Friday, May 16, 2014

गोव्यात भाजपचा नवा राजकीय अध्याय

गोव्यातील दोन्ही जागा जिंकत भाजपने नव्या राजकीय अध्यायाची केलेली सुरवात आणखी पुढे नेली आहे. समाजमानसावर पकड आहे असा समजल्या जाणाऱ्या चर्चने याखेपेला धर्मनिरपेक्ष उमेदवारांनाच मतदान करा असा आदेश देऊनही जनतेने राज्य सरकारने दोन वर्षात राबविलेल्या कल्याणकारी योजनांना पसंतीची मोहर या निकालातून उमटवली आहे.
उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक हे चौथ्यांदा विजयी झाले असून दक्षिण गोव्यातून ऍड नरेंद्र सावईकर हे प्रथमच निवडून आले आहेत. सावईकर हे राज्य कायदा आयोगाचेही अध्यक्ष आहेत. दक्षिण गोव्यात भाजपने अल्पसंख्याक असलेल्या ख्रिस्ती समाजातील किंवा गावडा, कुणबी, वेळीप या आदिवासी समाजातील उमेदवार का ठेवला नाही असा प्रश्‍न उपस्थित करून भाजपसमोर सुरवातीला कटकटी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा घेणे सुरु केले आणि भाजपच्या बाजूने वातावरण तयार केले. देशभर नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते भाजपने मते मागितली तरी गोव्यात गेल्या दोन वर्षात राबविलेल्या कल्याणकारी योजनांवर आणि सुशासनावर भर देण्यात आला होता. कॉंग्रेसने खासदार फ्रांसिस सार्दिन यांना उमेदवारी नाकारून कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चिडून कॉंग्रेसमधून चर्चिल आलेमाव बाहेर पडले आणि तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार झाले. यानंतर कॉंग्रेसच्या गोटात एकसंघपणा दिसलाच नाही. अनेक गटसमित्या बरखास्त कर, स्थानिक नेत्यांची पक्षविरोधी कारवायांसाठी हाकालपट्टी कर यातच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस मग्न राहिले. फातोर्ड्याचे अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी रेजिनाल्ड विजयी होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ख्रिस्तीबहुल सासष्टी तालुक्‍यापेक्षा (सात विधानसभा मतदारसंघ यात आहेत) भाजपने अन्य भागात लक्ष केंद्रीत केले आणि तीच व्यूहरचना त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली आहे.
उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना कॉंग्रेसने रिंगणात उतरवले होते. दोघेही भंडारी समाजाचे असल्याने उत्तरेत 60 टक्के असलेल्या या समाजाच्या मतविभागणीचा फायदा रवी नाईक यांना होईल असा कॉंग्रेसचा अंदाज होता. मात्र कॉंग्रेस पक्ष आणि रवी नाईक यांची प्रचार यंत्रणा यांचे कधी पटल्याचे दिसले नाही. पक्षाच्या कार्यालयातून त्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रचाराचा कार्यक्रमही मिळत नव्हता एवढी दरी दिसून येत होती. मात्र रवी यांनी एकहाती प्रचार केला. आपल्या स्वतःच्या बळावर ते लढले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे हे प्रचारासाठी अनेकठिकाणी फिरले मात्र 2012 मध्ये सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसला सपशेल नाकारणाऱ्या जनतेने याही खेपेला भाजपच्याच बाजून कौल दिला. आम आदमी पक्षाने उत्तरेतून एकेकाळी नायलॉन 6.6 विरोधी आंदोलन पुकारणारे डॉ. दत्ताराम देसाई यांना उत्तरेतून तर विशेष आर्थिक क्षेत्रांविरोधात (सेझ) न्यायालयीन लढाई जिंकलेल्या स्वाती केरकर यांना दक्षिणेतून रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांची डाळही या निवडणूकीत शिजली नाही.
दक्षिण गोव्यातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या चर्चिल आलेमाव यांनाही जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. हे सारे होत असताना चर्चचा समाजमानसावरील निसटलेला प्रभाव ठळक झाला आहे. भाजपने आपणही धर्मनिरपेक्ष असल्याचे ठासून सांगितले होते, त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले असा दावा भाजप आता करू शकेल. मात्र राजकीय समीकरणे मोडीत काढत अल्पसंख्यांकांना सोबत घेत भाजपने गोव्यात नवा राजकीय अध्याय सुरू केल्याचे आज दिसून आले.

No comments:

Post a Comment