Tuesday, November 18, 2014

लक्ष्मीकांत पार्सेकर

राजकीय वाटचालीपासून आजवर केवळ भाजपमध्येच असलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मुख्यमंत्रिपदाच्या रूपाने मिळाले आहे. पेडणे या मागास तालुक्‍यातील मांद्रे मतदारसंघात 25 वर्षे आमदार असलेल्या आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते ऍड रमाकांत खलप यांना टक्कर देत पार्सेकर यांनी आपली राजकीय कारकीर्द फुलविली आहे.
पार्सेकर यांचे घराणे मराठा, जमीनदार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कट्टर समर्थक. भाजपची उमेदवारी घेण्यासाठी कोणीही इच्छुक नसायचे वा त्या पक्षाशी संबंध सांगायलाही लोक तयार होत नसत त्याकाळात म्हणजे 80 च्या दशकात पार्सेकर यांनी भाजपचा उमेदवार म्हणून मांद्रेतून प्रथम निवडणूक लढविली. अनामत रक्कमही गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यावेळी खलप यांनी प्रचारासाठी पार्सेकर यांच्या कुटुंबातीलच ट्रक वापरला होता यावरून कुटुंबाचा मगोला किती पाठिंबा होता हे दिसून येते.
यामुळे कुटुंबातच बंडखोर ठरलेले पार्सेकर त्यानंतरची विधानसभा निवडणूक गमावूनही खचले नाहीत मात्र 1999 मध्ये पराभूत होऊनही अनामत वाचविण्यात यश आले यातच त्यांना समाधान होते. पेशाने शिक्षक असलेले पार्सेकर सायंकाळी मिळणारा वेळ जनसंपर्कासाठी वापरत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी तरुण कार्यकर्त्याची फळी तयार केली आणि विजय मिळविण्याचा निश्‍चय केला. विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी आणि शिक्षण शास्त्रातील पदवी घेतलेल्या पार्सेकरांचे थेट मुद्याला हात घालणारे वक्तृत्व लोकांना भावू लागले. अखेर 2002 मध्ये अवघ्या 750 मतांनी खलप यांचा पराभव करून ते विधानसभेत पोचले.  त्यानंतर सतत दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.
भाजपचे दोन वेळा ते प्रदेशाध्यक्ष झाले. त्यावेळी भाजपचे सरकार गोव्यात सत्तेत आले. त्यामुळे 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी पार्सेकर यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद देणार असे मनोहर पर्रीकर यांनी सांगितले होते. भाजपची एकनिष्ठ असणारे पार्सेकर मागील खेपेला मंत्रिमंडळात आले नाहीत. त्यांनी ज्येष्ठ असूनही इतरांना संधी दिली. भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर चौथ्या क्रमाकांचे स्थान त्यांनी मंत्रिमंडळात मिळविले.
जे दिसते ते बोलून दाखवायचे हा पार्सेकर यांचा स्वभाव. सकाळी वर्तमानपत्रांचे वाचन केल्यावर व्यायाम वा पोहण्यासाठी आवर्जून वेळ देत आपल्या आरोग्याची काळजी घेणारे ते आरोग्यमंत्री. कधीही मोबाईलवर संपर्क केला तर उत्तर देणारे, कार्यकर्त्यांत रमणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी येथील ते जावई. त्यांच्या पत्नी स्मिता या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका. पूर्णवेळ राजकारणासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदावरून पार्सेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी स्मिता या आजही नोकरी करतात. मागील आठवड्यात देवदर्शनासाठी शेगाव येथे जाऊन आलेले पार्सेकर यांचे मालवणजवळील तारकर्ली हे सुटीसाठीचे आवडीचे ठिकाण. तारकर्ली व आपल्या हरमलमध्ये काहीच फरक नसल्याने घरच्याच वातावरणात निवांतपणा तेथे मिळतो असे त्यांचे म्हणणे.
दिलखुलासपणे प्रत्येकाचे स्वागत करणाऱ्या पार्सेकरांचा स्वभाव मात्र आक्रमक आहे. विधानसभेत आमदाराने प्रश्‍न विचारत खोडी काढण्याचा प्रयत्न केला की पार्सेकरांचा अवतार बघण्यासारखा असतो. ते प्रत्येक मुद्याची राजकीय विरोधकांना चिमटे काढत चिरफाड करतात ती पाहण्यासारखी असते. होय मी करू शकतो, ही भूमिका व्यक्तिगत आयुष्यात बाळगणारे पार्सेकर मुख्यमंत्रिपदी पोचले आहेत. त्यामुळे होय मी पर्रीकरानंतर राज्यशकट हाकू शकतो हेही त्यांनी सिद्ध करण्यासाठी पावले टाकणे त्यांनी सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment