Sunday, November 24, 2013

आव्हान गोव्याची बदनामी रोखण्याचे

एका पत्रकार तरुणीचा "थिंक फेस्ट'मध्ये विनयभंग झाल्याचे प्रकरण चर्चेत आले आणि महिलांच्या सुरक्षिततेविषयीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. नवीदिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरण असो किंवा वास्कोतील शाळकरी मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण असो, अशी प्रकरणे प्रसार माध्यमांत आल्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत येतो. त्यामुळे अकारण गोमंतकीय महिला असुरक्षित असल्याचे चित्र समोर आणले जाते. गोव्यातील कोणतीही महिला असुरक्षित नाही. अगदी दुचाकीवरून मध्यरात्रीही महिला प्रवास करते.
गोव्याने पर्यटनातून विकास हे प्रारूप स्वीकारल्यानंतर काही गोष्टी येथे ओघाने येणे साहजिकच आहे. वास्को हे बंदराचे शहर असल्याने त्या शहराला लागून वेश्‍यावस्ती असणेही नैसर्गिकच होते. सरकारने मोठ्या हिमतीने बायणातील वस्ती हटविली तरी शरीरविक्रयाचा व्यवसाय थंडावला असे म्हणता येणार नाही. तो इतरत्र पसरला. देशी महिलांसह विदेशी महिलांना या व्यवसायात ओढले गेले आहे. कायदा यात गुंतलेली महिला बळी (व्हिक्‍टीम) असे म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात तसे असते का हा प्रश्‍न विचार करायला लावणारा आहे. विदेशातून येथे येऊन या महिला कोणते प्रकार करतात हे जाणून घेण्यासाठी "गोवा एस्कॉर्टस' एवढे शब्द जरी "गुगल'मध्ये "सर्च' केले तरी नको असलेली बरीच माहिती मिळून जाते.
दीडेक वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार कामत यांनी मला काही वेबसाईटच्या लिंक ईमेलवर पाठविल्या होत्या. गोव्याची वेबदुनियेत कशी बदनाम प्रतिमा आहे याची माहिती ती वेबसाइट पाहिल्यावर मिळाली. ती प्रतिमा सुधारण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेही प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही. याउलट जगभरात गोव्याची जाहिरात करण्यासाठी या वेबसाईटवरील छायाचित्रांशी साधर्म्य दाखविणारी छायाचित्र असलेली दिनदर्शिका सरकारी यंत्रणांनीच प्रसारित केली होती. काही महिला संघटनांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर त्या यंत्रणेने निर्णयाचे जोरदार समर्थनही केले होते. आता हा मुद्दा दोघांच्याही विस्मृतीत गेला तरी सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुर्लक्षित येणारा नाही. त्यामुळे गोव्यात या खा, प्या, मजा करा अशी खुशालचेंडू प्रतिमा गेल्या अनेक वर्षात तयार झाली आहे. त्यातून महिलांची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे, पण ती गोमंतकीय महिलांची नव्हे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून गोमंतकीय महिला सर्वच क्षेत्रात वावरतात. त्यांना पुरुष सहकाऱ्यांचे अकारण भय वाटत नाही. महिलांच्या कर्तबगारीचे एक उदाहरण येथे नमूद केल्यास देश कुठे आहे आणि गोवा कुठे आहे हे पटू शकेल. नवीदिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर नेमलेल्या चौकशी आयोगाच्या शिफारशीनंतर महिलांनी महिलांसाठी चालविलेली बॅंक सुरू करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. परवा मुंबईत त्याचे पंतप्रधान व केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्‌घाटनही झाले. गोव्यात मात्र महिलांनी महिलांसाठी चालविलेली बॅंक कित्येक वर्षे सुरू आहे. यावरून गोव्यातील महिला किती सक्षम आहेत हे दिसून येते.
काही राज्ये आता मुलींना पित्याच्या मालमत्तेत वाटा देऊ लागली आहेत, गोव्यात हा हक्क पूर्वीपासूनच आहे. समान नागरी कायदा लागू असलेल्या या राज्याचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा. मात्र, तसे न करता इतर राज्यातून येथे येणारे गोवा बदनाम होण्यासाठीच हातभार लावत आहेत. तरुण मुलीला एकटे टाकून स्कार्लेट किलिंग या ब्रिटिश तरुणीची आई गोकर्ण येथे गेली होती. गोकर्ण हे हिंदूंसाठी पवित्र धार्मिक स्थळ असले, तरी अलीकडे ते विदेशींच्या का पसंतीस उतरू लागले आहे हे उघड गुपित आहे. त्या स्कार्लेटचा हणजुणच्या किनाऱ्यावर खून झाला व बदनामी मात्र गोव्याची झाली. गोमंतकीय किनारे असुरक्षित आहेत असे चित्र काही दिवसांपुरते का होईना आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी रंगविले होते. मध्यरात्रीनंतर एकटी तरुणी किनाऱ्यावर काय करत होती असा प्रश्‍न कोणालाही विचारावासा वाटला नाही.
देशात आचार स्वातंत्र्य असले तरी समाजमान्य असे नितीसंकेत आहेत. त्याचे पालन हे व्हायलाच हवे. आजवर अनेक खून प्रकरणात बळी पडलेले आणि मारेकरी हे दोन्ही परराज्यातील आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परराज्यात गुन्हे करून लपण्यासाठी जागा म्हणून गोव्याची निवड करणारे अनेकजण असतात हे वारंवार सांगितले आहे. त्यांच्यातील ती प्रवृत्ती येथे बळावते व आणखी एका गुन्ह्याचा जन्म होतो. त्यामुळेही राज्यातील गुन्हेगारीचा आलेख अकारण उंचावतो आणि गुन्हेगारीची अमुक टक्‍केवारी असणारे राज्य असा शिक्का विनाकारण पडतो. पत्रकार तरुणीच्या प्रकरणातही असेच झाले आहे. सर्व संबंधित येथील नव्हेत केवळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोव्यात येतात, गुन्हा घडतो आणि बातम्यांत मात्र गोव्याचे नाव येत राहते.
हे असे असले तरी एक काळ असा होता, की मुली व महिलांनी सायंकाळी किंवा रात्रीच्यावेळी निश्‍चिंतपणे फिरणे हे धोक्‍याचे वाटत नव्हते. गेल्या पंचवीस वर्षांत गोवा बदलला आणि त्या बदलातून आलेल्या विकृतींमुळे सारेच वातावरण भयावह बनले. एसटीडी बूथवर किंवा झेरॉक्‍स दुकानावर काम करणाऱ्या मुली, बसमधून महाविद्यालयात जाणाऱ्या युवती, नोकरीनिमित्त दुचाकी घेऊन शहरात जाणाऱ्या गावातील महिला या सर्वांचे जीवन असुरक्षित करून ठेवणारी प्रवृत्ती गेल्या वीस- पंचवीस वर्षांत फोफावली आहे. अद्याप त्याची झळ गावांपर्यंत पोचली नसली तरी किनारी भागात महिलांनी सायंकाळी उशिरानंतर एकट्याने प्रवास करणे अतिउत्साही पर्यटकांमुळे धोक्‍याचे ठरू शकते.
यासंदर्भात विचार करताना असे दिसते, की समाजाची घडीच विस्कटू लागली आहे, अशी भीती आता वाटली पाहिजे. चांगले शिक्षण घेणारे, चांगली नोकरी करणारे, आपल्या कुटुंबात व समाजातही चांगल्याप्रकारे राहणाऱ्या तरुणांचा वर्ग एका बाजूला दिसतो आणि दुसऱ्या बाजूला मद्य व अमलीपदार्थांच्या आहारी गेलेल्या, व्यसनी बनलेल्या युवकांचा वर्ग उभा असलेला दिसतो. एकाच गोव्यात हे दोन गोवा दिसून येतात. त्याचा विचार सरकारने केला पाहिजे. त्यातूनही पुढील गोवा घडविण्यासाठी मदत होणार आहे.
मुळात गोमंतकीय महिला रोजगारासाठी घराबाहेर पडणे नवी गोष्ट नव्हे. परंतु 1990 मध्ये आपल्याकडे आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले. या बदलत्या जागतिक परिणामांमुळे महिलांनाही अनेक संधी निर्माण झाल्या. आजपर्यंत चूल आणि मूल या पारंपरिक मानसिकतेमध्ये गुरफटलेली स्त्री बाहेर पडली. प्रगतीची अनेक क्षितिजे तिला खुणावू लागली. नवऱ्याच्या पैशावरच जगणाऱ्या स्त्रिया आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करू लागल्या. या बदलत्या प्रवाहात ज्याप्रमाणे महिला स्वतः:ला बदलत होत्या, त्याप्रमाणेच समाजही स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात कासवगतीने का होईना बदल करीत होता. स्त्रिया घराबाहेर पडल्या. विविध क्षेत्रात नोकरी करू लागल्या. यामध्येही सुरवातीला सकाळी 10 ते 5 या कालावधीतील नोकरी स्वीकारली जायची; परंतु हळूहळू यामध्येही फरक पडला आणि महिला रात्रपाळी करू लागल्या. सुरवातीला आपल्या समाजाने वा व्यवस्थापनानेही महिलांच्या रात्रपाळीला स्वीकारले नाही. भरपूर विरोध केला. मात्र, आता ते सवयीचे झाले आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे गोमंतकीय महिला असुरक्षित झाल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. काही गोमंतकीय महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, घडत आहेत. पोलिसांत गुन्हे नोंद होऊन आरोपींना शिक्षाही झाली आहे, बरेचसे खटले सुरूही आहेत. मात्र, 15 लाख वस्तीच्या गोव्यात अशा गुन्ह्यांचे प्रमाण किती याचा विचार केला, तर फारशी भयावह स्थिती नाही. बस आणि रेल्वेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सशस्त्र पोलिस नेमण्याची वेळ अद्याप आलेली नाही. बंगळूरमध्ये परवा एटीएममध्ये महिलेवर झालेला हल्ला तेथील महिलांच्या सुरक्षिततेविषयी आणि मुंबईतील पत्रकार तरुणीवरील अत्याचार तेथील महिलांच्या सुरक्षिततेविषयी पुरेसे बोलके आहेत. तसे प्रकार येथे झालेले नाहीत आणि होऊही नयेत. मात्र, कुठून तरी येथे येऊन येथे गुन्हा करणाऱ्यांमुळे राज्याचे नाव बदनाम होते हे थांबवले पाहिजे.

1 comment: