Wednesday, July 4, 2018

"लढवय्ये' लुईझिन

लुईझिन फालेरो हे नाव उच्चारल्यावर कॉंग्रेसचे ईशान्य भारतातील सर्वेसर्वा हे आठवल्याशिवाय राहत नाही. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून वावरताना ते गेली कित्येक वर्षे ईशान्येकडील राज्यांतील "सुपर सीएम' होते हे कोणीही नाकारू शकणार नाही. गोमंतकियांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक पदे भुषवलीही असतील. मात्र, त्यांच्याएवढे मानाचे पद कॉंग्रेसने आजवर कोणा गोमंतकीयाला दिलेले नाही.
फालेरो विधानसभेत बोलत असताना ते नेमकेपणाने काही शब्दांवर जोर देतात. हातात कागद असेल तर त्यांनी तो फडकावलाच म्हणून समजा. आपल्या प्रश्‍नाला अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत फिरवून फिरवून तोच प्रश्‍न विचारण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. समोरील मंत्र्यावर शाब्दीक आक्रमण कसे करावे, हे कोणीही त्यांच्याकडूनच जणू शिकावे. जाहिररित्या अशा आक्रमकतेचे अनुभव देणारे लुईझिन खासगीत मात्र तेवढेच मृदू आहेत.
दिल्लीतील राजकारणात रमलेल्या फालेरो यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी पाठवले. राष्ट्रीय सरचिटणीस तोही ईशान्य राज्यांचा प्रभारी या पदावरून प्रदेशाध्यक्ष या पदावर त्यांना आणणे कदाचित अनेकांना कमीपणाचे वाटले असेल. पण फालेरो यांनी ते खिलाडूवृत्तीने स्वीकारले. ईशान्येकडील सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या हाताखाली होते. मात्र गोव्यात आल्यावर ते अन्य राष्ट्रीय सरचिटणीसांच्या हाताखाली आले. फालेरो जेव्हा गोव्यात परतले त्यापूर्वी कॉंग्रेसचे राज्यातील अवसान गळाले होते. सत्ताधाऱ्यांविरोधात कुणीच शड्डू ठोकू शकणार नाही अशी स्थिती होती. कॉंग्रेसजनांत पुन्हा प्राण फुंकण्याची गरज होती. त्या गरजेपोटीच लढाऊ बाण्याच्या लुईझिन यांना गोव्यात पाठवले होते.
फालेरो यांनी ते आव्हान स्वीकारले. नवी फळी उभारली. पक्षातून दुरावलेल्यांना जवळ केले. कॉंग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी प्रत्येकाच्या मनावर बिंबवणे सुरू केले. चिंतन शिबिर घेतले. त्यातून नव्या नेतृत्वाचा शोध सुरू केला. विधानसभा निवडणूक जवळ आली तशी त्यांनी अर्ध्याहून अधिक उमेदवारी ही नव्या चेहऱ्यांना मिळेल, असे जाहीर केले. त्या युवा नेत्यांनी जीव तोडून निवडणुकीत काम केले. लुईझिन यांची कार्यपद्धती यश मिळवून गेली. 2017 च्या निवडणुकीत कॉंग्रेस हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला.
लुईझिन यांच्या नेतृत्वावर आमदारांकडून शिक्कामोर्तब न झाल्याने कॉंग्रेसचे सरकार राज्यात सत्तारुढ होऊ शकले नाही. हे सत्य असले तरी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी ज्या विश्‍वासाने त्यांना परत पाठवले होते, तो विश्‍वास त्यांनी सार्थ ठरवला. पक्ष संघटनेत केवळ धुगधुगी निर्माण करून ते गप्प राहिले नाहीत तर पक्ष संघटना पुरती बळकट केली. निवडणुकीनंतर नावेली या त्यांच्याच परंपरागत मतदारसंघातून निवडून आल्यावर प्रदेशाध्यक्षपदावरून दूर होण्याचा चाणाक्षपणा त्यांनी दाखवला.
गोवा मुक्तीपूर्वी 26 ऑगस्ट 1951 रोजी जन्मलेल्या लुईझिन यांच्यावर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रभाव आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्वांचा प्रभाव हा पूर्वीपासूनच आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे रवींद्रनाथ आणि लेनीन अशी ठेवली आहेत. यावरून हे पुरते स्पष्ट होते. सुरवातीच्या काळात कामगार नेते, वकील म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजवली होती. झुआरी ऍग्रोच्या कामगारांचे प्रश्‍न कामगार नेता या नात्याने त्यांनी अनेकवर्षे हाताळले. त्यावेळीही त्यांच्या कणखर मनोवृत्तीचा परिचय आल्याशिवाय राहिला नव्हता.
लुईझिन दक्षिणेच्या सासष्टीतील असले तरी सासष्टीबाहेरच्या राजकारणाचा त्यांनी सदोदीत विचार केला. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव त्यांना बोचला आणि त्यांनी गोवा सोडण्याचा निर्णय घेतला. ते पक्ष कार्यासाठी दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी आपल्या कार्य संस्कृतीचा ठसा उमटवला. ईशान्येकडील राज्ये ते कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असताना सदोदीत कॉंग्रेसकडेच राहिली. त्याचमुळे आता बदलत्या राजकीय परिस्थितीत ईशान्येकडील उमेदवार निवडीची जबाबदारी त्यांच्याकडे पुन्हा पक्षाने सोपवली आहे. राष्ट्रीय राजकारणात मला परतायचे नाही, असे ते वारंवार सांगत असले तरी पक्षाने दिलेली जबाबदारीचे पालन केलेच पाहिजे, हा त्यांचा बाणा असल्याने ते पुन्हा ईशान्य भारतात सक्रीय झालेले दिसल्यास आश्‍चर्य नाही.
लुईझिन हे नावेलीचे आता सातव्यांदा आमदार झाले आहेत. त्यांचा गोवा विधानसभेतील पहिला प्रवेश हा 1979 मधील. ती निवडणूक त्यांनी 7 हजार 715 मतांनी जिंकली होती. त्याचवेळी कोण हे लुईझिन अशी चर्चा राज्यात सर्वत्र झाली होती. आजवर दोनवेळा त्यांनी मुख्यमंत्रिपदही भुषवले आहे. 1984 मध्ये त्यांनी विजयाचे मताधिक्‍य वाढवून 9 हजार 126 केले. त्यावरून ते मतदारसंघात किती लोकप्रिय झाले होते हे लक्षात येते. त्यानंतर नावेली मतदार व लुईझिन हे समीकरणच झाले होते. त्यानंतर 1989 मध्ये तर ते नावेलीतून बिनविरोध निवडून आले. 1994 च्या निवडणुकीत नावेलीतून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला केवळ 1 हजार 107 तर 1999 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या उमेदवाराला केवळ 2 हजार 293 मते मिळाली होती. यावरून लुईझिन यांचा राजकीय पाया त्या मतदारसंघात किती पक्का होता, हे लक्षात येते. ते पराभूत होतील असे कोणाला सांगूनही खरे वाटत नव्हते. मात्र ती गोष्ट त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय चर्चिल आलेमाव यांनी शक्‍य करून दाखवली. त्यामुळे कंटाळून फालेरो दिल्लीला गेले होते.
कायद्याच्या पदवीसह वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी घेतलेला हा नेता आता राज्याची सेवा करण्यासाठी परतला आहे. आहे ते आयुष्य आता गोव्यातच व्यतीत करणार असे ते सांगतात. उद्योग खाते सांभाळताना त्यांनी "गोवा व्हिजन' हे दूरदृष्टी दर्शवणारे प्रदर्शन आयोजित केले होते. यावरून त्यांच्या एकंदरीत व्यक्तीमत्वाचाच अंदाज येऊ शकतो.

No comments:

Post a Comment