Saturday, April 5, 2025

भाजपचा प्रवास ः संघर्षातून स्थैर्याकडे!

 भाजपने आज गोव्यातील राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि येत्या काळातही ही पकड अधिक दृढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोव्यातील जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष हा प्रवास म्हणजे एका विचारसरणीचा, नेतृत्वशैलीचा आणि राजकीय संघटन कौशल्याचा वेध घेणारी कहाणी आहे.


गोव्यातील जनता पक्ष ते भारतीय जनता पक्षाचा प्रवास हा केवळ पक्षवाढीचा प्रवास नाही, तर तो गोव्याच्या राजकीय मानसिकतेतील परिवर्तनाचा आरसाही आहे. १९७० च्या दशकात सुरू झालेला काँग्रेसविरोधाचा प्रवाह, ८० च्या दशकात भाजपच्या रूपाने आकार घेत गेला. मनोहर पर्रीकरांसारख्या नेतृत्वामुळे हा पक्ष केवळ राजकीय संघटना न राहता, एक विश्वासार्ह पर्याय म्हणून लोकांसमोर उभा राहिला. आज भाजप हा केवळ सत्ताधारी पक्ष नाही, तर भविष्यातील गोव्याच्या राजकारणात दीर्घकाळ टिकणारा एक प्रभावी घटक म्हणून दिसतो आहे.


गोव्यात भाजपाचा प्रवास हा संघर्षातून स्थैर्याकडे गेलेला आहे. १९८० च्या दशकात स्थानिक राजकारणात स्थान मिळवण्यासाठी धडपडणारा पक्ष, आज राज्याचा प्रमुख पक्ष बनला आहे. यामध्ये संघटनशक्ती, नेतृत्वातील सातत्य, स्थानिक प्रश्नांची जाण, आणि वेळोवेळी भूमिका बदलण्याची लवचिकता या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. स्व. मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व, केंद्रातील सत्तेची साथ, संघटनांच्या माध्यमातून समाजाशी जोडलेली नाळ, आणि विरोधकांतील फाटाफूट, साऱ्याचा परिणाम म्हणून गोव्यात भाजपाची सत्तास्थापना यशस्वी झाली आहे.

गोव्याचे राजकारण भारताच्या इतर राज्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे राहिले आहे. भारतात विलीन होण्याआधी पोर्तुगीज सत्तेखाली दीर्घ काळ राहिल्यामुळे गोव्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात पाश्चिमात्य प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. मात्र १९६१ नंतर गोव्याने भारताच्या लोकशाही प्रवाहात पाऊल ठेवले आणि त्यानंतर इथले राजकारणही बदलायला लागले.


या राजकीय वाटचालीत १९७७ नंतर उदयास आलेल्या जनता पक्षाचा आणि पुढे त्याच्याच मूळातून तयार झालेल्या भारतीय जनता पक्षाचा (भाजप) एक वेगळा इतिहास आहे. गोव्यात सुरुवातीला या विचारसरणीला फारसा प्रतिसाद नव्हता. पण वेळोवेळी राजकीय बदल, नेतृत्वाच्या शैलीतील वेगळेपण आणि संघटनेच्या बळावर भाजपाने गोव्यात आपले अस्तित्व निर्माण केले. आज गोवा हा भाजपाचा एक महत्त्वाचा बालेकिल्ला मानला जातो.


भाजपने सध्या गोव्यात आपली मजबूत पकड राखली आहे. पण स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर समाधानकारक कृती न झाल्यास ही पकड सैल होऊ शकते. रोजगारनिर्मिती, पर्यटन नियोजन, जमीन हस्तांतरणाचे कायदे, आणि खाण व्यवसायाचे नियमन या क्षेत्रांत पक्षाकडून ठोस काम अपेक्षित आहे.


१९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी लागू केल्याने लोकशाही मूल्यांना मोठा धक्का बसला. त्याच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र आले आणि ‘जनता पक्ष’ हा राष्ट्रीय स्तरावर तयार झाला. १९७७ मध्ये या नव्या पक्षाने केंद्रात काँग्रेसचा पराभव करून सत्ता मिळवली. गोव्यातही या लाटेचा परिणाम दिसून आला. त्यावेळी गोवा केंद्रशासित प्रदेश होता आणि येथील राजकारण प्रामुख्याने ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष’ आणि युनायटेड गोवन्स यांच्या भोवती फिरत होते. १९६३ मध्ये येथे पहिल्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्या काळात ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष’ आणि युनायटेड गोवन्स यांचा प्रमुख प्रभाव होता. मगोने मराठी भाषिक समाजाचा, तर युगोने ख्रिस्ती व शहरी जनतेचा पाठिंबा मिळवला होता.


जनता पक्षाने सुरुवातीला सगळीकडे थेट निवडणूक लढविण्यापेक्षा, काँग्रेसविरोधी भूमिकेतून एक पर्याय तयार करण्याचा प्रयत्न केला. १९७९ मध्ये तीन ठिकाणी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण यश मिळाले नाही. त्‍यांनी नाउमेद न होता काम सुरु ठेवले आणि गोव्यातील काही बुद्धिजीवी, समाजसुधारक व संघटनांतील कार्यकर्ते जनता पक्षाच्या कार्यप्रणालीकडे आकृष्ट झाले.

जनता पक्षाच्या आंतरिक मतभेदांमुळे त्याचे केंद्रातील सरकार फार काळ टिकले नाही. विविध विचारधारांचे लोक एकत्र येऊन तयार झालेला हा पक्ष फार काळ एकसंध राहू शकला नाही. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या नेत्यांना पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले गेले.

१९८० मध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, भैरोंसिंह शेखावत आदी नेत्यांनी मिळून 'भारतीय जनता पक्ष' (भा.ज.प.) स्थापन केला. भाजपाने “गांधीवादी समाजवाद” आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आग्रह धरला. प्रारंभी त्याला फारसा यश लाभले नाही, पण संघटनेचे मजबूत जाळे आणि निष्ठावान कार्यकर्ते यामुळे पक्षाची घडी मजबूत होत गेली.


सामाजिक स्तरावर स्थान!

गोव्यात मात्र भाजपाची सुरुवात अंमळ संथ झाली. काँग्रेस, मगो आणि स्थानिक पक्ष यांच्या वर्चस्वात भाजपाला स्थान निर्माण करणे, हे आव्हान होते. सुरुवातीच्या दशकात भाजपाचे काम मुख्यतः संघाच्या कार्यकर्त्यांवर आधारित होते. १९८० नंतर भाजपाचा गोव्यातील खरा पाया बांधण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका होती. संघाचे कार्यकर्ते ग्रामीण भागात, विशेषतः हिंदू बहुल भागात आपले सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य सुरू ठेवून होते. त्यातूनच पुढे भाजपाला कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळे तयार करता आले. संघाच्या माध्यमातून शिक्षण, सेवाकार्य, धार्मिक उत्सवांचे आयोजन यांचा उपयोग करत भाजपाने हळूहळू सामाजिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले. याला राजकीय रूपांतर देण्याचे काम १९९० नंतर सुरू झाले.


पर्रीकर ः मजबूत चेहरा

१९९० नंतर भाजपाने गोव्यात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात भाजपाच्या राष्ट्रवादी विचारसरणीला चालना मिळाली. त्याच दरम्यान

काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि मगोच्या कमकुवत होत चाललेल्या पकडीतून भाजपाला संधी मिळाली. या दशकात मनोहर पर्रीकर या नेतृत्वाने गोव्यात भाजपाला एक मजबूत चेहरा दिला. आयआयटी ग्रॅज्युएट असलेल्या पर्रीकरांनी संघाच्या कार्यपद्धतीतून आलेली शिस्त, जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, स्वच्छ प्रतिमा आणि प्रशासनातील कल्पकता या गुणांमुळे भाजपाचे अस्तित्व समाजात दृढ केले. त्यांची शैली पारंपरिक नेत्यांपेक्षा वेगळी होती, जी विशेषतः युवा वर्गाला भावली.


भाजपची प्रतिमा...

गोव्यातील ख्रिस्ती समाज पारंपरिकतः काँग्रेसकडे झुकलेला होता. पण मनोहर पर्रीकर यांच्या काळात भाजपने त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न केले. शिक्षण, सुरक्षा आणि ख्रिस्ती समाजाच्या श्रद्धास्थळांप्रती आदर या गोष्टींमुळे भाजपाची प्रतिमा थोडी सुधारली. यंत्रणा भाजपने आधुनिक प्रचारतंत्राचा प्रभावी वापर करून तरुण मतदारांपर्यंत संपर्क प्रस्थापित केला आहे. व्हॉटसॲप गट, फेसबुक पेज, आणि स्थानिक भाषेतील प्रभावी संदेशांमुळे भाजपची पोहोच वाढली. त्याचवेळी तरुण नेत्यांना पुढे आणून त्यांनी ‘नवे गोवा’ या आशयावर काम केले. त्याचे दूरगामी सकारात्मक आजवर दिसून येत आहेत.


स्थानिक प्रश्नांवर लक्ष

१९९४ च्या गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पहिल्यांदाच चार जागा जिंकल्या. विशेषतः मनोहर पर्रीकर यांचा राजकारणातील प्रवेश हा भाजपासाठी निर्णायक ठरला. आयआयटी ग्रॅज्युएट असलेले पर्रीकर एक वेगळ्या प्रतिमेचे नेते होते. अभ्यासू, सडेतोड, तांत्रिक ज्ञान असलेले आणि संघटनेशी निष्ठावान. त्यांनी आपला मतदारसंघ (पणजी) मजबूत केला आणि भाजपासाठी शहरी, सुशिक्षित वर्गात एक नवा आधार तयार केला. पर्रीकरांनी स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. पाणी, कचरा, शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाची प्रतिमा ‘सामाजिक काम करणारा पक्ष’ म्हणून तयार होऊ लागली.


पर्रीकर मुख्यमंत्री बनले!

२००० मध्ये मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले आणि भाजपासाठी हा एक मैलाचा दगड ठरला. भाजपाच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक घटना होती. ही सत्ता फार काळ टिकली नाही, पण भाजपाला यानंतर निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका मिळत गेली. २००२ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आला. त्यांनी राज्यातील प्रशासनात पारदर्शकता आणली, भ्रष्टाचाराला थोपवले आणि शिक्षण, पायाभूत सुविधा यावर भर दिला. यानंतर भाजपाची राज्यात भरभराट सुरू झाली. काँग्रेसमध्ये अस्थिरता वाढत गेली आणि अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत गेले. पर्रीकरांनी पक्षवाढीसोबतच समाजातील विविध घटकांमध्ये भाजपाच्या विचारसरणीचा प्रसार केला. त्यांनी हिंदुत्वाचा उघड प्रचार न करता, विकासाच्या अजेंड्यावर भर दिला. २०१२ मध्ये भाजपाने बहुमत मिळवले आणि पुन्हा सत्ता मिळवली. पर्रीकर केंद्रात संरक्षणमंत्री होऊन गेले तरीही राज्यात भाजपाचे वर्चस्व कायम राहिले.


सर्वसमावेशक पक्ष

२०१२ च्या निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले. यामध्ये एक विशेष गोष्ट घडली. भाजपाने अनेक ख्रिस्ती उमेदवारांना उमेदवारी दिली आणि काही जण विजयीही झाले. यामुळे गोव्यात भाजप केवळ हिंदूंचा पक्ष राहिला नाही, तर सर्वसमावेशक पक्ष म्हणून उभा राहिला. "सर्वांच्या विश्वासाने विकास" हे पर्रीकरांचे धोरण इथे यशस्वी ठरले. या काळात भाजपाची ओळख एक सक्षम आणि शिस्तबद्ध पक्ष अशी झाली. भाजपाचे कार्यकर्ते गावपातळीवर उतरून जनतेशी जोडले गेले. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि राज्यात पर्रीकरांचे नेतृत्व या दुहेरी परिणामामुळे भाजपाची गोव्यातील ताकद बळकट झाली.


अखेर बहुमत सिद्ध!

पर्रीकर यांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक धोरण, गुंतवणूक आकर्षित करणे, पर्यटनाचा विकास यावर भर दिला. त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणली आणि भ्रष्ट्राचारविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे गोव्याच्या जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढू लागला. ते दिल्लीत गेल्यानंतर २०१७ च्या निवडणुकांमध्ये भाजप बहुमतापर्यंत पोहोचला नाही. पण त्यांनी मगो, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्ष आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. पर्रीकर परत मुख्यमंत्री झाले, पण त्यांचे आरोग्य ढासळले आणि २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर भाजपपुढे नेतृत्वाचं मोठं आव्हान निर्माण झाले. तरीही भाजपाने आपले संघटन मजबूत ठेवले आणि केंद्रातील सत्तेचा प्रभाव वापरून राज्यात पकड घट्ट केली. डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करून भाजपने नेतृत्वात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला. २०२२ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, मगो अशा विविध पक्षांमुळे विरोधकांचे मत विभाजित झाले. भाजपाने २० जागा जिंकून पुन्हा सत्ता स्थापन केली. भाजपाने पुन्हा एकदा अपक्ष आणि मगोला आपल्याकडे वळवले आणि बहुमत सिद्ध केले.


एक मजबूत पक्ष

गोव्यात आज भाजप हा एक मजबूत पक्ष म्हणून उभा आहे. स्थानिक पातळीवर भाजपाने आपली संघटन रचना बळकट केली आहे. हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास याचा समतोल राखून पक्षाने आपली पकड टिकवली आहे. गोवा, आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि समृद्ध संस्कृतीसाठी ओळखले जाणारे राज्य, त्याच्या राजकीय इतिहासातही अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा साक्षीदार राहिले आहे. पोर्तुगीज सत्तेखालून मुक्त झाल्यानंतरच्या काळात, गोव्याच्या राजकारणात विविध पक्षांचे उदय आणि अस्त झाले. भाजपने मात्र आपली घोडदौड कायम राखली आहे. सत्तेवर आल्यानंतर भाजपाने विकास प्रकल्प, पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, तसेच शिक्षण आणि आरोग्य यावर काम सुरू ठेवले. विरोधकांनी भाजपावर “सत्तेसाठी काहीही” अशी टीका केली, पण भाजपाची पकड कायम राहिली आहे. भाजपचा "संघटनात्मक काटेकोरपणा", "नेत्यांची तत्परता", व "सत्तेसाठी आवश्यक आघाड्या उभ्या करण्याची क्षमता" हे मुद्दे आजवरच्या वाटचालीत महत्वाचे ठरले आहेत.


‘भाजप’चा सत्ताप्रवास..!

गोव्यात एकेकाळी भाजपला कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळत नव्हते. काही जण ‘भाजीपाव’ पार्टी म्हणून हिणवत असत. आज जो, तो भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर ऊर्फ दामू नाईक यांनी साखळी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना हे उद्‍गार काढले. 

राजेंद्र आर्लेकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, मनोहर पर्रीकर मिळेल त्या वाहनाने राज्यभरात फिरत. मिळेल ते खाऊन त्यांना मुक्काम ठोकावा लागत असे. अशा परिस्थितीत त्यांनी भाजप वाढवला, फुलवला असे दामू यांनी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. हेच सत्य आहे. 

गोवा हे सांस्कृतिक वैविध्याने नटलेलं, ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न आणि राजकीयदृष्ट्या नेहमीच गुंतागुंतीचे राज्य. १९६१ मध्ये भारतात विलीन झाल्यावर गोव्यात राजकीय प्रयोगांची सुरुवात झाली. भारतीय राजकारणाच्या प्रवाहात अनेक पक्षांनी येथे आपली उपस्थिती नोंदवली. पण “जनता पक्ष” या एकत्रित राजकीय प्रयोगातून उगम पावलेला “भारतीय जनता पक्ष” (भाजप) मात्र गोव्यात अत्यंत रोचक आणि अभ्यासनीय प्रवासातून स्थिरावला.

गोव्यात भाजपला हिंदुत्ववादी छाया असलेला, मर्यादित विचारसरणीचा आणि मुख्यतः शहरी उच्चवर्गातील लोकांचा पक्ष म्हणून पहिले गेले. याचे मुख्य कारण म्हणजे गोव्याची मिश्र धार्मिक लोकसंख्या- सुमारे २५-३०% ख्रिस्ती, उर्वरित हिंदू व मुस्लिम. त्यामुळे भाजपचे “हिंदुत्व” हे एक अडथळा ठरत होते. या काळात भाजपला फारशा जागाही मिळत नव्हत्या. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, नानाजी देशमुख यांसारख्या नेत्यांनी याला आकार दिला. पण गोव्यामध्ये भाजपचा अजिबात प्रभाव नव्हता. 

१९८० च्या दशकात भाजप गोव्यात प्रभावहीन होता. हे दशक काँग्रेस आणि मगो यांच्यातील सत्तासंघर्षाने व्यापलेले होते. भाजपकडे ना प्रभावी नेतृत्व होते, ना खास मतदारसंघ. त्यात गोव्याचे मिश्र धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप पाहता भाजपची "हिंदुत्ववादी" प्रतिमा रोख ठरत होती. त्या काळात भाजपकडे फारशा जागा नव्हत्या; अनेकदा त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत असे.

या काळात भाजपने संघटनात्मक पातळीवर मुळे रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला. गोमंतकात शाखा, बूथ कार्यकर्ते, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने या माध्यमातून पक्षाने उपस्थिती दर्शवण्यास सुरुवात केली. संघ परिवाराचे कार्यकर्ते आणि विद्वान नेते गोव्यातील विशिष्ट गावांमध्ये कार्यरत राहिले.

१९९४ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा ४ जागा मिळवल्या. हे विजय आकड्याच्या दृष्टीने कमी असले, तरी वैचारिक परिवर्तनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले. याच निवडणुकीत मनोहर पर्रीकर हे प्रथमच निवडून आले. पर्रीकर एक आयआयटी इंजिनीअर, स्वच्छ प्रतिमेचे, अभ्यासू आणि स्थानिक प्रश्नांशी जोडलेले नेतृत्व म्हणून उदयाला आले. त्यांनी गोव्यात भाजपचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली. त्यांनी “हिंदुत्व”च्या पलिकडे जाऊन “शासन व्यवस्थेतील पारदर्शकता, स्थानिक प्रश्नांवर लक्ष, भ्रष्टाचारविरोधी भूमिका” यावर भर दिला. या काळात त्यांनी सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, शालेय शिक्षण या विषयांवर सभागृहात मुद्देसूद भाषणं केली. त्यामुळे भाजपची प्रतिमा हळूहळू बदलू लागली. त्यांच्या भाषणांमधील आक्रस्ताळेपणा नसलेली नम्र पण ठाम मांडणी ही गोव्याच्या प्रगल्भ जनतेला पटली. सरकार आले आणि गेलेही पण भाजपने समाजात विचार पेरणी सुरुच ठेवली. 

पुढे २०१२ मध्ये भाजपने २१ जागा जिंकल्या स्पष्ट बहुमत मिळवले. यामागे काँग्रेस सरकारातील प्रचंड भ्रष्टाचार, खाण घोटाळा आणि जनतेचा असंतोष कारणीभूत होता. यावेळी पर्रीकरांनी “सामाजिक सलोखा, प्रादेशिक अस्मिता आणि पारदर्शकता” या त्रिसूत्रीवर भर दिला. ख्रिस्ती समाजाचाही काही प्रमाणात भाजपकडे ओढा झाला. पर्रीकरांचे विधान – “गोवा हा गोमंतकीयांचा आहे, धर्माच्या आधारावर विभागणी आम्ही मानत नाही”  हे प्रभावी ठरले. पर्रीकरांनी हिंदुत्वाच्या पलीकडे जाऊन “गोमंतकीय अस्मिता” यावर भर दिला. त्यांनी वारंवार म्हटले, “गोवा सर्व धर्मीयांचा आहे. आम्ही राजकारणाला धर्माच्या चौकटीत पाहत नाही.”

पुढे सत्ता स्थापनेसाठी २०१७ मध्ये खेळी करण्यात आली २०२२ मध्ये अपक्ष आणि मगोचा पाठिंबा घेतला. गोव्यातील राजकारण हे केवळ जनादेशावर नाही, तर “संघटनशक्ती, लवचिकता आणि राजकीय खेळी” यावरही अवलंबून आहे हेच यातून अधोरेखित केले. भारतीय जनता पक्ष ही आता राजकीय व्यवहारक्षमतेची आणि सत्तास्थैर्याची ओळख बनली आहे. ही परिवर्तनाची गोष्ट मनोहर पर्रीकरांपासून सुरू होते आणि डॉ. प्रमोद सावंतांपर्यंत पोहोचते. प्रमोद सावंत हे आयुर्वेदीक डॉक्टर आणि पर्रीकरांचे विश्वासू कार्यकर्ते. त्यांनी कारभार हळूहळू सावरला. त्यांच्या कार्यकाळात कोरोनाच्या संकटाला सामोरे जात सरकारने आरोग्य यंत्रणा स्थिर ठेवली. ई गव्हर्सनन्स, डिजिटल सेवा केंद्रे, पर्यटन क्षेत्रात सुधारणा हे त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत.

भाजपने स्थानिकतेशी जुळवून घेतले, मतविभागणी न करता समाजमन जिंकण्याचा प्रयत्न केला, आणि प्रशासनात पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या यशात काँग्रेसच्या गोंधळलेल्या नेतृत्वाचाही वाटा आहे.

आज भाजप गोव्यात “एकमेव स्थिर सत्ता पर्याय” म्हणून ओळखला जातो. पण हे यश केवळ संघटनात्मक ताकदीमुळे नाही, तर लोकांशी प्रामाणिक संबंध, सुस्पष्ट नेतृत्व व दीर्घकालीन नियोजनामुळे आहे.

भाजपचा गोव्यातील प्रवास

गोव्यात जनता पक्षाचे सुरुवातीचे अपयश आणि नंतर भाजपाने मिळवलेले यश हा एक प्रदीर्घ राजकीय प्रवास आहे. हे यश एकट्या पक्षाचे नसून नेतृत्व, संघटन, रणनीती, आणि विरोधकांच्या दुर्बलतेच्या एकत्रित परिणामाचे फळ आहे. गोव्याच्या सामाजिक-सांस्कृतिक संमिश्रतेत भाजपने आपले स्थान निर्माण करून राजकारणाचा नवा अध्याय लिहिला आहे.

भाजपचे यश केवळ निवडणुकीपुरते नाही. त्यांनी स्थानिक पातळीवर बूथ समित्या, युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी व अल्पसंख्याक सेल्स यांचा मजबूत आधार उभा केला. या संघटनात्मक बांधणीमुळे भाजपचा प्रचार केवळ वरून नाही, तर खालूनही प्रभावी झाला आहे.

गोव्याचा राजकीय इतिहास म्हणजे स्वतंत्रतेनंतर भारतीय राजकारणाच्या पडसादांचे प्रतिबिंब. जनता पक्षाच्या उदयानंतर भाजपापर्यंतचा प्रवास हा केवळ पक्षांचा नाही, तर विचारांचा, नेतृत्वाचा आणि स्थानिक जनतेच्या अपेक्षांचा प्रवास आहे. 

जनता पक्षाच्या विघटनातून १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांसारखे नेते पक्षात होते, पण गोव्यात भाजपाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यावेळी गोव्यात काँग्रेसचा प्रभाव वाढलेला होता आणि भाजपाला “उत्तरेकडील हिंदी पट्ट्याचा पक्ष” म्हणून पाहिले जात होते. गोव्यात १९९० नंतर राजकारणात नाट्यमय वळणं आली. काही महिन्यांत मुख्यमंत्र्यांचे बदल, अपक्ष आमदारांची महत्वाकांक्षा, आणि पक्षांतराची ‘सांस्कृतिक परंपरा’ रूढ झाली होती.

१९९० मध्ये सरकार एका रात्रीत कोसळलं. विरोधी आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवल्याची बातमी पेपरांत छापली गेली. सकाळी सत्तांतर झालं आणि सरकार बदललं. गोवा राजकारणाने “resort politics” ही संज्ञा अनुभवली, जिचं पुढे देशभर अनुकरण झालं. १९९४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने पहिल्यांदा ४ जागा जिंकल्या. यापैकी एक होते मनोहर पर्रीकर — त्यावेळी एक शिक्षणतज्ज्ञ, पण अभ्यासू आणि स्पष्टवक्ते राजकारणी. त्यांनी आपल्या सडेतोड शैलीने भाजपाच्या विचारधारेला गोव्यातील सामान्य माणसाशी जोडले.

त्याच वर्षी भाजपने काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पर्रीकरांनी “भ्रष्टाचारविरोधी मोहीम” छेडली होती आणि काही अधिकाऱ्यांवर थेट आरोप लावले होते. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. गोव्यात भाजपाचा एक नवा चेहरा तयार होत होता - अभ्यासू, आधुनिक, आणि तरीही जमिनीवरचा. २००० मध्ये मनोहर पर्रीकरांनी गोव्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला अपक्षांच्या मदतीने पाडले होते. पर्रीकर यांनी गोवा विद्यापीठ, वाहतूक व्यवस्था, आणि शिक्षणात अनेक सुधारणांचे बीज रोवले. लोकांचा त्यांच्या निर्णयक्षमतेवर विश्वास होता. २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला  २१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत. पर्रीकर यांच्या "सामाजिक समरसता" धोरणामुळे ख्रिस्ती मतदारांचाही काही प्रमाणात झुकाव भाजपकडे झाला. प्रचारात त्यांनी “शब्दाला जागणारा नेता” ही प्रतिमा तयार केली होती.

त्या निवडणुकीपूर्वी एक गमतीदार किस्सा झाला होता. पर्रीकरांना एका चर्च जवळ भाजपचा प्रचार करताना बघून काही जणांनी आश्चर्य व्यक्त केले. पण त्यांनी फक्त इतकेच उत्तर दिले, “मी फक्त राजकारण करत नाही, लोकांना भेटायला आलोय.”

१७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रीकर यांचं निधन झाले. गोव्यातील प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना हे वैयक्तिक दुःख वाटले. त्यांची कार्यशैली आणि अपार श्रम हे सगळ्यांनाच प्रेरणादायी वाटत होते. पक्षाने प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले. त्यांनी २०२२ च्या निवडणुकांत भाजपला पुन्हा बहुमत मिळवून दिले. काँग्रेसने ११ जागा मिळवल्या खऱ्या पण त्यांचे ८ आमदार भाजपमध्ये आले.

भारतीय राजकारणात प्रादेशिकतेचा प्रभाव जितका प्रखर आहे, तितकाच तो गोव्यातही प्रकर्षाने जाणवतो. गोव्याचे राजकीय वास्तव हे नेहमीच काहीसे वेगळे आणि अधिक चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे. गोव्याच्या राजकारणात ‘जनता पक्ष’ हा एक क्षणभराचा प्रवाह वाटला असला तरी त्यातून जन्मलेला ‘भारतीय जनता पक्ष’ (भाजप) हा आज गोव्यात सत्ता स्थिर ठेवणारा प्रमुख पक्ष बनला आहे.

गोव्याच्या राजकारणात जनता पक्ष फक्त एक हस्तक्षेप करणारा प्रयोग होता, पण त्यातून जन्मलेला भाजप हा गोव्याच्या राजकीय पटावर स्थायिक झाला.

गोव्यात भाजपने आपली सत्ता बळकट केली, तर काँग्रेसचे नेतृत्व आणि गोंधळ वाढतच गेला. गोव्याच्या राजकारणात जनता पक्षाने सुरुवातीला अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागले, तर भाजपने संयम, नेतृत्व, आणि संघटनबळ यांच्या जोरावर हळूहळू आपली पकड निर्माण केली. मनोहर पर्रीकरांचा व्यक्तिमत्त्व, काँग्रेसचे गोंधळ, आणि भाजपाचे संधीचं सोनं करण्याचे राजकारण हे या प्रवासाचे तीन मुख्य स्तंभ होते. गोव्याच्या राजकारणात पक्ष बदलणं सहज आहे, पण मतदारांचा विश्वास टिकवणं कठीण आणि भाजपने आजतागायत त्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न केले, हे नाकारता येणार नाही.

भाजपने “हिंदुत्ववादी” ओळखीपलीकडे जाऊन “विकास, सुशासन आणि स्थैर्य” या मुद्द्यांवर विश्वास निर्माण केला. मात्र आजही गोवा हे प्रादेशिक अस्मितेच्या आणि राष्ट्रीय पक्षांच्या संघर्षाचं रंगमंच आहे.