Sunday, May 5, 2019

पर्रीकर यांच्या वारशाची कथा

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्याने गोमंतकीय राजकारणात एक पोकळी निर्माण झाली ही गोष्ट खरी असली त्याही पेक्षा भाजप राज्यात पोरका झाला ही गोष्ट मोठी आहे. पर्रीकर यांची प्रतिमा पक्षातीत होती त्यामुळे पणतीतील साडेचार हजार ख्रिस्ती व बाराशे मुस्लीम मतांपैकी बहुतांश मते ते भाजपचे उमेदवार असूनही सहा निवडणुकांत त्यांना मिळत राहिली होती.
पर्रीकर यांच्या जाण्यानंतर त्यांच्या राजकीय वारशाची चर्चा होणे ही अपरिहार्य अशी बाब होती. तशी ती चर्चा झाली मात्र त्याचा शेवट हा क्लेशदायी झाला आहे. तो भाजपला उपकारक ठरणार नाही उलट पणजीच्या विधानसभा पोट निवडणुकीत भाजपला त्याचाच जास्त फटका बसणार आहे. पर्रीकर हे या जगाचा एवढ्या लवकर निरोप घेतील अशी कोणालाही कल्पना नव्हती. खुद्द त्यांनाही त्याची कल्पना आली नाही, दिल्लीत गेल्यावर प्रकृतीच्या कुरबुरी सुरु झाल्या होत्या,त्याचे खापर ते दिल्लीतील प्रदूषित हवेवर फोडून मोकळे होत होते. नेहमीप्रमाणे १२.-१४तास राबत होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. ते मुख्यमंत्रीपदी परत आले आणि आघाडी सरकारची तारेवरची कसरत करताना झालेली दगदग त्यांना पेलवली नाही आणि इहलोकाची यात्रा त्यांना लवकर आटोपती घ्यावी लागली.
पर्रीकर यांना दुर्धर असा आजार झाल्याचे निदान झाल्यापासून वर्षभर ते उपचाराखालीच राहिले. एककेंद्रीत सत्ता राबवण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी शोधला नाही. संरक्षणमंत्री जाताना त्यांनी आपलेच संयुक्त सचिव असलेले सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांना राजकीय आखाड्यात उतरवले. पुढच्या निवडणुकीत आपण राज्यात परत येऊ, संरक्षण मंत्रालयाची दशकभर विस्कळीत झालेली घडी बसवण्यापुरतेच आपले दिल्लीत काम आहे अशी त्यांची धारणा होती. लोकसभा निवडणुकीआधी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर पंतप्रधानपदासाठी सर्वमान्य चेहरा म्हणून त्यांचे नाव पुढे करण्याची योजना तयार होती. मात्र २०१४ ची निवडणूक नरेंद्र मोदी यांनी आपल्या करिश्यावर जिंकल्यानंतर आपण आणखीन राजकीय पल्ला गाठू शकणार नाही याची पुरेपूर कल्पना पर्रीकर यांना आली होती. त्यामुळे ते राज्यात परतण्यासाठी इच्छूक होते.
तसे ते परत आले परंतु राज्यशकट फारकाळ हाकू शकले नाहीत. जेमतेम वर्षभरात त्यांना दुर्धर आजाराने गाठल्याचे निदान झाले, त्यानंतर वर्षभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. त्यात ते अपयशी ठरले आणि पणजीत विधानसभा पोट निवडणूक जाहीर झाली. सुरवातीला कुंकळ्येंकर हेच भाजपचे उमेदवार असतील असे वाटत होते मात्र मध्येच पर्रीकर यांचे ज्येष्ठ पूत्र उत्पल यांच्या नावाचे पिल्लू सोडून देण्यात आले. उत्पल हे राजकारणात येणार नाहीत असाच सर्वांचा होरा होता. पर्रीकर यांनी आपल्या कुटुंबियांना राजकारण व सरकार यापासून मुद्दामहून दूर ठेवले होते. आपला व्यक्तीगत खर्चही स्वतःच्या खिशातून करण्याची साधनशुचिता जपणाऱ्या पर्रीकर यांनी हे जाणीवपूर्वक केले होते. तरीही काहींनी उत्पल यांना भरीस पाडले. त्यांनीही तयारी दर्शवली. त्याचे नाव दिल्लीत पाठवल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केली.
दिल्लीत मात्र वेगळेच झाले, उमेदवारी कुंकळ्येंकर यांना जाहीर झाली. त्यामुळे उत्पल यांना राजकारणात ओढू पाहणाऱ्यांचे चेहरे बधण्यासारखे झाले. त्यांना उमेदवारी का नाकारली याचे कारण भाजपचा कोणताही नेता आजवर देऊ शकला नाही यातच सारेकाही आले. मात्र उत्पल यांचे नाव चर्चेत आणून त्यांना उमदेवारी नाकारण्याची किंमत  भाजपला मोजावी लागणार आहे. पर्रीकर यांचा राजकीय वारसा खरोखरच पुढे न्यायचा होता तर पणजीत बिनविरोध निवडणूक करून त्यांना खरोखरची श्रद्धांजली वाहणे योग्य ठरले असते. पण राजकीय साठमारीत असा संवेदनाशील विचार कोणी करेल का?

No comments:

Post a Comment