Saturday, November 7, 2015

म्हणून होतो मोपा विमानतळाला विरोध

मोपा विमानतळाला केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण दाखला दिला. त्याचपाठोपाठ पेडणे तालुक्‍यातील या प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी निविदा मागविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आता मोपा विमानतळाला विरोध करण्याची भाषा विशेष करून सासष्टीतून ऐकू येऊ लागली आहे. वरवर दाबोळी बंद होणार म्हणून मोपाला विरोध असे दिसत असले तरी राज्यातील विविध भागातील प्रकल्पांबाबत इतर भागांना असलेले वावडेच यातून दिसते.
भारतीय लष्कराने 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्ती दिली. त्यानंतर 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जाही मिळाला. तरीही गोवा हे राज्य म्हणून एकजीनसीपणाने पुढे का आले नाही, हा प्रश्‍न कायम आहे. पेडण्यातील जनतेला बार्देश आपला कधी वाटला नाही. उलट शिवोली-चोपडेचा पूल होईपर्यंत बार्देशशी तसा व्यावहारिक संबंध प्रस्थापितही झालेला नव्हता. आजही पेडणे तालुक्‍याचे नातेसंबंध उर्वरित गोव्यापेक्षा शेजारील महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याशी अधिक आहेत.
केवळ एका पेडणे तालुक्‍याची ही स्थिती नाही. डिचोली तालुका सत्तरीसारखा नाही. सांगे आणि केपे तालुकेही एकसारखे नाहीत. काणकोणची जवळीक शेजारील कारवारशी लपून राहत नाही. मुरगाव तालुक्‍याला तर बहुभाषिक तोंडवळा केव्हाच लाभला आहे. पणजी वेगळी तर तिसवाडी तालुका वेगळा. सासष्टीची तर गोष्टच वेगळी. बाराही तालुक्‍यांचे स्वतःचे असे वैशिष्ट्य असणे, काही वावगे नाही मात्र हीच वैशिष्टे राज्य म्हणून गोवा पुढे येण्यास अडसर ठरतात त्यावेळी त्यांची दखल घ्यावी लागते. आजही पेडण्यात होणाऱ्या प्रकल्पाला मग तो मोपा विमानतळ का असेना सासष्टीतून विरोध होतो याची कारणे याच भिन्नतेत दडली आहेत. काणकोणमध्ये काही मोठे घडल्यास पेडण्यात तेवढ्या तीव्रतेने त्याचे पडसाद उमटत नाहीत, याचे कारणच बहुतांशपणे असेच आहे. गोवा हे पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात ठेवलेल्या प्रदेशातून आकाराला आले आहे. त्यात कधीही एकजिनसीपणा नव्हता व नाही, हे कटू का असेना सत्य आहे आणि ते मान्यच करावे लागणार आहे.
त्याचच आणखी एक भिन्नतेचा मुद्दा म्हणजे भाषेचा. पेडण्याची बोली वेगळी, ती मालवणी, कुडाळीला साम्य दाखविणारी, सत्तरीतील बोलीमध्ये शेजारील बेळगाव जिल्ह्यातील मराठी शब्दांची पेरणी गैर वाटत नाही. केप्याच्या आणि सांग्याच्या ग्रामीण भागात कर्नाटकातील दांडेली, जोयडा भागात बोलले जाणारे कन्नडमधील काही शब्द हमखासपणे आढळतात. तीच परिस्थिती थोड्याबहुत प्रमाणात काणकोणमध्येही आहे. त्यामुळे राजभाषेचा दर्जा जरी कोकणीला मिळाला तरी सरकारी पातळीवरील कोकणी कोणाला आपली वाटलीच नाही, त्याचे कारण हेच आहे. नाही म्हणायला इतर राज्यांतही प्रांतभेद आहेत. महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, मराठवाडा येथील बोलीभाषा वेगळ्या आहेत. मात्र तो सारा प्रदेश मराठी भाषेच्या विणीने गुंतलेला आहे. तसे गोव्याचे नाही. कोकणीचीच अनेक रुपे असल्याने आणि प्रत्येकाला आपली बोली श्रेष्ठ वाटत असल्याने भाषेच्या माध्यमातून तरी सारे एक होतील, अशी जी एक आशा करण्यास जागा असते तीही येथे नाही.
वर म्हटल्याप्रमाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचे आज राज्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे कृत्रिमपणा यात ठायीठायी वसला आहे. मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवानंतरही गोवा एक राज्य म्हणून एकसंध झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. गोवा राज्य म्हणून विचार केल्यास एक गोष्ट स्पष्टच आहे गोवा हा कोकण प्रदेशाचा एक भाग आहे. इथली परंपरा ही सातेरी रवळनाथ पंथाची (sateri ravalnath cult) आहे. त्यामुळे आजही सांस्कृतिक गोवा हा आजच्या गोव्याच्या सीमेरेषेपलीकडे पोर्तुगीजपूर्व पसरलेला आहे. आजच्या गोव्याचा विचार करत असताना आपल्याला गोव्याचे प्रामुख्याने तीन भाग करता येतात. एक पूर्वोत्तर, दोन दक्षिणपूर्व आणि पश्‍चिमेकडील तालुके. साधारणपणे पेडणे, डिचोली, सत्तरी व फोडा हे तालुके पहिल्या विभागात येतात तर सांगे, केपे व काणकोण हे तीन तालुके तर तिसऱ्या विभागात बार्देश, तिसवाडी, सासष्टी आणि मुरगाव या चार तालुक्‍यांचा समावेश करता येतील. धारबांदोडा, सासष्टी आणि मुरगाव तालुक्‍याचा तोंडवळा या साऱ्यांशी मिळता जुळता नाही. या विभागांचा बारकाईने विचार केल्यास पहिला गट हा महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषेला सलग्न आहे, दुसरा भाग कर्नाटक राज्य आणि कानडी भाषेला सलग्न तर तिसरा भाग दोन्हींच्या मध्ये आहे. या तिसऱ्या विभागावर लॅटिन संसकृतीचा प्रभाव जाणवतो, तो एक स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल.
सांस्कृतिक गोवा सीमेपलीकडे आह.े त्याच्या खाणाखुणा शोधायच्या झाल्यास उत्तरेत खारेपाटणच्या आसपास तर दक्षिणेत कुमठ्याच्या आसपास गोवा होता हे दिसून येते. त्यामुळे गोव्यावर मराठी व कानडी लोकसंस्कृतीचा प्रभाव सर्वांगी भिनत गेल्याचे जाणवते. सूक्ष्म निरीक्षणाने आणि सखोल संशोधनाने हे वास्तव उलगडून दाखविता येणे मुळीच कठीण नाही. गोव्यात केवळ पोर्तुगीज बाहेरून आले असे नव्हे, आजची गोव्याची वसाहत इतिहास आणि मानववंशशास्त्र यांच्या नजरेतून पाहिल्यास इथे नानाविध जाती-जमातीचे, मानव वंशाचे लोक आपापली संस्कृती घेऊन आले. त्यांनी आपली छोटी राष्ट्रे आपल्या या भूप्रदेशात बनविली. त्याची राखण करण्यासाठी राष्ट्रोळी या देवतेची स्थापना केली. बाहेरून आलेल्या या लोकांनी आपली संस्कृती घराघरांत आजही टिकविली आहे. जीवनकलहामध्ये टिकून राहण्यासाठी इथल्या समाजात वावरत असताना इथली सांस्कृतिक बिरुदेही त्यांनी स्वीकारली. ती सामाजिक स्तरावर आजही पहावयास मिळतात. त्याचमुळे केवळ 3700 चौरस किलोमीटर पसरलेल्या गोव्यात एकजिनसीपणा दिसत नाही याचे मूळ कारण येथे दडल्याचे दिसते.
गोव्याची आणखी एक ओळख गोमंतक अशी आहे. गोमंतक हा शब्द इसवी सनापासून कमी कमी अडीचशे वर्षांपासून प्रचारात आहे. हे महाभारताच्या भीष्मपर्वीच्या नवव्या अध्यायावरून कळते. त्यात गोमन्ताः असा शब्द आलेला आहे. तो देश वा लोकवाचक रूपात वापरल्याचे दिसते. सध्या वापरात असलेले महाभारताचे संस्करण ख्रिस्तपूर्व - वर्षांपूर्वीचे असावे, असे गृहीत धरले तरी गोमंतक हा शब्द तेवढाच जुना आहे हे मानता येते. हिंदुस्थानचे दोन दरवाजे या धी गोवा हिंदू असोसिएशनने प्रकाशित केलेल्या ग्रंथात अ. का. प्रियोळकर यांनी म्हटले आहे, की गोमंतक हा कोकण प्रदेशाचा भाग होता. कोकणाचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग मानले गेले आहेत. यापैकी उत्तर कोकणात गावे तर दक्षिण कोकणात गावे येत होती. उत्तरेत दमणगंगेपासून दक्षिणेत गंगावळ्ळीपर्यंत हा प्रदेश पसरलेला होता. कुडाळजवळच्या कुंडलिका नदीने त्याचे दोन भाग केलेले होते. हीच उत्तर व दक्षिण कोकणाची विभाजक रेषा होती. दक्षिण कोकणाला गोमंतक असे नाव होते. यावरून आज सांस्कृतिक गोवा वाटणारा प्रदेश पूर्वी खरोखर अस्तित्वात होता हेही सिद्ध होते.
या प्रदेशावर अनेक राजवटींचे राज्य होते. मौर्य, भोज, आभीर, चालुक्‍य, कदंब, राष्ट्रकूट, शिलाहार, गोवा कदंब, देवगिरीचे यादव, दिल्लीचे सुलतान, बहामनी सुलतान, विजयनगरचे राय, अहमदनगरची महमदशाही, विजापूरची आदिलशाही, पोर्तुगीज, मराठा, सौंधे असा सर्वसाधारण क्रम आहे. याच काळात अनेक प्रकारचे लोकसमूह या प्रदेशात स्थायिक झाले त्यात सुमेरिअन, शक, किरात, शबर, मुंडा, कोल, कुश, गौड, मग, पतेनिक आदी समूहात समावेश असल्याची नोंद इतिहासात आहे. परिणामतः या प्रदेशाची संस्कृती अत्यंत विमिश्र स्वरूपाची बनलेली असून त्याचा शोध घेणे वाटते तितके सुलभ व सोपे काम नाही. मात्र या साऱ्यावरून गोवा पेडण्यापासून काणकोणपर्यंत एक तोंडवळा आजदेखील का धारण करू शकत नाही, याची उत्तरे कशात दडली आहेत याचा थोडातरी अंदाज येऊ शकतो. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर मोपा विमानतळाला होत असलेल्या विरोधाकडे पाहिले पाहिजे.

No comments:

Post a Comment