Monday, January 7, 2013

सत्पाल येथील स्वास्थ्यवन


आयुर्वेदात नमूद केल्याप्रमाणे एका राशीचे एक झाड, एका ऋषीच्या व एका राशीच्या नि नक्षत्राच्या नावे एक झाड असे लावून स्वास्थ्यवन, ऋषिवन, नवग्रहवन व नक्षत्रवन राबविले तर? ही निव्वळ कविकल्पना नाही. प्रत्यक्षात अशी वने गोव्यात आहेत. तीही वनखात्याने विकसित केलेली. फोंड्याजवळील सत्पाल येथे ही वने पर्यटकांच्या स्वागतासाठी आता सज्ज झाली आहेत.
फोंड्याहून धारबांदोडा पुढे साकोर्डा व तेथून वळून सत्पाल येथे जाता येते. फोंड्याहून जेमतेम १२ किलोमीटरवर ही वने आहेत. येथे जाण्यासाठी आणखी एक रस्ता आहे पण तो साहसासाठी म्हणूनच ठीक आहे. बोंडला अभयारण्यातून पुढे एकेरी वाहतुकीसाठीचा नि दोन किलोमीटर अंतरात फक्त खडी असलेला रस्ताही याच सत्पालकडे जातो. या रस्त्यावर पूल नसलेले दोन मोठे ओहोळ पार करावे लागतात. सध्या दीड फूट पाणी आहे. मी याच रस्त्यावरून भर दुपारी गेलो व जंगलातील नीरव शांतता काय असते याचा गोव्यातच अनुभव घेतला.
बोंडल्याच्या अभयारण्याचे वनक्षेत्रपाल दीपक बेतकीकर माझे लेख वाचतात. ते मला गेल्या रविवारी बोंडला येथे गेलो असताना म्हणाले, "तुम्ही भारतभराच्या भटकंतीवर लेखमाला लिहिली. सर्वसाधारणपणे पुस्तकातून न मिळणारी माहिती दिलीत पण सत्पाल तुमच्या नजरेतून सुटले कसे? तुम्ही आताच तेथे जा! मी तेथे सांगून ठेवतो'. असे म्हणून त्यांनी तेथे दूरध्वनीवर संपर्क साधून कल्पनाही दिली. बोंडल्याहून परत तिस्कवर जा तेथून धारबांदोडा करत सत्पाल गाठण्याऐवजी मधल्या रस्त्याने जा असा सल्लाही त्यांनी दिला. पण तो रस्ता पूर्णतः निर्मनुष्य असेल याची सुतराम कल्पना मला त्या वेळी आली नाही. सात किलोमीटर अंतरात मानवी हालचाली वा अस्तित्वाच्या रस्ता सोडला तर कुठल्याही खुणा नव्हत्या. ओहोळातून गाडी घालतानाची ती रुतली तर काय हा प्रश्‍नही ताण वाढवून गेला.
सत्पालला कालिदास पोखरे (हे मूळचे पार्से येथील) यांनी हसऱ्या चेहऱ्याने केलेल्या स्वागताने सारा क्षीण निघून गेला. सत्पालला असे काय आहे? तेथे काय नाही ते विचारा ! एखाद्या संशोधकाला भुरळ घालणारे असे ते केंद्र आहे. पर्यटनासाठी आता त्याचा उपयोग होणार असला तरी त्याचे मूल्य त्याहून किती तरी अधिक आहे.
१९७४ दरम्यान सत्पाल येथे पहिली लागवड करण्यात आली. देशात आणि विदेशात आढळणारी झाडे गोव्यात होतील काय याची पाहणी करण्यासाठी त्यांची प्रथम लागवड तेथे झाली. त्यातून सत्पाल "अर्बोरेटम"चा जन्म झाला. मध्यंतरी काही वेळ दुर्लक्ष झाले असले तरी आता पुन्हा सत्पाल विकसित होऊ लागले आहे. त्याला कारणीभूत ठरली आहे १९९९ पासून राज्यात मूळ धरू पाहणारी निसर्ग पर्यटन ही संकल्पना. आज गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या पॅकेजमध्ये सत्पालचा समावेश झाला असला तरी ते निव्वळ पर्यटनस्थळ नक्कीच नाही. तेथे पूर्णतः फिरण्या व समजून घेण्यासाठी किमान तीन तास तरी हवेत.
१५ हजार चौरस मीटरात येथे लागवड आहे. तीही केवळ भारतीय वृक्षांचीच नव्हे तर विदेशातील नानाविध प्रांतातील वृक्षांची, तेथे या वृक्षांची माहिती देणारे फलक नसल्याचे मात्र जाणवत राहते. ती उणीव दूर व्हायला हवी.
सुरुवातीला ८३ भूखंडांवर लागवड करण्यात आली. वन खात्याच्या संशोधन व उपयोजन विभागाने त्याची जबाबदारी स्वीकारली. विविध झाडांची वने तयार करणे त्यांच्यावर संशोधन करणे हा मूळ उद्देश असला तरी संशोधन काय झाले हा प्रश्‍न सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. पण जगातील कुठली झाडे गोव्यात होऊ शकतात हे पाहायचे असेल तर सत्पाललाच जावे लागेल. चार भूखंडावर हिरवळ उगवून पर्यटकांची सोय केली आहे. पर्यटकांसोबत येणाऱ्या छोट्या दोस्तांसाठी बालोद्यानही विकसित केले आहे. दुपारच्या विश्रांतीसाठी नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या साधनांतून एक कुटीरही तयार केले आहे.
मुळात सत्पालला जायला हवे ते विविध वने पाहण्यासाठी. स्वास्थ्यवन ही त्यातील प्रमुख कल्पना. डोक्‍यापासून तळपायापर्यंतच्या विकारासाठी कुठल्या वनस्पतींपासून औषध मिळू शकते याचा खुलासा तेथे होतो. त्याची समग्र माहिती देणारे फलकही असल्याने चटचट समजून घेत पुढे जाता येते. मेथी, अडुळसा, किरायते, ब्राह्मीचा वापर येथे समजून घेता येतो. संधिवात, छातीत दुखणे, मूत्राशयाचे विकार एवढेच नव्हे तर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी निसर्गाच्या या ठेव्याच्या आधारे काय करता येते हे शिकण्यासाठी स्वास्थ्यवनासारखा दुसरा शिक्षक नाही.
स्वास्थ्यवनात पाऊल ठेवल्यापासून आपण एका वेगळ्या जगात आल्याची अनुभूती मिळत जाते. सुरुवातीला डोक्‍याच्या आजारावर आपल्याला कोणत्या वनस्पती कशाप्रकारे मदत करू शकतात ते कळते. त्यानंतर छाती, पोट, पाय यांच्या नानाविध आजारांवर कुठल्या वनस्पतींच्या साहाय्याने उपचार करता येतात हे समजते. त्यात आपल्या परसबागेतच सापडणारी अनेक झाडे आहेत. त्यांचे बहुमूल्य उपयोग वाचून थक्‍कच व्हायला होते. एकाच रोगावर अनेक वनस्पती उपकारक असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळवायला हवी तर स्वास्थ्यवनात निवांतपणे मुशाफिरीच करायला हवी.
स्वास्थ्यवनाच्या या भूलभुलय्यात आपण रमतो तोच आपल्याला शेजारी असलेले नवग्रहवन खुणावू लागते. नवग्रहवनात राहूच्या नावे दूर्वा, चंद्र म्हणजे पळस, मंगळ म्हणजे खैर, शुक्र म्हणजे औदुंबर, बुध म्हणजे अर्जुन, गुरू म्हणजे पिंपळ, केतू म्हणजे दर्भ, शनी म्हणजे शमी आणि सूर्य म्हणजे सफेद रुई असे समजून वर्तुळाकार लागवड केली आहे. त्याच्या मध्यभागी उभे राहिल्यानंतर ती कल्पनाच मनाला भावल्यावाचून राहत नाही. पूर्वीच्या काळी वृक्षसंवर्धनासाठी पूर्वजांनी राबविलेल्या या संकल्पनेचा आधुनिक आविष्कार तोही कलात्मक पद्धतीने पाहताना विचारचक्र सुरू न झाल्यास नवल. याच पद्धतीने सप्तर्षी वनही विकसित केले आहे. विश्वामित्र, भारद्वाज, अत्रेय, विशिष्ट, जमदग्नी, गौतम, कश्‍यप या ऋषींच्या नावे झाडे लावण्यात आली आहेत. मेषच्या नावे रक्तचंदन, वृषभच्या नावे सातवीण, मिथुनच्या नावे फणस, कर्कच्या नावे पळस, सिंहच्या नावे कुसणे, तूळच्या नावे आंबा, मूळच्या नावे ओवळ, वृश्‍चिकेच्या नावे खैर, धनूच्या नावे पिंपळ, मकरच्या नावे शिसम, कुंभच्या नावे शमी तर मीनच्या नावे वड लावण्यात आला आहे. तेथे उभे राहिल्यावर निसर्गाचा हा ठेवा जतन करण्यासाठी ऋषींच्या नावाचा चपखल वापर कसा काय केला जाऊ शकतो हे समजून घेता येते. तेथून पुढे राशिवन आहे. आपली रास कोणती, त्याच्या नावे झाड कोणते हे शोधताही येते. तेथे वर्तुळाकार पद्धतीने राशींच्या नावे वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहेत. या वर्तुळाच्या बाहेर आणखी एक वर्तुळ नक्षत्रवनाचे आहे.
हे वनीकरण १९७४ मध्ये केले असले तरी कालपरवापर्यंत तेथे सिंचनाची व्यवस्था नव्हती. तेथे सुरुवातीला निसर्गाच्या लहरीपणाने वाढू द्या झाडे असे म्हणत लागवड झाली ती बाळसेदार झाली आहे. आता तेथे एक विहीर खोदण्यात आली आहे. तेथे वीज आल्याने पंप बसविण्यात आला आहे. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी लघु जलसिंचन योजनाही खाते राबविणार असल्याचे वनक्षेत्रपाल राजू देसाई यांनी नंतर दूरध्वनीवर मला सांगितले. माहिती देणारे केंद्रही तेथे सुसज्ज करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात सत्पाल हे गोव्याचे आकर्षण ठरल्यास चुकीचे ठरणार नाही.

बोंडला येथे प्राणिसंग्रहालय पाहताना तेथील कर्मचाऱ्यांकडून बरीच माहिती मिळाली. प्राण्यांच्या वर्तनाबाबत माहिती मिळालीच पण त्यांच्या आहाराच्या सवयीविषयी मिळालेली मी तरी पहिल्यांदाच ऐकली. तेथे असलेल्या किंग कोब्राला (नागराज) आठवड्यातून एक बिनविषारी साप खायला लागतो. तो सापही मेलेला नव्हे तर जिवंतच हवा. त्यासाठी बिनविषारी साप पकडण्यासाठी भटकंतीही वन कर्मचाऱ्यांना कधी कधी करावी लागते. एकेकदा नागराज तो साप पटकन खात नाही. त्यामुळे नागराजाने त्याला भक्ष्य करेपर्यंत त्या बिनविषारी सापाला जिवंत ठेवण्यासाठी बेडूक देण्याची वेळ देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर येते. तेथे दोन पाच फुटी अजगर आहेत. ते आठवड्यातून एकदा अख्खी कोंबडी गिळतात. त्यांना मरतुकडी व मेलेली कोंबडी नको. त्यांच्या पिंजऱ्यात तशी कोंबडी टाकल्यास त्याकडे सरळ ते दुर्लक्ष करतात. हे प्राणी पिंजऱ्यात असले तरी त्यांनी आपल्या नैसर्गिक सवयींत बदल केलेला नाही. तेथे सहा बिबटे असले तरी जाळीदार मैदानात एका दिवसाला एकाच बिबट्याला सोडण्यात येते. तसे का याची विचारणा केल्यावर सांगण्यात आले की एकापेक्षा जास्त बिबट्याला मैदानात सोडल्यास ते भांडतात. एरव्ही पिंजऱ्यात शांतपणे पहुडणारा व अभ्यागतांकडे केविलवाण्या नजरेने पाहणारा बिबटा मोकळ्या जागेत मात्र आक्रमक कसा होतो तेच कळत नाही. त्यांनाही आता आठवड्यातून एकदिवसच संचार स्वातंत्र्य (मर्यादित स्वरूपात) उपभोगायला मिळेल याची सवय लागली आहे. कारण पिंजरा उघडल्यावर सायंकाळी मैदानातील बिबट्या आपोआप आत जातो. तेथे असलेल्या अस्वलाला दररोज दुपारी साडेचार वाजता खाणे दिले जाते. एका जाळीच्या दरवाजामागे ते खाणे ठेवले जाते. साडेचारला तो दरवाजा उघडला जातो. साडेचार वाजण्याच्या सुमारास जणू घड्याळ आपल्याला कळत असावे अशा थाटात अस्वल त्या वर्तुळाकार रिकाम्या जागेतून जाळीच्या दरवाजाकडे जात तो पकडून कधी उघडतो याची वाट पाहत राहते. एरव्ही दिवसभर ते तिथे फिरकतही नाही. २५ डुकरे तेथे आहेत पण दगडांआड ती लपत असल्याने शोधावी लागतात. एकमेव असलेला कोल्हा चकवा देत पळत राहतो.

No comments:

Post a Comment