Monday, May 12, 2014

प्रश्‍न केवळ पाण्याचा नाही

धारवाड, हुबळी व इतर शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मृतवत असलेल्या मलप्रभेत कळसा-भांडुरा नाल्याचे पाणी वळविण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. त्याला गोव्याने आक्षेप घेतला आहे.
म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविण्यास जलवाटप तंटा लवादाने अंतरिम आदेशाने बंदी घातली आहे. यामुळे पाण्याची शाश्‍वती झाली असा सरळ अर्थ काढला जात असला तरी हा विषय केवळ पाण्यापुरता मर्यादित नाही. मांडवी ही गोव्याची मुख्य जीवनदायिनी. सत्तरीत तिला म्हादई या नावाने ओळखतात. म्हादई म्हणजे मोठी आई. सत्तरी आणि कर्नाटकातील ज्या परिसरातून ही नदी वाहते तेथील मानव जातीच्याच नव्हे तर वनस्पती, जीवजंतू यांना जगवण्याचे काम ती करते. इतिहासपूर्व काळापासून रानावनात भटकंती करणाऱ्या आदिमानवाला याच नदीत जगण्याचा मंत्र दिला. हजारो वर्षांपासून ही नदी या प्रदेशातील मानवजातीचे अस्तित्व टिकविण्यास महत्त्वाचे व प्रमुख कारण राहिलेली आहे. त्यामुळेच या नदीला मातेचे, मोठ्या आईचे स्थान पूर्वजांनी दिलेले आहे.
सत्तरी परिसरातून ही नदी जेव्हा गांजेहून फोंडा महालात प्रवेश करते तेव्हा सगळेच जण तिला मांडवी म्हणून ओळखतात. कर्नाटक आणि गोव्याच्या भूमिपुत्रांनी आपल्या म्हादईची पूजा केळबाय, गजलक्ष्मीच्या रूपात केली आहे. त्यामुळेच या ठिकाणच्या परिसरात गजलक्ष्मीरूपी म्हादईच्या मूर्ती सापडतात. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात खानापूर विभागातील शिरोली-हेम्माडगा पंचायत विभागात देगावच्या डोंगरांतून म्हादईचा उगम होतो. इथून म्हादईला शीतल पाण्याचा पुरवठा करणारी ओला पानसिरा ही नदी वाहते. देगावातून म्हादई डोंगरातून गवाळी गावात जाते. मधल्या वाटेने तिला नेरसे गावात भंडुरा हा ओहोळ मिळतो.
चिखले गावातून आंबेशीच्या झरीच्या रूपात बैल नदीचा उगम होतो. ही नदी मग धोणलो धबधबा होऊन कोसळते. बैल नदीवरही आता धरण बांधण्याचा प्रस्ताव आहे. आमगाव येथे एक ओहोळ आहे. पावसात तो भरभरून वाहतो. पण उन्हाळ्यात थेंबभरही पाणी नसते. किरवळे गावातून येणारा "डोल्ड' आणि कोंग येथून येणारा कोंगंळा ओहोळ आपले पाणी म्हादईत एकरूप करतात.
म्हादई ज्यावेळी तळेवाडीला पोचते तेव्हा तिला मरडुहाल आणि पानशिऱ्याचे पाणी मिळते. गवाळीहून म्हादई जेव्हा जांबोटी घाटावरून खाली उतरते. जांबोटीच्या चापोळा गावात कोटणी येथे कर्नाटकने मेगावॉट वीज प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न चालवला आहे. कोटणी येथील जंगलातून जाणाऱ्या म्हादईचे विहंगम दृश्‍य दृष्ट लागण्यासारखे असते. गवाळी आणि चापोली गावातून वाहणारी म्हादई व्रजा पोया येथून उंचावरून खाली कोसळते. म्हादई नदीवर अनेक धबधबे आहेत. पण वज्रा पोयाच सर्वांगसुंदर आहे.
देगावाहून नेरसे, कोंगंला, किरवाळे, चापोली, गवाळी, आमगाव, मेंडील होयडा... अशा अनेक गावातून लहान मोठे ओहोळ मिळतात व म्हादईची ताकद वाढते. भीमगडला कुशीत घेऊन वाहणारी म्हादई कृष्णापुरला येते. तिथून कडवळ व पुढे बोंदीर गावात प्रवेश करते. सोनाळ, सावर्डे, वेळगे, खडकी, गुळेली, गांजे इथून सत्तरीची ही म्हादई उसगावहून मांडवी म्हणून ओळखतात.
आज पर्यावरणीय दृष्टिकोनातून या नदीवर अनेक संकटे आहेत. कर्नाटकातील धरण व वीज निर्मिती प्रकल्पांनी तिला बंदिस्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
"कळसा' ही म्हादईची उपनदी असून म्हादई खोऱ्यातील जीवसंपदा या नदीवर पोसली जाते. कळसा - भांडुरा प्रकल्पाद्वारे म्हादईचे पाणी "मलप्रभा' नदीत वळविण्यात येणार आहे. मलप्रभा नदी ही म्हादईची बहीण समजली जाते. म्हादईची उपनदी कळसा व मलप्रभेचा उगम एकाच ठिकाणी आहे. कणकुंबी येथील रामेश्‍वर मंदिरानजीक या नद्या उगम पावत असून त्याचा एक फाटा पश्‍चिमेला (कळसा नाल्याच्या स्वरूपात) व दुसरा पूर्वेला (मलप्रभा नदी) जातो. कळसा नाला म्हादई नदीत विलीन होऊन अरबी समुद्रात, तर मलप्रभा कृष्णा नदीला मिळताना थेट बंगालच्या उपसागरात विलीन होते. आता मलप्रभेचे पात्र आटले आहे. धारवाड, हुबळी व इतर शहरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मृतवत असलेल्या मलप्रभेत कळसा-भांडुरा नाल्याचे पाणी वळविण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकार करीत आहे. त्याला गोव्याने आक्षेप घेतला आहे.
लवादाने अंतरिम आदेश गोव्याच्या बाजूने दिला असला तरी ही लढाई दिसते तितकी सोपी नाही. म्हादईप्रश्‍नी केंद्राने नेमलेल्या लवादासमोर आता आकडेवारीवर दोन्ही राज्ये भर देणार आहे. गोवा सरकारच्या म्हणण्यानुसार मांडवीच्या खोऱ्यात केवळ 1531 दशलक्ष घनमीटर पाणी आहे तर कर्नाटकाच्या म्हणण्यानुसार 5600 दशलक्ष घनमीटर पाणी आहे. गोवा संघप्रदेश असताना व घटक राज्य झाल्यानंतर काही काळ केंद्र सरकारच्या जलस्रोत खात्याने नदीतील पाणी मोजण्याचे काम केले होते. ती आकडेवारी गोवा सरकारला मान्य नाही. पुन्हा यंत्रे बसविण्याचा मुद्दा समोर आला तर त्यातच 10-15 वर्षे जाऊ शकतील. तोवर कर्नाटक पाणी वळवू शकणार नाही, असे त्यांच्या भूमिकेवरून दिसते. गोवा सरकारने 9 जुलै 2002 रोजी केंद्र सरकारला एका पत्राद्वारे लवादाची मागणी केली होती. कर्नाटकाने 16 एप्रिल 2002 रोजी पत्र लिहिले आणि केंद्रीय जल आयोगाने काही पाणी वळविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. त्यानंतर गोव्याने आक्षेप घेत ही परवानगी स्थगित करवून घेतली. त्यानंतर गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आता हा प्रश्‍न लवादासमोर पोचला आहे.
कळसा-भांडुरा प्रकल्पाविरोधात 9 जानेवारी 2009 मध्ये गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर 20 फेब्रुवारी 2009 मध्ये केंद्राने प्रकरणाची पाहणी करून अहवाल सादर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवड केलेल्या समितीने केलेल्या पाहणीत म्हादई नदी वळविली जात असल्याने पश्‍चिम घाटाचे अस्तित्व धोक्‍यात आले असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले होते. असे असतानाही प्रकल्प पुढे रेटण्यात आला होता. कर्नाटकात सरकार कोणाचेही असू दे, त्यांनी हा प्रकल्प इमानेइतबारे पूर्ण करण्यावर भर दिला. भाजपकडून आलेल्या दबावामुळेच आपण म्हादई नदीवरील कळसा-भंडुरा बंधारा प्रकल्पासाठी पायाभरणी केली; मात्र हा प्रकल्प प्रामाणिकपणे मार्गी लावण्याची भाजपची इच्छा नव्हती, अशी कबुली कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 2008 मध्ये दिली होती. नंतर सत्तेवर आलेल्या भाजपच्या येडीयुराप्पा आणि त्यानंतर आता कॉंग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या प्रकल्पाचे काम बंद पाडले नव्हते.
कर्नाटक सरकार म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा एकतर्फी प्रयत्न करीत असून त्यांत केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तंटा सोडवावा, अशी मागणी खासदार शांताराम नाईक यांनी राज्यसभेत केली होती. म्हणजे हा विषय संसदेतही पोचला होता. त्यांनी त्यावेळी
गोव्यात म्हादई खोऱ्याचे 1850 चौरस मीटर लाभक्षेत्राचा भाग आहे तर कर्नाटकात फक्त 375 चौरस मीटर असल्याची आकडेवारी मांडली होती. मात्र त्यावेळी सरकारने हस्तक्षेप करणे नाकारले होते. तत्कालीन केंद्रीय जलस्त्रोतमंत्री पवनकुमार बन्सल यांनी म्हादई नदीच्या पाणी तंट्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दिल्लीत कर्नाटक व गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक येत्या 5 फेब्रुवारी 2010 रोजी बोलावली होती. त्यातूनही तोडगा निघालेला नव्हता. त्यामुळे लवाद लवकर काहीतरी करेल अशा अपेक्षेत राहणे चूक ठरणार आहे. कारण कर्नाटकाचा पाण्यावरून महाराष्ट्र, केरळशी उभा वाद आहे आणि तो सुटलेला नाही. त्यातच त्याने गोव्यासोबत हा वाद सुरू केला आहे. या प्रस्तावित प्रकल्प क्षेत्रात 73 प्रजातीचे मासे, 21 प्रकारचे उभयचर प्राणी, 79 सरपटणारे प्राणी, 84 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती असल्याचे आढळून आले आहे. याव्यतिरिक्त 600 प्रकारच्या औषधी वनस्पती, 333 प्रजातीचे पक्षी, 79 प्रकारची फुलपाखरे आढळतात. एवढा हा प्रदेश समृद्ध आहे. त्यामुळे हा प्रश्‍न केवळ पाणी अडविण्याचा नाही.

No comments:

Post a Comment