Sunday, September 1, 2013

डान्सबार संस्कृती अपरिहार्य?

कांपाल येथे डान्सबारवर पोलिसांनी  छापा टाकला. यानंतर डान्सबार संस्कृतीने राजधानीच्या शहरापर्यंत मजल मारल्याची चर्चा सुरू झाली आणि मात्र याची बीजे दोन दशकांपूर्वीच रोवली गेली होती, याकडे सोईस्कर डोळेझाक होत आहे.

गोवा म्हणजे पूर्वेकडचे रोम अशी ओळख पूर्वी केली जायची. ती पुसून नवी ओळख निर्माण व्हावी असे अनेकांना वाटत होते, मात्र आहे ती ओळख पुसतानाच नवी तयार होणारी ओळख कोणती आहे याचे भान कोणी ठेवले नाही. त्यामुळे भरवस्तीत डान्सबार सुरू होता हे सत्य समोर आले आहे. खाणींवरील कामकाज बंद झाल्यानंतर राज्याची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगामुळे तरून राहिली हे सत्य असले तरी पर्यटन व्यवसायवृद्धीची कोणती किंमत राज्याने मोजली आहे, याचाही कधीतरी हिशेब केला गेला पाहिजे. राज्य मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतर तरी ही प्रक्रिया केली जावी.
ऐंशीच्या दशकात विदेशींना गोव्यातील नितांत सुंदर समुद्रकिनाऱ्यांची भुरळ पडली. केवळ मौखिक प्रसिद्धीतून गोव्याने जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळविले होते ते आजवर टिकवले असले तरी पर्यटनामुळे येथील पायाभूत सुविधांवर आणि संस्कृतीवर पडलेला ताण कमालीचा आहे. पर्यटनातून येणारा पैसाही राज्यात आज राहत नाही असे दिसून येते. हा व्यवसाय स्थानिक तरुणांना बारमाही रोजगारही देऊ शकत नाही हेही वास्तव आहे. यामुळे पर्यटन विकासाची दिशा चुकली की काय अशी शंका घेण्यास जागा आहे.
गोव्याला निसर्ग सौंदर्याप्रमाणे भजन, कीर्तन, गणेशचतुर्थी, प्रत्येक मंदिरात साजरा होणारा देवदेवतांचा पालखी उत्सव, शिमगोत्सव असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अशा सभ्य व सुसंस्कृत संस्कृतीला तडा देऊन डान्सबार व रेव्हपार्ट्या यांना समर्थन देणे म्हणजे गोव्याच्या नावलौकिकाला काळिमा फासून गोव्याची प्रतिमा देशात तसेच परदेशात मलिन करण्यासारखे आहे.
गोव्यात पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने डान्सबार वा रेव्ह पार्ट्यांची गरज नाही. गोव्याचे किनारे व नैसर्गिक सौंदर्यच पर्यटकांना आकर्षित करण्यास पुरेसे आहे. डान्सबार व रेव्हपार्ट्यांमुळे गोव्याची नवी पिढी बिघडण्याची शक्‍यता आहे. तसेच गोवा म्हणजे "कार्निव्हल' अशी जाहिरात केली जाते. परंतु गोवा म्हणजे शिमगोत्सव, येथील भव्य मंदिरे असे दाखविले जात नाही. म्हणूनच गोव्याची संस्कृती व उज्ज्वल परंपरा टिकवायची असेल, तर राज्यात डान्सबार व रेव्हपार्ट्यांना अजिबात थारा नको. अलीकडे विदेशात पर्यटनासंदर्भात केलेली जाहिरात आक्षेपार्ह आहे, असा आक्षेप घेतल्यावर सरकारी पातळीवर तेथील जनतेच्या अभिरुचीप्रमाणे जाहिरातबाजी करावी लागते असे समर्थन केले गेले आहे. त्यामुळे जगभरातील अभिरुचीनुसार येथील पर्यटनाने चेहरा धारण करावा, अशी व्यवस्थाच सरकारी पातळीवर केली जात आहे असे मानता येते.
मुळात मनोरंजन हा समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक असून, त्यात दररोज लाखो माणसे रममाण झालेली असतात, म्हणून इतर माणसांना आपले दैनंदिन जीवन शांततेत जगता येते, हे कटुसत्य आहे. हे कटुसत्य आपण कसे स्वीकारणार आहोत, याचाही या निमित्ताने विचार झाला पाहिजे. वेश्‍या व्यवसाय आणि डान्सबारही मनोरंजनात मोडतात आणि या प्रकारची मोकळीक जगात सर्वत्र पाहायला मिळते. काही देशांमध्ये खुबीने या प्रकारांना प्रोत्साहनही दिले जाते. पर्यटकांची संख्या त्यामुळे त्या देशांमध्ये वाढते. येथे पुन्हा व्यापारच महत्त्वाचा ठरतो, असे दिसते. आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने घातलेली डान्सबार बंदी अमान्य करत व्यवसायाचा हक्क हिरावून घेणे घटनाबाह्य असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे सध्या तरी डान्सबार रोखण्यासाठी कायदा पुरेसा नाही. यापुढेही कायदा केल्यास कायद्याच्या प्रत्येक कलमातील पळवाट शोधण्याचा हा खेळ केवळ तरुण पिढीच नव्हे, तर अख्ख्या समाजाला पोखरून काढणार आहे. त्याची चिंता असणाऱ्यांना केवळ बंदीच्या घोषणा करून थांबता येणार नाही. त्याही पुढे समाज सुधारण्यासाठी पावले टाकावी लागणार आहेत.
"डीजे' आणि "फॅशन शो' आयोजित करून आपण मूळ संस्कृतीपासून दुरावत आहोत, याचा विचार कोणी करत नाही. फॅशन शो आयोजित करून डान्सबारचे भूत वेगळ्या तऱ्हेने साकारत जात नाही कशावरून? "फॅशन शो'सारखे कार्यक्रम व डीजे लावून गाण्यांच्या बोलांवर वेडेवाकडे अंगविक्षेप करून नाचणे ही आपली संस्कृती नव्हे. यातून कोणताही सामाजिक दृष्टिकोन व योग्य वातावरण साध्य होत नाही. आपणच आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. संस्कृती जपण्यासाठी आपण जर डान्स बार बंद करीत असू, तर मग "फॅशन शो'सारखे कार्यक्रम आयोजित करून डान्स बारचे भूत कशासाठी जागवत आहोत?
सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केली. आज गणेशोत्सवाचेही फिल्मोत्सव झाले आहे. गणेशोत्सवात कोणती गाणी अथवा कार्यक्रम ठेवावे याचे भान आयोजकांना असणे गरजेचे आहे. सण-उत्सवात भजन-कीर्तन ही गोव्याची परंपरा जर डीजे आणि फिल्मी गीतांबरोबरच "फॅशन शो'मध्ये परिवर्तित होणार असेल, तर त्याचा वेळीच विचार व्हायला हवा. संस्कृतीचे आपण काही देणे-घेणे लागतो, याचा संयोजकांनी विचार करायला हवा आणि या गोष्टी सण-उत्सवात तरी बंद व्हायला हव्यात.
पर्यटनाच्या आघाडीवर विचार करताना किनारी भागात कॉंक्रिटचे जंगल नंतर उभे झाल्याचे दिसते. पूर्वी सुंदर किनाऱ्यांसाठी येणारे पर्यटक त्यानंतर कॉंक्रिटच्या जंगलात हरविण्यासाठी येऊ लागले. विदेशातील पर्यटकांचे अड्डे तयार झाले. आजही इंटरनेटवर गोवा एस्कॉर्ट हे दोन शब्द टाइप केल्यावर गोव्यात नेमके काय सुरू आहे याचे दर्शन घडविणाऱ्या नानाविध वेबसाइट दिसतात. त्यामुळे किनारी भाग निव्वळ सोज्वळ पर्यटनावर अवलंबून आहे ही फारच भाबडेपणाचे होणार आहे. अधून मधून पोलिस वेश्‍यांना पकडतात पण त्यांच्याबरोबर पुरुष मात्र नसतात. पुरुष सोबतीला नसताना वेश्‍या आपल्या व्यवसाय कशा काय करू शकतात ते पोलिसच जाणे. पर्यटनात प्रतिष्ठित वेश्‍याव्यवसाय आहे तो "कॉलगर्ल्स"चा. पंचतारांकित पर्यटन संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. त्याला पायबंद घालण्यात आलेले अपयश त्याच भरीला कसिनो संस्कृतीचे झालेले आगमन आणि डान्सबारच्या रूपाने त्यांचे जाणवलेले अस्तित्व हे सारे ठरवून झाले आहे. गेली दोन दशके राज्याच्या पर्यटनाला किनारी पर्यटनाऐवजी दुसरा चेहरा देता येईल या शक्‍यतेवर फारसा भरच दिला गेला नाही. आजही अनेक पर्यटनस्थळी जाण्यासाठी धड रस्तेही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे किनारी भागातील अनियंत्रित पर्यटन व्यवसायाला आलेल्या सुजेला प्रगती समजण्याची चूक सगळ्याच पातळ्यांवर झाली आहे. "मागणी तसा पुरवठा' या न्यायाने जगभरात पर्यटनातील सर्व प्रवृत्ती अपप्रवृत्ती येथे आल्या आणि स्थिरावल्या आहेत. अमली पदार्थ व्यवहार, देहव्यापार ही त्याची प्रमुख अंगे आहेत. मात्र यावर नियंत्रण आणणे, हे वाटते तेवढे सोपे नाही. कारण त्यामुळे पर्यटन व्यवसाय कोलमडण्याचीच शक्‍यता अधिक आहे. पर्यटनाचा चेहरा नियोजनबद्ध पद्धतीने बदलणे हाच यावरील जालीम उपाय आहे. तोवर या "पर्यटन संस्कृतीची' अपरिहार्यता जाणवतच राहील.
.................................

कसिनोतून कोट्यवधीचा महसूल
नागरिकांच्या लेखी जुगाराचा एक प्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसिनोद्वारे गोवा सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 2012-13 या आर्थिक वर्षात कसिनोच्या माध्यमातून 135.45 कोटी रुपये गोवा सरकारला मिळाले आहेत. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार कसिनो उद्योगाने विविध करांच्या रूपात 135.45 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले आहेत. या करांमध्ये करमणूक कर, मद्य परवाने, प्रवेश शुल्क व बंदर शुल्क आदींचा समावेश आहे. या सर्व करांची वसुली राज्य सरकारच्या विविध विभागांनी केली आहे. एका कसिनोमध्ये साधारणपणे 500 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. प्रवेश शुल्काची सर्व रक्कम सरकारकडे भरली जाते. ही रक्कम एकूण 17.96 कोटी रुपये झाली आहे. 2011-12 या आर्थिक वर्षात हे शुल्क प्रतिव्यक्ती दोन हजार रुपये होते. कसिनोच्या ऑफशोअर परवान्याच्या रूपात प्रतिकसिनो 6.5 कोटी रुपये; तर ऑनशोअर परवान्याच्या रूपात प्रतिकसिनो 2.5 कोटी रुपये सरकारला मिळाले आहेत.
...............................................
व्यवहार मादक पदार्थांचा
नायजेरियन आणि केनियामधील अमली पदार्थ "व्यावसायिकां'नी 1980 मध्ये उत्तर गोव्यात हातपाय पसरण्यास प्रारंभ केला. 90 च्या दशकात अंजुणाच्या पट्ट्यात इस्रायली माफियांनी येण्यास प्रारंभ केला. आता किनारी भागातील अमली पदार्थ व्यवहाराची सारी सूत्रे रशियन माफियांनी हाती घेतली आहेत. 1997 व 98 मध्ये इस्रायली मंडळींनी किनारपट्टी भागात कहरच माजविला होता. इस्त्रायलींनी रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याचा मक्‍ताच घेतला व अशा पार्ट्यांमधून अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले होते.

No comments:

Post a Comment