Friday, December 12, 2014

किनारी भाग शांततेच्या प्रतीक्षेत

देशाला दीड हजार कोटींचे विदेशी चलन गोवा केवळ पर्यटन व्यवसायाद्वारे मिळवून देतो. मात्र पर्यटनाच्या नावाखाली येणाऱ्या विकृतींचे परिणाम काय असतात तेही गोव्याने गेल्या पंचविसेक वर्षात अनुभवले आहे.
डिसेंबर महिना सुरु झाला, की किनारी भागात होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाविषयी स्थानिक लोक आवाज उठवणे सुरु करतात. मुळात असे ध्वनी प्रदूषण पर्यटनासाठी आवश्‍यक आहे का याचा विचार केला गेला पाहिजे. विधानसभेत बोलताना सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांनी पर्यटन क्षेत्राचा विकास करताना गोव्याची ओळख हरवू देऊ नका असे परखड बोल सुनावले होते. खरे तर त्या त्या भागाची ओळख अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. त्यांना गोवा जसा आहे तसा अनुभवण्यास द्यायला हवा. आपण पर्यटकांच्या गरजेनुसार बदलत गेलो तर एक दिवस मूळ गोवा वस्तू संग्रहालयातच पाहण्याची वेळ येऊ शकते.
पर्यटकांसाठी किनारी भागात नाताळच्या आसपास पार्ट्या सुरु होतात. नववर्ष स्वागतासाठी सारे बेहोश होतात आणि किनारी भागाच्या शांततेचा कधी बळी जातो कुणालाच समजत नाही. ध्वनीची पातळी ही डेसिबलमध्ये मोजतात. ध्वनिप्रदूषण हे सर्वांत धोकादायक आहे. कारण इतर प्रदूषणामुळे केवळ शारीरिक स्वास्थ्य बिघडते, पण ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडते, पर्यायाने कुटुंबावर व समाजावर त्याचे परिणाम होतात. ध्वनिप्रदूषणाबाबतची सर्वांत गंभीर बाब म्हणजे प्रदूषणाचा काळ जास्त असेल, तेवढे परिणाम अधिक तीव्र होतात. 40 ते 50 डेसिबलच्या सतत आवाजाने श्रवणशक्ती कमी होते. आवाजाची पातळी, त्याची तीव्रता व त्याचा काळ यावर ध्वनिप्रदूषणाचे परिणाम अवलंबून असतात. दिल्ली येथील नॅशनल फिजिकल लॅबेरोटरीने केलेल्या सर्वेक्षणानुसार सतत 85 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनिपातळी असल्यास कायमस्वरूपी बहिरेपण येऊ शकते. आवाजामुळे झोप चाळवली जाते, झोपेतून जाग येते व परत लवकर झोप लागत नाही. ज्या व्यक्तीची झोप सावध असते, अशा व्यक्तीला जाग येण्यास 45 डेसिबल आवाज पुरेसा होतो व ज्या व्यक्तीला गाढ झोप लागत असेल, त्याला 60 डेसिबल आवाजाने जाग येते. झोपेमध्ये अडथळा आणणे, हा ध्वनिप्रदूषणाचा फार महत्त्वाचा परिणाम आहे. झोप म्हणजे विश्रांती. झोप व्यवस्थित नसेल तर माणसाचे आरोग्य बिघडते.
लोक पार्ट्यांमुळे आवाजाला विरोध करतात त्यामागे हे कारण आहे. गोव्यात कर्णकर्कश ध्वनिप्रदूषणाबाबत जे कायदे आहेत तेही बरेच अपुरे आहेत. ध्वनीसंदर्भात मध्य प्रदेश कायदा आहे तोच गोव्यासाठी लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत कर्णकर्कश संगीताला बंदी आहे आणि त्याचा भंग केला गेला तर पोलिस त्याविरुद्ध कारवाई करू शकतात. या उलट मुंबईतील ध्वनिप्रदूषणाचे कायदे बरेच स्पष्ट आणि विस्तृत आहेत त्यामुळे कारवाई करणे त्यांना सोयीस्कर होते. तो कायदा गोव्याने आपला स्वतःचा कायदा तयार करेपर्यंत वापरात आणला पाहिजे.
औद्योगिक, व्यावसायिक, निवासी आणि शांतता विभाग अशा चार विभागांमध्ये (झोन) आवाजाच्या तीव्रतेनुसार ध्वनी प्रदूषण ठरविले जाते. तथापि, गोव्यात या विविध विभागांच्या विभागणीत सुस्पष्टता नाही. ध्वनी प्रदूषणाबाबत कारवाई करायची तर पोलिसांसमोरील ही एक फार मोठी डोकेदुखी आहे. एखादी ध्वनिप्रदूषणासंदर्भात पोलिसांकडे तक्रार आल्यास त्याची कार्यवाही केली जाते. पोलिस दखल घेत नाहीत अशाही तक्रारी नंतर होत जातात. ज्याने तक्रार दिली त्याच्या ठिकाणापासून "डेसिबल मीटर्स' या ध्वनिप्रदूषण मोजमाप उपकरणाने ध्वनी प्रदूषणाची तीव्रता मोजली जाते. असे मीटर्स मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयांकडेही उपलब्ध आहेत मात्र त्याचा प्रभावी वापर कोणी केला असे ऐकीवात नाही. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अशी यंत्रणा आहे मात्र अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्‍न त्यांच्याकडे आहे. शिवाय त्यांच्याकडे सुरक्षा व्यवस्था नसल्याने मागे सनबर्न संगीत महोत्सवावेळी आवाजाची पातळी नोंद करणाऱ्या मंडळाच्या कर्मचाऱ्यांना महोत्सवाच्या बाऊन्सर्सकडून मार पडण्यापासून ते जरा वाचले होते. यामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी मापन हेही किती जिकीरीचे असते याची कल्पना येऊ शकते.
किनारी भागात रात्री 10 नंतर या आवाजाचा त्रास जाणवतो. ध्वनिवर्धकांच्या भिंती (12- 15 ध्वनिवर्धक) उभ्या केल्याने त्याचा आवाज वाढतो. तो साधारण अर्धा-एक किलोमीटरपर्यंत जातो व सर्वांनाच त्याच्या दणदणीत आवाजाचा त्रास होतो. म्हणजे नुसती ध्वनिवर्धकांची संख्या वाढविल्यानेच त्रास होतो असे नाही, तर ध्वनिवर्धकांना ऍम्प्लिफायरमार्फत शक्ती पुरविली जाते. त्यामुळे तो आवाज "ऍम्प्लिफाय' होतो. या 12-15 ध्वनिवर्धकांना आवाज वाढविण्यासाठी जे ऍम्प्लिफायर वापरले जातात ते 250 ते 1000 वॉटचे असतात. त्यामुळेच तो आवाज वाढून एक किलोमीटरपर्यंत जातो.
या ध्वनिवर्धकांमध्ये बासचे म्हणजे खर्जातले आवाज निर्माण करणारे वूफर्स, बेसबिन स्पीकर्स, हायफ्रिक्वेन्सीचे आवाज निर्माण करणारे मिड स्पीकर्स, ट्यूटर्स असे सर्व मिळून 12- 15 स्पीकर्स असतात. या 250 ते 1000 वॉटच्या ऍम्प्लिफायरमार्फत त्यांना भरपूर शक्ती मिळते व कर्णकर्कश आवाज निर्माण होतो. हा आवाज कमी करण्यासाठी मुळातच फक्त 100 वॉटचा एकच ऍम्प्लिफायर लावला तर या 12-15 ध्वनिवर्धकांना शक्ती कमी मिळून हा आवाज कमी होईल व तो फक्त 100 मीटरपर्यंतच ऐकू जाईल. यापेक्षा ध्वनिवर्धकांसाठी 100 वॉटचा एकच ऍम्प्लिफायर लावण्याची ही सक्ती केली तरच आवाज कमी होईल व ध्वनिवर्धकांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण कमी होईल, सुसह्य होईल. 100 वॉटच्या ऍम्प्लिफायरला फक्त दोनच साधे ध्वनिवर्धक पुरेसे होतात. 100 वॉटच्या ऍम्प्लिफायरला स्पीकर्सची भिंत जरी लावली तरी तो आवाज 100 मीटरपर्यंतच जाईल. त्यांना मिळणारी शक्ती कमी केली तरच हे होऊ शकते. स्पीकर्सची संख्या कमी करणे, हा उपाय नाही. त्याकडे आता तरी सरकारने लक्ष पुरवले पाहिजे.
गोव्याच्या किनारी भागात रात्रीच्यावेळी कुणीही गेले तर तो भाग गोव्याचा आहे असे वाटतच नाही. हा विदेशी प्रांत आहे असाच प्रत्येकाचा समज होतो. उत्तर गोव्यातील मोरजी, बागा, हरमल, अंजुणा, कळंगुट, कांदोळी आणि दक्षिण गोव्यातील कोलवा, पाळोळे, केळशी, माजोर्डा या किनारी भागांमध्ये पर्यटनाच्या नावाखाली हे सारी पार्टी संस्कृती पहावयास मिळते आहे. गोमंतकीय माणूस पर्यटनाने दिलेल्या रोजगारामुळे सुखावला आहे पण पर्यटनाच्या दुष्परिणामांनी धास्तावला आहे. एकेदिवशी नको हे पर्यटन असा लोकजागर होण्याआधी सरकारने याला पायबंद घालून अस्सल गोमंतकीय पर्यटन वाढीवर भर दिला पाहिजे. 25 डिसेंबर फार दूर नाही.

No comments:

Post a Comment