Tuesday, January 15, 2013

चकन दा बाग

जम्मू काश्‍मीरमधील ऑक्‍ट्रॉय या भारत पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेला भेट दिल्यानंतर पीर भद्रेश्वर येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट दिली. पण त्याच वेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही आंतरराष्ट्रीय सीमेसारखी व्यवस्था असेल असे मला वाटले नव्हते. धुळीने भरलेल्या रस्त्यावरून (मागे पुढे डझनभर कमांडोंसह) सहा तासांच्या प्रवासानंतर पूंछमध्ये पोचल्यावर काय दृष्टीस पडले तर उंचच उंच डोंगररांगा आणि केविलवाणा बाजार. त्यावरून त्या परिसराच्या आर्थिक स्थितीचा अंदाज आल्यावाचून राहिला नाही.
पूंछवरून विसेक किलोमीटरवर चकन दा बाग हे भारताचे शेवटचे ठाणे. त्या पलीकडे रावलाकोट हे पाक व्याप्त काश्‍मीरमधील गाव. सध्या चकन दा बाग भागातील लोक वगळता बाहेरच्या लोकांसाठी या परिसरात प्रवेश निषिद्ध. कारण ही आहे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा. अवघ्या काही मीटरवर पाकिस्तानी लष्कर (रेंजर्स नव्हेत) मशिनगनच्या चापावर बोट ठेवून खडे. आपल्याकडेही तसेच चित्र. कुठून केव्हा गोळी सुटेल व गोळ्यांचा वर्षाव सुरू होईल हे सांगणे महाकठीण काम. तसेच सीमावर्ती भाग भू सुरूंगांनी भरलेला. एखाद्या नको त्या ठिकाणी पाय पडला तर जीवच गमवावा लागायचा (नाहीतर पाय गमवावा लागणे हे ठरून गेलेलेच). त्यामुळे मी तेथे जाण्याअगोदर सोबत असलेल्या मेजरचा सल्ला तंतोतंत पाळण्याबाबत वारंवार सूचना करायला वरिष्ठ लष्करी अधिकारी विसरले नाहीत. सुरुंग कुठे आहेत याचे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार फलक लावलेले असतात तरी प्रेमात आणि युद्धात सारे क्षम्य तशीही स्थिती असते. त्यामुळे रस्ता सोडून विशेष म्हणजे मेजरची साथ सोडून कुठे जाऊ नये असे सांगण्यात आले.
काश्‍मिरी जनतेला पाकव्याप्त काश्‍मीरमधील आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी (पाकव्याप्त काश्‍मीरमधील लोकांना काश्‍मीरमधील नातेवाइकांनीही भेटण्यास येण्यासाठी) तीन मार्ग खुले करण्याबाबत भारत पाकिस्तानचे एकमत झाले. त्यापैकी एक मार्ग उरी येथून खुला करण्यात आला. दुसरा मार्ग चकन दा बाग येथून खुला करण्यात आला, तिसरा मार्ग मागे लिहिल्याप्रमाणे (जम्मू सियालकोट) ऑक्‍ट्रॉय येथून खुला होणार आहे. चकन दा बाग हा भाग प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा परिसर असल्याने तेथे निर्मनुष्य प्रदेश (नो मेन्स) नाही. भारताचे नियंत्रण संपते त्या दुसऱ्या इंचालाच पाकिस्तानचे नियंत्रण सुरू होते. तेथे आंतरराष्ट्रीय सीमेसारखे फाटक बसवावे अशी कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. पण सरकारी इच्छेमुळे ते शक्‍य झाले आहे. चकन दा बाग येथील घनदाट अरण्य साफ करून तेथे आता हॉटमिक्‍स पद्धतीने डांबरीकरण केलेला रस्ता अस्तित्वात आला आहे. दोन्ही बाजूला फाटके बसविण्यात आली. फाटकांना समांतर अशी तारेच्या कुंपणाचीही व्यवस्था करण्यात आली. एमिग्रेशनचा परवाना देण्यासाठी आता प्रशस्त कार्यालयही चकन दा बाग येथे सुरू करण्यात आले आहे.
महिन्यातून दोन सोमवारी पाकिस्तानकडून चाळिसेक नातेवाइकांना भारतात प्रवेशासाठी पाठविले जाते. तेवढेच नातेवाईक भारताकडूनही पलीकडे पाठविले जातात. एरव्ही या लोकांना पाकिस्तानात जाण्यासाठी पंजाबमधील वाघा सीमेवरून पाकिस्तानात जाऊन पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये यावे लागत असे वा त्याच पद्धतीने पलीकडच्या लोकांनाही द्राविडी प्राणायामाचा अनुभव येत असे. आता या सीमेवरून (चकन दा बाग) फक्त जम्मू काश्‍मीरमधील लोकच पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊ शकतात, त्यासाठीही सीमेपलीकडे नातेवाइकांची यादी देऊन त्या नातेवाइकांनीही या प्रवासाला मान्यता द्यावी लागते. हीच पद्धती तेथून भारतात येणाऱ्यांसाठीही लागू आहे.
चकन दा बाग येथे मला स्थानिक ग्रामस्थ महमद बशीर यांची भेट घेता आली. ते म्हणाले, भूकंपाने अर्ध्याअधिक चकन दा बागला उद्‌ध्वस्त केले होते. आता कुठे ते सावरू लागले आहे. तेथील जनतेने सारे पाहुणे सीमेपलीकडे आहेत. भारतातील व्यक्ती हिंदू तर पाक व्याप्त काश्‍मिरातील भाऊ मुस्लीम अशीही अनेक उदाहरणे आहेत. आता सीमेपलीकडे महागाईने कहर केल्याने दैनंदिन चीजवस्तू घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांकडे येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही या माहितीस दुजोरा दिला. कपडे व धान्यही वाहून नेता येईल तितके नेले जाते. विचारणा केली तर नातेवाइकांनी भेट दिली असे सांगितले जाते. पाच महिन्यांपूर्वी येथे फाटक करकरले त्या वेळी पाकव्याप्त काश्‍मीरमधील लोक मोठ्या संख्येने भारतात प्रवेश करण्यासाठी धावून आले होते, अशी आठवणही बशीर यांच्याकडून ऐकता आली.
अशा या चकन दा बागला भेट दिली त्या वेळी पाकिस्तानने काश्‍मिरी बांधवांचे स्वागत आहे असा लावलेला फलक ठळकपणे दृष्टीस पडला. दुसऱ्याच फलकावर ला इलाह इल्लीलाह असे लिहिले आहे. भारताने मात्र मजहब नही सिखाता आपस में बैर रखना आणि सर्वांचे स्वागत असे फलक लावले आहेत.
त्याच रात्री चकन दा बाग येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तारेच्या कुंपणापलीकडे पाकिस्तानच्या सीमेपासून अवघ्या तिसेक मीटरवर लष्करी ठाण्यात राहण्याची संधी मला मिळाली. रात्री मी गस्तही घातली (बाकी तपशील गोपनीयतेच्या शपथेमुळे देता येत नाही). शेजारून वाहणारा ओढा पाकव्याप्त काश्‍मीरच्या दिशेने वाहत होता. रात्रीच्या अंधारात ओढ्याचा आवाज काळजाला भिडत होता. ओढ्याप्रमाणेच दोन्हीकडच्या माणसांच्या मनाचा प्रवास होत असेल अशी कवी कल्पना मला स्पर्शून गेली. सकाळ झाली नि चकन दा बागचे सुनेपण अंगावर आले नि मी परतीच्या प्रवासाला निघालो.

No comments:

Post a Comment