Friday, July 19, 2013

लढाई, बिबट्या आणि माणसाची

राज्यातील वनक्षेत्र वाढल्याचा दावा वनखाते करते. दुसऱ्या बाजूने बिबटे मानवी वस्तीत घुसण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी असल्या तरी त्या गोष्टी खऱ्या आहेत. बिबटे आणि मानवाचा संघर्ष का होऊ लागला आहे याचा विचार न केल्यास यातून अनेक प्रश्‍न निर्माण होण्याची भीती आहे.
बिबटे शहरात घुसले ही बातमी आता टीव्हीवर पाहण्याइतपत मर्यादित राहिलेली नाही. आपल्या आसपास बिबटे वावरू लागले आहेत. गोव्यात सध्या बिबटे लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. एरवी दाट जंगलात वावरणारा बिबटा लोकवस्तीत घुसण्याचा सिलसिला गोव्यात दहाएक वर्षांपूर्वी सुरू झाला. सिकेरी येथे एका पंचतारांकित हॉटेलच्या हेलिपॅडवर आढळलेला बिबटा नंतर गोव्यातील वेगवेगळ्या भागांतील लोकवस्तीमध्ये दिसू लागला. दाबोळीच्या नौदल तळावरही आठनऊ वर्षांपूर्वी बिबटा सापडला होता. नंतर बांबोळी येथे महामार्ग ओलांडत असलेल्या बिबट्याचे दर्शन घडले होते.
अलीकडच्या काही वर्षांत बिबट्याचे दर्शन ही दुर्मिळ बाब राहिली नाही. वाळपई, डिचोली, पेडणे, सासष्टी, केपे व काणकोण या परिसरात बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकायला मिळतात. सासष्टीतील राय, कुडतरी, चांदर, पारोडा, सारझोरा, चिंचोळणे, नुवे या भागात बिबट्यांचा सर्रास वावर आहे. घाटमरड-चांदर येथे तर पाचसहा बिबटे आहेत. वनखात्याने या भागात अनेक वेळा सापळे लावले. पण, या बिबट्यांना पकडण्यात यश आले नाही. बिबटा हा मार्जार कुळातील सर्वांत बिलंदर प्राणी आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्यास बिबटा वाकबगार मानला जातो. म्हणूनच चिता व पट्टेरी वाघांची संख्या कमी होत असताना बिबट्यांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसते. गोव्यात 41 बिबटे असल्याची वनखात्याकडे नोंद आहे. पण, या संख्येपेक्षा तिप्पट बिबट्यांचा गोव्यात वावर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. इतर राज्यांतही बिबटे लोकवस्तीत घुसण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दाट लोकवस्तीच्या मुंबईतही बिबटे सापडले आहेत. सहसा माणसावर हल्ला न करणारा बिबटा नरभक्षक बनल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. हुबळी येथे तीन चार वर्षांपूर्वी बिबट्याने दोन मुलांना ठार केले होते. उत्तराखंडातील तेहरी व छमोली या गावात गेल्या वर्षी दोन नरभक्षक बिबट्यांना वनखात्याने ठार मारले. तर तेहच्या डोंगराळ भागात सहा बिबटे नरभक्षक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गोव्यात डुकरे, कुत्री व मांजरे या पाळीव प्राण्याच्या रूपात बिबट्याला मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. विशेषतः डुकरे हे बिबट्यांचे आवडते खाद्य असल्याचे दिसून आले आहे. तरी बिबट्याची माणसाला भीती ही वाटतेच. याच भयातून आगशी येथे एका बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजावणारा बिबटा लोकवस्तीत का घुसू लागला याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. बिबटा माणसांच्या वस्तीत नव्हे, तर माणूस बिबट्यांच्या वस्तीत घुसू लागलाय असा प्राणीप्रेमींचा युक्तिवाद आहे आणि त्यात बरेच तथ्यही आहे.
बिबटे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात असे अनेक वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला खडतर कष्ट करावे लागतात. त्यातही मांसाहारी प्राण्यांना जास्त. कारण त्यांना शाकाहारी प्राण्यांप्रमाणे आयते अन्न उपलब्ध नसते. आधी भक्ष्य शोधावयाचे, त्याच्या मागावर जायचे, अनुकूल संधी शोधायची आणि मग हल्ला करून शिकार साधायची हे प्रत्येक मांसाहारी प्राण्याला अपरिहार्य असते. एवढे करूनही भक्ष्य मिळण्याची शक्‍यता तुलनेने कमीच. मार्जार कुळात सिंह, वाघ, बिबट्या आणि जॅग्वार (दक्षिण अमेरिका) हे खरे "बडे' सदस्य म्हणावे लागतील. "परिपूर्ण शिकारी' अशीच त्यांची खरी ओळख आहे. त्या तुलनेत फाटकी शरीरयष्टी, लहान आकार आणि कमी वजनामुळे चित्ता दुय्यम ठरतो, त्यामुळे मार्जार कुळातल्या उपकुळात त्याचा समावेश झाला आहे. या सर्वांनी अधिवासही जणू वाटून घेतले आहेत. सिंह कळपाने राहतो म्हणून तो खुरट्या जंगली किंवा मैदानी प्रदेशात वावरतो. वाघाला दाट जंगल पसंत आहे. बिबट्याने मात्र कोणताही भेदभाव न करता मिळेल ते स्थान आपले असे धोरण ठेवले आहे. उग्र आणि कावेबाज स्वभावामुळे बिबटे मात्र नरभक्षक होतात. जिम कॉर्बेटचा रुद्रप्रयागचा, केनेथ ऍण्डरसनचा गुमालपूरचा हे नरभक्षक बिबटेच होते. त्यामुळे काणकोणच्या गावडोंगरीत बिबट्याने माणसावर हल्ला केला यात कोणतेही नवल नाही.
मुळात बिबटे मानवी वस्तीत येऊ नयेत म्हणून वन खाते कोणतीही उपाययोजना करत नाही हा खरा प्रश्‍न आहे. मानवी वस्तीत बिबटा शिरला की तेथे पिंजरा लाव त्याला पकड आणि जंगलात सोड असे वनखात्याचे बिबट्यांबाबतचे सध्याचे धोरण आहे. शिकारीसाठी लोकवस्तीमधील पाळीव जनावरांना लक्ष्य करणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करण्याचे सत्र वन खात्याने सुरू केले आहे. परंतु हे बिबटे जंगलातून लोकवस्तीत घुसण्यामागची कारणे कोणती व त्यावरील उपाय यावर वन खात्याने गांभीर्याने विचार केलेला नाही. बिबट्यांना जेरबंद करून दुसऱ्या जंगलात सोडल्यावर जंगलातील अन्नसाखळीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. मात्र बिबट्यांच्या समस्येवर शास्त्रीय तोडगा काढण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. गावात बिबट्याचा उपद्रव सुरू झाला, की वन खाते त्याठिकाणी सापळा रचून बिबट्याला पकडून अन्य जंगलात सोडून देते. वन खात्याची ही प्रक्रिया काही वर्षांपूर्वी ठीक वाटायची, परंतु आता बिबटे लोकवस्तीत घुसण्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. वन खात्याचे अधिकारी हे बिबटे नेऊन दुसऱ्या जंगलात सोडताहेत. यामुळे ज्या जंगलात पकडण्यात आलेला बिबटा राहतो, तो परिसर मोकळा राहतो, अन्‌ ज्या जंगलात उपद्रवी बिबटे सोडले जातात त्याठिकाणी पूर्वीचा बिबटा व खात्याने सोडलेला बिबटा आल्यामुळे तेथील अन्नसाखळीवर परिणाम होऊ शकतो.
बिबट्यांची नैसर्गिक संचार पद्धती त्यांच्या कृत्रिम स्थलांतरणाने बदलल्यास भविष्यात त्यांच्या एकूण अधिवासावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. बिबटा हा क्षेत्रीय प्राणी (टेरिटोरियल) असल्यामुळे आपले संचार क्षेत्र हा प्राणी आखून घेतो. त्या क्षेत्रात दुसरा बिबटा घुसत नाही. अशा परिस्थितीत बिबटाविरहित जंगलपट्ट्यात दुसऱ्या क्षेत्रातील बिबटा सहजपणे शिकार मिळत असल्याने संचार करतो. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना जंगलामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे असा समज होतो. लोकवस्तीमध्ये बिबट्यांचा संचार वाढला आहे, याचे कारण बिबट्यांची संख्या वाढली आहे, असे नव्हे तर विकासाचे लोण जंगलापर्यंत पोचल्यामुळे बिबट्यांचे अस्तित्व लोकांना सातत्याने जाणवू लागले आहे.
बिबट्या दिसला, बिबट्याने हल्ला केला, बिबट्यासारखा प्राणी दिसला, या आणि अशा प्रकारच्या बऱ्याच अफवा हल्ली सर्वांच्या कानावर पडत आहेत. गेल्या काही वर्षांत राज्यात पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या डोक्‍यात बिबट्या चांगलाच भिनला आहे. तथापि बिबट्यापेक्षा साधारणपणे बिबट्यासारखाच दिसणारा "तरस' हा प्राणी जंगल परिसरात परिसरात अधिक आढळतो, हे वास्तव आहे. बिबट्यासारखा प्राणी दिसला अशा घटना बऱ्याच घडल्या आहेत. बिबट्यासारखा प्राणी ज्यांनी पाहिला, त्यांनी ती साधारण संध्याकाळची वेळ सांगितली आहे. मात्र बिबट्या दिवसासुद्धा शिकार करतो आणि तरस फक्त रात्रीच्या वेळी शिकार शोधण्यासाठी बाहेर पडतो. बिबट्याला अशा अफवांमुळे बदनाम करणारा तरस हाच प्राणी आहे.
"निसर्गाचा सफाई कामगार' असे संबोधले जाणारे तरस साधारणपणे करड्या-तपकिरी रंगाचे असते. त्यावर आडवे धुसर पट्टे असतात. त्यामुळे तो साधारण पट्टेरी वाघाच्या किंवा बिबट्याच्या बछड्यासारखा दिसतो. प्रत्यक्षात बिबट्याचा रंग तांबूस पिवळसर असून त्यावर काळे ठिपके असतात. पाळीव जनावरांना असला तरी तरसापासून माणसाला तसा धोका नाही. शिवाय राजबिंडा बिबट्या आणि कुत्रा वर्गातील तरस यांची तुलना होऊच शकत नाही. मात्र मुळात सर्वांच्या मनात बसलेली बिबट्याची भीती आणि रात्रीच्या अंधारात लांबून भासणारे दोघांच्या बाह्यरूपातील काहीसे साम्य, यामुळे लोक तरसालाच बिबट्या समजून भेदरून जातात. त्यामुळे पावलांचे ठसे घेऊन वन खात्याने याबाबत लोकांना सत्य नेमके काय हे सांगण्याचीही वेळ आली आहे.

No comments:

Post a Comment