Monday, September 23, 2013

गोव्यात गुन्हेगार का दडतात?

देशभरात अनेक राज्यांच्या पोलिसांना, दहशतवादविरोधी पथकांना हवा असणारा यासीन भटकळ हा गोव्यात राहत होता हे धक्कादायक वाटू शकते. मात्र गोव्याच्या बदललेल्या चेहऱ्याचा अभ्यास केला तर यात नवे काही नाही हे दिसून येते. आजही गोव्यात पर्यटक म्हणून कोण येत आहे यावर नजर ठेवणारी यंत्रणाच नाही. एवढेच कशाला मजूर म्हणून देशभरातून येथे येणाऱ्यांची पार्श्वभूमी कोणती हे तपासणारी यंत्रणा संथगतीने चालते की चार दोन महिने डोके लपविण्यासाठी कोणताही गुन्हेगार येथे बिनधास्तपणे राहू शकतो.
यासीन भटकळला एका स्थानिक मध्यस्थाच्या ओळखीमुळे घर भाड्याने मिळाल्याची माहिती आजवर समोर आली आहे. स्थानिक पोलिस केवळ याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे असे म्हणत हाताची घडी घालून बसणार आहेत, की तेही मुळात या स्थानिकांची त्याच्याशी ओळख कशी झाली. त्याला काही इतर राज्यातील लोकांचा थेट हातभार आहे का, याचा तपास केला जाणार आहे की नाही, यावरच याप्रकरणाचा पोलिसांनी धडा घेतला की नाही हे समजणार आहे.
"सिमी'चे कार्यकर्ते संघटनेचे नाव बदलून गोव्यात वावरत असल्याचा दावा भाजपचे प्रदेश तत्कालीन प्रवक्ते गोविंद पर्वतकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. इंटेलिजन्स ब्युरोच्या अहवालाचा हवाला देऊन त्यांनी सांगितले होते, की "सिमी' संघटनेच्या कारवाया बऱ्याच दिवसांपासून गोव्यात चालू आहेत. सभागृह समितीच्या गृह खात्यावरील चर्चेच्यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याशी राज्याच्या पोलिस महानिरीक्षकांनीही ते उघड केले होते. "सिमी'चे नाव बदलून स्टुडंटस इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया असे करण्यात आले असून, या संघटनेचे कार्यकर्ते गोव्यात आहेत. आता भाजपच सत्तेवर असल्याने अशा कारवाया सुरू आहेत की बंद झाल्या आहेत. त्याला आळा घातला तर नेमक्‍या कोण त्या कारवाया करत होत्या याची माहिती देण्याची जबाबदारीही आज भाजपवर येऊन पडते. त्यांनी याप्रकरणी मौन बाळगल्यास पोलिसांप्रमाणे त्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असेच म्हणावे लागेल.
यासीनने घर भाड्याने घेतले, मुळात घर भाड्याने दिल्यानंतर पोलिसांत तशी माहिती दिली होती की नाही, याबाबत अद्याप परस्परविरोधी माहिती समोर येत आहे. त्याने अन्य व्यक्तीच्या नावाने घर भाड्याने घेतले असे घरमालकाचे म्हणणे असेल, तर एकाने भाड्याने घेतलेल्या घरात अन्य व्यक्तीच राहत आहे हे लक्षात कसे आले नाही, याचे उत्तरही मिळाले पाहिजे.

घरे भाड्याने देण्याचा
व्यवसाय अनियंत्रित

राज्याच्या किनारी भागासह सर्वत्र खोल्या आणि घरे भाड्याने देण्याचा व्यवसाय अलीकडे फोफावला आहे. त्याला जोड दुचाक्‍या भाड्याने देण्याची आहे. त्याचा आणि गुन्हेगारांनी लपण्यासाठी सुरक्षित आश्रयस्थाने शोधण्याचा थेट संबंध आहे.
गोवा जागतिक ख्यातीचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यावर देश विदेशातील पर्यटकांना दीर्घकाळ येथे राहावेसे वाटू लागले. हॉटेलमधील काहीशा बंदिस्त वातावरणाऐवजी एखादे घर वा खोली घेऊन चवीने स्वयंपाक करून तेथे महिनोंमहिने राहण्यासाठी दरवर्षी येणाऱ्यांची संख्याही काही हजारांत आहे. या विनासायास भाड्याने मिळणाऱ्या खोल्याच गुन्हेगारांची आश्रयस्थाने बनल्यास नवल ते कोणते? जमीन विकली की हक्काचे निश्‍चित उत्पन्न म्हणून भाड्याच्या खोल्या बांधायच्या व महिन्याला काही लाखांत, तर काही हजारांत उत्पन्न मिळवायचे, असा समज असल्याने भाड्याच्या खोल्या बांधण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. भाड्याच्या खोल्या ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली आहे. किनारी भागात हजारांवर भाड्याच्या खोल्या आहेत व अजूनही बांधकामे सुरू आहेत. ग्रामपंचायत दप्तरी मात्र खोल्यांच्या नोंदी कमी प्रमाणात आहेत. अनेकजण अशा खोल्यांची नोंदही ग्रामपंचायतींत करत नाहीत, कारण त्यांना उगाच घरपट्टी वाढलेली नको असते. भाड्याच्या खोल्यांची वाढीव घरपट्टी भरावी लागत नसल्याने खोलीमालकही निर्धास्त आहेत. या खोल्या शंभर, दोनशे, अडीचशे, तीनशे स्क्वेअर फुटाच्या आहेत. काही खोल्या डबलरूम स्वरूपात आहेत. बहुतांश खोल्या सिमेंट पत्र्याच्या चाळी आहेत. काहींनी आरसीसी बांधकामातील दोन-तीन मजल्यापर्यंत ही खोल्या केल्या आहेत. या खोल्यांना सुविधेनुसार भाडे आकारले जाते. साधारणपणे एक हजार ते दोन हजार रुपये असे भाडे आकारले जाते. किनारी परिसरात भाड्याच्या खोल्या कोणाच्या किती आहेत, हे समजत नाही. या खोल्यांत कोण राहतात, याचे खोली मालकाला काही देणे-घेणे नसते. त्याला फक्त महिन्याला भाडे किती मिळते, याची काळजी असते. आपल्या खोल्या रिकाम्या राहणार नाहीत ना याची काळजी तो घेत असतो. अशा दुर्लक्षामुळे परराज्यांत, तसेच राज्याच्या इतर भागात गुन्हे करून आलेले सराईत गुन्हेगार येथे महिनोन्‌महिने राहतात. परिसरातही गुन्हे करतात. पकडले गेले तर कोठे, कोणत्या खोलीत राहत होते, हे उघड होते. पण बहुतांश पकडले जात नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांचे फावते आहे.

गुन्हेगारांचे बनले आश्रयस्थान
भाड्याच्या खोल्या म्हणजे त्यांचे विनाकाळजीचे आश्रयस्थान झाले आहे. या खोल्यांत दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार तसेच राज्याच्या इतर भागातील गुन्हेगार, फरारी आरोपी राहतात. खोली मालक जे भाडे सांगेल ते देतात. या खोल्यांत ऐषारामी जीवन जगतात. हे गुन्हेगार इतर खोल्यांत राहणाऱ्या विवाहिता, तरुणी यांना पैशाचे, नोकरीचे, लग्नाचे आमिष दाखवून परराज्यांत पळवून नेतात, असेही अनेक प्रकार घडले आहेत. काही परराज्यांतील गुन्हेगार या खोल्यांत वास्तव्य करून, त्यांच्या राज्यातील इतर गुन्हेगारांशी मोबाईलवर संपर्क साधून गुन्हेगारीचे प्रकार करतात. असे काही प्रकार उघडकीस आल्यानंतर परराज्यांतील पोलिस या परिसरात येतात व स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून या गुन्हेगारांना त्यांच्या राज्यात नेतात. असे प्रकार उघडकीस आल्यानंतर खोली मालकाला कळते.
खोल्यांत कोण भाडेकरू राहतो, याची नोंद काही खोली मालकांकडे असते. भाड्याच्या खोल्यांत एक-दोन महिने हे गुन्हेगार राहतात व खोली बदलून दुसऱ्या ठिकाणी जातात. ज्याठिकाणी ते राहतात त्या खोली मालकाला ते चुकीची, खोटी नावे सांगतात. मालकाला छायाचित्रही देत नाहीत. त्यांच्या गावाची नावे खोटी सांगतात. मालकही त्यांची माहिती ठेवत नाहीत. त्यामुळे एखादा गुन्हा करून हे गुन्हेगार रातोरात हलतात, असेही चित्र आहे. भाड्याच्या खोल्यांत राहणाऱ्या व्यक्तींची नोंद नसल्यामुळे पोलिसांना तपासात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे खोल्यांतील भाडेकरूंची छायाचित्रासहीत सर्व नोंद खोली मालक, ग्रामपंचायत, पोलिस यांच्याकडे असणे आवश्‍यक आहे, पण अशा नोंदी केल्या जात नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांना अशा खोल्यांत राहणे सोपे वाटते.
जिल्ह्यात भाड्याच्या खोल्यांत जे भाडेकरू राहतात, त्यांच्या नोंदी होण्यासाठी 144 प्रमाणे अधिसूचना काढण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार दिला आहे. दर सह महिन्याने तसा आदेश जारी केला जातो. या आदेशाचे पालन केल्यास भाडेकरूचे नाव, छायाचित्र, पत्ता, मूळ गाव, मूळ गावातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींची नावे, मूळ गावातील दूरध्वनी क्रमांक, संबंधित नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक, स्वतःचा मोबाईल क्रमांक, खोलीत कोण राहते, त्या सर्व व्यक्तींची नावे, कौटुंबिक माहिती, व्यवसाय, नोकरी आदी सर्व माहिती पोलिसांना द्यावी लागेल. त्यामुळे गुन्हेगार ओळखता येईल.
मुळात गोव्यात आताच गुन्हेगार येऊ लागले आहेत, असे मानणेही चुकीचे ठरणार आहे. पर्वरी येथील ओ कोकेरो हॉटेलमध्ये कुख्यात चार्ल्स शोभराज याला मुंबईचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांनी पकडले, त्यावेळी तो मोठा चर्चेचा विषय ठरला होता. त्याआधी आग्वाद तुरुंगातील सुकूर नारायण बाखिया पलायन प्रकरणानेही भुवया उंचावण्यास लावल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी सीमीशी संबंधित संशयित दहशतवादी दोन दिवस कुठलीही नोंद न करता पणजीतील एका हॉटेलात राहून गेल्याचे स्पष्ट होताच पोलिसांची धावाधाव झाली होती. त्यानंतर आगरवाडा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर हवा असलेल्या मेन्सोसा ऍडम पोइत्रा याला पकडल्याने गोवा हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनत चालले आहे यावर शिक्कामोर्तबच झाले होते. आता यासीनच्या वावराचे पुरावे समोर आल्याने गोवा हे सुरक्षितही राहिलेले नाही हे समजले आहे. पर्यटकांच्या रूपात येथे कोण येतो हे डोळे फाडून पाहण्याची गरज आहे. विदेशी पर्यटक येथे आल्यानंतर त्याने 24 तासांच्या आत माहिती देणे बंधनकारक नाही. फक्त पर्यटक सहा महिन्यांहून अधिक काळाच्या व्हिसावर आला असेल तरच त्याला पोलिसांच्या विदेशी नागरिक व्यवहार विभागाकडे नोंदणी करून घ्यावी लागते. अन्यथा कोण पर्यटक कोठे येतो, कोठे राहतो याची माहिती संकलित करण्याची कुठलीही कायदेशीर व अधिकृत व्यवस्था सध्या नाही. ती व्यवस्था जोवर उभी राहत नाही तोवर पर्यटकांच्या बुरख्याआड दडलेल्या अपप्रवृत्तीच्या लोकांना हटकणे सोपे जाणार नाही. नाही म्हणायला हवालदार वा त्यावरील कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला कधीही विदेशी नागरिकांकडे त्याच्या कागदपत्रांची मागणी करण्याचा अधिकार आहे, पण अधिकार बजावतो कोण हाच प्रश्‍न आहे.
येथे राहण्यासाठी विदेशींना परवाना देणारा व्हिसा वाढवून घेता येतो. त्यासाठी दिल्लीत पर्यटकांना अशी वाढ देणारी यंत्रणा सक्रिय असावी इतक्‍या सोप्या पद्धतीने मुदतवाढ मिळत असल्याचे दिसून येते. त्याचमुळे चार पाच वर्षे येथे तळ ठोकून असलेले आणि नानाविध व्यवसाय करणारे विदेशी पर्यटकही दिसतात. मुळात सुरवातीला मजेसाठी येणारे हे विदेशी आता येथील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक बनले आहेत. स्थानिक विविध सेवांसाठी तुलनेने अधिक रक्कम घेतात हे लक्षात आल्यानंतर विदेशींनी या सेवा पुरविण्याच्या क्षेत्रातच गुंतवणूक केली. एक एक करत सर्व व्यवसाय काबीज केले. आज गाड्या भाड्याने देण्यापासून सदनिका भाड्याने देण्यापर्यंत ते रेस्टॉरंट चालवण्यापर्यंत या विदेशींची मजल गेल्याचे दिसते. बरे सारे काही सुरू असते, पण प्रत्यक्षात ते स्थानिकाच्या नावावरच असते. जगात इतक्‍या प्रामाणिकपणे कुठे व्यवहार होत नसेल. गोमंतकीय जनतेच्या या गुणाचा नेमका फायदा या विदेशींनी घेतला आहे. तसाच फायदा गुन्हेगारही घेत आहेत. आता या साऱ्यात सरकारी हस्तक्षेपाशिवाय पर्याय नाही. आधीच विदेशी पर्यटकांची संख्या घटत असल्याची देश पातळीवरील आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. त्यातच गोवा असुरक्षित असा ब्रभा झाल्यास झाल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला टेकू देणारा हा व्यवसायही संपण्यास वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment