Sunday, December 16, 2012

किनारी गोवाची निर्मिती कोणाच्या पथ्यावर?

किनारी भागातील चेहऱ्यावर या अगोदर अनेकदा लिहून झाले आहे. लोकांनाही ते पटले होते, पण पूर्ण राज्याचे नाव जगभर बदनाम होईपर्यंत सरकारला या चेहऱ्याची दखल घ्यावीशी वाटली नाही असेच दिसून येते. पर्यटकांवर उटसूठ कारवाई करता येत नाही. त्याच्या आड आंतरराष्ट्रीय राजकारण, परराष्ट्रीय धोरण नि वकिलातींच्यामार्फत येणारा दबाव अशा गोष्टी येत असतात. सरकार उघडपणे या गोष्टी जनतेला सांगूही शकत नाही, पण पर्यटकांचे वर्तन नियंत्रणात ठेवण्यासाठी कायद्याचे पालन व रक्षण करण्यासाठी असलेल्या यंत्रणांचा धाक किनारी भागात ठेवणे सरकारचे कर्तव्य होते तसे न झाल्यानेच आज किनारी भाग अनियंत्रित व असुरक्षित असल्याचे चित्र रंगविण्याची संधी सरकारने सर्वांनाच दिली आहे.
पर्यटनावर राज्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे की नाही अशा चर्चांना आजच्या घडीला अर्थ नाही. कारण पर्यटनाने एक भयावह चेहरा धारण केला आहे. एकेकाळी नितांत सुंदर असलेले किनारे आता कॉंक्रिटच्या जंगलांनी भरून गेले, जात आहेत. दुसरीकडे किनाऱ्यांची धूप होऊ लागली आहे. त्यातच पर्यटकांची दादागिरी वाढली तर पर्यटन व्यवसाय कोलमडण्यास वेळ लागणार नाही. शेजारील सिंधुदुर्ग व कारवार जिल्ह्याने पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे येथील शांत सुंदर पर्यटन टिकविण्याचे आव्हान सरकारपुढे आहे व ते त्यांना पेलावेही लागणार आहे.
किनारी भागात सारेकाही आलबेल आहे असे पणजीत बसून सांगणे सहजसोपे आहे. किनारी भागात यापूर्वी पोलिसांवरही हात टाकण्याचे प्रकार घडले आहे. पर्यटकांच्या दोन गटांत मारामारी ते आता स्थानिकांना मारहाण असा या किनारी भागातील परिस्थितीचा प्रवास झाला आहे. तो रोखला न गेल्यास किनारी गोवा असा वेगळी संस्कृती असणारा प्रदेश उदयाला आला तर आश्‍चर्य वाटायला नको.
ब्रिटिश पर्यटक युवती स्कार्लेट किलिंगच्या खुनानंतर किनारी भागातील अमली पदार्थ आणि त्यात गुंतलेले सारे काही यावर मोठी चर्चा झाली. आता तर विदेशी वारांगनांना पोलिसांनी पकडल्याने साऱ्या चर्चेला एक वेगळे वळण मिळणार आहे. गोवा या मार्गावर जाणार याची कल्पना राज्यकर्त्यांना फार पूर्वीच यायला हवी होती. कुठलेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्र अशा प्रवृत्ती आणि अपप्रवृत्तींपासून मुक्त राहू शकत नाही. बाली असू दे वा पटाया त्यांनी या क्षेत्राच्या विकासाची वाटचाल कुठवर घसरू शकते हे यापूर्वीच सिद्ध केल्याने त्यापासून गोव्याने विशेषतः सत्ताधाऱ्यांनी धडा घेणे आवश्‍यक होते. पण या क्षेत्राची वाढ निकोप होईल, असा भाबडा आशावाद बाळगत क्षेत्र विकासावर भर दिला गेला व त्याची कटू फळे आज आकाराला आली आहेत. राज्याची अर्थव्यवस्था पर्यटन या एकमेव उद्योगावर अवलंबून आहे, सर्वसामान्य त्यावर अवलंबून आहेत असे फसवे आणि चुकीचे चित्र गेली काही वर्षे जाणूनबुजून रंगविले गेले. एका बाजूने खाणीवर गोवा अवलंबून तर दुसरीकडे पर्यटनावर या द्वंद्वात गोव्याचे काय झाले याचे विदारक चित्र सर्वांसमोर आहे. किनारी भागात सायंकाळनंतर सत्ता कुणाची चालते असा प्रश्‍न पडावा इतपत पर्यटकरूपी विदेशींची दादागिरी चालते. पोलिस या विदेशींसमोर गपगार का पडतात याचे उत्तर कधी तरी शोधले गेले पाहिजे. किनारी भागातील जनता आणि तेथे चालणारे बरेवाईट व्यवसाय याचे सख्य तर जगजाहीर आहे. त्यातून निर्माण होणारा पैसा देशाबाहेर जात असल्यास तो कसा जातो याचा शोध घेतला गेला पाहिजे. छोटे राज्य म्हणून दुर्लक्ष न करता या भागाकडे केंद्रीय यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे.
फक्त विदेशींना भाड्याने देण्यासाठी अशा पाट्या या भागात लागतात आणि त्यावर काही कारवाई होत नाही यातच सारे काही आले. आता या गोष्टींना निर्बंध घालणे फार कठीण बाब. एक तर किनारी भागातील साऱ्या पारंपरिक व्यवसायांची वाट लावत पर्यटनाने आपला कब्जा तेथे बसवला आहे. अनेकांच्या रोजीरोटीचे ते साधनच बनले आहे. केवळ दुकाने, गाड्या, जागा भाड्याने देऊन लक्षावधी रुपये कमावणारे अनेक जण या भागात सापडतील. त्यामुळे कुठलाही सत्ताधारी पक्ष या भागातील या प्रवृत्ती उखडू शकणार नाही. कारण त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे या व्यावसायिकांशी पंगा न परवडणारा आहे. किनारी गोवा, मध्यभागातील गोवा आणि डोंगराळ भागातील गोवा ( सत्तरी, सांगे, केपे आदी) असे तीन भाग निर्माण झाले हे सत्य आहे आणि ते नाकारलेही जाऊ शकत नाही. किनारी भागात राहणाऱ्यांनी घराच्या काही खोल्या या पर्यटकांना भाड्याने देण्यापासून या व्यवसायात पदार्पण केले. एक विदेशी तेथे राहिला की परत जाताना तो दुसऱ्या विदेशीला काकणभर जास्तच भाड्याने ती खोली मिळवून देतो, घरमालकाशी त्याची ओळख करून देतो. त्यापुढे वाहन भाड्याने देण्याचा व्यवसायही युवा वर्गात चांगला फोफावला आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी डोकेफोड करून अर्थार्जन करण्यापेक्षा सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या संधीचा लाभ घेण्याकडे युवावर्गाचा कल राहिल्याचे दिसते. त्यातून वारंवार येणाऱ्या विदेशींची ओळख वाढून, विदेशींबरोबर भागीदारीत व्यवसाय करण्यापर्यंतचा प्रवास केला गेला आहे. सॅटर्डे नाईट बाजाराच्या निमित्ताने अशा प्रकारांची मोठी चर्चा झाली होती, पण नंतर सारे विस्मृतीत गेले. तसेच याही प्रकारांबाबत घडणार आहे. वर्षभराने आणखी कुठले प्रकरण घडेल आणि गोमंतकीय समाजमन जागृत होऊन गोव्याच्या अस्मितेला तडा जाणारे हे प्रकार थांबवावेत अशी मागणी करेल. बैठका होतील , निवेदने देण्यात येतील पण पुढे काय याचे उत्तर मिळणार नाही. पर्यटन क्षेत्राची झालेली वाढ पुरेशी आहे, त्याचा विस्तार न पेलवणारा आहे हे कटू सत्य गळी उतरविणे कठीण काम आहे. पण राज्याच्या हितासाठी ते केलेच पाहिजे. पूर्वी कुटुंबासोबत किनाऱ्यांवर आठवड्यातून एकदा जाण्याची सोय होती. आता नग्न, अर्धनग्न अवस्थेत पहुडणाऱ्या पर्यटकांमुळे ती सोयही हिरावून घेण्यात आली आहे. विदेशींच्या या वागण्याची नक्कल अलीकडे देशी पर्यटकही करू लागल्याने साराच नंगानाच असे दृश्‍य किनारी भागात वर्षातील कुठल्याही दिवशी पाहता येते. या व्यवसायाला शिस्त घालू असे सरकार म्हणत असेल तर ती निव्वळ धूळफेक आहे. विदेशींना जोवर त्यांच्या चलनात दंड ठोठावला जात नाही तोवर येथील कायद्यांची जरब त्यांना वाटणार नाही. गाडी चालवताना हेल्मेट घातले नाही म्हणून होणारा शंभर रुपयांचा दंड ते अशा तुच्छतेने भरतात की तो घेतानाही पोलिसांना शरम वाटावी. पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने देशभरातील नागरिकांची येथे गुंतवणूक आहे. त्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवण्याचा प्रश्‍न आहे. आज कळंगुटसारख्या भागात तेथे सरकारी कामानिमित्त असणारेही खोली भाड्याने घेऊन राहू शकत नाहीत, एवढी भाडी वाढली आहेत. त्यामुळे किनारी भागाचे चित्र डोळ्यासमोर येऊ शकते. हळूहळू आता तुलनेने स्वस्त असणारे मोरजीसारख्या किनारी भागातील जीवन महागडे होत जाईल. त्यातून सर्वसामान्य माणसाला किनाऱ्यावर जाणे ही चैन न परवडणारी ठरू शकते. खरेच असे व्हावे असे सर्वांना वाटते का?

No comments:

Post a Comment