Monday, March 17, 2014

यासीनबाबत "अबोल' भटकळ...

पर्दानी कॉलनीत राहणाऱ्या अब्दुल मौलाना हे भटकळ शहराविषयी बरीच माहिती देत होते. मात्र चर्चेची गाडी यासिनवर आली आणि हा विषयच जणू वर्ज्य असल्यागत ते म्हणाले, "और कुछ पुछो भई!'
भटकळमध्ये यासीनचा विषय टाळणारे मौलाना हे एकटेच नव्हेत. या गावातील सगळ्यांनाच ही नवी ओळख नकोशी झाली आहे. गावात आलेल्या कुणीही यासिनविषयी विचारण्याचा प्रयत्न केला तर; एकतर विषयांतर करायचे किंवा बोलायचेच नाही, असे भटकळमध्ये सर्वजण ठरवून करत आहेत. यासीनचे या शहराशी असलेले नातेच पुसण्याचा हा प्रयत्न आहे.
पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या दौऱ्यावेळी पणजीपासून 210 किलोमीटरवरील भटकळला भेट दिली... भटकळवर पूर्वीपासून मुस्लीम बहुसंख्य असल्याने इस्लामी संस्कृतीचा पगडा शहरावर स्पष्टपणे जाणवणारा आहे. आजही ते रूप पालटलेले नाही. कुख्यात अतिरेकी यासीन भटकळ पकडला गेला आणि दक्षिण कर्नाटकातील बंदरगाव वजा शहर असलेले भटकळ 8 वर्षांनी पुन्हा प्रसिद्धीस आले. तत्पूर्वी येथील भाजपचे आमदार डॉ. यु. चित्तरंजन यांची 11 एप्रिल 1996 रोजी हत्या झाली आणि भटकळ पेटले. जातीय दंगलीमुळे मुंबईनंतर भटकळने जगाचे लक्ष वेधून घेतले. तेथील लोक मुंबई व आखातात नोकरीच्या निमित्ताने पूर्वीपासून स्थायिक झालेले. त्यामुळे तेथून लोंढेच्या लोंढे भटकळमध्ये येऊन आदळले. दंगलीचा अंमल साधारणपणे आठवडाभर टिकला. इमारती जाळल्या गेल्या, कैकजणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. तेव्हापासून आजवर भटकळकडे पोलिस यंत्रणा संशयानेच पाहत आहे. देशभरात कुठेही काही झाले तर त्याचे पडसाद भटकळमध्ये उमटू नयेत म्हणून सावधगिरी बाळगली जाते. 1993 च्या मुख्य दंगलीनंतर झालेले किमान सहा दंगे पोलिसांच्या या भीतीस आधारभूत ठरत आहेत. त्यात प्राणहानी झाली नाही तरी हिंसाचारामुळे भटकळ शहर संवेदनशील बनले होते.
दंगलीनंतर उद्‌ध्वस्त झालेले शहर या प्रतिनिधीने पाहिले होते. जळालेल्या इमारती, त्यांचे ढिगारे, बसस्थानकाच्या ठिकाणी राहिलेले मोठे शून्य आजही नजरेसमोर येते. सिनेमा थिएटर तर दोन दिवस धुमसत होते. कैक कुटुंबे यामुळे उघड्यावर आली. मासेमारीसाठीचे साहित्य जळाल्याने अनेकांची रोजीरोटी हिरावली गेली होती.

नजरेत भरणारी पुनर्बांधणी
या पार्श्वभूमीवर यामुळे आता भटकळची झालेली पुनर्बांधणी चटकन नजरेत भरते. जणू दशकापूर्वी आगीत हे शहर होरपळलेलेच नव्हते, अशा पद्धतीने दैनंदिन व्यवहार सुरू होते. सहज म्हणून बंदरावर डोकावल्यावर तेथे भर दुपारी मासळी उतरवून घेण्याचे काम उत्साहात सुरू असल्याचे दिसले. राखेतून झेप घेत उभा राहिलेला कष्टकरी दालदी समाज (मुस्लिमांतील एक पोटजात) तेथे पाहता आला.
दंगलीत एकमेव वाचनालयही खाक झाले होते. त्याची नवी सुंदर वास्तू आता उभी राहिली आहे. थिएटर, बसस्थानक यांची पुनर्बांधणी तर झाली आहेच याशिवाय लहानमोठ्या वस्त्याही उभ्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे कुठेही जाळपोळीच्या खुणा जपल्या गेल्या नाहीत.
मासेमारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या शहराचा आता कायापालट झाला आहे. पूर्वी परदेशी मालावर आयात बंदी होती. त्यावेळी तशा परदेशी वस्तूंचे आकर्षण होते. त्यावेळीही भटकळमध्ये अशा वस्तू चोरीछुपे पद्धतीने मिळत असत. दक्षिणेच्या सहलीवर जाणारे अशा वस्तूंसाठी एकतर रामेश्‍वरम किंवा भटकळला भेट देत असत. आता तर गल्फ बाजार, दुबई मार्केट या नावाच्या मोठाल्या इमारतीच तेथे उभ्या राहिल्या आहेत. कालिकतच्या (केरळ) धर्तीवर भटकळचा हा बाजार विकसित झाला आहे. साध्या परदेशी सुई पासून दुचाकीपर्यंत काय हवे ते विचारा क्षणार्धात हजर करणारा हजरजबाबी विक्रेता येथेच भेटतो. याच बाजारात खलिफा मार्गावरील जाफर शाबुद्दीन भेटले. यासीन असे ऐकल्यावर ते झपाझप चालतच पुढे गेले. जणू या विषयावर त्यांना बोलायचेच नव्हते. असे करणारे ते एकटे नव्हते. भटकळ तालुक्‍यातील बेंग्रे येथील इराप्पा नाईक यांनाही विचारल्यावर त्यांनीही, "जो हो गया सो हो गया, आता तो विषय कशाला' असा सवाल मोडक्‍या हिंदीत केला. यावरून येथील एकूणच मानसिकता लक्षात येते.

भटकळ बाजार सर्वमुखी....
परदेशी वस्तूंच्या साहाय्याने तेथील अर्थव्यवस्थेला एक नवी उभारी मिळू लागली आहे. भटकळला नैसर्गिक बंदर आहे. पूर्वी मंगळूरच्या बरोबरीची मान आयातीच्या बाबतीत भटकळला मिळत असे. आता मंगळूर बंदर विकसित झाल्याने आयातीचा ओघ मंगळूरकडे वळला आणि बंदर ही भटकळची ओळख पुसली जाऊ लागली आहे. तरीही तेथील जनतेने काळाची पावले ओळखत या परदेशी वस्तू विक्रीच्या नव्या व्यवसायात पाय रोवले आहेत. कोरियन, चिनी, तैवानी बनावटीच्या साहित्याने दुकाने तर भरली आहेत वर चोखंदळ ग्राहकासाठी युरोप वा अमेरिकी बनावटीच्या साहित्याची उपलब्धता ही बाजाराची खासियत. ती टिकवून ठेवण्यासाठी लागणारी उपजत हुशारी व्यापाऱ्यांत असल्याने प्रत्येक ग्राहक आपल्याला स्वस्तात वस्तू मिळाली या समाधानातूनच बाजारातून निघतो, तो आपल्या मित्रांना या बाजाराविषयी अवगत करायच्या निश्‍चयाने. त्यामुळे कुठेही औपचारिक जाहिरातबाजी न करता भटकळचा परदेशी वस्तूंचा बाजार आता सर्वमुखी झाला आहे. पूर्वी गोव्याचे हणजूण, बागा, कळंगुट, कोलवा येथील किनारे अशा बाजारांसाठी प्रसिद्ध होते. आता हा ओघ भटकळकडे वळल्याचे जाणवते. त्यामुळे दशकापूर्वी आगीत होरपळलेल्या भटकळवर या परदेशी वस्तूंच्या व्यवहाराची फुंकरच पडली आहे.

No comments:

Post a Comment