Sunday, July 13, 2014

दाबोळीच्या विकासातून पर्यटनाचा महामार्ग

दाबोळी विमानतळाचा देशी हवाई वाहतूक संकुल म्हणून विकास करण्यातून पर्यटन क्षेत्र दुपटीने विकसित होईल. जागतिक पर्यटनासोबत तेथील अनेक गोष्टी येथे येतील, त्या आपण स्वीकारणार का हाच प्रश्‍न आहे.
गेला आठवडाभर बिकिनी परिधान करणे आणि पब संस्कृती येथे असावी की, नसावी यावरून वाद विवाद झडत आहेत. श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांनी आपली शाखा येथे सुरू करून संस्कृती रक्षणाचे काम हाती घेणार हे जाहीर केल्यानंतर समाजमनात या विषयाबाबत प्रतिक्रियांचे तरंग उठू लागले आहेत. आता तरंगांच्या लाटा झाल्याने त्या धडकू लागल्या आहेत. गोवा हे जागतिक नकाशावरील पर्यटनस्थळ असल्याने साहजिकच प्रसार माध्यमांचे डोळे गोव्याकडे नेहमीच लागलेले असतात. त्यामुळे येथे कुठे खुट्ट झाले की, त्याचे पडसाद कारण, अकारण सगळीकडे ऐकावयास मिळतात.
हे सारे सुरू असताना गुरुवारी उद्योगपती रतन टाटा गोव्यात आले होते. प्रसार माध्यमांशी अवाक्षरही त्यांनी काढले नसले तरी विमानतळावरील कक्षात त्यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष किरीट मगनलाल, अतुल पै काणे आदींशी केलेल्या चर्चेवेळी राज्याला पर्यटन विकासात असलेल्या संधीबाबत आपली मते स्वच्छपणे मांडली होती. टाटांना गोवा हा एक दिवस जागतिक पातळीवर पर्यटन क्षेत्रात नाव कमावेल, याचा अंदाज आता आलेला नाही. त्यांनी गोव्यात ताज हॉटेलांची साखळी विणली तेव्हाच त्यांना त्याची कल्पना होती.
एका बाजूने पर्यटनाच्या एका अंगाला विरोध होत असतानाच पर्यटन विकासाचे स्वप्न घेऊन टाटा गोव्यात आले होते. देशी वाहतुकीसाठी दाबोळी विमानतळाचा संकुल म्हणून विकास करण्याचा प्रस्ताव एअर आशिया कंपनी स्वीकारण्यास इच्छुक असल्याचे संकेत देण्यासाठी टाटा त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस यांच्यासह आले होते. हा विकास झाला तर पर्यटनात दुपटीने वाढ होणे उद्योग महासंघाने अपेक्षित धरले आहे.
खरेतर ही कल्पना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून पुढे आली आहे. दाबोळी विमानतळाचा विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, चार दशलक्ष प्रवाशांची हाताळणी करणे आता दाबोळीवर शक्‍य झाले आहे. अनेक विमाने गोव्याकडे यावी यासाठी आणि विमानतळाचे संकुलात रूपांतर करावे म्हणून राज्य हवाई वाहतूक धोरण आखणार आहे. जी कंपनी आपली चार विमाने दाबोळीवर रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी अपारंपरिक मार्गावर वाहतुकीसाठी उपलब्ध करेल, त्या कंपनीला इंधनावरील मूल्यवर्धित करावर सवलत दिली जाईल. यामुळे 2017 पर्यंत सहा दशलक्ष पर्यटक गोव्यात येतील, असा अंदाज आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनामुळेच पर्यटनाला चालना देण्यासाठीच विमानतळ संकुल ही कल्पना असल्याचे स्पष्ट होते. गोव्यात पोर्तुगीज काळापासून कार्यरत असलेला दाबोळीचा नागरी विमानतळ राज्याच्या मध्यभागी असून उत्तरेतील पेडणे व दक्षिणेतील काणकोण तालुक्‍यापर्यंतच्या लोकांना विमानसेवेसाठी केंद्र ठरत आहे. दाबोळी विमानतळाच्या क्षेत्रातील सर्वाधिक जमिनीवर नौदलाचा ताबा आहे. या विमानतळाचा भूखंड व विदेशातून येणारी चार्टर्ड विमाने, पर्यटकांची सख्या लक्षात घेतल्यास देशातील 17 आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी याचा 13 वा क्रमांक लागत असून गेल्या दोन वर्षांपर्यंत सरकारने या विमानतळाकडे विशेष लक्ष दिलेले नव्हते. दाबोळी विमानतळाचा विस्तार महत्त्वाचा आहे. तो आता होणे सुरू झाले आहे. दाबोळी विमानतळावर एका तासात 2750 प्रवासी उतरण्याची सोय असून ही सोय पुढील 10 ते 12 वर्षांपर्यंत पुरेशी आहे. विमानतळ प्राधिकरण सध्या 75 कोटी रुपये खर्चून रन-वेची क्षमता पाचपटीने वाढवत आहे. सरकार 2035 साली 9.5 दशलक्ष पर्यटक येतील या निकषावर मोपा विमानतळाच्या निर्माणाचे समर्थन करीत आहे, पण सध्या दाबोळीची पर्यटक वाहतुकीची क्षमता चार दशलक्ष इतकी आहे. दाबोळीचा विस्तार झाल्यास ती आणखी सहा दशलक्षापर्यंत वाढणार आहे. त्यामुळे दाबोळीचा विस्तार केल्यास 2035 सालीही विमान वाहतुकीसाठी दाबोळी पुरेसे ठरणार आहे.
सध्या दाबोळी विमानतळावर वर्षाकाठी 3.5 दशलक्ष पर्यटक उतरण्याची सोय होती. या विस्तारीकरणामुळे पर्यटक उतरण्याच्या क्षमतेत मोठी वाढ झालेली आहे. यामुळे राज्यात पुढील 30 वर्षे आणखी दुसऱ्या विमानतळाची गरजच भासणार नाही. नौदलाने नऊ एकर जमीन दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी दिल्यामुळे तेही काम मार्गी लागणार आहे. गेल्या वर्षी "बोईंग 787 ड्रीम लाईनर'चे विमान दाबोळीवर उतरले आणि या विमानतळाची क्षमता सिद्ध झाली. या विमानातून 391 ब्रिटिश पर्यटक गोव्यात आले होते. दाबोळी विमानतळावर आजवर उतरलेले ते सर्वांत मोठे विमान होते.
जगातील सर्वांत मोठे असलेल्या या विमानाची हाताळणी ब्रिटिश चार्टर्ड एजन्सीच्या थॉमसन कंपनीने केली होती. अशा प्रकारचे विमान एअर इंडियाने खरेदी केले असून, दिल्ली ते ऑस्टेलिया या मार्गावर ते विमान फेऱ्या मारीत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे "ड्रीम लाईनर बोईंग 787' हे विमान गेल्या वर्षी जून महिन्यात दाबोळी विमानतळावर उतरविण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. परंतु ती मान्य न करता नोव्हेंबर महिन्यात हे विमान उतरविण्यात परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये विमान दाबोळी विमानतळावर प्रवासी घेऊन उतरले. दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने अशा प्रकारच्या मोठ्या विमानांना येथे उतरविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जेणेकरून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईलच शिवाय राज्याच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागण्यास मदत होईल.
हे सारे दाबोळीकडे असताना दाबोळीच्या विकासासाठी खुद्द टाटांकडून हात पुढे येणे यासारखी दुसरी चांगली बाब नाही. टाटांच्या भागीदारीत असलेल्या एअर आशिया या हवाई वाहतूक कंपनीने दाबोळीचा विकास संकुल म्हणून करण्यास आपणास रस असल्याचे शुक्रवारी जाहीर केले आहे. दाबोळीचा देशांतर्गत विमान वाहतुकीचे संकुल म्हणून झाल्यास देशातील प्रत्येक शहरातून गोव्यात येण्यास येण्यास विमान उपलब्ध असेल. आजही पुणे, नागपूरसारख्या जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सोयीच्या वेळी विमाने नाहीत. नागपूरला जाण्यासाठी अक्षरशः मुंबईत थांबून दिवसभर प्रवास करण्याची वेळ येते. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या शहरांशी गोवा जोडला गेल्याने देशांतर्गत पर्यटकांचे पायही गोव्याकडे वळतील.
उद्योग महासंघाच्या म्हणण्यानुसार पर्यटकांची संख्या दुपटीने वाढेल आणि बारमाही रोजगारनिर्मिती यातून होईल. त्यामुळे हा विषय सरळपणे राज्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. राज्य सरकारने किनारी पर्यटनाला अंतर्गत पर्यटनाचा नवा चेहरा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. केंद्रीय पर्यटनमंत्रिपदही उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्याकडे आहे. त्यामुळे येत्या एक दोन वर्षात राज्याने पर्यटन क्षेत्रात कधी मारली नव्हती एवढी मुसंडी मारण्याची संधी आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून गोव्यात येण्यास आणि गोव्यातून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध झाली तर पर्यटकांची ये-जा किती वाढू शकेल, याची कल्पनाही करवत नाही. यासाठी येथे तेवढ्या संख्येने पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील, हे काही वेगळे सांगण्याची आवश्‍यकता नाही.
हे सारे केले जात असताना पर्यटनाचा चेहरा आटोक्‍यात राहील असे मानणे मात्र भाबडेपणाचे ठरणार आहे. जागतिक पातळीवर या व्यवसायात आणि क्षेत्रात असलेले बरेवाईट प्रवाह येथे येणार आहेत. गोमंतकीय संस्कृतीवर ते आक्रमण मानायचे की, पर्यटन हा मुख्य व्यवसाय असलेल्या राज्यात अशा काही गोष्टी असणारच असे गृहीत धरायचे याच्या निर्णयावर सारे काही अवलंबून आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यटनाला बाटलीबंद करणे आता शक्‍य नाही. एकतर पर्यटन स्वीकारा किंवा नाकारा, असा हा सरळ मामला आहे. नाकारणे तर शक्‍यच नाही त्यामुळे पर्यटन विकासाच्या हाकेला "ओ' देत राज्य सरकारने आता दाबोळी विमानतळाचा संकुल म्हणून विकास करण्यासाठी प्रत्यक्ष निर्णय करण्याची गरज आहे. त्यातूनच विकासाच्या महामार्गाची कवाडे खुली होणार आहेत.

No comments:

Post a Comment