Friday, July 25, 2014

सुशासनाच्या दिशेने पाऊल

सरकारी कामात सुसुत्रता आणण्यासाठी मुक्तीनंतर पन्नास वर्षांनी का होईना प्रयत्न करावेसे सरकारला वाटले याचे स्वागत केले पाहिजे. कल्याणकारी राज्य त्यामुळेच अस्तित्वात येणार आहे.
सरकारी काम आणि सहा महिने थांब असे मस्करीने म्हटले जाते मात्र ते वास्तव आहे. सरकारी काम कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय वेळेवर होत नाही हा सर्वांचाच अनुभव असतो. कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यास कामांसाठी अनेक चकरा मारणारे नागरिक तेथे भेटतात. सरकार 21 व्या शतकात आजही कागदपत्रांसाठी सरकारचे उंबरठे झिजवणारे नागरिक हे चित्र बदलू शकलेले नाही हे वास्तव आहे.
सरकारी कामांसाठी लागणारी प्रक्रीया वेळकाढू असते. नागरिकांची सनद मध्यंतरी चर्चेत आली होती. अनेक कार्यालयात भिंतीवर ती लटकावण्यात आली होती. मात्र ती प्रत्यक्षात कधी आलीच नाही. माहिती हक्क कायदा आणि नागरिकांची सनद या दोन्ही चळवळी देशात एकाचवेळी सुरु झाल्या. माहिती हक्काला कायद्याचे स्वरुप मिळाले मात्र नागरिकांची सनद कायद्याचे रुप घेण्यास आणखी काही काळ लागणार आहे.
पूर्वीच्या काळी सरकारी कर्मचाऱ्यांना लोकसेवक म्हटले जात असे. ते जनतेसाठी आहेत ही भावना वाढीस लागण्यासाठी पब्लीक सर्वंट हा शब्द मुद्दामहून वापरण्यात येत होता. हळूहळू त्या शब्दाचे रुपांतर गर्वर्नमेंट सर्वंट म्हणजे सरकारी कर्मचारी केव्हा झाले तेच समजले नाही. मात्र हा नवा शब्द अक्षरक्षः खरा आहे. कर्मचारी हे जनतेसाठी की सरकारसाठी असा प्रश्‍न पुढे आल्यास ते सरकारसाठी असेच उत्तर द्यावे लागेल.
राज्याची लोकसंख्या 15 लाख गृहित धरून 60 हजार सरकारी कर्मचारी आहेत असे मानले तर 25 कर्मचाऱ्यांमागे एक सरकारी कर्मचारी असे हे प्रमाण आहे. असे असताना लोकांना कामांसाठी हेलपाटे घालावे लागतात याचा सरळ अर्थ कर्मचारी काम करत नाहीत असा होतो. ते काम करतील हे पाहण्याची जबाबदारी संचालक आणि सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांवर असते. त्यांनी आपले कर्तव्य नीट पार पाडले नाही म्हणून सरकार त्यांच्यावर यापुढे तरी कारवाई करणार का हा मूळ प्रश्‍न आहे.
कर्मचाऱ्यांनी संचालकांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा झाला सर्वसाधारण समज. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी काय काय करावे लागते कोणालाही विश्‍वासात घेऊन विचारले तर सत्य बाहेर येते. राजकीय आशिर्वादाशिवाय सरकारी नोकरीपर्यंत पोचलेला नशीबवानच म्हणायला हवा. त्यामुळे नोकरीसाठी आशिर्वाद देणारा राजकारणी त्या कर्मचाऱ्याची नंतरही पाठराखण करतो, त्यामुळे कर्मचाऱ्याची बांधीलकी खात्यापेक्षा त्या राजकारण्याशीच जास्त असते. त्यामुळे तळव्यावरील फोडासारखे अशा कर्मचाऱ्यांना जपणे त्या खातेप्रमुखाला अनेकदा भाग पडते. त्यातून तोटा होत असल्यास तो सरकारचा नव्हे तर जनतेचा होतो.
कामे न करणारे कर्मचारी ही एक गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेळचे फायदे आणि निवृत्तीवेतन यावर सरकार किती खर्च करते याची माहिती गुरुवारी दिली आहे. त्याचवेळी त्या तुलनेत त्या दर्जाची सेवा मिळते का असाही प्रश्‍न त्यांनी विचारला.
तोच प्रश्‍न महत्वाचा आहे. सध्या वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्यासाठी सरकारी कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. गेली चार वर्षे हा प्रश्‍न सुटलेला नाही. आता निर्णायक लढा देण्याचे त्यांनी ठरविले आहे. संपाची नोटीसही दिली आहे. संघटनेने आपल्या सदस्यांचे हित पाहण्यात काही गैर नाही, मात्र कर्मचारी काम करतात की नाही हे पाहण्याची नैतिक जबाबदारी संघटना कधी घेणार.
सरकारी कर्मचाऱ्यांपैकी कितीजण संघटनेचे सदस्य आहेत हा आणखी एक स्वतंत्र विषय. तरीही संघटनेने कर्मचाऱ्यांत कामाची शिस्त बाणावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी म्हापशातील कार्यालयांची अचानक पाहणी केली. त्यावेळी कर्मचारीच कामाच्या जागी नसल्याचे आढळले. सचिवांनीही पणजीत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडले होते. त्यामुळे लोकांची कामे न होण्याचा कामे न करणारे कर्मचारीच नव्हे तर कामाच्यावेळी आपली कामे करत गावभर फिरणारे कर्मचारीच जबाबदार आहेत हे सिद्ध झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वेतनश्रेणीतील तफावत दूर करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे एकीकडे हे सगळे कामे करत नाहीत मात्र हक्कांसाठी भांडतात असा सर्वसामान्य माणसाचा समज झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी तालुका पातळीवरही अचानकपणे पाहणी करावी अशी अनेकांना वाटणे यातून सरकारी कार्यालयांत काय चालले आहे याची पुरेशी कल्पना येते.
त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी सरकारने आता मान्य केली नाही तरी जनमताचा रेटा त्यामागे नसेल. जनता या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीला वैतागली आहे. अमूक एक काम ठराविक वेळेत होण्यासाठी मंजूर झालेल्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. तो कायदा लागू करण्यासाठी आता फक्त नियमावली तयार करण्याचाच अवकाश आहे. त्यात दंडाची तरतूद आहे. सुरवातीला ती तरतूद लागू करता येणार नाही कारण कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या आहे की नाही हे पाहणे आवश्‍यक आहे असे सरकारला वाटत होते. मात्र तसे काही वाटण्याची गरज नाही. 25 नागरिकामागे एक कर्मचारी असताना कर्मचाऱ्यांचा अभाव जाणवणे शक्‍यच नाही.
एका खात्यातून दुसऱ्या खात्यात बदली करण्यासाठीची तरतुद केली पाहिजे. त्यासाठी समान केडर हवे असल्यास प्रत्येक पातळीवर करावे. मात्र जेथे गरज आहे तेथे कर्मचारी द्यावेत आणि तेथे जास्त आहेत तेथून त्यांना दुसऱ्या जागी हलवावे. असे करण्यास फारतर सहा महिने लागू शकतील. मात्र नव्या आर्थिक वर्षात नागरिकांना आपली कामे पटापट होतील हा सुखद अनुभव सरकारने द्यावा.
कर्मचाऱ्यांना कामाला लावणे हा झाला एक भाग. दुसरा भाग आहे तो कामात सुसुत्रता आणण्याचा. अगदी बेकायदा बांधकामांचा विचार केल्यास घर बांधण्यासाठी लागणारे नानाविध परवाने घेण्यात जाणारा वेळ पाहिल्यास पंचायतीकडून ना हरकत दाखला घेऊन छप्पराची सोय करणे कोणालाही सोपे वाटते. रेशनकार्ड हरवले तर नवे मिळविण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी लागत नाही. कागदोपत्री एखादे काम आठवडाभरात व्हावे असे असले तरी प्रत्यक्षात त्याला महिना लागणे ठरून गेलेलेच असते. निवासी दाखला मिळविण्यासाठी करावी लागणारी प्रक्रीयाही अशीच किचकट आहे. युवक वा युवतीसाठी निवासी दाखला घ्यायचा असल्यास जन्माला आल्याचा दाखला, तो वा ती शाळेत होती याचा दाखला असे नानाविध दाखले दिल्यानंतरही पून्हा तलाठी चौकशी करणार. कितीही वेगाने हे काम झाले तरी दोन महिने यात जातात. या सर्वांची सुटका या प्रतीक्षा कालावधीतून करणे सरकारचे कर्तव्य आहे.
सरकारने आता त्यातही लक्ष घातले ही एक चांगली बाब आहे. एन. डी. अगरवाल या निवृत्त अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सर्व खात्यातील प्रक्रीया सुटसुटीत करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. अगरवाल याना या समितीचे अन्य दोन सहकारी अद्याप मिळायचे आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात हे काम सुरु होणार आहे. सरकारी मुद्रणालयाचे संचालकपदी असताना अगरवाल यांनी स्वतःच अभ्यास करून कायद्याची पुस्तके अद्ययावत केली. त्यामुळे अभ्यास करण्याची त्यांना सवय आहे. पणजी मार्केट घोटाळ्याचा तपासही त्यांनी केला होता. कर्तव्यकठोरपणामुळे कर्मचारी त्यांच्यावर नेहमीच नाराज असतात. हा भाग सोडला तरी अगरवाल होते म्हणून मडगावातील कार्यालये तेथील प्रशासकीय कार्यालय संकुल इमारतीत अल्पावधीत आणि कोणत्याही गोंधळाविना हलविणे शक्‍य झाले असे मुख्यमंत्र्यांचेच म्हणणे होते.
त्यामुळे येत्या काही महिन्यात महसूल, पंचायत, वीज, पाणी असा सर्वसामान्यांचा नेहमी संबंध येणाऱ्या खात्यातील कामकाजाची प्रक्रीया जरी सुटसुटीत केली तरी बहुतांश काम झाले असे मानावे लागेल. अगरवाल ही सूचना करताना कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरही बोट ठेवणार का याविषयी कुतूहल आहे. आजवर मामलेदार ते जिल्हाधिकारी असा प्रवास करताना त्यांची बदली अनेक खात्यात झाली. गेले तेथे आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला होता. अगदी समाजकल्याण संचालकपदी असताना बोगस लाभार्थ्यांची यादी उघडकीस आणली होती. त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल आक्षेप असू शकतील मात्र जनतेचे पैसे घेता तर त्यांच्यासाठी काम करा हा त्यांचा संदेश नजरेआड करता येणारा नाही.
केवळ अगरवाल यांना या समितीचे अध्यक्षपद दिले म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी या समितीकडे साशंकतेने पाहता कामा नये. त्यांनीही समितीला आपणहून सूचना केल्या पाहिजेत. अनेकवर्षे त्या खात्यात काम केल्यामुळे त्यांनाच काम सुटसुटीत होण्यासाठी काय केले पाहिजे याचे ज्ञान इतर कोणापेक्षा जास्त असणार. त्याचा फायदा त्यांनी करून दिला पाहिजे. त्याचमुळे सर्वसामान्यांची कामे लवकर होतील आणि सरकार म्हणत असलेले सुशासन खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment