Friday, November 2, 2012

बदलते पर्यटन

गोव्याच्या पर्यटन क्षेत्राने कात टाकण्याची वेळ आली आहे. तसे न केल्यास पर्यटन क्षेत्रालाही ओहोटी लागण्यास वेळ लागणार नाही. दुसऱ्या क्रमांकाचा रोजगार देणाऱ्या या क्षेत्राकडे म्हणूनच लक्ष पुरविण्याची गरज आहे. गेल्या महिन्यात यंदाचा पर्यटन हंगाम सुरू झाला. अद्याप तरी किनारी भागात पार्ट्या सुरू झाल्या आणि मोठ्याने ध्वनीक्षेपक, संगीताच्या आवाजामुळे स्थानिकांच्या झोपेचे खोबरे झाले अशा बातम्या वाचनात आलेल्या नाहीत. त्यामुळे सारेकाही आलबेल असल्याचे चित्र सध्या आहे. राज्यात मार्चमध्ये सत्तारुढ झालेल्या नव्या सरकारने पर्यटनाचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा प्रत्यक्षात अवतरण्याजोगी स्थिती निर्माण होत असल्याचे मानता येईल असे वातावरण आहे.
गोव्यातील किनारे पर्यटकांना भूरळ घालत असले तरी किनारी भागातील सोयींकडे राज्य मुक्तीच्या 50 वर्षात कुणीही गंभीरपणे लक्ष पुरविलेले नाही हे वास्तव आहे. पर्यटन क्षेत्र आपोआप फोफावले आणि त्यातून ते रुजले असे म्हणणेही अतिशोक्तीचे ठरणार नाही. गोमंतकीय जनतेच्या रक्तातच असलेल्या आतिथ्यशीलतेला फारतर त्याचे श्रेय देता येईल. मात्र जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाने झळकणाऱ्या गोव्याच्या किनाऱ्यांवर मुलभूत सुविधाही नसाव्यात या मोठा विरोधाभास आहे. असे असले तरी दरवर्षी देशी विदेशी पर्यटकांचा आकडा वाढतच आहे आणि त्यातून या सुविधा तयार करण्याची गरजही पुसट होत गेली होती.
किनाऱ्यावर येणारे पर्यटक हे प्रामुख्याने समुद्रस्नानासाठी येतात. त्यांना कपडे बदलण्यासाठी व्यवस्था असणे आणि किनाऱ्यावर एकावेळी हजारोंच्या संख्येने असणाऱ्या पर्यटकांसाठी प्रसाधनगृहाची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे मात्र तेवढीही सुविधा किनाऱ्यांवर नव्हती आता सरकारने पुढाकार घेऊन ही व्यवस्था करणे सुरू केले आहे. नाही म्हणायला गेल्या वर्षीपासून जीवरक्षक नेमून आणि सध्या अस्तित्वात नसलेले पर्यटक सुरक्षा दल नेमून सरकारने आपले कर्तव्याचे सोपस्कार पूर्ण केले होते.
किनारी पर्यटनापेक्षा इतर पर्यटन क्षेत्रांचीही व्यवस्था नीट नाही. पर्यटकांनी गोव्यात येऊन काय पहावे याचे नीटपणे मार्गदर्शन करणारी कोणताही व्यवस्था आजच्या घडीला नाही. किनारे, मंदिरे यांच्याभोवतीच पर्यटनाचा फेरा फिरत राहिलेला आहे. तोंडी लावण्यापुरते कृषी पर्यटन आहे. पर्यटनासाठी पायाभूत सुविधा लागतात त्याचे नियोजन व्यवस्थितरीत्या न केल्याने आजवर अनेक पर्यटनस्थळे दुर्लक्षितच राहिली आहेत.
गोवा म्हणजे केवळ मंदिरे आणि किनारे याभोवतीच पर्यटन फिरत ठेवल्याने त्या पर्यटनाला मर्यादा आली आहे. मुळात एकेकाळी सुंदर असलेले किनारे तसे राहिलेले नाहीत.  किनाऱ्यांवर आता कॉंक्रिटची जंगले उभी राहिली आहेत. निसर्ग हा अभावानेच शिल्लक राहिलेला आहे. त्याच्या जोडीला किनाऱ्यांची धूपही वाढत आहे. मंदिराच्या पर्यटनालाही मर्यादा आहे. केवळ सणांच्या निमित्ताने दरवर्षी येणारे आणि निव्वळ पर्यटनांसाठी येऊन मार्गदर्शकाने सुचविले म्हणून मंदिरांना भेटी देणारे सोडले तर मंदिर पर्यटनाच्या मर्यादा स्पष्ट होणाऱ्या आहेत. कुठल्याही मंदिराची व्यवस्थित माहिती देणारे फलक, छायाचित्रे आणि त्याची पर्यटन व्यवसायाची सांगड यांचा अभाव या क्षेत्राच्या वाढीच्या मुळावर आला आहे.
गोव्याच्या या पर्यटनाचा चेहरा आपण बदलणार असे नवे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी सांगितले आणि त्या दिशेने पावलेही टाकण्यास सुरवात केली आहे. गोव्यात कधी नव्हे ते रिव्हर राफ्टींग सुरू झाले आहे. साहस पर्यटनासाठी गोव्यात असलेल्या नानाविध संधीपैकी ही एक संधी. दुधसागराचे पाणी वाहून जाते. कुळ्याहून दुधसागरापर्यंत याच पाण्यातून जीप जातात. पण या मार्गाचा वापर साहस पर्यटनासाठी होऊ शकतो याचा विचारही केला गेलेला नाही.
पर्यटकांची पावले राज्याच्या आतील भागात वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुळात असे करताना काही मुलभूत गोष्टी कराव्या लागतात याकडे आजवर लक्ष दिलेले नाही. कोणते पर्यटनस्थळ कोठे आहे, तेथे जायचे कसे, तेथे कोणत्या सुविधा आहेत, अंतर किती याची माहिती देणारे फलक रस्त्याच्या कडेला पर्यटकांना समजतील अशा भाषेत लावणे आवश्‍यक आहे. शेजारील महाराष्ट्र व कर्नाटकाने अशा फलकांच्या बाबतीत बरीच प्रगती केली आहे. गोव्याचे सांस्कृतिक जीवन, लोकजीवन, लोकनृत्ये, लोकसंगीत, वाद्यसंगीत यांची सांगड पर्यटनाशी घातली गेली पाहिजे. केरळने पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या कला जगभरात पोचविल्या. केरळ देवभूमी ही जाहिरातबाजी त्यांनी आक्रमकपणे केली. केरळच्या तुलनेत गोव्याकडे देण्यासारखे बरेचकाही आहे. हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लीमांच्या लोकसंस्कृतीचे प्रदर्शन जगभरातील पर्यटकांना भूरळ घालू शकेल.
कार्निवल बघण्यासाठी पर्यटक येत असतील तर शिमगोत्सवाची मिरवणूक देश पातळीवर प्रसिद्ध केली पाहिजे. त्यासाठी याची वैशिष्ट्ये लोकांपर्यंत नेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत. शिमगोत्सव, धालोत्सव यासह फुगडीचे नानाविध प्रकार पर्यटकांना निश्‍चितपणे आवडू शकतात. शेजारील सावंतवाडीत डिसेंबरमध्ये होणाऱ्या सावंतवाडी महोत्सवात कोकणी लोककला आणि लोकसंस्कृतीचे प्रदर्शन पर्यटकांसाठी केले जाते व त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो. गोमंतकीय समाज उत्सवप्रिय आहे. त्याच्या उत्सवप्रियतेला पर्यटनाची जोड दिल्यास पर्यटनाला वेगळा चेहरा देण्याची सरकारची इच्छा प्रत्यक्षात येऊ शकते. अलीबागजवळ म्हैशीच्या पाठीवर पर्यटकाला बसवून डोहात डुंबण्याची व्यवस्था करण्याचे कृषी पर्यटन बऱ्यापैकी रुजले आहे. त्याच धर्तीवर गोव्याचे वैशिष्ट्य असलेले काजू फेणीचे गाळप हेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकते. पावाची बेकरीही पर्यटक अनुभवू शकतात.
गोवा म्हणजे किनारे आणि मंदिरे या पलीकडे विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. कारण शेजारील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीने तसेच कारवारपासून उडूपीपर्यंतच्या पट्ट्याने पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पावले टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे या व्यवसायाने परीवर्तनरूपी कात टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. अन्यथा कोणेएकेकाळी पर्यटन व्यवसाय हाही अर्थव्यवस्थेचा कणा होता असे म्हणण्याची वेळ येण्यास वेळ लागणार नाही.

No comments:

Post a Comment