Tuesday, February 18, 2020

आहे आशा अजूनी

तरुणाईची जिज्ञासू मनोवृत्ती असते. इतर कोणत्याही वयोगटातील लोकांपेक्षा, काय चालले आहे आणि का हे जाणण्याची उत्सुकता सर्वात जास्त त्यांनाच असते. तरुणाईतील सर्व उद्याची चिंता करत नाहीत अशी सर्वसामान्य समज असला तरीही प्रत्यक्षात तसे नसते. आपण त्यांच्याशी संवाद साधायला सुरवात केली की वेगळेच चित्र समोर येते. त्यातून असे दिसून येते की, तरुण लोक आपल्या भोवतालच्या परिस्थितीची दखल घेतात आणि मग भविष्यात कशी परिस्थिती असेल याबाबतीत स्वतःचेच निष्कर्ष काढतात. भविष्याविषयीबऱ्‍याचदाकिंवाबहुतेकदाविचार करतात. तरुण लोक आशावादी असले तरी बहुतेक तरुण भविष्याबद्दल थोड्याफार प्रमाणात चिंतीत असतात. कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या कणकवलीजवळच्या वागदे येथील गोपुरी आश्रमाचा संचालक म्हणून काम पाहताना तरुणाईची ही चिंता जवळून पाहता आली.
१९९० मधील तरुणाई आजची तरुणाई यांची तुलना केली तर आजची तरुणाई फार वेगवान झाली आहे. त्यांच्या जगण्याचा संघर्ष फार तीव्र झाला आहे. करिअर कसे होईल ही चिंता डोक्यात घर करून बसलेली जाणवते. अर्थात या साऱ्याचे आरोग्यावर व्हायचे ते बरे वाईट परीणाम होतच जातात.आरोग्य हाच खरा माणसाच्या जीवन जगण्याचा मंत्र आहे. परंतु आजकालच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात तरुणांना स्वत:चे आरोग्य राखण्यासाठी वेळच नाही. नोकरी, शिक्षण, राहणीमान, प्रेम, सोशल साइटवरील प्रसिद्धी या सर्व बाबतीत स्पर्धा सुरु आहे आणि या सर्व गोष्टींचा माणसाच्या मानसिक आरोग्यवार परिणाम होतो. हे चित्र बदलणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी. व्यायाम करावा, नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे, योग्य अशी पुरेपूर झोप घ्यावी, सर्व गोष्टी या सावकाश विचारपूर्वक पद्धतीने हाताळाव्यात. सर्वात मुख्य म्हणजे आपले जे छंद असतील ते जोपासावेत. या सर्वांमुळे आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहील.पण यासाठी वेळच नाही अशी स्थिती आहे. यामुळेही सहनशीलतेला ग्रहण लागल्याचे जाणवते.
ही स्पर्धा थांबणार नाही, त्याला तोंड तर द्यावेच लागणार आहे. तरुणाईचे जीवन हे धावपळीचे स्पर्धात्मक झाले आहे. प्रत्येकाला थांबता थकता कार्य करत राहणे तसेच या स्पर्धात्मक युगात आपलं स्थान निर्माण करणे गरजेचे झाले आहे. सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाइलचं आकर्षण दिसून येते. ज्या व्यक्तीकडे स्मार्ट मोबाइल ती व्यक्ती स्मार्ट असा सध्या लोकांमध्ये न्यूनगंड आहे. स्मार्ट असावे पण ते आपल्या बुद्धीचातुर्याने. या स्मार्ट स्पर्धोत्मक युगात सोशल मीडियाचा वापर नक्कीच करावा परंतु तो एका मर्यादेपर्यंतच असावा. तरुणांमधील हे आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यासाठी शाळा-कॉलेजातून तसेच सरकारी पातळीवर विविध मानसिक आरोग्यासाठीची शिबिरे राबवली जाणे गरजेचे आहे. प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणं काळाची गरज आहे. अन्यथा सहनशीलेचा ऱ्हास कोणत्या थरापर्यंत जाईल आणि त्यातून कोणता सामाजिक उद्रेक होईल हे आताच सांगता येणार नाही.
सहनशीलता घटण्यातून जीवनविषय़क नकारात्मक दृष्टीकोन तयार होत जाते. स्पर्धेत टिकाव लागू शकणार नाही या शक्यतेने काळजी मन पोखरू लागते. मानसिक वैफल्य आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्यास दरवेळेस बाह्यपरिस्थिती कारणीभूत ठरते, असे नाही. काही वेळेस आपल्या मनातील चुकीच्या समजूती कारणीभूत ठरतात आणि मन वैफल्यग्रस्त होते. सतत आपल्या सुरक्षित कोशात मुलांना वाढवणं, लहानपणापासूनच त्यांना सतत एका पोषक वलयाखाली जपणं या सवयी भविष्यात त्रासदायक ठरतात आणि जगरहाटी माहीत नसल्याने मुलांची मने अर्थातच नाजूक आणि कमकुवत होतात. यातूनही सहनशीलता नष्ट होत जाते आणि तो चिडचिडेपणातून जाणवत राहतो. मन मोकळे करणे हा त्यावरील एक उपाय असू शकतो पण अशावेळी मानसोपचारतज्ज्ञांची जरुर मदत घ्यावी. समाजाने घालून दिलेली बंधने पाळण्यात अपयश येणे किंवा एखाद्या गोष्टीविषयी मर्यादेपलीकडे जाऊन विचार करणे, स्वतःवर दडपण ओढवून घेणे ही प्रमुख कारणं आहेत. आयुष्यात समोर आलेलं अपयश पचवण्याची मानसिकता आजकालच्या तरुण पिढीत कमी असल्याची जाणवते. म्हणूनच असे टोकाचे पाऊल उचलण्याइतपत हिंमत तरुण वर्गात दिसते. शैक्षणिक संस्था तसंच सरकारी पातळीवर याविषयी जागरुकता निर्माण करण्यात म्हणावे तेवढे यश आलेले नाही. आपल्या प्रियजनांशी संवाद साधणं आणि त्यांची मनःस्थिती समजून घेणं गरजेचं झालंय. अशा तणावपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे हा चांगला मार्ग आहे.
सावंतवाडीच्या  गुरूवर्य बी. नाईक. महाविद्यालयाचा विश्वस्त म्हणून काम पाहताना महाविद्यालयीन तरुण तरणींशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यातून जाणवले, की मनस्वास्थ्य बिघडवणारी जी प्रमुख कारणे असतात त्यामध्ये चिंता, काळजी किंवा विवंचना यांचा समावेश असतो. 'चिता माणसाला एकदाच जाळत असते, पण चिंता मात्र माणसाला आयुष्यभर जाळत असते' असे म्हटले जाते. तरुणाई सोशल मीडियावरच्या आभासी दुनियेलाच खरी दुनिया मानून जगते. त्यामुळे त्या आभासी दुनियेत जरा चलबिचल झाली तरी त्यांच्या मनाची चलबिचल सुरु. आजच्या युगात आपण सगळे भौतिक गोष्टींमध्ये सुख शोधतो. वाढती स्पर्धा, वेगवान जीवनशैली, प्रत्येकाची पोटापाण्यासाठीची धडपड, स्वतःच्या प्रगतीसाठी चढाओढ याच्या नादात आपल्या माणसांकरता पुरेसा वेळ नसतो आणि मग संवादाच्या अभावामुळे मानसिक आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. काही जण वाढत्या वयात आकर्षणाला प्रेम समजून वाहत जातात. यावर उपाय म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात हक्काची, मनात जे साचलं आहे त्याचा निचरा होण्यासाठी एक जागा असावी. मग तो एखादा गट असेल किंवा जवळची व्यक्ती. त्याशिवाय आवडती कला तन-मन लावून जोपासली तरी. मानसिक आरोग्य जपण्यास मदत होईल आणि त्यातून सहनशीलताच वृद्धींगत होईल.
'अपयश ही यशाची पहिली पायरी असते' हे आजच्या पिढीला फारसे ठाऊकच नाही. तरुणाईला सर्व गोष्टी एकदम फास्ट हव्या असतात. पालक आधीपासूनच मुलांना सगळ्याच गोष्टी देऊ करतात. त्यामुळे 'आपण मागू ते आपल्याला मिळतं' असं त्यांना वाटतं. खरं तर पालकांनी मुलांना आधीपासून 'नाही' या शब्दाची ओळख करुन दिली तर पुढे जाऊन मुलांचे मन अपयशाला सामोरे जाऊ शकते. आधी महागडे शिक्षण, पुढे नोकरी-व्यवसाय हे चक्र म्हणजे जणू जीवघेणी स्पर्धा झाली आहे. वेगवान जीवनशैली आणि वाढत्या कामाचा ताण यामुळे तरुणाईत नैराश्य येऊ लागले हे. करिअरचं टेन्शन आणि त्यातच आलेला सोशल मीडिया यामुळे तरुणाईचे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. तरूणाई सोशल मीडियामध्ये फारच गुंतत चालली आहे. त्यामुळे नको त्या विश्वात ती रमते. त्याचबरोबर रिलेशनशिप, ब्रेकअप, एकाकीपणा, परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास येणारा तणाव यातून मनावर जे ओरखडे उमटतात तेही सहनशीलता नष्ट करण्यास कारणीभूत ठरतात.
या साऱ्या चक्रव्युहातून तरुणाईची सुटका मनावरील ताण हलका होण्यानेच होणार आहे. यासाठी मन मोकळे केले पाहिजे. जगातली सर्वात सुंदर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे कुणाशीही होणारा मनमोकळा संवाद. मनात येईल ते समोरच्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोलणे यामुळे माणसाच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती वा गैरसमज राहत नाही. मनावरचे दडपण, तणाव दूर होतो. आपल्याला एखादी गोष्ट येत नाही म्हणून निराश होणे हे चुकीचे आहे. आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याबाबतचे ध्येय ठरवून घेऊन चालायला हवे. मनमोकळा संवाद साधला पाहिजे, मनमोकळ्या गप्पा मारल्या पाहिजेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही वेळ मिळत नाही, तरीसुद्धा वेळात वेळ काढून आपण मित्र-परिवार यांच्यासोबत मोकळेपणाने बोलायला हवेस्पर्धात्मक युग आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंब व्यवस्थेतील संवाद संपुष्टात आला. संवाद संपल्यामुळे प्रत्येकावर मानसिक ओझे वाढत चालल्याचे दिसते. मनोधैर्याचे अप्रत्यक्षपणे खच्चीकरण होत आहे. तरुणाई या ओझ्याखाली दबली जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे. पालकांनी सातत्याने मुलांशी हितगूज केली पाहिजे. मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले पाहिजेत. युवा पिढीचे मनोबल वाढवण्यासाठी शालेय जीवनापासूनच प्रयत्न व्हायला हवेत. शाळेच्या वेळेतच मुलांकडून योगासने, ध्यानधारणा करून घेतली पाहिजे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसात मानसिक दृष्ट्या सुदृढ पिढी निर्माण होईल.








No comments:

Post a Comment