Tuesday, November 6, 2012

पत्रकारिता कोणत्या दिशेने?

पत्रकारिता हा तसा सामान्याशी संबंधित असलेला विषय असल्याने भरडले जाणारे लोक आपला एक आधार म्हणून पत्रकारांकडे पाहत असतात. वर्तमानपत्रात प्रसिद्ध होते ते सगळे खरे असते असा मानणारा एक वर्ग अजूनही अस्तित्वात आहे. पण आजची पत्रकारिता ही खरोखर लोकांच्या अपेक्षांना पुरून उरली आहे काय, असा एक प्रश्‍न पडू शकतो, तसा प्रश्‍न पडण्याजोगी परिस्थिती सभोवताली तयार होत आहे. त्याला कारण कोण याची चर्चा नंतर करता येईल परंतु सध्या परिस्थिती तेवढी अनुकूल नाही असे म्हणता येते.
गोवा हा छोटा प्रदेश असल्यामुळे येथे बांधिलकी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. या बांधिलकीमुळेच पत्रकारांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या दडपण यायला लागते. अर्थात, ते दडपण त्यांनी झुगारायला हवे, असे सर्वसामान्यांना वाटल्यावाचून राहात नाही. पण पत्रकार हाही शेवटी एक माणूसच असल्यामुळे ते त्याला शक्‍य होईल, असे वाटत नाही. म्हणून एखाद्या राजकीय पक्षाची भाटगिरी करणे कधीही योग्य नाही. लेखणीचे फटके मारत येत नसतील तर कमीत कमी वस्तुस्थितीचे आकलन करण्याएवढे ज्ञान तरी पत्रकाराला असायलाच हवे. सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी हाच एकमेव व अंतिम उपाय हाती राहिलेला आहे.
सध्या खप वाढविण्यासाठी आपल्या दैनिकांतून क्‍ल्यू सोडण्याचे प्रकारही हल्ली भलतेच वाढले आहेत. बातमीसमोर प्रश्‍नचिन्ह छापले की झाले. उद्या ती बातमी खोटी ठरली तरी त्या दैनिकांचे वा बातमीदाराचे काहीही बिघडत नसते. पण या प्रकारामुळे त्या दैनिकाची विश्वासार्हता मात्र लोप पावत असते. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे वर्तमानपत्रे जास्तीत जास्त व्यावसायिक बनत चालली आहेत. आता याबाबत फक्त वर्तमानपत्रांनाच दोष देता कामा नये. आज आपण कोणताही "न्यूज' चॅनल पाहिला तर तो संपूर्णपणे व्यावसायिक झालेला दिसून येतो. पण म्हणून व्यावसायिकतेमुळे लेखणीवर बंधने येता कामा नयेत. या बंधनांमुळे पत्रकार लोकांसमोर स्पष्ट परिस्थिती आणू शकत नाही. म्हणूनच कोठे तरी व्यावसायिकता व निस्पृहता यामध्ये एक सीमारेषा आखलेली असली पाहिजे.
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तोच ढासळत चालला आहे, अशी एक तक्रार कधीही व कोणालाही करता येणे सहज शक्‍य आहे परंतु ही परिस्थिती का उद्‌भवली याचा विचार करण्यास कुणालाही वेळ नाही.
आजचा पत्रकार काही अपवाद वगळता, तेवढा झुंजार राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरे लिहिले तर समाजातला एक घटक आपल्याविरुद्ध जाईल, ही भीती सदैव त्याच्या मनी असते. आज प्रत्येकाला हवी असते ती स्तुती. जरा कोठे विरोधात लिहिले की तो घटक त्या पत्रकाराला कायमचा शत्रू बनत असतो. त्यांना स्पष्टवक्तेपणा कधी कधी त्याला भलताच महागही पडू शकतो. अर्थात ते लोक हातात लेखणी एक "शस्त्र' म्हणून घेतात ते परिस्थितीच्या विरोधात असूनही निर्भीडपणे लिहू शकतात.
आपण नेहमी टिळक आगरकरांच्या पत्रकारितेची उदाहरणे देत असतो. पण ती पत्रकारिता इंग्रजांच्या विरोधात होती. आज आपल्याला लिहावे लागते ते स्वकीयांविरुद्ध. तसे लिहायला गेल्यास कित्येक जणांचे सभ्यपणाचे मुखवटे टराटरा फाडता येतील. पण समाजातील विविध बंधनामुळे ते शक्‍य होत नाही. त्यामुळेही पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह लावणेही सोपे झाले आहे.
सध्या प्रसारमाध्यमांत विशेषतः छापील (वृत्तपत्रांच्या) माध्यमात आज तीव्र स्पर्धा आहे. त्यातून टिकून राहणे हे आज या माध्यमापुढे मोठे आव्हान आहे. आज दृकश्राव्य माध्यमांचे ग्लॅमर तरुणपिढीला आकर्षित करीत आहे. मात्र छापील माध्यमात संधी असूनही पत्रकारिता अभ्यासक्रम करण्यासाठी तरुणवर्ग पुढे येत नाही. वृत्ताचे विश्‍लेषण करणे, लिहिणे, ते वाचणे व वाचकांसमोर सादर करणे म्हणजे पत्रकारिता असते. आज राजकारणाचा, उद्योजकांचा वृतपत्रांवर पगडा असल्याचेही पहायला मिळते. प्रत्येक वृत्तपत्राचा वाचकवर्ग असतो. त्यानुसार आपल्या वाचकांना हवे ते देण्याचा वृत्तपत्राचा प्रयत्न असतो. पत्रकार स्वातंत्र्याचा अर्थ या साऱ्याच्या जंजाळात आज म्हणूनच शोधावा लागत आहे.
हे झाले एकंदर पत्रकारितेबद्दल. खुद्द गोव्यातही स्थिती फारशी वेगळी नाही. पोर्तुगीज राजवटीत मराठी भाषेचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न पोर्तुगीज राजसत्तेने केले. हे सारे प्रयत्न अयशस्वी ठरले त्या गोव्याच्या भूमीत मुक्त मराठी पत्रकारितेची गुढी सर्वप्रथम दै."गोमन्तक' या वृत्तपत्राने उभी केली. त्याअन्वये मराठी पत्रकारितेचा पाया घालण्यात आला. तिच्यावर नंतर पन्नास वर्षांत जो कळस घातला गेला त्याविषयी चर्चा करता या क्षेत्रात आलेले व येणारे विविध मतप्रवाह लक्षात घ्यावे लागतात.
क्तीनंतर गोव्यात लोकशाही व्यवस्था आली. त्याकरिता लोकशिक्षण हाच उद्देश ठेवून मराठी पत्रकारितेची वाटचाल सुरू झाली. मनोरंजन हा त्यातील एक भाग होता. आपल्या ध्येय-धोरणांची अंमलबजावणी करताना मराठी पत्रकारिता समाजाच्या वेदनांची आणि भावनांची दखल घेत राहिली. वृत्तपत्रातील आर्थिक व्यवहार हा विषय त्या काळात दुसऱ्या क्रमांकावर होता. दै. गोमन्तक हे वृत्तपत्र सुरू करताना श्रेष्ठ उद्योगपती विश्‍वासराव चौगुले यांनी औद्योगिक केंद्र या दृष्टिकोनातून या वृत्तपत्रीय क्षेत्राकडे पाहिले नव्हते. त्यामुळे दै. गोमन्तक ही एक लोकसंस्था म्हणूनच पुढे येऊ लागली. हे पहिल्या दोन दशकातील चित्र आहे. एक लोकमान्य संस्था म्हणून गोमंतकीय जनतेने हे सत्य मान्य केले होते.
पत्रकारितेस खूप मोठा इतिहास आहे. "दर्पण'कारांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत आणि आगरकरांपासून आचार्य अत्रेंपर्यंत पत्रकारितेतील विधायक दृष्टी राष्ट्र उभारणीच्या कामात जुंपली होती. मुक्तीनंतर गोव्यात ही विधायक दृष्टी आली, तथापि ही विचारसरणी कायम राहिली नाही. समाजातील नागरी शास्त्र जसे फॅशनच्या नावाखाली बदलत जाते तशी मराठी पत्रकारिता राजकारणातील विविध प्रवाहांमुळे चेंगरत गेली. चेंगरत मरण्याऐवजी जगण्याची धडपड करताना मराठी पत्रकारितेने अनेक समझोते केले. त्यातून या क्षेत्रात अनेक बदल होताना दिसू लागले. या प्रवाहांशी लढाई करीत स्व. माधव गडकरी, स्व. भाऊसाहेब ऊर्फ द्वा.भ. कर्णिक यांनी धाडसाने नव्या पिढीकडे परंपरांनी नटलेल्या लेखण्या स्वाधीन केल्या.
गोव्यात लोकशाही आली म्हणजे आता मराठी पत्रकारितेस निश्‍चितपणे चांगले दिवस लाभतील असे दै. "गोमन्तक'चे पहिले संपादक स्व. बा.द. ऊर्फ दादा सातोस्कर यांनाही वाटत होते. तसे काही घडत आहे, असा अनुभव मराठी पत्रकारांना आला नाही. मराठी वाचकांनी सर्व मराठी नियतकालिकांमागे आपली शक्ती उभी केली. म्हणून मराठी भाषा, परंपरा, संस्कृती पत्रकारितेने टिकवून धरली. गोव्यात रोज प्रकाशित होणाऱ्या मराठी दैनिकांनी आपापल्या कुवतीनुसार याच धोरणाची अंमलबजावणी केली. त्यामुळे लोकशिक्षणा बाबतीत मराठी पत्रकारितेचे गोव्यातील कार्य उल्लेखनीय वाटते.
दिवसभर घडलेल्या घटनांचे वृत्त गोळा करून दुसऱ्या दिवशी पहाटे ते लोकांपर्यंत पोचवण्याचे काम वृत्तपत्रांनी केले वा करताहेत. मराठी वाचक रात्री झोपतात तेव्हा दैनिकांची छपाई होते. पत्रकारिता घड्याळाबरोबर पळत असते. एके काळी "हे माझे वृत्तपत्र' असे मराठी पत्रकार म्हणत असत. आज परिस्थिती बदलते आहे. कारण नवे कायदे-कानून आले. कामात सुसूत्रता यावी यासाठी सरकार कामगारांचे हित पाहू लागले. त्यातून वृत्तपत्रीय कामाची दिशा बदलली. वृत्तपत्र म्हणजे आरसा असे मानून नवी पिढी वावरू लागली. परिणामी बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब मराठी पत्रकारितेत दिसू लागले. आणि या घाईगडबडीत वृत्तपत्रीय परंपरेचा विसर पडतोय की काय अशी शंका येऊ लागली. नव्या पिढीची मराठी पत्रकारितेकडे पाहण्याची दृष्टीच बदलली आहे. मराठी वाचकसुद्धा पूर्वीप्रमाणे आत्मीयतेने वृत्तपत्रीय आरशात पाहत नाही. मराठी पत्रकारिता आणि मराठी वाचक यांच्यामध्ये अंतर वाढत आहे. इलेक्‍ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृती ढकलून बाजूस सारली आहे व पाश्‍चिमात्य परंपरेचा प्रचार सुरू केला. तिथे तरुणवर्ग लवकर आकर्षित होऊ पाहत आहे. त्याचसाठी मराठी पत्रकारितेस यापुढे तरी समाजप्रबोधनाचे व्रत स्वीकारावे लागेल. विश्वासार्हता नव्याने निर्माण करावी लागेल. मराठी पत्रकारितेतील प्रशासन व्यवस्था हा एक स्वतंत्र विषय मानला गेला तरी त्या व्यवस्थेवर पत्रकारिता उभी असते. आर्थिक व्यवहार समाजातील वाचकवर्ग सांभाळू शकतो. सरकारी अनुदान जाहिरात रूपाने मिळते त्यावर ही मराठी पत्रकारिता वर्षभर चालणार नाही. गोव्यात तर मराठी पत्रकारितेस सरकारी दडपणास कायम सामोरे जावे लागते. त्या व्यवहारात जी तडजोड करावी लागते ती मराठी पत्रकारितेतील बदलत्या प्रवाहांचे दर्शन नकळत देत असते. द.शं. पोतनीस, गोविंद तळवलकर, यदुनाथ थत्ते, दत्ता सराफ आदी मराठी पत्रकारांनी या व्यवसायास एक आकार देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. समाजातील बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घ्या हेच हे पत्रकार आपल्या लेखनातून करीत आले. त्या बरोबर मराठी पत्रकारिता एक स्वाभिमानी, धाडसी, सत्यवादी वाचक उभा करील असेही त्यांना वाटत होते. हे त्यांच्या दीर्घ लेखनातूनही सिद्ध होते. मात्र आज मराठी पत्रकारिता व्यवहाराकडे अधिक झुकू लागली आहे. प्रसंगी आडवळणातूनही जाताना दिसते. हेच बदलते प्रवाह मानले जातात. मग ते पाहून इतर जाणत्यांनी गप्प राहावे असे म्हणता येत नाही. वाचक वर्गाची बौद्धिक क्षमता मराठी पत्रकारितेने का वापरू नये?
गोवा ही बुद्धिवंतांची, गुणवंतांची भूमी आहे. या भूमीतून त्यांना शोधून काढण्यासाठी मराठी पत्रकारितेने एक शोध मोहीम हाती घ्यावी लागेल. अशा शोधकार्यान्वये मराठी पत्रकारिता समाजाच्या भावनांना स्पर्श करू शकेल. पुढे हेच वाचक वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहातील. आज वृत्तपत्र व वाचक यांच्यामध्ये अंतर दिसते, ते मग दिसणार नाही. 1980 व 1990 या काळाचा मागोवा घेत आपण पुढे गेलो तर या दशकात बेकारी संपवावी म्हणून अनेक तरुण तरुणी या क्षेत्रात आल्या व त्यांच्या व्यावसायिक अज्ञानातून मोठे संकटरूपी वातावरण मराठी पत्रकारितेत तयार झाले. तिथे दुरुस्ती करण्यासाठी गोव्यातूनच नव्हे तर इतर राज्यातीलही प्रादेशिक भाषांमधील पत्रकारांना स्वतः:हून प्रयत्न केले.
गोव्यातील दळणवळणास फार मर्यादा आहेत. ही बाब लक्षात घेतली तर मराठी पत्रकारितेचे अर्थकारणही अशा मर्यादेतच राहणार आहे. या मर्यादांवर कधी खुली चर्चा सरकार दरबारी अथवा सार्वजनिक व्यासपीठावर होत नाही. मराठी पत्रकारितेचे भवितव्य मराठी पत्रकारांबरोबर वाचकांनीही ठरवायचे असते. 1970 पर्यंत मराठी वाचकांच्या आशाआकांक्षांना वृत्तपत्रात अधिकाराने स्थान मिळत होते. कालांतराने नव्या कायद्यांची झळ मत स्वातंत्र्यास लागू लागली. या मर्यादांमुळेही वाचक संभ्रमात पडला. आपण वाट्टेल तेव्हा मराठी वृत्तपत्र वापरू शकतो, ही वाचकांची अपेक्षा फोल ठरू लागली. तेव्हाही मराठी पत्रकारितेवरील वाचकांचा विश्‍वास वितळू लागला.
वाचक, वितरक, जाहिरातदार, वार्तालेखक व इतर संपादकीय वर्ग रोज जे परिश्रम करतो त्या मराठी पत्रकारितेविषयी अनास्था कुणी बाळगू नये. विविध प्रवाह येत असले तरी गोव्यातील मराठी पत्रकारिता तशीच न डगमगता चालणार आहे. उणीव आहे ती ध्येयवादी तरुण पिढीची, प्रशिक्षित पत्रकारांची. सामाजिक बांधिलकी हाच वृत्तपत्रांचा प्राण असतो. ही बांधिलकी मानणारे सच्चा दिलाचे वार्तालेखक मराठी पत्रकारिता खऱ्या अर्थाने सांभाळू शकतील. लोकभाषा जर ओळखता आली तर सतत बदलत्या प्रवाहातही मराठी पत्रकारिता गोव्यात प्रथम क्रमांकावरच राहणार आहे. आजही एक प्रकारची कमतरता जाणवते ती अशी की, मुक्तीनंतरच्या मराठी पत्रकारितेवर संशोधन झाले नाही. संशोधन करायचे असे कुणी ठरवलेच तर आधी मराठी पत्रकारितेचा विकास दाखवावा लागेल.
आजच्या घटकेस अनेक आव्हाने मराठी पत्रकारितेसमोर उभी आहेत. त्यात वृत्तपत्र उत्पादनाचा वाढीव खर्च, सरकारकडून मिळणाऱ्या सोयी, सवलतीत कपात आदींचा समावेश आहे. त्याचसाठी समाज प्रबोधनाची अधिक गरज आहे. मराठी वाचकांच्या श्रद्धांची मस्करी न करता पत्रकारिता एक बलशाली बुद्धिवादी समाज घडवू शकते. ते सामर्थ्य गोव्यातील पत्रकारितेत आहे. ही मराठी पत्रकारिता मराठी माणसाची संस्कृती, भाषा, सांभाळून धरील असे गृहीत धरले जाते. हा विचारप्रवाह लक्षात घेता या क्षेत्राने आता वर्तमान व भविष्यकाळासाठी परिवर्तनाची भाषा स्वीकारावी लागेल.
समाजात नित्य नियमाने दिसणारे प्रवाह आपल्या बौद्धिक वाढीस लाभकारी असतातच असे नाही. वृत्तपत्रांची भूमिका ही कधी कधी वकिलाची असावी लागते. तेव्हा बदलत्या प्रवाहाला रोखून धरता येते. मराठी पत्रकारितेतून वाचकांना सद्विचार देण्याची परंपरा होती., आज ती नाही. सामाजिक जाणिवेचे भान ठेवून समाजातील सत्याचा ठाव घेणे आणि असत्यावर घाव घालणे पत्रकाराचे खरे काम आहे. त्यासाठी सभ्यतेचे सोंग घेतलेल्यांचे बुरखे पत्रकारांनी फाडायला हवेत.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्यांना पत्रकार का व्हावसे वाटते, या प्रश्‍नाचे उत्तर देता येत नाही. नाट्य समीक्षण, मुलाखत किंवा दैनंदिन कार्यक्रम करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. समाजप्रबोधन आणि मनोरंजन ही वृत्तपत्राची भूमिका असते. समाजप्रबोधन अधिक महत्त्वाचा घटक आहे; मात्र सध्या मनोरंजनाला अधिक महत्त्व आले आहे.
""प्रबोधनाची नेमकी व्याख्या नसली तरी केवळ सत्यदर्शन म्हणजे प्रबोधन नव्हे. जे असत्य आहे तेही सांगण्याची गरज आहे. व्यक्तिगत विकासासाठी पत्रकारिता करता कामा नये. राजकारण, उच्च क्षेत्र गढूळ झाले आहे. याला समाजही कारण आहे. असे असले तरी पत्रकाराने सामाजिक जाणिवेचे भान ठेवून लेखणी चालवायला हवी. सभ्यतेचे सोंग घेऊन समाजात वावरणाऱ्यांचे बुरखे फाडण्याचे काम त्यांनी करायला हवे. समाजाची वेदना पत्रकाराने समजावून घेऊन या समस्येला थेट भिडले पाहिजे. पत्रकाराच्या शब्दांत भाव असले तर पत्रकाराला भाव येतो. स्वतःकरता पत्रकारिता करणं हा व्यवसाय आहे, तर समाजाकरिता केलेली पत्रकारिता ही खरी पत्रकारिता असे मानले पाहिजे.

No comments:

Post a Comment