Tuesday, September 10, 2013

एलओसीची सैर

ऑक्‍ट्रॉय म्हटले की नजरेसमोर येतो जकात हा शब्द. जम्मूत जाईपर्यंत ऑक्‍ट्रॉय नावाचे गाव आहे हे मला माहीतही नव्हते. जम्मूत पाय ठेवला आणि पीटीआयचे तेथील ज्येष्ठ प्रतिनिधी अनिल भट यांनी जम्मूत आठवडाभर राहणार तर ऑक्‍ट्रॉयला भेट दे असे सुचविले. अनिल माझ्याबरोबर त्यापूर्वी प्रशिक्षणाच्या काळात 15 दिवस असल्याने ऑक्‍ट्रॉयला जाण्यासाठी त्याची कार मागण्या इतकी जवळीक निर्माण झाली होती. अखेर ती दुपार उजाडली.  अनिल, ई टीव्हीचे प्रतिनिधी अमित जोशी, राजस्थान पत्रिकेचे उपसंपादक उपेंद्र शर्मा यांच्यासोबत मी जम्मूहून ऑक्‍ट्रॉयला निघालो.
भारत पाकिस्तान यांच्यातील शांतता करारानुसार काश्‍मीरमधून पाकिस्तानात जाण्यासाठी आणखी एक मार्ग खुला करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात जम्मू ते सियालकोट बससेवा सुरू होणार आहे. हा मार्ग ऑक्‍ट्रॉय येथूनच जातो. पाकिस्तानबरोबरची आंतरराष्ट्रीय सीमा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर पंजाबमधील वाघा सीमा येते. ऑक्‍ट्रॉयला जातानाही माझ्याही मनात तसेच चित्र होते. अनिलने त्या माझ्यासाठी नव्या असलेल्या रस्त्यावर कार चालविण्याची संधी मला दिली होती. कारची चारही चाके खड्ड्यातून कशी चुकवावी हा मला त्या वेळी काश्‍मीरमध्ये शांतता नांदण्यासाठी काय केले जावे असा केंद्र सरकारला पडणाऱ्या प्रश्‍नाइतकाच गहन प्रश्‍न पडला होता. गाडीचे चाक खड्ड्यात गेले की अनिलच्या चेहऱ्यावरील भाव टिपत माझे चालकत्वाचे कर्तव्य मी पार पाडत होतो. मधून मधून अमित हे गोव्याचे रस्ते नव्हेत अशी आठवणही करून देत होता (नौदल सराव बातमीदारीसाठी अमित एकदा गोव्यात आला होता).
जम्मूहून वीस किलोमीटरवर ही सीमा आहे. जे एस नगर पार केले नि अनिलने माहिती देणे सुरू केले. त्याने रस्त्याच्या समांतर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याकडे लक्ष वेधत पूर्वी सियालकोटहून जम्मूला येण्यासाठी रेल्वेसेवा कशी होती, दोन्ही बाजूने व्यापार कसा चालायचा याची माहिती देणे सुरू केले. न जाणो आजही मातीच्या ढिगाऱ्यावरील थोडी माती दूर केली तर रेल्वेचे रूळ दिसतील असे मला वाटत होते. पण रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे मला गाडी थांबविण्याची संधीच मिळाली नाही.
जम्मूहून ऑक्‍ट्रॉयकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांत दुरुस्तीच झालेली नाही. एका वेळी जेमतेम एक बस जाऊ शकेल इतपत रुंद असा तो रस्ता सध्या दुरुस्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी भराव घालून रस्ता रुंदही केला जात आहे. त्या रुंदीकरणात इतिहासाचे साक्षीदार असलेले रूळही मातीखाली जाणार याची चिंताही आमच्या बोलण्यातून डोकावत होती. तावी नदीत मिळणारे पांढरे शुभ्र गोटे आणून ते रस्त्याच्या बाजूला रचून ठेवण्यात येत होते. त्यावर माती टाकून रुंदीकरण तर काही भागात डांबरीकरण केले जात आहे. वाटेत आम्ही थांबलो त्या वेळी मुसा सय्यद या स्थानिक व्यक्तीशी आमची भेट झाली. त्याने सांगितले की यानिमित्ताने का होईना रस्ता रुंदीकरण होते याचा आनंद आहे. त्याही पुढे गेले दीडवर्ष सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबला असल्याने शेती कसता येते याचा आनंद आहे. नाही तर दिवसा गोळी लागून कोणी जखमी झाला नाही असा दिवस सीमावर्ती भागात उजाडायचा नाही. गुरांनाही हकनाक जीव गमवावा लागायचा. शेत कापणीच्या वेळीही बेछूट गोळीबार व्हायचा.
दोन वर्षांपूर्वी ऑक्‍ट्रॉयलगतच्या गावांत लष्कराने रणगाडे आणून ठेवले होते. रडार व्यवस्था तैनात केली होती. त्यामुळे शेती करणे अवघड झाले होते. आता शांततेच्या काळात त्याच जमिनींवर भातशेती डोलत आहे.
ऑक्‍ट्रॉयहून पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळाली तर तात्पुरता व्हिसा देण्याची व्यवस्था भारत सरकार कुठे करेल, किती दिवसांसाठी व्हिसा असेल, व्यापारालाही परवानगी असेल का? सीमेपलीकडील नातेवाईक किती दिवस राहू शकतील असे प्रश्‍न स्थानिकांसमोर आहेत, मुसा यांनीही तीच भावना बोलून दाखविली. सध्या ऑक्‍ट्रॉयहून पाकिस्तानात जाण्यासाठी पक्का मार्ग आहे. आपल्या आणि पलीकडच्या बाजूने फाटकेही आहेत. पण ती उघडली जातात फक्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या वाहनांसाठीच. एरवी हा मार्ग अधिकृतरीत्या बंद आहे. पलीकडे पाकिस्तानी रेंजर्स तर आपल्या बाजूने सीमा सुरक्षा दलाचा खडा पहारा.
सुरक्षा दलाच्या बड्या अधिकाऱ्यांची परवानगी अनिलने आधीच घेऊन ठेवली होती. ऑक्‍ट्रॉयला पोचताच मला रेल्वे स्थानकासदृश वास्तू दिसली. ती सध्या सुरक्षा दलाची चौकी आहे. अनिलकडे विचारणा केली असता तो म्हणाला, तुझा अंदाज बरोबर आहे. पूर्वी तेथे रेल्वे स्थानकच होते. फाळणीनंतर पाकिस्तानातून येणाऱ्या रेल्वे याच स्थानकावर थांबत असत. (फाळणीच्या वेळचा रक्तरंजित इतिहास त्याने मला या वेळी ऐकवला) फाटक उघडून पलीकडे गेल्यावर शंभर मीटरवर पाकिस्तानी फाटक आहे. त्याच्या बाजूला दिल है पाकिस्तानी असा ठळक फलकही आहे. पाकिस्तान झिंदाबादच्या फाटकावरील नाऱ्यास आपल्याबाजूच्या फाटकावरील सारे जहॉंसे अच्छा हिंदुस्तान हमारा या नाऱ्याने प्रत्युत्तर दिले आहे.
मला दोन्ही देशांना विभागणारी नेमकी रेषा कोणती हे जाणून घ्यायचे होते. तशी इच्छा मी सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे बोलूनही दाखविली. त्या अधिकाऱ्याने दाखविले की एक लोखंडी पाण्याच्या पाइप सारखी वस्तू आडवी टाकली गेली आहे ती सीमा. मला पक्‍क्‍यास्वरूपाच्या उभ्या खांबावरील नोंदीचा शोध घ्यायचा होता त्यावर त्याने एक पिंपळाच्या वृक्षाकडे बोट दाखविले. दोन्ही फाटकामंधील रस्त्याच्या उजव्या बाजूला पिंपळ आहे त्या ठिकाणी तेथे हद्द दर्शविणारा सिमेंटचा खांब होता. पिंपळाच्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाले त्या वेळी खांब पिंपळाच्या बुंध्यात सामावला गेला. आता पिंपळ हीच आंतरराष्ट्रीय सीमा. पिंपळाच्या दोन्ही बाजूंनी दोन्ही देशांनी व्यासपीठ उभारले आहे, त्याचा उपयोग काय हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहिला. पलीकडे पन्नास मीटरवरून पाकिस्तानी रेंजर्सचा जवान डोळ्याला दुर्बीण लावून आमच्या हालचाली न्याहाळतोय हे पाहत पाहतच आम्ही माघारी फिरलो पण येताना सीमेला लागूनच असलेल्या जगन्नाथाच्या मंदिरात आमची पावले नकळतपणे वळली.

No comments:

Post a Comment