Sunday, December 16, 2012

गोव्याची नवी ओळख कसिनो

गोवा म्हणजे कसिनो. कुठल्याही निर्बंधाविना सुरू असलेले कसिनो. येथे कोट्यवधीची रक्कम जरी जिंकली तरी याची खबर त्या कानाला लागणार नाही याची हमी. गोव्याची ही ओळख न कळत का होईना. जगभरातील लोकांत रुजली आहे. त्यामुळे कसिनोंत आपले नशिब आजमावण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा एक वर्ग आता तयार झाला आहे. माकाव, बॅंकॉक आणि काठमांडूनंतर आता कसिनो पर्यटनाच्या नकाशावर गोव्याने आपले स्थान निर्माण करून टिकविले आहे.
गोव्यात मटका, जुगाराचे प्रस्थ मद्याबरोबर वाढत असताना मांडवीत समुद्री कसिनो आला. त्यानंतर जवळजवळ सर्व पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेल्समधून स्लॉट मशिन्स आली. गोवा म्हणजे मौजमजेचे ठिकाण (लेजर अँड प्लेजर) अशी प्रसिद्धी आधीच होती. गेमिंगचे स्थळ, रेव्ह पार्ट्यांचे स्थान म्हणून हल्ली गोव्याची ओळख झाली. रात्रीचे बाजार जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत. व्यवहार करणारे बहुतांश बिगर गोमंतकीय परंतु नाव गोव्याचे अशी ही स्थिती आहे.
सुमारे दशकभरापूर्वी कसिनो या शब्दाचा उच्चारही दबकत केला जायचा. त्यावेळी एक दोन पंचतारांकीत हॉटेल्समध्ये कसिनो होते. नंतर पंचतारांकीत हॉटेल्स वाढत केली तसे कसिनो वाढले. आताही कसिनो सुरू करण्यासाठी पंचतारांकीत दर्जा त्या हॉटेलला हवा अशी अट आहे अन्यथा गोव्यातील बारच्या संख्येएवढे कसिनो असते. मांडवी नदीच्या पात्रात 2004 पासून कसिनोवाहू नौका स्थिरावल्या आणि कसिनो लोकांच्या फार जवळ आले. त्यानंतर कसिनो म्हणजे "कायदेशीर जुगार' असा सर्वांनी समज करून घेतला आणि तो दृढ झाला आहे. या नौका समुद्रात पाठविण्याची घोषणा करणाऱ्या सरकारलाही आजतागायत त्या नौकांना हात लावणेही जमलेले नाही यावरून कसिनोंची पकड लक्षात येते.
किनारी पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाच्या जोडीला कसिनो पर्यटनाने गोव्यात आपले बस्तान बऱ्यापैकी बसविलेले आहे. कसिनोंच्या ओढीने गोव्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नेमके किती जण या कसिनोंपोटी गोव्यात येतात याची निश्‍चित आकडेवारी सरकारी पातळीवर उपलब्ध नसली तरी मध्यंतरी मांडवी नदीत नांगरलेल्या सहा कसिनोमध्ये गोमंतकीय नागरिक दिवसाकाठी तीन कोटींचा जुगार खेळतात, असे एका पाहणीत स्पष्ट झाल्याचे आम आदमी, औरत अगेन्स्ट गॅम्ब्लिंग या संघटनेने जाहीर केले होते. पूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारच्या काळात कसिनोवर जाण्यासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत होते, ते भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आघाडी सरकारने पाचशे रुपये केले. ग्राहकांसाठी शुल्क कमी करण्यात आले असले, तरी कसिनोवाल्यांच्या परवान्यात भाजप सरकारने भरघोस वाढ केली आहे. त्यातच एकवीस वर्षांखालील युवकांना कसिनोवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कसिनोवर जायचे असल्यास पर्यटकांना एखाद्या हॉटेलवर उतरावे लागते आणि तेथूनच मग हॉटेलची प्रवेशिका घेऊन कसिनोवर जायला मिळते. या व्यवस्थेचा बरेच गोमंतकीय ग्राहक फायदा उठवून सरळ हॉटेलचालकांशी संधान बांधून प्रवेशिका घेतात व कसिनोवर प्रवेश मिळवतात असेही आता उघडकीस आले आहे. त्याशिवाय आता कसिनोंच्या चालकांकडेही वाणिज्य कर खात्याने दिलेल्या प्रवेशिका माणशी दोन हजार रुपये दरानेही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
ब्रिटिश, रशियन, इस्रायली, नायजेरियन व कॅनियन यांसारख्या "बॅकपॅकर' पर्यटकांनंतर "काठमांडू पर्यटन' गोव्याकडे आकृष्ट करण्यासाठी कसिनोचालकांकडून महत्त्वांकाक्षी योजना आखण्यात आल्या आहेत. दक्षिण आशियातील सर्वांत मोठा असा हा "प्लेविन लॉटरी'चा "नो लिमिट्‌स टेबल्स' तरंगता कसिनो मांडवी नदीत आहे. आतापर्यंत गोव्याकडे न फिरकणारा वेगळ्या प्रकारचा देशी-विदेशी पर्यटक येथे त्यामुळे येऊ लागला आहे. "महाराजा कसिनो' असे या कसिनोचे नामकरण करण्यात आले आहे.
25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्चाचा हा "क्रिएटिव्ह गॅम्बलिंग सोल्युशन' या मुंबईस्थित कंपनीचा हा कसिनो 70 मीटर लांबीचा आहे. मांडवीच्या तिरापासून 20 मीटर अंतरावर तो तरंगत. तिरावरून "गॅम्बलर्सना' कसिनोत ने-आण करण्यासाठी दोन छोट्या बोटी आहेत. या कसिनोतील 22 हजार चौरस फूट क्षेत्रफळात 35 टेबले आहेत. "अमेरिकन रॉलेट', "ब्लॅक जॅक' आदी गेम्स, "बार ऍण्ड रेस्टॉरंट' व करमणूक सुविधा, तसेच कोणत्याही क्षणी 40 ते 50 लाखांच्या रोख रकमेची व्यवस्था तेथे आहे. अशा जुगारासाठी आजपर्यंत काठमांडूकडे जाणारा देशी-विदेशी पर्यटक यामुळे गोव्याकडे वळू लागल्याचे सांगण्यात येते.
गेली काही वर्षे कसिनो गोव्यात असले तरी त्यांच्यासाठी म्हणून वेगळे नियम कायदे नसल्याने कसिनोवाल्यांवर तसे कोणतेही निर्बंध नव्हते. आताही नाहीत. सरकारने कसिनोतील गेमिंगवर (जुगारावर) नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी गेमिंग कमिशनरची नियुक्ती करण्याची तयारी चालविली आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोवा पब्लिक गॅम्बलिंग दुरुस्ती विधेयक संमतही करण्यात आले आहे. यामुळे नागरी न्यायालय व प्रशासकीय लवादाला आता कसिनोंतील फसवणूकीची प्रकरणेही हाताळता येत नाहीत. गेमिंग कमिश्‍नर नियुक्त होईपर्यंत गोव्यातील कसिनो निर्बंधमुक्त आहेत असेच म्हणावे लागेल.
कसिनोच्या मयसभेत एकीकडे गेम्स खेळताना (पत्त्यांच्या जुगाराचे व अन्य प्रकार) दुसरीकडे डान्स बार, डिस्कोथेक, फिल्म्स बघण्याचीही सोय आहे. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाल्यास आराम करायचा असेल तर "सोबत'ही उपलब्ध होते व ऐषआरामी खोलीही, फक्त पैसे मोजा म्हणजे बस्स. जुगार खेळण्यासाठी असलेले छोट्याशा बोटीतील सभागृह म्हणजे खेळाच्या क्‍लृप्त्या शिकवण्यापासून विदेशी जुगाराची माहिती, पत्ते पिसण्यापासूनचे धडे देणारा अड्डा. जोडीला सुरापान, सुंदरी आहेत (जगभरातील युवती गोव्यात सेवेला असतात). आज कसिनोवर जाण्यासाठी पणजीतील रस्त्यावर प्रामुख्याने शुक्रवार, शनिवार, रविवारी उभी राहणारी वाहने पाहिल्यास देशवासियांसाठी कसिनोंनी घातलेली भूरळ लक्षात येते. पैशाची दादत नसणाऱ्यांच्या गोव्यात विकएंडला त्यांच्या फेऱ्या असतात, त्यांत मुलींची संख्या मुलांएवढीच असते. रात्री दोन वाजल्यानंतर गोव्याचे रात्ररंग युवक युवतींसाठी आकर्षित करू लागले आहेत व येणाऱ्या काही वर्षात गोवा म्हणजे कसिनो ही ओळख आणखी घट्ट होत जाणार असे दिसते.


No comments:

Post a Comment