Friday, December 19, 2014

बंद खाणींच्या वापरातून रोजगारनिर्मितीही शक्‍य

पर्यावरणाचे नुकसान व खाण व्यवसाय यामधील समतोल आता हळूहळू ढासळू लागला आहे. या ढासळत्या पर्यावरणाची दखल घेऊन राज्यातील पडीक खनिज खाणीचे शास्त्रीय पुनर्वसन (रिक्‍लेमेशन) करण्याची गरज निर्माण झाली आहे.
इंडियन ब्युरो ऑफ माईन्स या संस्थेने देशभरातील पडीक खाणींचा अभ्यास करून संपूर्णतः बंद पडलेल्या खाणींची यादी तयार केली आहे. यामध्ये अनेक खाणींचा समावेश आहे. गोव्यात शेकडो खाणी आहेत ज्यामध्ये उत्खनन थांबलेले आहे. परंतु त्याठिकाणी भविष्यात खनिज मिळू शकेल किंवा कालातरांने या खाणी पुन्हा सुरू करता येतील या सबबीपोटी वन संपदा व भूगर्भजलव्यवस्थेचा ऱ्हास पत्करून अनेक खाणी पुनर्वसनाविना पडून आहेत. खनिजसाठा संपुष्टात आल्यावर ही खाण पडीक ठरविण्याचे अधिकार आयबीएम या संस्थेला आहेत. परंतु राज्यातील भौगोलिक क्षेत्रफळ व खाणींची संख्या लक्षात घेता, जुन्या खाणी बंद करून त्याचे योग्य पुनर्वसन होणे गरजेचे आहे.
माईन्स क्‍लोजर प्लॅन नियम ( खाण बंद आराखडा) अस्तित्वात असून पर्यावरणाच्या नुकसानाची दखल घेऊन ठराविक काळानंतर एखादी खाण बंद करून त्याचे पुनर्वसन करण्याची तरतूद आहे. प्रत्येक खाण कंपनीला संबंधित खाणीचा क्‍लोजर प्लॅन खाण सुरू करण्यापूर्वी आयबीएमला सादर करावा लागतो. त्यामध्ये खाणीचे पुनर्वसन कसे होईल व अपेक्षित असलेला खनिजसाठा याची सविस्तर माहिती द्यावी लागते. मात्र खाण आराखड्यानुसार खनिज उत्खनन होते का? याची पाहणी करण्याची व्यवस्था अद्याप अस्तित्वात नाही. ज्याठिकाणी खनिज मिळण्याची शक्‍यता कमी आहे, किंवा अनेक वर्षांपासून खाणी बंद आहेत, त्याचे पुनर्वसन करण्यासाठी आतातरी प्रयत्न करण्याची गरज आहे.
सेझा गोवाच्या साखळीलगत असलेल्या तीन खाणपट्ट्यांपैकी दोन खाणपट्ट्यांत खाणकाम बंद करण्यात आले आहे. 203 हेक्‍टर जमिनीपैकी आता 170 हेक्‍टरवर पुनर्वसन करण्यात आले आहे. खाणकाम बंद झाल्यामुळे सोडून देण्यात आलेल्या खाणीत थोडी माती घालत, एकात मासे पाळण्यात आले आहेत. तर दुसरी खाण पाणी शुद्ध करून पिण्यासाठी पुरवठा करण्यासाठी वापरली जाते.
एक टन खनिज माती काढली जाते, तेव्हा आणखी तीन टन टाकाऊ माती वर येते. ती खाणीशेजारी उभा ढीग पद्धतीने साठविली जाते. खाणकाम बंद करण्यासाठी भारतीय खाण ब्युरोची परवानगी घ्यावी लागते. खाणीत थोडीशी तरी खनिज माती शिल्लक असल्यास ती खाण पुन्हा सुरू करण्याच्या शक्‍यतेने बुजविता येत नाही.
खाणकाम बंद केल्यानंतर खाणींशेजारील ढिगाऱ्यांवर आकेशियाची झाडे लावण्यात आली होती. त्यावेळी खनिज टाकाऊ मातीत अन्य कोणती स्थानिक झाडे लावल्यास मरतात असा अनुभव होता. त्यावर मात करणारे तंत्रज्ञान आता निर्माण झाले आहे. टाकाऊ मातीवर झाड लावण्यापूर्वी तेथे खड्डा खणून, तेथे जैव खते पुरून तो भाग सुपीक करण्यात येतो. त्यानंतर झाड लावल्यानंतर तीन वर्षे निगा घ्यावी लागते. त्यानंतर झाड आपोआप वाढते. त्यांनी या परिसरात बांबूच्या 32 जाती लावल्या आहेत. नक्षत्र वनही उभारले आहे. फुलपाखरांसाठी ताटवाही उभारला आहे. 40 प्रकारची फुलपाखरे निसर्ग अभ्यासक पराग रांगणेकर यांना त्या भागात आढळली होती.
यातून रोजगारनिर्मिती कशी करता येईल हे पाहण्यासाठी मात्र बेळगावातील "संकल्प भूमी' हे सुटीच्या काळात राहण्यासाठीचे ठिकाण गाठावे लागेल. तेथील उद्यमनगर परिसरात टाकून दिलेल्या चिरेखाणीत आता संजय कुलकर्णी या अभियंत्याने निसर्ग फुलवला आहे. त्यातून स्थानिकांना रोजगारही मिळवून दिला आहे. एका बाजूने मोठा दगडी पहाड आहे. तेथून पावसाळ्यात वेगाने पाणी खाली झेपावत असते. पावसाळ्यानंतरही दोनेक महिने हे चित्र कायम असते. या भागात मोठा खाणीचा खड्डा होता. कचरा फेकण्यासाठी या जागेची वापर होत असे. कुलकर्णी यांच्या शोधक नजरेने ही जमीन हेरली. निसर्ग ओराबाडला गेल्याने तो पूर्ववत तरी करू म्हणून त्यांनी ही जमीन मिळविली. त्यांची फौंड्री आहे. त्यांनी त्या खाणीच्या खड्ड्यात फौंड्रीत जळालेली वाळू ओतणे सुरु केले. यातून ती जमीन समतल झाली. हे करताना मात्र त्यांनी पाण्याचे प्रवाह नष्ट केले नाहीत. उलट त्यांना वाट करून दिली. एका नाल्याचे रूपांतर त्यांनी तरण तलावात केले. दुसऱ्या एका नाल्यातील खळाळत्या प्रवाहाचा आधार घेत नौकाविहार करता येईल अशी व्यवस्था केली.
या जमीनीच्या मागील भागात एक वीस फूट खोल खाणीचा खड्डा आहे. तेथे सतत खडकातील फटींतून पाणी झिरपत असते. त्यामुळे खड्ड्याच्या एका बाजूने ते पाणी बाहेरही पडत असते. त्या खड्ड्याच्या काठावर दोन खडकांच्या मध्ये कुटीरे उभारण्याचा विचार त्यांनी केला आणि ती उभीही केली. आज त्या खड्यातील पाण्यात तराफाही सोडला आहे.
नाल्यात नौकानयनाची व्यवस्था करताना तेथेही कुटीरे उभारली. कोणीतरी जाहीर कार्यक्रमासाठी जागा पाहिजे अशी विनंती केली त्यातून ध्वनीवर्धकाशिवाय वापरता येणारी यंत्रणा ध्वनी प्रतिध्वनीच्या तंत्राने त्यांनी निर्माण केले. परिषदेसाठी आवश्‍यक ते सभागृहही उभारले. शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थांसाठी दोन रेस्टॉरंटही सुरु केली. हे वाचून एक प्रश्‍न पडेल यात नवल ते काय. नवल हे की हे सारे करताना त्यांनी निसर्गाचे देणे निसर्गाला परत दिले पाहिजे हा विचार सोडला नाही. त्यांनी हे सारे टाकावू वस्तूंतून उभारले. प्रसाधनगृहातील सोयी वगळता कोणत्याही गोष्टी त्यांनी नव्या कोऱ्या विकत आणल्या नाहीत.
त्यासाठी ते वाडे पाडण्याच्या व्यवसायात शिरले. कोणत्याही बिल्डरला वा विकासकाला वाडा पाडून त्या जागी इमारत पाडायची असल्यास ते काम ते स्वतःकडे घेत. दरवाजे, भिंतीतील कपाटे, सळ्या, तुळ्या, वासे, रीप यांची बेगमी करत. आसपासच्या 10 किलोमीटरच्या परिसरात कोणीतरी वापरून टाकून दिलेली वस्तू जमा करत त्यांनी हे सारे केले आहे. त्यातून त्या जागेच्या आसपास राहणाऱ्यानाच रोजगार मिळवून दिला आहे. खाणीचा टाकून दिलेला खड्ड्याचे निसर्गमय परिसरात रुपांतर करताना तेथे लागणारा भाजीपालाही तेथेच पिकविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे टाकावू खाणीतून काय करता येते याचे एक उदाहरण सर्वांसमोर उभे राहिले आहे.

No comments:

Post a Comment