. भारताने एक पाऊल पुढे टाकावे यासाठी पाकिस्तानने चालविलेला हा हेतुतः प्रयत्न आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांच्या वेशात हे भाडोत्री सैनिक लढू शकतील असे समीकरण पाकिस्तानने मांडले आहे. भारताने त्याला किती व कसा प्रतिसाद द्यावा यातच मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे.

No comments:

Post a Comment